आक्रमण

Submitted by अरुण मनोहर on 17 December, 2012 - 16:50

सतत भेटीला येणा-यांची वर्दळ
काही नजरा झुकलेल्या, काही चोरुन न्याहाळणा-या
काल ते पोलिस देखील असेच काय काय विचारीत होते.
तिला काहीच उमजत नव्हते,
हे कोण आहेत, कशाला चवकशा करीत आहेत?
नवरा तिला सारखा समजावित होता.
अग तू धीराने घे.
तुझी काहीच चुकी नाही.
तू कशाला स्वत:ला बोल लावतेस?
तू व्यवस्थित माहिती दे,
पोलिस त्या बदमाषाला नक्की पकडतील...
नव-याचे समजावणे, पोलिसांची चवकशी
शब्दांचे मोहोळ तिच्या कानांना दंश करीत सुटले होते
त्या वणव्यातही नवरा इतका शांत कसा राहिला?
चवताळून त्याने सगळे जग पेटवून का दिले नाही?
का नुसता माझ्या जखमांवर सांत्वनाचे शब्द चोळीत बसला होता?

सतत भेटीला येणा-यांची वर्दळ
लाज, कींव, दु:ख, सुटकेचे निश्वास पांघरलेल्या नजरा
आता कशी आहेस? काही मदत हवी आहे का?
कसं सहन केलं असेल हो पोरीनी?
जमिनीत रुतलेल्या तिच्या नजरेला
दिसल्या नुसत्या समोरच्या हलत्या सावल्या.
वादळ येऊन गेल्यावर जागोजागी विखुरलेल्या पानांसारख्या,
तशाच दोन क्षण थांबून निघून जाणा-या.
त्यांनी विचारलेले शब्द देखील हवेत विरून गेलेले,
मनावर काहीच उमटले नाही.
कानांना जाणवत होती भेटायला येणा-यांची दबकी कुजबूज
अंधा-या बिळातून जशी खसखस ऐकू यावी तशी
आक्रमक न होता आक्रमणाची शक्यता सांगणारी.

तो देखील असाच अंधा-या बोळातून अचानक समोर आला होता.
रात्री उशीरा कामावरून परत येतांना,
घराकडे निघालेली ती आपल्याच स्वप्नात मग्न
घरी जाऊन मस्तपैकी वॊश घेऊन टीव्ही समोर लेट शो पहात पडायचे
उद्या सुट्टी, कामासाठी लवकर उठण्याची घाइ नाही!
नवरा उद्या रात्री परगावाहून परत येणार
त्याचा आवडता स्वयंपाक करून ठेवायचा.
असे बेत डोळ्यासमोरून तरळत होते,
तेवढ्यात, अंधारातून अचानक अंगावर आलेली वावटळ
अंगाभोवती आवळले गेलेले दोन राकट हात
चेह-यावर फ़ुत्कारणारे उष्ण, पुरुषी श्वास
गळ्यावर बोचणारे सुरीचे पाते
तिच्या धडपडीला न जुमानता तोंडात खुपसले गेलेले बोळे
डोळ्यावर बांधलेली पट्टी,
गाडीच्या मागच्या सीटवर,
हातपाय बांधलेल्या असहाय अवस्थेत
हुंदके गिळत केलेला प्रवास

आतापर्यंत लग्नानंतरच्या दोन वर्षात नव-याने नाजूक फ़ुलासारखे वागविलेले.
जणू पारिजातकाचा सुगंध घ्यावा,
तो देखील आपला उष्ण श्वास लागून
ते कोमेजणार नाही ह्याची काळजी घेत!
त्याच्या हळूवार फ़ुलविण्यानी ती मोहरून जायची
मोरपिसांच्या झिरमिळ्या गात्रांत झिरपाव्या असा त्याचा स्पर्श!
बुडबुड्यावर स्वार होऊन झुळुकेबरोबर तरंगत रहावे असा आभास
तिच्या देहाची स्वायत्तता कायम ठेऊन,
तिचा देह स्वत:मधे सामावून घेण्याची त्याची जादू.
हे सगळे आपल्याला पुन्हापुन्हा हवेहवेसे वाटायचे, तरी प्रत्येक वेळीस
मिलनासाठी त्यानेच गोडीगुलाबी करायची,
दोन वर्षातील प्रत्येक मिलनात आस्वादलेले सुखद क्षण
हिरव्याकंच वृक्षांचे गालीचे पसरलेला
आणि मनमोहक फ़ुलांच्या राशींनी बहरलेला निळासावळा डोंगर
सावरीच्या पिसावर स्वार होऊन
सुगंधी झुळुकांसोबत अलगद चढायचा
डोंगरमाथ्यावरील सोनेरी किरणांमधे नहाण्यासाठी
डोंगरमाथ्यावर आल्यानंतर खाली पाहीले की
खोल खोल खाली खुणवायचे चकाकते चंदेरी पाणी
वाटायचे, सावरीच्या पिसाची पेटलेली उल्का व्हावी
अन त्यावरून सूर मारावा वेगाने खाली
त्या चंदेरी सरोवरात मुसंडी मारावी
उल्केच्या जळणा-या स्पर्शाने
चंदेरी पाण्यातून निमिषार्धात कढत वाफ़ेचे ढग
उफ़ाळावे चोहीकडे
आपण तसेच उल्केसोबत खोल
आतपर्यंत डुबकी मारून तेथेच विसावावे
पण असे न होता,
तो अलगद सावरीचे पीस फ़ुंकरीत
घेऊन जायचा मला चंदेरी सरोवराकडे
हळूवार डोलत, लहरत, पीस उतरायचे
झिरमिल पाण्यावर,
अन तिने तरंगत रहायचे स्वप्नवत, पाण्यावरच.
तप्त उल्केची आता ठिणगी झालेली
एखाद्या गारगार शिंतोड्याने तीही केव्हा विझली ते कळायचे नाही.

पुढच्या वेळेची हुरहूर लावून नाहिशी होणारी उल्का,
तरीही पुढच्या वेळीस तीच पुन्हा त्याला लटके दूर ढकलणार,
आणि तोच पुन्हा नवीन सफ़रीसाठी मनधरणी करणार!

त्या रात्री कोण कुठल्या आगांतुकाने
केलेली बळजबरी, तिच्या देहाची विटंबना,
तिच्या अस्तित्वाचे धिंडवडे,
कारमधून उचलून कुठल्याशा रानातील झोपडीत
तोंडातले बोळे निघाल्यावर कानठळ्या बसविणारा तिचा आक्रोश
फ़क्त बहि-या रानाने ऐकलेला ओरडून ओरडून घसा सुजलेला
रडून रडून डोळे आटलेले

त्याला हवे ते घेऊ दिले नाही तर
जीवे मारण्याच्या धमक्या
पोकळ नाहीत हे त्याचे अमानुष थंडगार
डोळे बजावित असले तरी,
शरीरावर इतके अत्याचार होत असतांना
जीवाची भिती माणसाला इतकी लाचार बनविते?

त्या रात्री जिवाच्या भितीने थिजून
तिने सर्वस्व त्या नराधमाच्या आधीन केले होते
फ़ांद्यावरून फ़ुले ओरबाडून ती मुठीत चुरडून हुंगावी तसा त्याचा आवेश!
जंगली श्वापदाने कच्चे मांस दाढेखाली भरडावे तशी बुभुक्षा!
ती विव्हळली, होरपरळी, ठसठसली.
यातना असह्य झाल्या तशी ती आक्रसली,
आक्रसून जशी तिने वास्तवातून माघार घेतली,
तशी ती एका अगम्य खडबडीत मार्गावरून जाऊ लागली होती

झंझावातावर फ़ेकले गेलेले सावरीचे पीस
तिला प्रचंड वेगाने एका डोंगरमाथ्याकडे घेऊन निघाले
पण तो डोंगर मात्र पुर्वी दिसला होता तसा
हिरवाकंच, किंवा सुवासिक फ़ुलोरा पांघरलेला नव्हता.
चारीकडे निवडुंगाची काटेरी राने माजलेली,
निवडुंगांच्या नग्न देहांना विळखे घालून
रक्तपिपासू विषवेली त्यांचे हिरवे रक्त शोषतांना,
जमिनीवर विंचवांचे थवे दंश करण्यास टपलेले
बोच-या काट्यांमधून, विंचवांच्या नांग्यांमधून,
विषवेलींचे जहाल विष अंगावर घेत अतिशय वेगाने
झंझावाताने पिसाला डोंगरमाथ्यावर आणून सोडलेले
खोल खाली तेच शांत सरोवर, तेच चंदेरी पाणी बोलावतेय,
मार सूर खोल खोल आतवर
क्षणार्धात पिसाची तप्त पेटती उल्का होऊन झेपावली खाली........
प्रचंड वेगाने जन्मोजन्मीची अघोरी तृष्णा शांतवायला.......

तिच्या डोळ्यांतून झरणा-या अदृष्य आसवांच्या लडी
रुमालाने टिपीत तिचा नवरा अजूनही तिला समजावित असलेला...
अगं, तू स्वत:ला दोष नको लावून घेऊ.
तू आरडाओरडा केला नाहीस ते चांगलेच केलेस.
तुला काही झाले असते, तर मी आज काय केले असते?
त्याने जे काही केले, ते तुझ्या इच्छे्विरुद्ध केले.
पण तू तर फ़क्त माझीच आहेस ही वस्तुस्थिती थोडीच बदलतेय!

एखाद्या वेड्याकडे पहावे तशा अचंब्याने
आपल्या शांत नव-याकडे पहातच राहिलेली ती...
देहाची होत असलेली विटंबना त्या रात्री ती टाळू शकत नव्हतीच.
निसर्गानियमानुसार देहाने कोणते का संकेत मनाला पाठविले असेनात,
तरी मनाने ते संकेत धुडकारून देहावर ताबा का मिळविला नाही?
कां असेल नसेल ते बळ गोळा करून,
गळ्यावर खुपणारी सुरी खेचून त्या नरपिशाच्याच्या छातीत खुपसली नाही?
की त्याच्या आक्रमणाचा धसमुसळेपणा
मनाला क्षणासाठी तरी, भुलावून गेला?
अन हा हिमालयासारखा शांत नवरा म्हणतोय,
अगं, तू कशाला स्वत:ला बोल लावतेस!
त्या रात्री न झालेले आज स्वत:च पूर्ण करण्यासाठी
हा पेटून कां उठत नाहीये?
कां मिळेल ती सुरी घेऊन माझे कलंकीत शरीर आणि मन संपवून टाकीत नाहीये?
न सुटणारे प्रश्न उगाळीत ती मिटून बसली.

नव-याचे समजावणे चालूच होते. त्याचे हळुवार, गोंजारणारे शब्द कानांवर पडत होते,
पण त्यांचा अर्थ मात्र हलकेच तरंगणा-या पिसावर स्वार होऊन तिला खिजवीत राहिला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users