मीहून स्वत: स्वप्नांच्या सरणावर गेलो होतो!

Submitted by सतीश देवपूरकर on 16 December, 2012 - 08:54

गझल
मीहून स्वत: स्वप्नांच्या सरणावर गेलो होतो!
जीवना! तुझ्या, मी, भोळ्या हसण्यावर गेलो होतो!!

मी स्वत: पाडला होता पायावर धोंडा माझ्या!
असणे न पाहिले केव्हा, दिसण्यावर गेलो होतो!!

तसदी न दिली कोणाला, मी मेल्यावरती सुद्धा!
मी स्मशानातही माझ्या खांद्यावर गेलो होतो!!

इतक्याच कारणासाठी टाळती मैफिली मजला....
मी थेट सुरेश भटांच्या वळणावर गेलो होतो!

अभिमान वाटतो मजला या माझ्या हौतात्म्याचा!
मी खरे बोलण्यासाठी फासावर गेलो होतो!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतला मलाही जास्त नाही आवडला बाकी गझल एकदम भारी वाटली

माझा एक जुना शेर होता ........ अजूनपर्यंत एकटादुकटाच आहे .... कालच त्या जमीनीची गझल करावी असे योजले आहे नक्कीच प्रयत्न करीन ..ही गझल वाचून मला तसे करावेसे वाटते आहे

तुझ्यातही बघेल जग सुरेश भट कुणी नवा
तुझ्या मनात वैभवा तुझा वसंत पाहिजे

....... खूप खूप धन्यवाद सर!!

वैभवा!
रोज पाहिजे तुला बहार जीवनामधे!
पाहिजे वसंतही तसाच काळजामधे!!

प्रा.सतीश देवपूरकर
टीप: मतल्यात काय खटकले?

स्वप्नांच्या सरणावर जाणे = जीवनाच्या भोळ्या हसण्यावर जाणे हा अर्थ फार उशीरा अत्ता विचर करताना लागला आहे मला आधी या दोन ओळीतले कनेक्षनच समजले नाही आताचा अर्थही ओळींची आदलाबदल करून /वरची खाली खालची वर ...मग लागला आहे

"म्हणजेच" हा अव्यक्त शब्द आहे असे मी मानले आहे आधी "कारण", "पण" ,"किंवा" ,"तसेच" असे अव्यक्त शब्द योजून अर्थ लावू पाहत होतो

चुकले असल्यास क्षमस्व

माझा एक शेर ; जो मी तुम्हाला अर्पण होता ...तो चुकून आठवला ..तुम्हालाही आठवेल पहा तो ...या नंतरच तुम्ही माझ्या तखल्लुसास रदीफ योजून एक गझल केली होती पहा .........

विजा घेवून येणार्‍या पिढ्यांचे स्वप्न सरणावर
चितेची राख करण्यास्तव पडा की देवसर खाली ..........

असो

वैभवा!

पिढ्या आपापली घेतील त्यांची काळजी वेड्या!
स्वत:ची काळजी थोडी तरी घे वैभवा आता!!

.................................................................
कोणी न तारतो वा कोणी न मारतो.....
खणतो स्वत:च जो तो आपापली कबर!

...........प्रा.सतीश देवपूरकर

जीवना! तुझ्या, मी, भोळ्या हसण्यावर गेलो होतो!!
<<< सुंदर मिसरा >>

मी स्वत: पाडला होता पायावर धोंडा माझ्या!
असणे न पाहिले केव्हा, दिसण्यावर गेलो होतो!!
<< छान >>

तसदी न दिली कोणाला, मी मेल्यावरती सुद्धा!
मी स्मशानातही माझ्या खांद्यावर गेलो होतो!!
<< व्वा ! >>

मी खरे बोलण्यासाठी फासावर गेलो होतो!!

<<< सुंदर मिसरा >>