एक पान... गळालेलं

Submitted by -शाम on 19 December, 2012 - 23:34

" पहिल्यांदाच वेळेवर आलीयेस... बैस "

" हुं...महत्वाची वेळ निघून गेल्यावर, बाकी वेळांना महत्व उरतं कुठं?"

" माझा नंबर बरा आठवला तुला, इतक्या दिवसांनी?"

" विसरलेय कुठे मी अजून काही?"

"नीट बोलाणारेस का? तू बोलावलं म्हणून आलोय "

"काहीच नीट नाही राहिलं रे, मग बोलणं कुठून राहणार?"

"एनी वे, कशीयेस?"

"पाणी येत नाही हल्ली डोळ्यात, बाकी मस्त... तू ? "

"आहे तसाच"

"म्हणजे डामाडौल"

"कधीच नव्हतो"

"मग हात का सोडलास?"

..

"काही वेगळं बोलुयात?"

"हुं..."

"हे तळं वेगळंच वाटतंय न आता"

"पाणी... पाणी बदललंय, दोन पावसाळे गेले ना!"

"आणि या झाडांची पानं पण बघ कशी नवी झालीयेत"

"जुनी गळून गेलीत, ते बघ, कशी बेवारस उडतायेत"

"अगं निसर्गाचा नियमच आहे हा. काळाबरोबर बदल स्वीकारण्याचा"

"हो ना.. पण सोपं नसतं रे हे देठ तुटण्याच्या वेदना सहन करणं.
वाऱ्याबरोबर वाऱ्यासारखं धावणं...... मुक्कामच माहित नसलेला प्रवास होऊन जातं आयुष्य "

"वेदना तर फांदीलाही होतात, वाढवलेलं असतं इतके दिवसं"

"कोणी? विज्ञान नव्हतं का तुला?"

" ते जाउदे , कशासाठी बोलावलं ते सांग"

"तुला बघायचं होतं....
मिळालं का रे सगळं, मला सोडताना सांगितलेलं?... राहिलास उभा स्वत:च्या पायावर? .... बांधलंस घर, कष्टणाऱ्या आईबाबांसाठी?..
सांग ना... काय केलसं या दोन वर्षात?"

"कमी प्रयत्न केले नाहीत मी, गेली दोन वर्षे सतत ओव्हर टाईम करतोय"

"मी ही नोकरी करू शकले असते हातभारासाठी"

" हो , पण मिळालं काय असतं तुला, शेणामातीचं घर? जिथे ना अंघोळीला नीट आडोसा ना झोपायला नीट बिछाना."

"तू मिळाला असतास ... आनंदात स्वीकारलं असतं मी सगळं"

"चटका लागेपर्यंत छानच दिसतो विस्तव... मी आयुष्यभर भोगलेले चटके द्यायचे नव्हते तुला"

"मग प्रेम तरी का केलसं?"

"ठरवून केलं नाही. तू गरीब म्हणून दिलेल्या चार पुस्तकांच्या बदल्यात काळीज देऊन बसलो...माझ्याही नकळत"

"फक्त तूच?.. किती विश्वास होता तुझ्या सच्चेपणावर?"

"आणि मला आश्चर्य एक नाजूक फूल चिखलात रुतत चालल्याचं"

"हेच...स्वत:बद्दलचा न्यून कधी गेलाच नाही तुझा"

"न्यून नाही ते वास्तव होतं"

"थोडीशी हिम्मत केली असतीस तर..हं?"

"हिम्मत करायलाही पायाखाली मजबूत जमीन लागते"

"अहं....विश्वास लागतो स्वत:वर"

"आभाळाला मुठीत घेण्याच्या स्वप्नाला विश्वास तरी काय करणार?"

"कसलं आभाळ रे? आणि कसलं स्वप्न"

"आपलं लग्न. आभाळस्वप्नच होतं माझ्यासाठी. तुझ्या बाबांचा भव्य बंगला, नोकर, गाड्या, संपत्ती......आणि
माझं दहा बाय दहाचं इंदिरा आवास ... कुठे मेळ होता? पंधरा लाख खर्च होता तुझ्या लग्नाचा आणि पंधरा रुपयात दिवस काढणारा मी..."

"जाउदे ... तू अशीच गरीब-श्रीमंतीची निरर्थक प्रवचनं करीत बसशील... खरं तर तुझं मन भरलं होतं. मग कशाला धोंड बाधून घेशील?"

"म्हणजे?"

"म्हणजे माझे कपडे काढताना ह्या दिव्य गोष्टी कधीच का नाही आठवल्या तुला? तेंव्हा का नाही लायकी बघीतलीस स्वतःची?"

"ती वेळ, तो एकांत, ते वय ....ह्या सगळ्याला विसरतीयेस तू
...ह्यातलं कोणीच जबाबदार नाही?"

"कोणीही असलं तरी काय फरक पडतो? परिणाम बदलत नाही ना!"

"म्हणजे मी जबरदस्ती केली दरवेळी?"

"अहं .. मी केली .. स्वत:वर. कळतं असूनही आंधळा विश्वास ठेवला"

"सोड ना हे सगळं. आता संसार आहे तुझा. आता हे उगाळण्यात काय अर्थ?"

"तुला सोपं आहे रे म्हणायला. मी भोगतेय अजून "

"अजून?... तुमचे संबध ठीक नाहीत का?"

"आहेत ना... जसा रोज त्याच्यासाठी स्वयंपाक करते तसंच हे ही. कधी मीठ कमी, कधी तिखट.
त्याची रोजच कुरकुर. सुरुवातीला हक्काने केलेला बलात्कार वाटायचा ... आता धुण्याभांड्यासाखंच ठरलेलं काम... तुझा स्पर्श झालेला रोम रोम सूड उगवतो रे रोज. डोळे मिटले की तू दिसतोस समोर. किळस येते त्याच्या स्पर्शाची. त्वचा निब्बर झालीये सगळ्याने आणि मन तितकच जखमी.
आता कुठल्याच स्पर्शाने शहारे येत नाहीत की ओठ थरथरत नाहीत. तुझ्या सोबत व्हायची तशी उरात धडधडही होत नाही.
आणि कधी कधी नकळत तुझं नाव येतं ओठावर. मग तो खूप प्रश्न विचारतो. शेवटी काल दिलचं उत्तर.
म्हटलं काय व्हायचं ते होऊदे. किती वेळ मनाचा कोंडमारा सहन करणार? .... तू असं करायला नको होतं"

"काय?"

"माझ्या शरीराशी खेळायला नको होतं"

"शरीराशिवाय प्रेम करता येतं? तुला असं वाटत नाही की आपण आधी हाडामांसाच्या आकृतीच्या प्रेमात पडतो?
मग कळतात तिच्या स्वभावाचे कंगोरे. जे आपण आवडून घेतो त्या आकृतीवरच्या प्रेमापोटी. आपल्याला काय हवं असतं? प्रेमळ मन? .... अंह...नुसतं मन नाही.... ते मन असणारं शरीर सुद्धा. आणि नुसतं शरीरही नाही तर आपल्याला हवं तसा भोग देणारं शरीर. यात शरीरसुखासोबत सगळंच येतं... असं नसेल तर मनाने सुंदर असणाऱ्यांचेही संसार विस्कटतात आणि शरीराने सुंदर असणाऱ्यांचेही.
जे झालं त्याला आपण दोघेही सारखेच जबाबदार आहोत"

"हो. तरीही फांदीला नवी पालवी फुटते... गळालेल्या पानाला नवी फांदी मिळत नाही"

"म्हणजे?"

"काही नाही"...........

" आता पर्समधे काय शोधतीयेस?"

"हे घे...माझे थोडेसे पैसे. तुझ्या घराचा भाग होऊ शकले नाहीच. निदान माझा थोडासा हातभार तरी , सिमेंट, विटांसाठी"

"नुसत्या सिमेंट, विटांनी घर होत नाही"

"घर तर नुसत्या एकत्र राहण्यानेही होत नाही,.. घे..."

"नको"
..

"कविता करतोस अजून?"

"हो"

"ऐकव ना!"

"तुला समज नाही"

"नाही कशी ...

खडकांशी कुजबुजताना सागरही हळवा होई

विस्कटलेल्या घरट्याने रेतीला गहिवर येई......."

"तुझ्या लक्षाते"

"हो, तुला निर्जीवातलं सजीवत्व कळलं ... पण सजीवातलं नाही आणि मलाच म्हणतोस की, तुला समज नाही?
.

ये आता मलाही कळतेय हा, निसर्गाची भाषा..

हे तळं, हे गडद गहिरं पाणी, आणि ही गळालेली पानं.....

कशी मस्त तरंगतायेत ना..?"
..

"जास्त पुढे जाऊ नकोस"

"अशा पानांना याहून चांगला मुक्काम कुठेच नसावा... हो ना?"

"काहीतरीच, मागे ये "
..

"अरे हो..."

"अगं बसं पुढे जाऊ नकोस पडशील"

"आणि तुला पोहताही येत नाही वाचवायला, ना? "
..

"ये थांब... पुढे कुठे जातीयेस...अगं ...अगं ....खोल आहे ते..."

"माहितीये... आणि ........... आणि....
तू उडी टाकणार नाहीस हे ही माहितीये....!"
...

" अगं .... यये .................इय्य्य ... ओ.ओओओ.. हं
रुपा$$$$$$$$आ$$$......."

.............................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे!!
अशा अतिरेकी इमोशनल लोकांची.. फॉर दॅट मॅटर लेखातील पात्रांचीही मला भिती वाटते!!

मला कॉन्सेप्ट आवडला नाही. एक लिखाण म्हणून मात्र प्रसंग चांगला चितारलास.. शुभेच्छा दोस्त Happy

अती सुंदर.................
निशब्द करुन सोडणारी आणि तितकीचं रीयलस्टीक.........
पु.ले.शु.

छान संवाद. काही महत्वाचा आशय असलेले पॅरा पुन्हा वाचून त्यावर लिहावेसे वाटत आहे.

धन्यवाद!

माझ्याही अश्या नव्हे, पण साधारण धर्तीवरच्या एका कथेची आठवण झाली.

http://www.maayboli.com/node/31793

संवाद मस्त लिहिला आहे.
खूप आवडला....
काही वाक्य जास्त आवडली ....
१)महत्वाची वेळ निघून गेल्यावर, बाकी वेळांना महत्व उरतं कुठं?
२)शरीराशिवाय प्रेम करता येतं? तुला असं वाटत नाही की आपण आधी हाडामांसाच्या आकृतीच्या प्रेमात पडतो?
मग कळतात तिच्या स्वभावाचे कंगोरे. जे आपण आवडून घेतो त्या आकृतीवरच्या प्रेमापोटी. आपल्याला काय हवं असतं? प्रेमळ मन? .... अंह...नुसतं मन नाही.... ते मन असणारं शरीर सुद्धा. आणि नुसतं शरीरही नाही तर आपल्याला हवं तसा भोग देणारं शरीर. यात शरीरसुखासोबत सगळंच येतं..
३)खडकांशी कुजबुजताना सागरही हळवा होई.

जे लिहिले आहे ते पटणे किंवा न पटणे हा मुद्दा असुच शकत नाही.
कारण...
जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात काय घडतंय आणि काय घडेल याचा अंदाज आपण कधीच लावू शकत नाही.

संवादातला महत्वाचा मुद्दा वाटला तो प्रेमातल्या शारीरिक संबंधाचा.
प्रेमातले हे पाउल योग्य असते का? अयोग्य वाटले तरी मुद्दाम घेतलेले असते का? आयुष्याच्या असल्या नाजूक क्षणी आपला स्वत:वर कंट्रोल असतो का?

आणि अशी चूक (लग्नाआधी घडले तर 'चूक' च म्हणावे लागते) घडलीच तर काहीही करून त्या नात्याला पूर्णत्वास नेणे आपले कर्तव्य नाहीयेय का?
पण कधी कधी परिस्थिती अशी असते कि, वाटूनही नात्याला पूर्णत्वास नेणे शक्य नसते.

संवाद छान होता... आत्महत्या सोडली तर बाकी पूर्ण संवाद कित्येक जणांच्या आयुष्यात घडून गेला असेल...आणि अजूनही अंधारात असेल.

खूप खूप आभार दोस्तांनो ,
एका मित्राच्या मोबाईल इनबॉक्सने ही कथा मला दिली... म्हणून मांडणीही तशीच करण्याचा प्रयत्न केला.
त्याचे मेसेज प्रेरक आहेत आशय नाही.... त्याचेही खूप खूप आभार!

@ बेफि....नक्की लिहा .. मला उपयोगी असेच लिहाल याची खात्री आहे.

ही शैली आवडली. कथा म्हणून पण मांडणी भावली.

थोडं अजून विस्तार करायला हवा होता, असं मात्र वाटलं. (दोघांना तळ्याच्या काठी न बसवता एखाद्या कड्याच्या टोकावर बसवलं असतं तर???)

कथा आवडली. मांडणी छान आहे, विषय छान हाताळला आहेत. आशिष म्हणाल्याप्रमाणे हा संवाद अनेकांच्या आयुष्यात घडून गेला असेल... त्यामुळे जास्त भावतो आहे.

छान