रायगड स्वारी - हे होणें तर श्रींच्या मनात होते...

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

रायगडला मी गेल्या १०-११ वर्षात गेलो नव्हतो. ३१ डिसेंबर १९९७ला माझी शेवट्ची फेरी झाली होती, पण त्यानंतर काही केल्या योग येत नव्हता. अगदी माझे वडील जेव्हा तीन वर्षे महाडला होते तेव्हाही मी जाऊ शकलो नव्हतो. गेले खुप दिवस मनात विचार होता पण वेळ मिळत नव्हता. योगयोगनेही अजुन रायगड पाहिला नव्हता त्यामुळे तोही यायला तयार होता. पण १ तारखेला सकाळी अचानक रायगडावर जायचे हा विचार मनात आला आणि सहज म्हणुन ईंद्राला फोनलो. तर ह पठ्ठया म्हणतो उद्याच जाऊया. मग किरु, दोघे आनंद, घारुअण्णा, दिपक्, योगी सगळ्यांना फोन केले. त्यात फक्त योगी तयार झाला. म्हणजे आता अस्मादिक, योगयोग, इंद्रा आणि योगी असे चौघे मावळे तयार झले होते. दुपारी पुन्हा इंद्राला फोन केला तर तो म्हणतो, "अरे, मी तर मस्करी करत होतो, तुम्ही खरोखरच निघालात कि काय?" त्याने मोहिमेतुन अंग काढुन घ्यायचा बराच प्रयत्न केला पण मी परतीचे दोर कापुन टाकले होते. शेवटी रात्री ११.३०ला ठाणे स्टेशनवर भेटायचे ठरले. आणि तेथुन रात्री १२.३० सुटणारी ठाणे पिंपळ्वाडी गाडी पकडायचे ठरले.

मी आणि योगा ७.३० ला ऑफिसमधुन निघालो. योगा विक्रोळिला उतरल्यावर मी सहज म्हणुन दिनेशला (माझा मामेभाऊ) फोन केला. तोही यायला तयार झाला पण राज्य परिवाहन मंडळाच्या गाडीने येण्यास त्याने नकार दिला. मग त्याने एका टवेरा गाडीची सोय केली. मी ही सर्वांना एक गडी वाढल्याची खबर देऊन टाकली.

मध्ये दोन तीन वेळा घारुअण्णांचे फोन येऊन गेले. ते आम्हाला गाडीत बसवायला येणार होते. रात्री ११.३०ला ते मला कळवा नाक्यावर भेटले. आम्ही दोघांनी ठाणे स्टेशनकडे कुच केले. तो पर्यंत योगी, इंद्रा आणि योगा तिथे पोहोचले होतेच. गावदेवीला दिनेशही गाडीत आमची वाट पहात थांबला होता. गाडीत आमच्याबरोबर घारुअण्णा असल्याने त्यांना आम्ही पुन्हा कळव्यात सोडले. त्यांनी गाडी थांबवतानाच ती चहाच्या टपरीवर थांबवली. मग सर्वांनी चहा पिणे हे ओघाने आलेच. (चहा पित नाही... म्हणजे काय????) मग तिथे वडापाव आणि ऑम्लेट पावावर हात मारुन झाल्यावर १२.३०ला गणरायाचे स्मरण करुन प्रवासास सुरुवात केली. ( आधी पोटोबा मग विठोबा Happy )

गाडी सुरु होऊन १५ मिनिटे झाली असतील तोच इंद्रदेव पुढे जाऊन रोप वे वरुन रायगडावर पोहोचले सुद्धा. पनवेल जवळ आल्यावर त्यांना एकटेच पुढे निघुन गेल्याची आणि जाणिव झाली आणि ते जागे झाले. पुढे पळस्प्यानंतर एका ढाब्यावर मी आणि दिनेशने पोट्पुजा करुन घेतली. अगदी रमतगमत आमचा प्रवस चालु होता. कारण रोप वे ने पहीली ट्रॉली सकाळी ७ वाजता गडावर जाते त्याआधी तिथे पोहोचुन काही फायदा होणार नव्हता. पण कोलाडजवळ पोहोचलो आणी आमच्या ड्रायव्हरला झोप येऊ लागली. मग माणगावला जाऊन थांबायचे ठरले. तो पर्यंत पहाटेचे ४ वाजले होते. मग ड्रायव्हरला गाडीत झोपायला सांगुन आम्ही एस टी स्टँडकडे मोर्चा वळवला. गाडीत डास चावत होते म्हणुन स्टँडवर आलो तर तिथे तर डासांनी उच्छाद मांडला होता. मी, दिनेश आणि योगा जागा पटकाऊन आडवे झालो. इतक्या डासातही योगानी मस्त ताणुन दिली. योगी आणि इंद्रा तर भटकायला बाहेर पडले. मी आणि दिनेश झोपायचा प्रयत्न करत होतो पण तिथल्या एका दुकानदाराला गरबा खेळायची हुकी आली होती, त्यानी मस्त मोठ्या आवाजात रिमिक्स गरब्याची गाणी सुरु केली होती. या अशा गोंधळात १५ मिनिटे झोप लागली असेल तेवढ्यात त्याच दुकानदाराने साईबाबांची आरती आणि भजने सुरु केली आणी आम्ही ( मी आणि दिनेश) उठुन बसलो. योगी आणि इंद्राचा पत्ता नव्हता. योगा मात्र ढाराढुर झोपला होता. इतक्यात योगी आणि इंद्रा कुठुन तरी नाश्ता करुन परतले. थोडावेळ टाईमपास केल्यावर ६.१५ ला योगाला जागे केले, तर तो डोळे किलकिले करुन त्रसलेल्या नजरेने माझ्याकडे पाहु लागला. दोन मिनिटांनी त्याला आजुबाजुची जाणिव झाली. ६.३० ला तिथुन निघालो आणि लालाभैयाच्या हॉटेलासमोर (साहेब, माफ करा, पण त्यावेळी कोणत्याही मराठी माणसाची दुकाने उघडी नव्हती ) गाडी थांबवली. तिथे मिळणारी बर्फी मी लहानपणापासुन खातोय. तिचा फडशा पाडला. चहा आणि शिरा खाउन झाल्यावर पुढचा प्रवास सुरु केला.

रात्रभर थंडि अशी जाणवली नव्हती पण माणगाव सोडले आणि हवेतला गारवा वाढला. पुढे तर सर्वत्र धुक्याची चादरच पसरली होती. असे वातावरण पाहुन सगळेच खुष झाले. सगळ्यांनी आपापले कॅमेरे काढले आणि त्या धुक्यानी भरलेल्या रस्त्यावर दुबळे फ्लॅश पडु लागले. फोटोतर कोणाचे ही नीट निघत नव्हते पण सर्वजण त्या धु़क्यानी भरलेल्या रस्त्याला कॅमेर्‍यात पकडण्याचा असफल प्रयत्न करत होते.
dhuke.jpg

पण लोणेरे गेले आणि धुकेही मागे पडले. महाड्जवळ पोहोचलो आणि रस्त्याबाजुने वाहणार्‍या नदीची खाडी दिसताच गाडी थांबवण्यात आली. तिथे काही फोटो काढण्यात आले.
boat.jpg

तिथे १०-१५ मिनिटे टाईमपास केल्यावर पुढील प्रवास सुरु झाला. पाचाड रोडला लागलो आणि धु़कं जाऊन मस्तपैकी कोवळं उन दिसु लागलं. ७.४५ झाले होते त्यामुळे तासभर आधी पोहोचलो असतो तर रोप वे ने जाता-जाता किंवा गडावरुन सुर्योदय पाहता आला असता हा विचार इंद्राने बोलुन दाखवला. पायथ्याशी पोहोचलो आणि रोप पहिले दर्शन झाले. रोप वे चे तिकिट काढण्यासाठी तिकिट खिडकी वर गेलो तर तेथिल कर्मचार्‍याने एक मोठा प्रश्न विचारला आणी मी स्तब्ध झालो. झाले असे कि मी पाच तिकिटे मागितल्यावर त्याने विचारले, "वर जायची कि खाली?" आत्ता बोला.... पाचाडहून खाली जायलाही रोप वे आहे हे मला अडाण्याला ठाउकच नव्हते.

आमच्या समोरुनच दोन ट्रॉलीज भरुन गडावर गेल्या... आम्ही सर्वजण मात्र त्या ट्रॉलीकडे आश्चर्यमिश्रित कौतुकाने पहात होतो. मनात हजार शंका... रोप वेच्या तारा मजबुत आहेत का?? ट्रॉली पडली तर???? लाईट गेली तर???? असे अनेकानेक प्रश्न... शेवटी एकदाची आम्हाला घेऊन जाणारी ट्रॉली आली. एका ट्रॉलिमध्ये मी, योगा, योगी, दिनेश असे चौघे आणि दुसर्‍या ट्रॉलीमध्ये इंद्र, एम टी डी सी च्या तीन कर्मचार्‍यांबरोबर बसला. रोप वे ने रायगडावर जाण्याचा अनुभव खुपच छान होता. आम्ही सारेच जरा सांभाळुनच बसलो होतो. उभे राहण्याचा वगैरे प्रयत्न कोणी केला नाही. हळु हळु वर जाणार्‍या ट्रॉलितुन खाली दिसणारे गाव व आजुबाजुचे डोंगर खुपच सुंदर दिसत होते. अगदि पाच मिनिटातच आम्ही गडावर पोहोचलो.
troly.jpg

गडावर पोहोचलो, एम टी डी सी मधुन गडावर जाण्याची तिकिटे घेतली. आणि समोर पसरलेल्या सह्याद्रीचे प्रथम दर्शन घेतले. नजर जाईल तिथपर्यंत फक्त ढगांचा समुद्र पसरला होता. ढगांच्या लाटा डोंगराच्या किनार्‍यावर आदळत होत्या. मधुन मधुन काही डोगरांची बेटे डोकावत होती.
samudra.jpg
तिथुन पाय निघतच नव्हते, जवळ जवळ २०-२५ मिनिटे तिथेच उभे राहुन आम्ही फोटो काढत होतो. फोटो तर इतके काढले कि सर्वांचे कॅमेरे धारातिर्थी पडले. मग बॅटरीज कढुन त्या घासुन पुन्हा फोटो काढायला सुरुवात केली.

एम टी डी सी च्या तिकिट खिडकीवर आलेला अजुन एक अनुभव. आम्ही पाच जणं असल्याने प्रत्येकी ५ रुपये या हिशोबाने २५ रुपये द्यायचे होते. मी १००चे नोट दिली, तर सुट्टे नाहीत ५० चे नोट द्या असे फर्मान आले. मग आमच्यापैकी कोणीतरी ५० ची नोट दिलीची तर ५ सुपये सुट्टे द्या असे म्हणाला. मी निमुटपणे ५ रुपये दिले. पण यानंतर मात्र त्याने कमालच केली. मला मीच दिलेली ५० ची नोट परत करुन म्हणाला आता २० रुपये द्या. म्हणजे इतकी देवाणघेवाण करुन शेवटी आम्हीच सुट्टे २५ त्याला दिले होते.

या सगळ्या हिशोबाच्या गोंधळातुन बाहेर पडुन आम्ही मेणा दरवाज्यातुन आत प्रवेश केला. राणिमहाल, अंधार कोठडी, दासींच्या खोल्या याबाबत इंद्रगुरुजींकडुन आम्हा विद्यार्थ्यांना माहिती मिळत होतीच. तिथे काम करणार्‍या एका काकांनी आमची चौकशी आरंभली. दुपारी जेवायला पिठलं भाकरी हवी का? हवी असल्यास सोय होऊ शकेल असे सांगितली. पण सकाळी ८.३०ला दुपारच्या जेवणाचा विचार कोण करणार??? आम्ही नंतर कळवतो असे सांगुन तिथुन पालखी दरवाज्याकडे वळलो.
palakhee.jpg

पालखी दरवा़ज्यातुन गंगासागर तलावाजवळील स्तंभाचे दर्शन घेत आम्ही होळीच्या माळावर पोहोचलो. महाराजांना मुजरा केला आणी रायगड येण्याचे सार्थक झाले. माझी ही रायगडावर येण्याची २०वी वेळ पण प्रत्येकवेळी माहाराजांसमोर उभं राहिलं की रक्त सळसळतंच.
maharaj.jpg

मी महाराजांचे फोटो काढत असताना इंद्रा गुरुजी इतर तीघा विद्यार्थ्यांना सह्याद्री परिसराची माहिती देण्यात गुंग झाले होते.
gurujee.jpg
इथे माझ्या कॅमेर्‍याच्या बॅटरीने शेवटचा आचका दिला. मी तरीही बॅटरीज घासुन, फ्लॅश बंद करुन फोटो काढण्याचा प्रयत्न चालु ठेवला होता. महाराजांची मुर्ती उघड्यावर होळीच्या माळावर बसवणार्‍या त्यावेळच्या केंद्र सरकाराच संस्कृतमध्ये उद्धार करत आम्ही नगारखान्याकडे वळलो. मला मेघडंबरी आणि नगारखान्याचे फोटो काढायचे होते. मग कॅमेरा मेला तरी बेलाशक.

नगारखान्यातुन दरबारात प्रवेश केला. मग नेहमीचा खेळ सुरु केला. योगा मेघडंबरी जवळ जाउन उभा राहीला आणि आम्ही नगारखान्याजवळ. आजही इतकी पड्झड होऊनही तिथे नगारखान्याजवळ उभे राहुन हळु आवाजात बोललेले मेघडंबरीजवळ ऐकु जाते. त्यावेळच्या स्थापत्य विशारदांना (हिरोजी) आमचा मानाचा मुजरा.
darbar.jpg

दरबार पाहुन होईपर्यंत पोटात कावळे काव-काव करु लागले होते. तेव्हढ्यात अनायासाने तिथे एक ताकवाल्या मावशीही आल्या. मग आपापल्या बॅगातुन आणलेला नाश्ता बाहेर काढण्यात आला. पोट्पुजा आट्पुन ताकाने तहान भागवण्याचा प्रयत्न केला गेला. इंद्र देवाने मात्र नाश्ता उरकल्यावर बॅगेतुन पुर्ण बाह्यांचा शॉर्ट कुर्ता काढला आणि तो घातला. मला त्याचे हे वागणे कळेना. तेव्हा उन्हापासुन बचावासाठी त्याने हे केल्याचे कळले. मला काही फरक पडत नाही असे म्हणुन मी ते हसण्यावारी नेले. पण मला नंतर त्याच्या म्हणण्याचा प्रत्यय आला. ते तुम्हाला नंतर कळेलच.
अर्थातच माझे आणि दिनेशचे पोट काही भरले नव्हते, मग गडावरील देशमुखांच्या हॉटेलाकडे मोर्चा वळवण्यात आला. तिथे मिसळ पाव हादडण्यात आला. तेवढ्यात योगी महाराजांनी तिथे एक डुलकी काढुन घेतली. त्यांना जागे केले आणि मोर्चा टकमक टोकाकडे वळवला. मात्र तिथे जाण्यासाठी सरळ रस्ता न निवडता आम्ही हत्ती तलावाला वळसा घालुन झाडीतुन कोणत्यातरी सरदाराच्या महालाच्या जोत्याजवळुन पाण्याची टाकं बघत बघत टकमक टोकावर पोहोचलो.
takamak.jpg

यावेळेला पहिल्यांदाच मी पाहीलं कि तेथे अजिबात वारा वाहत नव्हता. ११ वाजले असतील, सुर्य जवळ जवळ डोक्यावर आला होता. वारा अजिबातच नसल्याने घामाच्या धारा सुरु झाल्या होत्या. वारा नसल्याचा एक फायदा झाला कि आम्हाला टकमक टोकाच्या अगदी टोकाला खाली जाऊन आरामात उभे राहता आले. दरवेळेप्रमाणे पुन्हा एकदा सर्व नविन लोकांना छत्री निजामपुर दाखवण्यात आले आणी त्या गावाच्या नावाच्या जन्माची कहाणी सांगण्यात आली. हे सगळं आटपुन आम्ही तिथुन जगदिश्वराच्या मंदीराकडे निघालो. या वेळेलाही सरळ रस्त्याने न जाता दारुखान्यावरुन पुन्हा झाडीतुनच मार्गक्रमण सुरु केले. उन्हानी चटके बसायला लागले. मीही बॅगेतुन पांढरे टी शर्ट काढले ते घातले. मंदीरासमोरील रस्त्यावरील स्टॉलवरुन कोकम सरबत पिउन आम्ही मंदीरात प्रवेशलो. मंदिरात आमच्या आधीच चार्-पाच जणांचा एक गृप बसला होता. एक वयोवृद्ध काका (वय अंदाजे ७०-७५) शिवरायांची स्तुतीसुमने गात होते. आम्हीही जगदिश्वराचे दर्शन घेऊन तिथेच बसलो. काकांचे एवढे वय झालेले असुनही आवाज खणखणित होता. अगदी स्पष्ट उच्चार आणी ओघवत्या वाणीने त्यांनी आम्हाला भारावुन टाकले. त्यांच्या बोलण्याने आम्ही इतके भारावुन गेलो होतो की बोलता बोलता त्यांनी घेतलेला ३-४ सेकंदांचा पॉजही आम्हाला खुप मोठा वाटला. त्यांचे बोलणे संपले आणी काकांचे आभार मानुन आम्ही मंदिरातुन बाहेर पडलो. मग शिवसमाधीचे दर्शन घेतले आणी महाराजांच्या असलेल्या कि नसलेल्या वाघ्या कुत्र्याबद्दल चर्चा सुरु केली.
samadhee.jpg

तिथुन बाहेर पडल्यावर त्या बाहेरिल स्टॉलवरुन बिसलेरीच्या दोन बाटल्या आणी एका बाटलीत कोकम सरबत पार्सल घेण्यात आले. आता पुढे काय? हिरकणी बुरुजावर जायचे कि कुशावर्त पहायला जायचे यावर चर्चा झाली. शेवटी कुशावर्त पहायला जायचे ठरले आणी आम्ही दारुखान्यावरुन, बाजारपेठेतुन होळी माळावर यायला निघालो. महाराजांच्या काळात या बाजारपेठेतुनच मालाची घाऊक विक्री केली जायची. मसाले, रेशमी वस्त्रे, निरनिराळी रत्ने, आदींचे घाऊक व्यापारी या बाजारपेठेत बसत. आपल्या सर्वांनाच शालेय पाठ्यपुस्तकातुन देण्यात आलेल्या माहीतीप्रमाणे इथे घोड्यावरुन वगैरे खरेदी होत नसे. अशी उपयुक्त माहीती इंद्रा गुरुजींनी आम्हा सर्वांना दिली.
bajar.jpg

बाजारपेठेतुन आम्ही पुन्हा होळीच्या माळावर आलो. तिथुन कुशावर्तकडे जाण्यास निघालो. पायर्‍या उतरुन खाली गेलो समोरच कुशवर्त आणी शिव मंदीर दिसत होते. आमच्यापैकी तरुण सळसळ्त्या रक्ताने (योगा,योगी) ने मधुनच शॉर्टकटने तिथे जायचे ठरवले. मी मात्र सरळ रस्त्याने पुढुन वळुन तिथे पोहोचलो. तिथल्या तळ्यात आता काही जास्त पाणी उरले नाहीये. त्यातल्या त्यात इंद्रा गुरुजींनी आम्हाला तिथला जल शुद्धिकरणाचा तलाव दाखवला. वरुन आलेल्या एका ओहोळाच्या मार्गातच आकार कमी होत जाणार्‍या दगडाच्याच जाळ्या आणि मोठे-छोटे दगड, वाळु अशा प्रकारे बसवण्यात आल्या होत्या कि पाण्याच्या टाकात जमा होणारे पाणी गाळुन जमा होत असे. पण आता मात्र तेथे अवशेष उरलेले दिसतात. तिथुन मात्र आम्ही लगेचच परत फिरलो.

आता हिरकणी बुरुजाकडे वळायचे होते. पण इथे इतिहासाची पुनरावृती झाली. आम्हा पाचजणात मतभेद झाला. जायचे की नाही? मी, दिनेश आणी इंद्रा जाण्याविरुद्ध होतो. तर योगा आणि योगी उड्या मारत पुढे जायला ही निघाले. आम्ही सर्व पुन्हा एकदा गंगासागर तलावावरुन, स्तंभाजवळुन हिरकणीच्या मार्गावर कसेबसे निघालो. तिथुन हिरकणीचा बुरुज काही फारसा दुर नव्हता. योगी आणि योगा तर आमच्या ४०-५० फुट पुढे गेलेही होते. एका वळणावर इंद्राने माघार घेतली त्याला मी आणि दिनेशने पाठिंबा दिला आणि योगा-योगीला परत बोलवायला सुरुवात केली. वाटेत समोरच वाहणार्‍या पाण्याने दगड निसरडे झाले होते. तिथे योगीचा पाय घसरला ( या वयात हे व्हायचेच ) आणी तो खाली बसला. कदाचित याचमुळे त्यानेही पुढे जायचा बेत रद्द केला. आणी बिचार्‍या योगाला आम्हा चौघांमुळे परत फिरावे लागले.

आता गडावरिल महत्वाची बहुतेक सर्व ठिकाणे पाहुन झाली असल्याने आम्ही लवकर खाली उतरायचे असे ठरवले. दुपारचे १.३० वाजले होते. पुन्हा एकदा सर्वांना भुकेची जाणिव व्हायला लागली होती. मग महादरवाजाजवळ पोहोचल्यावर पोटोबा करण्याचे ठरले आणी आम्ही गड उतरायला सुरुवात केली.

महादरवाजाजवळ आलो आणि बॅगेतला उरलासुरला खाऊ बाहेर काढ्ला. मी येतानाच हल्दीरामची रेडी टु ईट भेळ आणली होती, ती मी आणी इंद्रानी मिक्स करायला घेतली, योगा आणी योगीने आणलेली बिस्किटे आणी चकल्याही बाहेर काढाल्या. इंद्र आणी मी मात्र त्या भेळेमध्ये चटण्या कमी जास्त प्रमाणात टाकुन बघत होतो. शेवटी एकदा इंद्राला योग्य प्रमाण कळाले आणी रायगडाच्या दरवाजाशीच अजुन एका भेळ्वाल्या भय्याचा उदय झाला. २.१५ ला आम्ही उतरायला सुरुवात केली. योगि आणि योगा तर कॅमेरा पाजळुनच निघाले होते. दर दोन ते तीन मिनिटांनी फोटो काढले जात होते. तर इंद्र त्याच्या कॅमेर्‍याची बॅटरी सांभाळ्त मोजुन मापुन फोटो काढत होता. मीही माझ्या मोबाईलच्या लेन्सला मोहिम लावुन दिली होती. वाटेत डोंगर, दर्‍या, झाडे, माकडे, खेकडे, फुलपाखरे सगळ्याचे फोटो सेशन चालु होतेच. सुर्व्या डोंबल्यावर आला होता. पायर्‍या उतरताना माझे पाय थरथरु लागले होते. दिनेश आणि योगीची परिस्थितीही काही वेगळी नव्ह्ती. योगा मात्र एकदम फ्रेश होता. उतरतानाही हिरकणी, खुबलढा बुरुज अशी ठिकाणे खालुन पाहणे चालुच होते. शेवटी ३.०० वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथिन एका खासगी वाहनाने रोप वे जवळ जिथे आमची गाडी पार्क केली होती तिथे पोहोचलो.

गाडीत बसलो, मी बुट काढले आणि मला इंद्राच्या पुर्ण बाह्याचा सदरा घालण्याचे कारण समजले. का? त्याचा फोटो खाली टाकतोय ते पहा.
sideeffects.jpg

परतीचा प्रवास सुरु झाला. आणि मला कधी झोप लागली ते कळले ही नाही. इंद्रा, दिनेश, योगी ही पार ढगापलीकडे पोहोचले. मला लोणेरे गेल्यानंतर जाग आली. मग इंद्रा आणी दिनेशही उठले. योगा मात्र जागाच होता. माणगावला एका हॉटेलात मिसळ, डोसा, इडलीचा बेत केल्यानंतर माझे आवडते पानही खाल्ले. गेली खुप वर्ष या पानाच्या गादीवर मी पान खातोय. माणगावात एस टी स्टँडच्या आधी हॉटेल तपस्वी बाहेर हे पानवाल्याचे खोके आहे. कधी नाही ते एक मराठी पानवाला तिथे इतकी वर्ष तग धरुन आहे. कधी गेलात तर जरुर ट्राय करा. या पानाची खासिइयत म्हणजे ते तुम्हाला आईसक्रीम्च्या कोनासारखे खावे लागते. एका घासात ते खाताच येत नाही.
paan.jpg

माणगाव सोडले आणी मग कधी एकदा घरी पोहोचतोय असे झाले होते. पनवेलनंतर जुईनगरजवळ इंद्रा उतरला, मग कळवा नाक्यावर मी, योगा आणि योगीने दिनेशची रजा घेतली. एक खुप छान पिकनिक संपली ती नव्या पिकनिकचे प्लॅन्स मनात घेउनच. आता जरी पुन्हा कधी पिकनिक निघेल हे माहीती नसेल तरी अजुनही मी नेटवर इतरांचे ट्र्किंगचे अनुभव वाचतोय. आणि रोज योगायोगला नविन जागा सुचवतोय. बघुया, आता पुन्हा कधी योग येतोय ते.

कारण आपण फक्त प्लॅन्स करायचे... ते पार पाडणं न पाडणं हे तर श्रींच्या इच्छेवर अवलंबुन आहे......

विषय: 

सही निल... एक वेळ तर अस वाटून गेलं की त्या लाटांवर झेप घ्यावी... Happy
येऊ दे भराभर...

मस्त! Happy
जायला पाहिजे एकदा! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मस्तच आहेत फोटो. अजून फोटो अन वर्णन येउ द्यात....

निल मस्तच, थोड्या वेळासाठी मला असे वाटले मी रायगड वरच आहे. आजून हि गडावरील देखावा डोळयात आहे, आणि तो सदेव राहिल, निल मी तुझा आभारी आहे तु मला रायगड दाखवलेस.

>>त्याने मोहिमेतुन अंग काढुन घ्यायचा बराच प्रयत्न केला पण मी परतीचे दोर कापुन टाकले होते. biggrin.gif
काय तुम्ही पण इंद्रदेवा!! वर्णन आणि फोटो मस्त!

नीलवेद
छान फोटो आणि वर्णन, अजुन येवु द्या.

मस्त रे!
फोटो खल्लास आले आहेत. Happy

सुरेख वर्णन, अप्रतीम फोटो!!!
रोपवे केल्याचं माहितीच नव्हतं.
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

अरेच्या मारी.. नील.. तुझ्या पानावर पण रंग उधळले की.. १दम मस्तच..
तुला आलेल्या "त्या प्रत्यया" ची वाट बघतोय मी... Lol

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-

"वर जायची कि खाली?" आत्ता बोला.... >>>>>
रायगडावर बरेच जण वर चढताना पायर्‍यांनी चढुन जातात आणी खाली उतरताना ropeway चा वापर करतात. इतकेच नव्हे तर केवळ उतरण्यासाठी ropeway च्या दरात सुट देखिल आहे.
ropeway return ticket - Rs.150/-
One way Ticket Up only - Rs.100/-
One way Ticket Down only-Rs.75/-
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

नील भाउ मला हाक जरी मारली असतीत तर मी पण आलो असतो की Happy अरे मी महाडलाच रहातोय. मस्त वर्णन आणि फोटो तर अप्रतीमच रे !
इंद्र ने तिथल्या खलबतखाना किंवा रत्नशाळेबद्दल माहीती दिली की नाही ?
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **

नील भाउ मला हाक जरी मारली असतीत तर मी पण आलो असतो की >>>>>
चाफ्या, तुझ हाकेला ओ देवुन धावत पळत येणं हे किती खर असत हे मी आणि केद्याने अख्ख्या मायबोलीवर "वर्ल्ड फेमस" केल आहे. Proud
त्यामुळे त्याने हाक नसेल मारली.

नील,सही वर्णन आणि फोटो पण मस्तच.. छान रायगड सफर घडवलीस आम्हाला... Happy

चाफा ती रत्नशाळा होती की टाकसाळ होती की Conference Rooms होते यात बरेच मतभेद आहेत...

वेळे अभावी चोर दिंडी, वाघ दरवाजा बघायचे राहुन गेले... खरतर रायगड फिरायचा म्हंजे २ दिवस मुक्काम करवा.

नील तुझा वृतांत फोटो प्रमाणेच सरस आलाय... लिंक दे की... Happy

मला रायगडावर जाऊन तब्बल ३५ वर्षे झाली रे.

इंद्र त्या जागेचा उल्लेख जरी रायगडच्या इतीहासात खलबतखाना म्हणुन असला तरी बखरीत त्या जागेला रत्नशाळा म्हंटले गेलेय त्यामुळे जर आत गेला असतात तर लोकांनी केलेली खोदाखोद दिसली असती. टाकसांळ ती वर मनोर्‍याजवळ आहे ! आणि तिथेच जमीनीखाली खलबतखाना.
या मनोर्‍यातले तांब्याचे पाईपही उकरुन उकरुन नेलेत रे लोकांनी. Sad
>>>>>>>>>>>चाफ्या, तुझ हाकेला ओ देवुन धावत पळत येणं हे किती खर असत हे मी आणि केद्याने अख्ख्या मायबोलीवर "वर्ल्ड फेमस" केल आहे.
त्यामुळे त्याने हाक नसेल मारली.>>>>>>>>>>>
झकोबा लेका, रायगड म्हणजे माझा विकपॉईंट आहे यार, तिथे जायला मी एका पायाच्या अंगठ्यावर तयार असतो. चारचार दिवस वस्ती केलेय तिथे.
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **

रायगड किल्ला शिवरायान्चि राजधानि. आम्हि रायगडवासि. अभिमान आहे. तुमचा. मला माझा. शिवाजि महाराजान्चा. शिवाजि महाराज कि जय!
शैलेश पालकर
पत्रकार
पोलाद्पुर

झकास रे...मस्त लिहीलय. रायगड भेट घडवलीस.

धन्यवाद नील, पुन्हा एकदा पुनः प्रत्ययाचा अनुभव दिल्याबद्दल.
आजवर किमान ३७ वेळा रायगडाची तिर्थयात्रा झालीय, पण प्रत्येक वेळी तो तसाच रोमांचक आणि उत्साहवर्धक वाटतो. तुझ्या या नितांतसुन्दर लेखाने आता पुन्हा एकदा महाराजांचे दर्शन घेण्याची ईच्छा अनावर झालीय.

धन्यवाद.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

मस्त लिहलय, मला तर पान खावासा वाट्तोय. Happy . भारतातुन इथे तो पान 'शिप' करता येईल का?? येत असेल तर माझ्या साठि पाठवा Happy

अरे वा... मुखपृष्ठावर जागा मिळाली की तुम्हाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy

सर्वांना धन्यवाद....

चाफा, अरे ही तर उडती भेट होती रायगडाला दिलेली... डिसेंबर मध्ये पुन्हा एकदा फेरी मारायची आहे. त्यावेळी मात्र कमीत कमी एक दिवस वस्तीलाच जायचे आहे, तुला नक्की हाक मारीन तेव्हा.

माझ्या लेखाला मुखपृष्टावर स्थान दिल्याबद्दल धन्यवाद....

फोटो सहीत मस्तच वर्णन रे Happy
झकोबा Proud
तो पानाचा फोटो तर फटाक आहे एकदम Happy

मस्त वर्ण्न .. पुढचा प्लान लवकर ठरवा आता

हर हर महादेव!!
छत्री निजामपुर ची कहाणी आम्हालापण कळुद्या..