अस्वस्थ करणार्‍या घटना आणि निराश, हताश, अगतिक मन

Submitted by वारी on 19 December, 2012 - 16:26

आजकाल फार अस्वस्थ वाटतय. निराश, हताश आणि अगतिक.

दिल्लीत घडलेल्या घटनांनी तर त्या आगीत अजून तेल ओतलं. नुकत्याच ६० वर्षाच्या वृद्धेवर आणि ४ आणी ६ वर्षांच्या मुलींवरच्या बलात्काराच्या बातम्या वाचल्या होत्या. सुधारगृहातल्या मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय व्यवसाय करायला लावलेल्या बातम्या ह्यापूर्वी आणी ह्यावर्षी वाचल्या आहेत. राजस्थानमधल्या स्त्रीभृणहत्येबद्दल वाचून असह्य असह्य वाटलं होतं. जिवंत मुलींना नदीत फेकणे, जमिनीत गाडणे ह्या बद्दल वाचून रात्रीची झोप उडाली होती. बायकोला मारणे किंवा करुन टाकणे, नकार दिल्यामुळे मुलींवर जिवघेणा हल्ला करणे रुटीन झाले आहे. रस्त्यावरची लहान भिकारी मुलं, कडेवर पोरं असलेल्या बायका पाहून फार अस्वस्थ होतं.

आताशा पेपर वाचणं बंद केलय. उघडलाच तर वाचल्या जातात त्या छोट्या जाहिराती, नवीन दुकानांच्या जाहिराती, आरोग्य विशेषांक वगैरे वगैरे. टिव्ही तर चालूच करत नाही. पत्रकारांच्या पातळीची कीव येते. पत्रकारीता म्हणजे जोरजोरात कंटेंट नसलेल्या ब्रेकींग न्यूज वर दळण घालून चर्चा करणे. सिनेसृष्टीची एंटरटेनमेंट चॅनल्स म्हणजे तोकडे कपडे घातलेल्या बायका अतिशय उत्तान अंगविक्षेप करत नाचत असणारी गाणी! लोकांच्या लैंगिक भावना चाळवायला आजकालचे चित्रपट आणि ही गाणी सगळ्यात जास्त कारणीभूत आहेत.

आपल्या देशावर राज्य करणं बाहेरुन आलेल्या राज्यकर्त्यांना फार सोपं गेलं म्हणतात. आपल्या लोकांची स्मृती फार छोटी आहे. अनन्वीत अत्याचार सहन करत सुद्धा लोकांनी परकीयांना राज्य करु दिलं. अर्थात ह्याला छोट्या मोठ्या राज्यकर्त्यांचे नेहेमीच अपवाद होते. पण सर्वसामान्य जनतेची मानसिकता ही नेहेमीच मरगळलेली होती. कोणाकडून तरी शासन्/राज्य करुन घेणे, आणि आपण आपल्या छोट्या तंट्या/बखेड्यांमध्ये मग्न राहणे ह्यातच लोकांनी आपली आयुष्यं घालवली. सहन नाही झाले की उठाव करायचा पण तो मोडून काढला की परत तसेच आयुष्य कंठायचे! शतकानूशतकं हेच होत राहिलं.

आतातरी परिस्थिती काय बदलली आहे? सगळं कसं नेगेटिव्ह वाटतय!!! अश्या बातम्या येतच राहतील, अमानुष घटना घडत राहतील, ४-८ दिवस लोक उठाव करतील, सरकार आमिष दाखवून गप्प बसवेल मग काही दिवसात लोक विसरुन जातील. काही बदलणार नाही! स्त्रिया आणि समजातले दुर्बल घटक हे नेहेमीप्रमाणे सहन करतील, जसे ते कित्येक शतकं करत आलेले आहेत...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर पेपरच वाचणं सोडून दिलेय. ज्या काही घटना कळतात त्या एकीव असतात मग त्यानंतर गूगलून कळते.... निराशाजनक व चिंताजनक आहे खरी स्थिती.

काही दिवसांपूर्वी अस्वस्थ करणारी एक हृदयद्रावक घटना कर्णोपकर्णी माझ्या कानावर आली होती. त्याचा नेटवर शोध घेतला काही संदर्भ मिळाला नाही. कोणाला काही संदर्भ मिळाला तर जरूर लिहावे.
तर ती घटना अशी - तीन मुलांची आई. लहानग्यास टबमध्ये ठेवून अंघोळ घालत होती. तिकडे घराबाहेर मधला मुलगा व मोठा मुलगा चोर-शिपाई खेळत होते. मोठ्या मुलाने खेळता खेळता मधल्यास चाकूने भोसकले. त्यानंतर तो घाबरून एका गाडीखाली लपून बसला. रक्तबंबाळ झालेल्या मुलाचा आक्रोश ऐकून आई लहानग्यास तसेच टबमध्ये सोडून पळत आली व व्यवधान न राहिल्याने त्याला तसेच रिक्षात घालून डॉक्टरकडे घेऊन गेली. इकडे ते बाळ टबात बुडल्यामुळे गेले व दुसरीकडे गाडी चालू झाल्यामुळे मोठा मुलगा गाडीखाली सापडून गेला. कालांतराने दवाखान्यातील मुलालाही देवज्ञा झाली.... हे सर्व ऐकून मन सुन्न झाले. काय अवस्था झाली असेल त्या माउलीची. वैऱ्यावरही असा प्रसंग येऊ नये. म्हणतात ना वेळ कोणावर सांगून येत नाही.
त्यामुळे "अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च।। निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी।। संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्र्चयः।। मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः।। (अध्याय 12 वा श्र्लोक 13 व 14) अर्थात - सर्व भूतमात्रांच्या बाबतीत द्वेष न बाळगणारा, सर्वांवर निर्व्याज प्रेम करणारा, करुणामय, ममत्व न बाळगणारा, अहंकार नसलेला, सुखदुःखांकडे समतेने पाहणारा, क्षमाशील, सदैव संतोषी राहणारा, एकाग्रचित्त असलेला, संयमी, दृढनिश्र्चयी आणि ज्याने माझ्या ठायी आपले मन तसेच बुद्धी अर्पण केलेली आहे असा भक्त मला प्रिय असतो.'' या गीतोक्तीनुसार राहणे ऐवढेच आपल्या हातात आहे.
ईश्र्वर मृतात्म्यांस शांती देवो व त्या माउलीस धैर्य देवो!!

हरिहर, अकल्पित आहे सगळे!!

मागे ठाण्यात एका सुशिक्षीत बाईने आणि तिच्या सासूने दुसर्‍यांदा मुलगी झाली म्हणून २ दिवसाच्या मुलीला गुदमरुन मारले. एका आईने आपल्या पूर्णपणे वैध बाळाला मारले. खूप त्रागा केला. बाळाला काहीही झाले तर पहिला टाहो/आक्रोश आईचा असतो. जन्मलेल्या बाळाला जन्मदात्री आणी तिचा स्पर्श ह्या दोनच गोष्टी असतात. त्या बाळाकरता खूप अश्रू ढाळले. विचार केला की कोण रडलं असेल तिच्याकरता. आईतर नक्कीच नाही! Sad हा आपला समाज आणि मानसिकता.

आज सकाळी पेपरमध्ये वाचले की दिल्ली घटनेतील पिडीत मुलगी म्हणतेय की तिला जगायचय. पण तिची परिस्थिती इतकी गंभिर आहे की ती जगली तरी तिचे आयुष्य नेहेमीकरता उध्वस्त झाले आहे. तिचे छोटे आतडे तिच्यावरच्या आत्याचाराने बाहेर आले होते, ते तिला दाखल केल्यावर कापून काढले, उरलेले आतडे गँगरीन मुळे नंतर काढावे लागले. ती वाचली तरी आयुष्यभर नेहेमी नाजूक राहणार, आणि IV वर रहावे लागणार. गेले ३ दिवस ती व्हेंटीलेटर वर होती, असेच चालू राहिले तर तिच्या शरीरात नळ्या घालून तिला कॄत्रिम श्वासोत्सवासावर ठेवणार, पण मग तिला फुफुसाचे इन्फेक्शन होण्याची खूप शक्यता आहे, म्हणजे परिस्थिती अजून गंभीर होणार.... काय गुन्हा होता तर ९-९:३० वाजता भर वस्तीच्या भागातून ती प्रायव्हेट बस मध्ये चढली!

कायदे बदलूनही आपल्या देशात काही होणार नाही आहे. कायदे पाळणारे बदलले नाही तर कायद्याचा काय उपयोग. कायदे न पाळणारे कधीही बदलणार नाही. धाक दाखवून किंवा भ्रष्टाचार करुन पळवाटा काढणारे लोक ... कायदा पाळणे त्यांची मानसिकताच नाही आहे. ही लोक बदलायला २-४ पिढ्या जाव्या लागतील जे आपल्या हयातीत कधीही होणार नाही. कितीही डिप्रेसिंग असले तरी हेच सत्य आहे.

जनतेने रोजच्या आयुष्यात साध्या सोप्या गोष्टी अवलंबल्या तर फार मोठा बदल होऊ शकेल. उदा. आपल्या आजुबाजुला जर काही दुर्घटना घडत असेल तर ती रोखण्यासाठी जमेल तेवढा प्रयत्न करणे, कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला उत्तेजन न देणे, इ.

पुर्वी पोलिसांचे खबरी लोकांशी चांगले संधान असायचे आणि मोठे जाळे असायचे, ते खुप मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाले आहे गेल्या अनेक वर्षांत (एका पोलिस अधिकार्‍याने मुलाखतीत हे सांगितले होते).
एकतर असे जाळे पुन्हा मोठ्या प्रमाणावर कार्यरत केले गेले पाहिजे. तसेच पोलिस यंत्रणेला एक समांतर यंत्रणा उभी केली गेली पाहिजे, उदा. युवक युवतींचे गट करून त्यांना विशिष्ट आयडेंटिफिकेशन देऊन गस्त घालणे, आपापल्या विभागावर करडी नजर ठेवणे, आणि जर काही घडले तर गुन्हेगार व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देणे, अपघातग्रस्त व्यक्तीला सर्व प्रकारची मदत करणे, इ. कामांचे अधिकार दिले जावेत. आणि या बदल्यात त्यांना काही मोबदला मिळावा. काही विशेष सवलती मिळाव्यात (उदा. प्रवासात सवलती, कमी दरात सिनेमाची तिकिटे, इ.) आणि हे काम काही ठराविक मर्यादित काळापुरते असावे. नंतर पुढची तरूण पिढी त्यामधे येऊ शकेल, असा फ्लो असावा. हे जर झाले तर अनेक गोष्टींना जरब बसु शकेल. आणि तरूण पिढी भलत्या सलत्या मार्गाला जाणार नाही.