मेथी चिकन - बीन मसाल्याचे

Submitted by _मधुरा_ on 11 December, 2012 - 16:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नेहमीचं कांदा/ खोबरं/ टोमॅटो चं वाटण आणि भरमसाठ मसाल्यांच्या गोष्टींचा कंटाळा आला असेल तर हे करून पहा. भारी चवदार लागतं, कसलाही गरम मसाला किंवा फोडणी नसताना सुद्धा!

- अर्धा किलो चिकन ( बाईट साईज तुकडे करून )
- एक मध्यम कांदा बारीक चिरून
- एक जूडी मेथी ( फक्त पानं, किंवा चिरून, आवडीनुसार)
- एक वाटी दही
- एक मूठ कोथींबीर
- ३-४ मीर्च्या ( आवडीनुसार कमी जास्त )
- ६-७ पाकळ्या लसूण ( ईथला मोठा असतो. भारतात प्रमाण वाढवावे )
- ईंचभर आलं
- मीठ, हळद, तेल

क्रमवार पाककृती: 

methichicken.JPG
(फोटो, फोन वरून घेतलाय, फारसा नीट जमला नाहीये)

- चिकनच्या तुकड्यांना हळद चोळावी
- थोडसं तेल गरम करून त्यात मेथी परतावी. बाजूला काढून ठेवावी.
- अजून थोडसं तेल गरम करून त्यात कांदा घालावा.
- कांदा परतून थोडा मऊ झाला की त्यात चिकन घालून परतावं.
- आलं, लसूण, मीर्ची कोथींबीर चं वाटण करावं. ( वेळ नसेल तर खिसून, चिरून घेतलं तरी चालेल ) त्यात दही मिसळून नीट फेटावं.
- चिकन चा रंग बदलला ( पांढुरकं झालं, किंवा वरून शिजलं ) की त्यात ती परतलेली मेथी आणि आलं लसणाचं दही घालावं.
- ५-१० मिनीटं उकळावं आणि मग चिकन पूर्ण शिजलं की थेट पानात घेऊन गरम गरम पोळी/ ब्रेड/ भाताबरोबर खाऊन टाकावं Happy

वाढणी/प्रमाण: 
दोघांना दोन वेळेला
अधिक टिपा: 

- कोणताही अ‍ॅडीशनल मसाला घालायची गरज नाही
- चिकन मॅरीनेट करायचीही गरज नाही. ( छोटे तुकडे करायचे म्हणजे ग्रेव्ही सगळीकडून लागते)
- फ्लॉवर/ बटाटे घालून "ती चव" येणार नाही.
- दुसरेदिवशी गार सुद्धा चांगलं लागतं.

माहितीचा स्रोत: 
ग्रीन चिकन आणि मेथी खिमा च्या वेगवेगळ्या रेसीपीज वाचून केलेले स्वःप्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथल्या मोतीमहल रेस्तराँमध्ये मिळतं मेथी चिकन, पण त्यात थोडं क्रिमही असतं, किंचितश्या गोडसर चवीचं चिकन छान लागतं. लहान पोरांना तर खूप आवडतं.
पुढच्या वेळी घरीच बनवू तुझ्या रेसेपिने मेथी चिकन. Happy

छान दिसतय. लहान मुलांना नक्कीच आवडेल.
कांदा किसून घेतला तर चांगली चव येईल, असे वाटते.

दह्याला पाणी सुटत नाही का ? काजू, मिल्क पावडर किंवा मग काहीतरी कोरडा पावडर मसाला लावल्याशिवाय ग्रेव्ही दाट होत नाही असा माझा अनुभव.

मस्त दिसतयं.

अगो, दह्यातलं पाणी काढून टाकायचे किंवा ग्रीक योगर्ट वापर. छान दाट होते ग्रेव्ही.

छान दिसते आहे. मी असेच पण पालक घालुन करते. आता मेथी घालुन करेन. पण मेथीची कडवट चव नाही ना येत?

धन्यवाद लोकहो Happy
दिनेशदा, मी जेंव्हा जेंव्हा कांदा खिसून घालते तेंव्हा तेंव्हा माझ्या भाज्या कडवट लागतात म्हणून मला तरी बारिक चिरलेलाच आवडतो.
अल्पना, क्रीम घालूनही मस्त लागेल, मेथी मलई मटर च्या जवळपास टेस्ट जाईल कदाचित.
अगो, थोडं पाणी सुटतं पण शेवटी घातलं की चोथा-पाणी नाही होत. पंजाबी ग्रेव्ही ईतकी दाट नाही होत ही करी, बर्यापैकी मटण शेरवा असतो त्या कंसिसटन्सी ची होते. किंवा स्वाती म्हणते तसं ग्रीक योगर्ट वापरलं तरी चालेल.
नंदीनी, हो अगं अगदी १५-२० मिनीटात होतं. आणि नाही गरज मॅरीनेट करायची. मला कधीच तेवढा वेळ नसतो :P, छोटे तुकडे करायचे मात्र.
मला पालक-चिकन काँबो पेक्षा मेथी-चिकन काँबो जास्ती आवडतं. पालक घालते तेंव्हा मी दही नाही घालत. करून बघायला पाहिजे तसही. मेथी कडू नाही लागत.

आज केलं मेथी चिकन. पण थोडं वेगळ्या पद्धतीने. चिकन मॅरिनेट करुन ठेवलं आधी १०-१५ मिनीट - गरम मसाला, हळद, धण्याची पावडर, दही, आलं-लसुण-कोथिंबीर पेस्ट आणि मीठ लावुन.
फोडणीमध्ये रगडलेले जीरे+ धणे, चिरलेला कांदा, लसूण-आलं पेस्ट परतून त्यात टॉमॅटो आणि दोन कप चिरलेली मेथी घातली. थोडा चिकन मसाला पण घातपा, मेरिनेट केलेलं चिकन घातलं. ते शिजल्यावर अर्धी वाटी क्रिम + दोन चमचे दही+ ५-६ काजुंची पेस्ट घातली.

मोतीमहल मधल्या मेथी चिकन्सारखी चव जमली. Happy

मधुरा, आज तुझ्या पद्धतीने मेथी चिकन केले. पण दही नसल्याने मी रॅन्च ड्रेसिंग १ टे.स्पु. टाकले. छान चव आली. धन्स!

>>>मोतीमहल मधल्या मेथी चिकन्सारखी चव जमली. सही.
नोटेड फॉर नेक्स्ट टाईम. Happy

सानुली, गॅस मोठा असताना फ्रिजातलं दही घातलं तर कधी कधी फुटतं. मंद आचेवर फेटून घातलं आणि हलवत राहिलं तर कदाचित नाही फुटणार, असं वाटतयं.