दिगडी

Submitted by मीन्वा on 19 December, 2012 - 09:04

"आजच्या वर्तमानपत्रातला मान्यवर लेखमालेतला लेख वाच म्हणजे कळेल तुला असं काही नसतं ते" आता मात्र गजाने दिग्याच्या मर्मावरच घाव घातला. गण्या मागून 'नाही नाही नको नको गप्प बस' अशा अगणित खाणाखुणा करत होता. त्या सगळ्यांना न जुमानता, अत्यंत धीरोदात्तपणे तो त्याचा प्रेरणादायी भाषण स्त्रोत पूर्ण करता झाला.

एकाच वेळी दिग्याने "सुप्रभात" हे वर्तमानपत्र घेऊन आणि गण्याने कपाळावर हात मारुन दिवाणावर ठाण मांडलं.

गजालाच काय गण्याला सुद्धा माहित होतं, हा रामबाण काम करणारच. पण प्रेरणादायी, स्फूर्तीदायी भाषण करुन दिग्याला मुलगी पहायला तयार करायच्या जोशात, गजा त्याच्या सल्ल्याच्या होणार्‍या दुष्परीणामांचा विचार करायला सपशेल म्हणजे अगदी सपशेलच विसरला होता. युद्ध जिंकलेल्या जेत्याच्या आविर्भावात त्याने खोलीत एक विजयी रपेट मारली. जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावरुन अगदी टपाटपा टपकत होता. गण्या शून्य नजरेनी त्याचा हा अल्पकाळ टिकणारा आनंद बघत बसला. आता एकंदरीतच जे नुकसान व्हायचं होतं ते झालंच आहे तर "तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे", असा विचार करुन तो उगीच इकडे तिकडे पहात राहीला.

'दिगंबर उर्फ दिग्या', 'गजानन उर्फ गजा' आणि 'गणेश उर्फ गण्या' या तिघांची लहानपणापासूनच घनिष्ट मैत्री होती. तिघांच्याही घनिष्ट मैत्रीमुळेच त्या तिघांच्या 'तिकडीला' लाडाचं असं 'दिगडी' नाव पडून गेलं. तिघांनाही एकमेकांच्या अगदी लहान सहान सवयी, आवडीनिवडी माहीत होत्या.

ही सर्व चर्चा चालू होती ती दिग्याच्या लग्नाबद्दल. तसं तर तिघंही लग्न करण्याच्या वयाचे झाले होते. तिघांचेही लग्नाचे स्वप्रयत्न असफल झाले म्हणताना, पालकांनीच कंबर कसली होती. दिग्याच्या आईच्या एका मैत्रिणीची कॉल सेंटरमधे काम करणारी मुलगी, ही त्याच्या आईच्या मते अतिशय योग्य मुलगी होती. दिग्या काही म्हणता काही ऐकायला तयार नव्हता. कॉल सेंटरमधल्या नाईटशिफ्टच्या कल्पनेनीच त्याला धडकी भरली होती. म्हणजे बायकोने नाईटशिफ्ट करण्याबद्दल त्याला अजिबात प्रॉब्लेम नव्हता, पण जर का ती मुलगी वेळीअवेळी घरी येणार असेल, तर दार उघडण्यासाठी उठण्यास मात्र तो सर्वतोपरी असमर्थ होता. खरं म्हणजे हे इतरांना पटवण्यासाठी त्याला अजिबातच प्रयत्न करायची गरज नव्हती. त्याच्या झोपेचे किस्से अगदी जगप्रसिद्ध होते.

गण्याच्या दृष्टीने यापेक्षाही अत्यंत ज्वलंत प्रश्न याक्षणी त्यांच्या समोर उभा होता तो म्हणजे दिग्याच्या हातातला तो पेपर आणि मान्यवर उद्योगपती जागेश्वर यांचा तो लेख.....

हा प्रश्न आत्ता नाही तरी थोड्या वेळाने त्यांच्या समोर दत्त म्हणून उभा राहणारच होता. कारण रोज तीन रुपये खर्च करुन खरेदी केलेला पेपर पहिल्या पानाच्या वरच्या डाव्या हाताच्या कोपर्‍यातल्या पहिल्या अक्षरापासून ते शेवटच्या पानाच्या उजव्या हातातल्या खालच्या कोपर्‍यातल्या शेवटच्या अक्षरापर्यंत वाचलाच पाहिजे असं दिग्याचं प्रामाणिक मत होतं. नुसतंच प्रामाणिक मत नव्हे तर दॄढनिश्चयच होता.

"मला अजूनही हे कळत नाही - वर्तमानपत्राचा हा असा अवाढव्य आकार ठेवण्याची कल्पना कुणाच्या महान डोक्यातून आली आहे ते. अरे, हा काय आकार झाला एका एका पानाचा? माणसाने धरायचा कसा तो कागद. १०० पानी वहीच्या आकाराचा का नाही ठेवत पेपर" कित्येक शे वेळा ऐकवलेला आपला हा विचार दिग्याने पुन्हा एकदा ऐकवला.

त्याचं पुढचं वाक्य गजानेच म्हणून टाकलं.

"ते काही असलं तरी इतके महान महान लोक तीन रुपयात आपल्या यशाचं गमक सर्व लोकांसाठी उपलब्ध करुन देतात म्हणजे आपण वाचायलाच हवं. जगात अशी चांगली लोकं आहेत म्हणूनच तर आपल्यासारख्या लोकांना उत्तम मार्गदर्शन मिळतं ना! " हे वाक्य म्हणताच गजाला स्वतःलाच जरासं विचित्र - अस्वस्थ वाटायला लागलं, येणार्‍या संकटाची जराशी चाहूल त्यालाही लागलीच. त्याने झटक्यात गण्याकडे पाहीलं, संसर्गजन्य आजार असावा त्याप्रमाणे गण्याच्या चेहर्‍यावरची काळजी त्याच्याही चेहर्‍यावर झळकायला लागली.

----------------२------------

तिघेजण "रेडी" बघून रात्री बारा वाजता घरी आले. ओठावर ढींकचिका अजूनही घोळत होतं. खोलीत आल्या आल्या गण्या आणि गजा मस्तपैकी दिवाणावर लोळत पडले.

"सलमान- यार या वयात पण काय भारी दिसतो. काय पण मेन्टेन केलंय स्वतःला" गजाने कमेंट पास केली.

"अरे या फिल्मी लोकांना दुसरं कामंच काय असतं? नुसतं स्वतःच्या हेल्थची आणि लुक्सची काळजी घ्यायची. उठल्यापासून झोपेपर्यंत यांच्या तैनातीला नोकर चाकर असतातच. आपल्यासारखं थोडंच आहे. दूध आपणंच आणा, चहा करा, ब्रेकफास्टचा ताप वेगळा. इतकं सगळं करुन वर पुन्हा १० च्या आत मस्टरवर सही करायला धावा. त्यातनं साला काळ्या टपलेलाच असतो ऑफिसमधे, की कधी मिनीटभर उशीर होतो आणि कधी लाल शेरा देतो असंच झालेलं असतं त्याला. हॅट हे काय साला लाइफ आहे." - गण्या

अचानक "हुप्पा हुय्या" असा जोरदार आवाज ऐकून दोघंही गडबडून इकडे तिकडे पहायला लागले. आवाज दिग्याच्या बेडरुममधून येत होता. काय चाल्लंय ते पहायला गेलेले दोघंही दिग्याला यावेळी बैठका मारताना पाहून चाटच पडले.

"अरे काय? काय चाल्लंय काय तुझं? आत्ता तर बरा होतास ना? अचानक डोक्यात तापबीप गेला का काय तुझ्या?"

"ताप ? ताप आला नाहीये ताप गेला. नुसतं सलमानच्या फीटनेसची चर्चा करुन काही उपयोग नाहीये. वाचा, वाचा जरा कालच्या सिनेबीझ सदरात आलेली "बॉलिवूड फिटनेस फ्रीक्स" मधली माहिती वाचा. सलमान, अक्षय उगीच फिट नाहीयेत. काहीही, अगदी काहीही झालं तरी ते रोजचा व्यायाम चुकवत नाहीत. थोडाथोडका नाही रोज दोन तास व्यायाम करतात पठ्ठे. अरे एकदा तर रात्री पार्टी करुन यायला सलमान ला तीन वाजून गेले त्यानंतर त्याने दोन तास व्यायाम केला."

"अरे, पण रात्री बारा वाजताच दुसरा दिवस सुरू झाला होता ना? आणि त्यांची गोष्ट वेगळी आपली वेगळी. " गजाने उगीच काहीतरी म्हणायचा प्रयत्न केला.

सिनेबीझ सदराचा उल्लेख झाला तेव्हाच आता कशाचा काही उपयोग नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. दोघंही जास्त वेळ न दवडता झोपायला निघाले. झोपायला जाण्याआधी झक्कपैकी चहा प्यावा हा विचार येताच त्यांनी किचनकडे मोर्चा वळवला. दिग्याने चहाला निर्धारपूर्वक नकार दिला. अर्थात एक जोरदार बैठक मारताना त्या दोघांच्या अनारोग्यपूर्ण जीवन पद्धतीचा निषेध करायला तो विसरला नाही. गजा आणि गण्याने ते अजिबात मनावर घेतलं नाही.

रविवार सकाळी गजाने डोळे उघडले तेच मुळी दिग्याच्या आवाजाने.

"आयाय गं, मेलो. मेलो...गजा.. गण्या अरे..." बाहेर धाव घेऊन पाहतात.. तर दिग्या हॉलमधल्या दिवाण आणि भिंतीमधल्या जागेत आपल्या शरीराचा त्रिकोण, नाही.. नाही..चौकोन.. नाय पंचकोन.. अरे असाच कुठला तरी नक्की न सांगता येणारा आकार बनवून ऊभा .. बसलेला ..कोंबलेला च्च! जाऊ दे.. नुसताच होता. दिग्या त्या मधल्या जागेत कसला तरी आकार बनवून होता. काही क्षण गजा आणि गण्या दोघांना त्याचे हात पाय नक्की कुठून कुठे गेलेत हे शोधायला लागले.

"गजा हे म्हणजे शाळेत आपल्याला मुर्गी बनवलं. त्या मुर्गीने साष्टांग नमस्कार केला असतानाच थोडसं त्रिकोणासन करायचा प्रयत्न केला तर जे बनेल ते बनलंय असं नाही का वाटत तुला?"

"अरे पण त्रिकोण कुठे दिसतोय तुला?"

"हे बघ इकडे ये या बाजूनी पाहीलं तर त्रिकोणासन .. असं वरुन पाहीलंस तर नमस्कार.." गण्या उत्साहानं उलगडून सांगायला लागला.

"हँ, हे म्हणजे तुला सांगतो, गुंतवडा नावाचा एक खेळ आम्ही लहानपणी खेळायचो. एकावर राज्य असायचं. उरलेल्यांनी एकमेकांचा हात पकडून गोल करायचा आणि हात न सोडता एक गुंता तयार करायचा. ज्याच्यावर राज्य असेल त्यानं १० सेकंदात सूचना देऊन तो गुंता सोडवायचा. तर गुंता झाल्यावर इतर खेळाडू हात सोडून निघून गेले तर जे काय बनेल ते बनलंय हे. "

"अरे ए, मित्र आहात का शत्रू अरे मला यातून सोडवायचं राहीलं बाजूला ... एकमेकांना खेळ आणि आसनं कसली शिकवताय. " दिग्याचा दम निघत होता. उरला सुरला जीव संपायच्या आत हे दोघं आपल्याला मदत करतील याची शक्यताही त्याला धुसर दिसायला लागली होती.

थोडा वेळ नक्की काय.. कसं धरुन दिग्याला नेहेमीसारखं सरळ करता येईल याची चर्चा करण्यात गेला. अखेर गजा आणि गण्याचं एकमत झाल्यावर त्यांनी दिग्याला सरळ करुन दिवाणावर झोपवलं. दोन तीन ग्लास पाणी प्यायल्यावर दिग्याकडून कळलेली हकीकत अशी. महाराज रात्री पन्नास बैठका मारल्यावर दमले. पण मनाला बरं वाटेना.. कुठे दोन तास आणि कुठे अर्धा तास. सकाळी लवकर उठून दिड तास व्यायाम करायचाच असा पण करुन महाराज हॉलमधे दिवाणावर आडवे झाले. रात्री मारलेल्या बैठकांचा जो परीणाम व्हायचा तो झालाच सकाळी एकही अवयव दुखल्याशिवाय हलत नव्हता आणि मग उठण्याच्या प्रयत्नात जे व्हायचं तेच झालं. दोन महिन्यापूर्वीचा हा प्रकार दोघांनाही अजूनही चांगलाच आठवत होता. त्यानंतर चार दिवस दिग्यानं अत्यावश्यक हालचाली सोडून, इतर काही करण्यास तो असमर्थ असल्याचं जाहीर केलं. एकंदरीत गजा आणि गण्याकडून भरपूर सेवा करुन घेतली.

बरं, हा काही एकमेव किस्सा नव्हता. त्रिफळाचूर्ण, च्यवनप्राश, पादाभ्यंग असे औषधीप्रयोग... अर्थात आयुर्वेदाचार्यांच्या वृत्तपत्रातल्या मार्गदर्शक लेखाप्रमाणे. योगासने, लाफ्टरक्लब, आणि अशा अनंत प्रकारच्या व्यायामांचे प्रयोग..फिटनेस गुरुंच्या मार्गदर्शनाप्रमाणे.. समाजकार्याचे प्रयोग. मागे एकदा वॉचमनच्या दोन मुलांचा जबरदस्ती अभ्यास घेण्याच्या त्याच्या प्रयत्नांमुळे वॉचमनच्या घरातले लोकही हैराण झाले होते. शेवटी मुलांनी स्वतःच चांगला अभ्यास करु असं वचन देऊन आपली व आपल्या परीवाराची सुटका करुन घेतली. असे अनेक प्रयोग गजाने व गण्याने सहन केले होते.

---

हां! तर आत्ताचा लेख या दृष्टीकोनातून पाहता फारच धोकादायक होता. अत्यंत श्रीमंत आणि प्रसिद्ध उद्योगपती श्री जागेश्वर यांनी मुलाखत दिली होती.

"दिवस - रात्र - सकाळ - दुपार - संध्याकाळ हे सर्व आपण व्यावहारीक सोईकरता तयार केले आहेत. प्रत्यक्षात असं काही नसतं. जगात असेही देश आहेत जिथे सहा सहा महिने सूर्य मावळत नाही. तिथे लोकांनी सूर्योदयापूर्वी उठायचं आणि सूर्यास्तानंतर झोपायचं ठरवलं तर त्यांना सहा महिने झोपायलाच नको. मी स्वतः ह्या सगळ्याला फारसं महत्व देत नाही. मनुष्याला २४ तासात पाच ते सात तास झोप आवश्यक आहे. तसंच चोवीस तासात एक ते दोन वेळा आंघोळ, ब्रश अशा आवश्यक स्वच्छतेची काळजी घेणंही महत्वाचं आहे. एकदा आपणं हे लक्षात घेतलं की आपल्या मनाप्रमाणे व सोयीप्रमाणे आपला दिनक्रम आखता येतो. इतकंच नव्हे तर आपण आपल्या छंदांसाठी, व्यायामासाठी हवा तितका वेळ काढू शकतो. मी रोज माझ्या मुलांना दोन तास क्वालिटी टाइम देतो. "

दिग्या सुरुवातीला मोठ्यानं वाचत होता. हळू हळू त्याचा आवाज कमी होऊन तो मनातल्या मनात वाचू लागला. त्याच्या चेहर्‍यवरचा जगाच्या निर्मितीचे रहस्य उलगडल्यावर व्हावा एवढा आनंद आणि डोळ्यातली खास चमक, गजा आणि गण्याच्या पोटात गोळा आणायला पुरेशी होती.

रात्रीचे नऊ वाजले होते. येईल त्या संकटाला येईल तेव्हा तोंड देऊ असा विचार करुन गजा आणि गण्या आडवे झाले. त्यांची पारंपारीक विचारसरणी त्यांच्या डोक्यात अशी फीट्ट होती. घड्याळात रात्रीचे नऊ वाजलेले पाहीले की त्यांना लगेच झोप येऊ लागायची आणि पाचच मिनीटात दोघेही घोरू लागले होते.
-----

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. पूर्णविराम हवेत. वाक्य संपल्याचे संदर्भाने समजतंय पण वाक्य परिच्छेदाच्या शेवटी आहे म्हणून पूर्णविराम ऐच्छिक ठरत नाही.
२. परिच्छेद किती लहान असावा ह्याबद्दल काय नियम आहेत हे तपासावे लागेल. सामान्यपणे ७-१० वाक्यांचा एक परिच्छेद असावा, एका परिच्छेदात एक नवीन कल्पना/मुद्दा असावा, हे शाळेतील नियम. एक वाक्याचे परिच्छेद फारसे माझ्या वाचनात नाहीत.
३. स्वल्पविराम व विरामचिन्हे (इंव्ह्र्तेद कोम्मा - सिंगल व डबल) ह्याचा वापर सुयोग्य नाही. "दिगडी" पेक्षा 'दिगडी' मला योग्य वाटते.
४. 'की' सोडले तर तुमचे लेखन शुद्ध वाटले. छान!!

लेखन ही छान आहे!

मी कथा लेखनातली फार मोठी जाणकार नाही. त्यामुळे वाचक म्हणून कथा वाचताना जे वाटले ते लिहित आहे.

काही वाक्ये फार मोठी मोठी आहेत. छोटी, सुटसुटीत हवी होती असे वाटले. एक वाक्य वाचून संपेस्तोवर वाक्याच्या सुरुवातीचा मजकूर नक्की काय होता हे पाहण्यासाठी वाक्याची सुरुवात परत वाचावी लागली, निदान मला तरी.

(गेल्या ववि मध्ये मी 'तोलून मापून बोला' हा खेळ घेतला होता. त्याची आठवण झाली. Proud ह्या कथेतले उतारे मी त्या खेळासाठी वापरू शकेन असे वाटले.)

उदा:
पण प्रेरणादायी, स्फूर्तीदायी भाषण करुन दिग्याला मुलगी पहायला तयार करायच्या जोशात, गजा त्याच्या सल्ल्याच्या होणार्‍या दुष्परीणामांचा विचार करायला सपशेल म्हणजे अगदी सपशेलच विसरला होता.

कारण रोज तीन रुपये खर्च करुन खरेदी केलेला पेपर पहिल्या पानाच्या वरच्या डाव्या हाताच्या कोपर्‍यातल्या पहिल्या अक्षरापासून ते शेवटच्या पानाच्या उजव्या हातातल्या खालच्या कोपर्‍यातल्या शेवटच्या अक्षरापर्यंत वाचलाच पाहिजे असं दिग्याचं प्रामाणिक मत होतं.

पुलेशु.

अजून मोठा भाग येऊद्या.
त्रिकूट असा नेहमीचा शब्द न येता 'दिगडी' आलाय. हा प्रकार नवा वाटला. Happy

बाकी कथा पूर्ण झाल्यावर (अर्थात पूर्ण झाली तर.)>> पूर्ण कर. ही विनंती वगैरे काही नाही. आदेश आहे Proud