अहवाल

Submitted by pkarandikar50 on 7 October, 2008 - 23:17

अहवाल

आजचा ताजा अहवाल तरी जरा वाचा,
काल दिवसाभरात चार जखमी आणि फक्त दोनच ठार.
परवा एकशेचोवीस आणि एकूणसत्तर होते.
परिस्थिती झपाट्याने निवळतीय,
असं नाही वाटत तुम्हाला?

आम्ही काही हातावर हात धरून नाही बसलेलो.
कालची प्रेसनोट वाचलीत का तुम्ही?
निवारा-छावण्यातल्या मोफत अन्नछत्रासाठी,
चव्वेचाळीस टन धान्य पोचलंसुद्धा.
मयतांच्या वारसांना वाटून झालेत
तीन कोटी सत्तवन्न लाख तीस हजार रुपये.

उच्च न्यायालयाच्या सेवनिवृत्त न्यायधीशांनाहि
रोजगार पुरवतोय आम्ही.
एक कमिशन नेमलं देखील.
त्यामागोमाग दुसर्‍याची तयारी चाललीय.
अहो, आजकाल चांगले न्यायाधीश सुद्धा
दुर्मिळ होत चाललेत, माहीतच असेल तुम्हाला.

उगीच भडकपणा नको, हां?
एक लाख लोकसंख्येमागे फक्त
शून्य पूर्णांक दोन दशांश
एवढेच काय ते ग्रस्त आहेत.
गेल्या वर्षीच्या महापूरात
एक पूर्णांक तीन दशांश होते.
त्याच्या मागच्या वर्षी चक्रीवादळ,
तेंव्हा तर एक पूर्णांक आठ दशांश होते,
हे आकडे काय सांगतात?

जळणार्‍या झोपड्या आणि प्रेतांवरचे कावळे
या पलीकडे तुम्हाला काही दिसतच नाही का?
बेघर झालेल्यांना आम्ही मोफत घरं देणार आहोत.
मंत्रिमंडळाचा परवाच ठराव झाला,
हे तुमच्या गावीहि नाही?

आमच्या सरकारची मुळीच चिंता नको.
रोज दोनचार ठिकाणी बाँब फुटतायत,
कुणा कुणाला बरखास्त करणार आहात?
अहो, असले वटहुकुम काढून कुठे
विकास होत असतो का?
आजचा ताजा अहवाल मात्र जरूर वाचा.

-बापू करन्दिकर.

गुलमोहर: 

बापू, क्या बात आहे. चिरफाड केलीत सरळ.

करंदीकर,
सद्यस्थिती अगदी अचूक शब्दात वर्णिली तुम्ही. Happy

हीही कालातीत आहे... झणझणीत अंजन घालणारी...
One who write about himself and about his own time writes about all the people and about all the time.