नकोसे वाटते

Submitted by रसप on 18 December, 2012 - 23:37

स्वत:ला शोधणे नकोसे वाटते
निराशा दाटणे नकोसे वाटते

सरे ना वाट ही किती चालायचे ?
विसावा पाहणे नकोसे वाटते

उधारी दे जरा सुखाची जीवना
भिकेचे भोगणे नकोसे वाटते

नव्याने हारणे मला चालेल पण,
सततचे झुंजणे नकोसे वाटते

खरा ये वा मला 'नसे मी' सांग तू
तुझे आभासणे नकोसे वाटते

जराशी रात्र दे जरासा चंद्र दे
उन्हाने पोळणे नकोसे वाटते

उद्याशी आजचा निरंतर हा लढा
कुणीही हारणे नकोसे वाटते

तुझ्या हातातले बनावे खेळणे
स्वत:शी खेळणे नकोसे वाटते

तुझा होईल रे 'जितू'ही ईश्वरा
तुझे बोलावणे नकोसे वाटते

....रसप....
१८ डिसेंबर २०१२

इथे ओशाळला म्हणे मृत्यू कधी
पुन्हा 'संभा'वणे नकोसे वाटते

....रसप....
http://www.ranjeetparadkar.com/2012/12/blog-post_19.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्याशी आजचा निरंतर हा लढा
कुणीही हारणे नकोसे वाटते

तुझ्या हातातले बनावे खेळणे
स्वत:शी खेळणे नकोसे वाटते<<< उत्तम अशआर

स्वत:ला शोधणे नकोसे वाटते
निराशा दाटणे नकोसे वाटते

उधारी दे जरा सुखाची जीवना
भिकेचे भोगणे नकोसे वाटते

जराशी रात्र दे जरासा चंद्र दे
उन्हाने पोळणे नकोसे वाटते<<< हेही आवडले.

गझल सुंदर. अभिनंदन!

वृत्तही छानच आहे.

-'बेफिकीर'!

स्वत:ला शोधणे नकोसे वाटते
निराशा दाटणे नकोसे वाटते... व्वा!

उधारी दे जरा सुखाची जीवना
भिकेचे भोगणे नकोसे वाटते...ह्म्न! खरयं!

जराशी रात्र दे जरासा चंद्र दे
उन्हाने पोळणे नकोसे वाटते... सही रे !

तुझ्या हातातले बनावे खेळणे
स्वत:शी खेळणे नकोसे वाटते...ये बात!!

वृत्त खूपच छान हाताळले आहेस
गझल आवडली

खरा ये वा मला 'नसे मी' सांग तू>>>>>>>
<<<<ये चल मृत्यो या श्वासाला
वा ठर खोटा जगासारखा >>>--- बहुधा बेफीजींच्या कवितेतील ओळी आहेत या

असो गझल खूपच मस्त आहे जितूभाय
अभिनंदन व धन्यवाद