संशयित

Submitted by प्रकाश कर्णिक on 11 December, 2012 - 12:02

संशयित

शिवराजला जाग आली आणि क्षणभर आपण कुठं आहोत याचं भान त्याला झालं नाही. त्याला असं जागं होण्याचा अनुभव अजिबात नवीन नव्हता आणि अर्धवट जागेपणीही त्याला माहित होतं की लवकरच पूर्ण जाग येऊन सर्व गोष्टी सुस्पष्ट होतील. पण आज नेहमीप्रमाणे बिछाना उबदार आणि मऊ लागला नव्हता तर त्याला थंडी वाजत होती आणि अंग पण ठणकत होतं याचं त्याला आश्चर्य वाटलं. कितीतरी दिवसात त्यानं निर्धारानं व्हिस्की सोडून इतर कोणत्याही अंमली पदार्थाचा वापर केला नव्हता आणि सवयीनं अगदी चार पेग नंतर सुध्दा तो गाडी उत्तमपणे चालवू शकत असे. त्याला ड्रायव्हर ठेवणं अजिबात पसंत नव्हतं कारण एक तर ड्रायव्हर लोकं हमखास स्मृतीला फितुर असत अथवा कधी नं कधी तरी होत. अगदी वीस पंचवीस हजाराच्या क्षुल्लक अँडवान्स साठी त्यांचं इमान मँडमकडे गहाण असे. स्मृती सुध्दा अतिशय संशयी आणि मत्सरी बाई होती तर कृती एकदम वेगळी आणि बिनधास्त होती. एका बापाच्या दोन मुली किती भिन्न स्वभावाच्या असू शकतात या नेहमी सतावणाऱ्या विचारा बरोबरच स्मृतीच्या आठवणीनं शिवराजला खडखडीत जाग आली आणि त्याच क्षणी वास्तवाची जाणीव पण झाली.

पोलिस लॉकप मधली सेल छोटी होती आणि वर टांगलेला पंचवीसचा बल्ब खिन्न पिवळा प्रकाश टाकत होता. सळ्या लावलेल्या खिडकीतून अजून उजेडाची तिरीप आत येत नव्हती म्हणजे बाहेर अंधार होता. खडबडीत जमिनीच्या गारव्याने शिवराजची डावी बाजू सुन्न झाली होती. एकुलतं एक कांबळं पायापाशी गोळा झालं होतं. बाहेर खुर्चीत एक पोलिस पेंगत होता. तेव्हड्यात दारातून चहावाला आत शिरला आणि त्यानं आरोळी दिली “चाय“. आवाजानं पोलिस दचकून जागा झाला. शिवराज उठून बसला. त्याला दिवसातून चार वेळा काचेच्या ग्लासमधे मिळणारा वाफाळलेला चहा प्यायची सवय होत होती, एवढेच नाही तर त्याला तो चहा आवडायला लागला होता. आज पोलिस कोठडीतला त्याचा पाचवा दिवस होता. आदल्या दिवशी स्मृतीची डेड बॉडी पोलिसांना दरीत सापडली होती.

शिवराज शुक्रवारी रात्री जवळजवळ अकरा वाजता वरळी पोलिस स्टेशनात शिरला होता. गाडी आवारात पार्क करून आत आला तेंव्हा पोलिस इन्स्पेक्टर सोनटक्के रात्र पाळीला होते. त्यांच्या टेबलासमोर काही वेळ उभे राहिल्यावर त्यांनी कष्टपूर्वक लिहीत असलेल्या डायरीतून डोकं वर करून नाकावरल्या चष्म्याच्या वरतून प्रश्न केला, “यस?”
“अँक्सिडेंट झालाय “ शिवराज म्हणाला “माझ्या गाडीचा“
“कुठे?”
“एअरपोर्ट रोडला“ शिवराज बोलला.
“मग इथे का आलाय? सांताक्रूझ, वकोला, बिकेसी सोडून?” इन्स्पेक्टर म्हणाले
“मी येणार नव्हतो. खूप विचार करून आलोय. एका माणसाला धडक लागली.” शिवराज म्हणाला
“गाडी कोण चालवत होतं?“ इन्स्पेक्टरनी विचारलं.
“मी“ शिवराज म्हणाला “गाडी बाहेर आहे”
इन्स्पेक्टर सोनटक्के समोरच्या खुर्चीकडे हात दाखवून म्हणाले “बसा“. त्यानंतर त्यांनी टेबलावरच्या फोनला हात घातला.
“कंट्रोल रूम? इन्स्पेक्टर सोनटक्के. एअरपोर्ट रोडला काही हिट अँड रन?” इन्स्पेक्टरनी फोनवर विचारलं. “असं? कुठल्या हॉस्पिटलमधे? लेडी रतनबाईत? ओके.”
नं बोलता लाल डायरीत पाहून त्यांनी फोनवर दुसरे नंबर दाबले “लेडी रतनबाई? मी इन्स्पेक्टर सोनटक्के बोलतोय. इमर्जेन्सी वाँर्ड द्या“ थोडावेळ थांबून त्यांनी विचारलं “रोड अपघाताची केस? हो, एअरपोर्ट रोडला. कोण? पीएसआय कांबळे? द्या त्यांना फोन.”
इन्स्पेक्टर सोनटक्केनी शिवराजकडे पाहिलं “किती वाजता अँक्सिडेंट झाला?”
“साधारण दहा वाजले असावेत. मी एअरपोर्टहून येत होतो“ शिवराज बोलला
“ड्रिंक घेतलंय? म्हणजे अल्कोहोलिक?“ इन्स्पेक्टरनी विचारलं
“नाही“
“कोण? कांबळे? मी सोनटक्के बोलतोय. काय परिस्थिती आहे? बेशुद्ध? इंटर्नल इंजुरी? रक्त वाहिलं नाही? ओके. वाहन चालक वरळी पोलिस स्टेशनात आलाय. ठीक. मी करतो एफ आय आर.
डॉक्टर काय म्हणाले? अठ्ठेचाळीस तास? ठीक ठीक म्हणजे नेहमीचं.” इन्स्पेक्टर सोनटक्केनी फोन ठेवला आणि उठताना म्हणाले “नाव काय तुमचं?”
“शिवराज क्षेत्रपाल. मी वरळी सी फेसला राहतो.”
“चला शिवराज. हॉस्पिटलमधे तुमची चाचणी करावी लागेल.” इन्स्पेक्टर सोनटक्केनी हवालदाराला जीप काढायची खुण केली. बाहेर आल्यावर शिवराजनं अंधाराकडे बोट केलं “इन्स्पेक्टर साहेब, गाडी तेथे ठेवलेय“
सोनटक्के म्हणाले “असुदे, असुदे. फर्स्ट थिंग्स फर्स्ट. उद्या सकाळी गाडीकडे पाहू. पंचनामा करावा लागेल. शिवराज, तुम्हाला डिटेन करावं लागेल. कमीत कमी अठ्ठेचाळीस तास. त्यानंतर मँजीस्ट्रेट समोर.” त्यांनी जीपकडे हात केला.

इन्स्पेक्टर सोनटक्केनी एफ आय आर लिहून होई पर्यंत तीन वाजले. शेवटी त्यांनी शिवराजला वाचून सही करायला सांगितलं तेंव्हा शिवराजनं आपल्याला ठीकसं मराठी वाचता येत नाही तेंव्हा वाचून दाखवा अशी विनंती केली. एकंदर शिवराजने सांगितलेल्या माहितीचा मतितार्थ असा होता-

शिवराज आपल्या मेव्हणीला म्हणजे कृती सूर्यवंशीला एअरपोर्टवर निरोप देऊन आपल्या वरळीच्या निवासस्थानी परत येत होता. कृती काही तासांपूर्वी दुबईहून आली होती आणि ती पुण्याला जात होती, तसेच स्मृती सूर्यवंशी क्षेत्रपाल म्हणजे शिवराजची पत्नी खंडाळ्याला बंगल्यावर होती. शिवराजला मुंबईत काम होतं आणि तो रविवारी नेहमीप्रमाणे खंडाळ्याला जाणार होता. शिवराज आपल्या स्कोडा मधून साधारण साठच्या गतीनं जात असताना एक माणूस अचानक गाडी समोर आला आणि त्याला जोराची धडक बसली व तो फेकला गेला. शिवराज न थांबता निघून आला पण आरश्यात त्याला कोणतेही वाहन थांबताना दिसले नाही. एफ आय आर मधे बाकीचा तपशील म्हणजे गाडीचा नंबर, चालकाचा परवाना, चालकाच्या घरचा पत्ता वगैरे होता आणि अपघाताची व वाहन चालक ठाण्यात आल्याची साधारण वेळ सुध्दा.
शिवराजने रिपोर्टवर सही केल्यावर इन्स्पेक्टर सोनटक्केनी विचारलं “शिवराज, तुम्हाला पोलिस स्टेशनमधे यावसं का वाटलं? नाहीतरी तुम्ही अपघाताच्या स्थानापासून पसार झाला होतात?”

“इन्स्पेक्टर साहेब“ शिवराजने उत्तर दिलं “मी खूप घाबरलो. असा अँक्सिडेंट माझ्या आयुष्यात कधी झाला नव्हता. अपघात स्थळी थांबण्याचा प्रश्नच नव्हता. लोकं मारू शकतात. पण जसा मी दूर आलो तशी शंका आली. जर का तो माणूस मेला आणि कोणीतरी माझ्या गाडीचा नंबर पहिला असेल, नसेल तरी उद्या पोलिस गँरेज आणि इन्शुरन्स कंपनीना अलर्ट करतील आणि माझी चूक नसून मी गोत्यात येईन.“
“बरोबर आहे!” इन्स्पेक्टर म्हणाले “तुम्ही योग्य केलंत. उद्या मेडिकल रेपोर्ट आणि पंचनामा झाल्यावरच ठरेल. तो माणूस सुद्धा शुद्धीवर येण्याची वाट पहावी लागेल”
“काय ठरेल इन्स्पेक्टर साहेब?” शिवराज चिंतेने उद्गारला
“उद्या ठरेल की अँक्सिडेंट केस की निष्काळजीपणा वगैरे. वेगवेगळे सेक्शन लागू होतात. पण तुम्ही स्वत: रिपोर्ट केलंत ही तुमच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे. एनी वेज, तुम्हाला कोणाला फोन करायचा आहे?” इन्स्पेक्टरनी विचारलं.
“नाही, नको. एक तर माझा मोबाईल धक्यानं डँशबोर्ड वरून गाडीत कुठे तरी पडला तो सकाळी मिळेल आणि मला नंबर पाठ नसतात. तसंही रात्र खूप झाली आहे.” शिवराज म्हणाला
“ठीक आहे तर.” इन्स्पेक्टर म्हणाले “रात्र सेल मधे काढा. पहिलाच अनुभव नं? का आहे काही पोलिस रेकोर्ड?”

सकाळी इन्स्पेक्टर सोनटक्के साडे अकराच्या सुमारास पोलिस स्टेशनात आले. तो पर्यंत कोणी साधं ढुंकून सुध्दा शिवराजकडे पाहिलं नव्हतं. पोलिस स्टेशनात काही नं घडता सुध्दा खूप वर्दळ होती. शिवराजला दोनदा चहा आणि एकदा वडापाव मिळाला होता. खूप वेळ थांबून शेवटी भुकेनं त्यानं वडापाव खाल्ला. काही वाईट नव्हता, थोडा तिखट होता इतकंच. टेबलवरील पोलिस डायरीतील नोंदी पाहून इन्स्पेक्टर सोनटक्के सेल मधे आले. त्यांनी खूण केल्यावर हवालदाराने सेल मधे त्यांना खुर्ची दिली.
“काय शिवराज, कशी होती सेलमधील रात्र? झोप लागली का?” इन्स्पेक्टरनी चौकशी केली
“हो लागली. काही कळलं का त्या माणसाबद्दल? “ शिवराजने विचारलं
“फारसं नाही. बाबू नाव आहे त्याचं. कन्स्ट्रक्शन मजूर आहे. मल्टीपल फ्रँक्चर आहेत. पोटात काही रक्तस्त्राव झालाय का ते डॉक्टरांना माहित नाही. थोडा वेळ शुद्ध आली. त्याला एवढंच आठवतंय की तो रस्ता ओलांडायला थांबला होता पण अचानक डोळ्यावर खूप प्रकाश आला. पुढचं काही आठवत नाही.” इन्स्पेक्टर म्हणाले
“थँक गाँड!” शिवराज पुटपुटला
“हो. तुम्ही खूप लकी आहात. तो दारू प्याला होता. तो म्हणतो थोडी, पण ब्लड ग्रुप साठी घेतलेल्या त्याच्या रक्तात ट्रेसेस मिळाले आणि तुमचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला.”
“मी तुम्हाला म्हणालो होतो. आता विश्वास बसला?” शिवराजला आता धीर आला.
“हो, बसला की तुम्ही नशेत गाडी चालवत नव्हता. गाडीला बरच डँमेज झालंय. एसीचा रेडीएटर पूर्ण निकामी. पण गाडी लावली तेथे खाली एक सुद्धा डाग नाही. कूलंट वाटेतच गळून गेलं असणार”
इन्स्पेक्टरनी शिवराजकडे रोखून पाहिलं.
“गाडी पहिलीत? आणि माझा मोबाईल?” शिवराजनं आतुरतेनं विचारलं.
“हो, पंचनामा पण झाला सकाळी. त्यात बिझी होतो. फोटो घेतलेत. इंजिनमध्ये पाणी होतं म्हणजे गाडी नुकतीच धुतली होती का?” इन्स्पेक्टरनी विचारलं
“नाही. म्हणजे मला माहित नाही. नोकराला विचारावं लागेल “शिवराज साशंक आवाजात म्हणाला.
“अरे हो, सांगायचं राहिलं. तुमचा मोबाईल सापडला. गाडीतच होता पण बँटरी डाउन होती. चार्जिंगला दिलाय. त्यावर रात्री दोन फोन तुमच्या पत्नीचे येऊन गेलेत आणि अनेक फोन कृतीचे होते. म्हणजे तशी नावं दिसली फोनवर” इन्स्पेक्टर म्हणाले
“मी करतोच फोन चार्ज झाल्यावर“ शिवराज म्हणाला
“मी केला अनेकदा पण “स्मृती” नावाखाली असलेल्या नंबरला फोन लागत नाही. तेंव्हा कृतीला केला. ती पण म्हणाली की तिच्या दीदीचा फोन लागत नाही. वाट पाहून ती खंडाळ्याला गेली तर केअर टेकरनी मँडम आल्याच नाहित म्हणून सांगितलं. तुम्हाला काही बोलल्या तुमच्या मिसेस?”
“नाही, स्मृती मला काही नाही बोलली“ शिवराज म्हणाला
“आता खंडाळा पोलिस शोध घेताहेत. प्रथम मुख्य हॉटेल्समधे फोन करून विचारातील पण स्मृतीचा तुमच्या किंवा कृतीच्या फोनवर जर फोन आला नाही दुपारी दोन वाजे पर्यंत तर मी कृतीला खंडाळा पोलिस स्टेशनवर ‘मिसिंग पर्सन‘ ची तक्रार नोंद करायला सांगितली आहे.” इन्स्पेक्टर उठताना म्हणाले. शिवराज त्यांच्याकडे तोंड वासून पहात होता. शेवटी त्याच्या तोंडून शब्द फुटला
“स्मृती घरी तर आली नाही नं?”
इन्स्पेक्टर म्हणाले “नाही शिवराज. मी हवालदार पाठवला होता तुमच्या घरी. तुमच्या नोकरानं सांगितलं की तुम्ही दोघेही घरी आला नाहित आणि मँडमनी त्याला काल साडेसात वाजता तुम्ही कूठं आहात हे विचारायला फोन केला होता.”
“कुठे गेली असेल? भोसरीच्या फँक्टरीत फोन करायला हवा.” शिवराज स्वतःशीच बोलला.
“केला होता. काल संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांनी फँक्टरी सोडली खंडाळ्याला जायला, म्हणजे तसं त्यांच्या डायव्हरनं सांगितलं. ड्रायव्हर त्यांच्या बरोबर नव्हता?” इन्स्पेक्टरनी प्रश्नवजा माहिती दिली.
“नाही. विकेंडला ती ड्रायव्हर घेत नाही. रविवारी माझ्याबरोबर मुंबईला येते. ड्रायव्हर नंतर तिची गाडी मुंबईला घेऊन येतो कारण परत बुधवारी ती फँक्टरीला जाते. कितीतरी वर्षांचं रुटीन आहे.”
शिवराजनं खुलासा केला.
“असं! मग तुम्ही काय करता?” इन्स्पेक्टरनी सहजच विचारलं.
“मी सूर्यवंशी इंडस्ट्रीजचे सर्व इम्पोर्ट एक्सपोर्ट पहातो, मुंबईतून. स्मृती, सूर्यवंशी इंडस्ट्रीजची चेअरपर्सन आणि मालक आहे, तिच्या आईचा वारसा! “ शिवराज म्हणाला
“ओके. चेअरपर्सन म्हणजे चेअरमन का? “इन्स्पेक्टरनी विचारलं
“हो. तेच ते.” शिवराज बोलला
“आणि मग तुम्ही काय आहात तर?” इन्स्पेक्टरनी कुतूहल दाखवलं
“मी काय, नोकरदार डायरेक्टर, ते सुध्दा लग्नानंतर बऱ्याच काळानी!“ शिवराजनं थट्टेचा सूर लावला.
“नशिबाचे खेळ आहेत झालं. मी नाही का सिनिअर पीआय व्हायला अठरा वर्षं वाट पहिली?”
इन्स्पेक्टरनी एक उसासा सोडला“ एनी वेज. आशा करुया की तुमच्या मिसेसशी लवकरच संपर्क होईल. लेट मी गेट बँक टू वर्क”
इन्स्पेक्टर निघताना शिवराजनं विचारलं “माझा मोबाईल जरा पाठवता का?”
“नाही. आत्ता नाही. कॉल मँनिटर होतोय. म्हणजे एखादेवेळेस स्मृतीचा फोन, काही दगा फटका , धमकी, डिमांड किंवा अगदी साधा फोन सापडल्याचा वगैरे ...”

बरोबर दोन वाजता थाळीतून जेवण आलं. कित्येक वर्षांनी शिवराज अशी जेवणाची थाळी पहात होता. त्यानी हवालदारला विचारलं “कुठून आलंय जेवण?” त्यावर तुसडेपणाने हवालदार म्हणाला “कशाला नसत्या चौकशा करताय. शेजारच्या उडप्याकडून आलीय थाळी. आम्हाला ती पण नशीब नाही. घरनं डबा आणायला लागतो.” शिवराजनं कौतुकानं थाळीकडे बघितलं. त्याला इंजिनीअरिंग कॉलेजची आठवण झाली. तिथल्या कँटीनमधे अशी थाळी मिळायची पण स्मृतीचा मात्र घरून डबा यायचा, रोज. तिला “बी-फोर” म्हणून तिच्या नकळत मुलं संबोधत म्हणजे ‘बडे बापकी बिगडी बेटी’. शेवटच्या वर्षापर्यंत तीचं नाव “खडूस बी फोर“ झालं. त्याला अनेकदा वाटे की त्याचे मित्र आणि शत्रू “बी-फोर” शी लग्न केलं म्हणून त्याला उगीचच स्मार्ट समजतात. फक्त त्यालाच माहित होतं की त्याची निवड व त्यानंतरच्या सर्व घटनांवर स्मृतीचं पूर्ण नियंत्रण होतं आणि याच गोष्टीचा त्याला अतिशय संताप येत असे.
शिवराज जेवण संपवून थाळीत बोटं धूत असताना इन्स्पेक्टर आत आले, “झालं का लंच?“
“हो, हे काय आत्ताच. आणि तुमचं?” शिवराज म्हणाला
“छे हो. आम्हाला कसलं लंच आणि कसलं काय? पोलीसांच आयुष्यच वाईट.” इन्स्पेक्टर म्हणाले
“स्मृतीशी कॉंटँक्ट झाला काय?” शिवराजनी विचारलं
“तोच विचार मी करत होतो, अजून कसं नाही तुम्ही विचारलत” इन्स्पेक्टर बोलले
“कुठे होती? कशी आहे स्मृती? ठीक आहे नं?” शिवराजनं घाईत विचारलं
“नाही. अजून त्यांच्याशी संपर्क झाला नाही. पण काल त्या खंडाळ्याच्या एका तारांकित हॉटेलमधे होत्या. त्यांनी तिथं एक ड्रिंक घेतलं. कोणाची तरी वाट पहात असाव्या असं बारटेंडरला वाटलं कारण त्या सतत वाँचकडे पहात होत्या. साधारण साडेसात वाजता त्या बाहेर गेल्या. त्या अगोदर त्या कोणाशी तरी फोनवर बोलल्या असं त्याच म्हणणं आहे. तो त्यांना आणि तुम्हाला नेहमीचे कस्टमर म्हणून ओळखतो.” इन्स्पेक्टर म्हणाले
“ओह!! म्हणजे स्मृती फरियास मधे गेली होती तर.” शिवराज पुटपुटला
“हो. बाहेर दरवानाने त्यांना गाडी पण आणून दिली. कसली गाडी आहे त्यांची?”
“तिच्या म्हणजे आमच्या वापराच्या बऱ्याच आहेत, बहुतेक सहा किंवा सात. पण ती मर्क जास्त वापरते.“ शिवराजनी सांगितलं
“ऐकलं नाही कधी नाव. पण आता गाडीचा शोध घ्यावा लागेल. अर्थात कृतीनं औपचारिक तक्रार नोंदवली असेलच तेंव्हा सारे तपशील मिळतील खंडाळा पोलिसांना.” इन्स्पेक्टर बोलले.
“अहो साहेब मर्क हो मर्क. म्हणजे मर्सिडीज, काळ्या रंगाची“ शिवराज म्हणाला
“असं होय. त्याचं काय आहे शिवराज, आम्हाला कुठलं कळायला! आम्ही सदैव असतो गुन्हेगारांच्या संगतीत. कधी घरफोडी, कधी मारामारी, खुन आणि दृग्स, बायकांच्या तक्रारी तर कधी रात्री रस्त्यावरून फिरणाऱ्या बायकांनाच राउंडअप. तुमच्या सारखी शिकलेली, सधन आणि स्वताहून स्टेशनात येणारी माणसं कुठली भेटतात!” इन्स्पेक्टर म्हणाले. शिवराजला त्यांच्या आवाजात उपहास असल्याचा भास झाला. तो गडबडीत म्हणाला “म्हणजे स्मृतीचा अँक्सिडेंट नसेल नं झाला?”
“शक्यता नाकारता येणार नाही. तुम्ही कुठे होतात?” इन्स्पेक्टर रोखून पहात म्हणाले.
“मी? म्हणजे कधी? मी इथेच होतो.” शिवराज दचकून म्हणाला
“तुम्ही ऑफिस साधारण चारला सोडलंत असं तुमची सेक्रेटरी म्हणाली” इन्स्पेक्टर म्हणाले
“तुम्ही माझ्या ऑफिसच्या लोकांशी बोललात? का?” शिवराज रागानं म्हणाला
“शिवराज, जरा शांतपणे. अहो सूर्यवंशी इंडस्ट्रीजची मालकीण हरवली आहे आणि तुमच्या ऑफिसच्या लोकांशी का बोललाय म्हणून एका पोलिस इन्स्पेक्टरला विचारताय, ते सुध्दा सेलमधे बसून?” इन्स्पेक्टर शांतपणे बोलत होते.
“सॉरी इन्स्पेक्टर. मला तुमचा अवमान करायचा उद्देश नव्हता“ शिवराज मवाळपणे म्हणाला
“पण काल पासून सर्व गोष्टी अशा घडल्यात नं की ...मी लॉकअप मधे आहे हे सांगितलं नसलत म्हणजे झालं”
“बरोबर आहे तुमचं म्हणनं, घटनांचा इतका योगायोग असू शकतो याचं माझ्यासारखा नशिबाला जबाबदार धरणारा माणूस सुध्दा आश्चर्य करेल.” इन्स्पेक्टर म्हणाले “तर मग कुठे कुठे होतात पोलिस स्टेशन मधे येण्यापूर्वी, एकंदरीत सहा तास?
“मी ऑफिसमधून तडक आंतरदेशीय एअरपोर्टला गेलो. कृतीला रिसीव करून मी हॉटेल इंटरकॉंटमध्ये आलो. कृतीसाठी काही तासांकरिता रूम बुक केली होती. आम्ही रुमवर पीझ्झा आणि कॉफी मागवली. साधारण साडे नऊला होटेल सोडलं. तिला दहावीसची फ्लाईट होती. बोर्डिंग कार्ड प्रिंट केलेलं अगोदरच. मग मी परत येताना वाटेत अँक्सिडेंट.“ शिवराजनं हिशोब दिला
“पण तुम्ही हे सर्व का विचारता आहात?” शिवराजनं प्रश्न केला.
“मला तुम्हा मोठया लोकांचं आश्चर्य वाटतं. बायको गायब होऊन सुध्दा तुम्ही फारसे बेचैन नाही, पाच तासांच्या मुदतीत बायकोचे तुम्हाला फक्त दोन फोन. तुम्ही त्यांना फोन केल्याचं फोनवर तरी दिसत नाही. मेव्हाणीचे तुम्हाला अनेक फोन. मेव्हणीसाठी तुम्ही हॉटेलात रूम घेता आणि तिच्याबरोबर वेळ काढता. सगळच कसं गोंधळात पाडणारं आहे.” इन्स्पेक्टर म्हणाले

“काय, म्हणताय काय इन्स्पेक्टर? धिस इज रीडीक्युलस.” शिवराज उद्विग्नतेनं बोलला.
“अहो, स्मृती जाऊन कुठे जाईल? गेली असेल कोणा फ्रेंडच्या घरी खंडाळ्यात. लागत नसेल फोन. सिग्नल वीक आहेत ठीक ठिकाणी. तिला कल्पना सुध्दा नसेल की तुम्ही तिचा शोध घेताय. आणि तुम्हाला वाटतंय तसं काही नाही. कृतीने दुबईत एका क्लायंट मीटिंग साठी हॉल्ट घेतला पण ती दोन आठवडयांनी लंडनहून आलीय आणि संध्याकाळच्या रहदारीत तिला शहरात यायचं नव्हतं. तुम्ही मला अपघातासाठी डिटेन केलंय का स्मृतीचा संपर्क होत नाही म्हणून?”

“शिवराज, तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे. पण आमची बाजू जरा समजून घ्या. आम्हा पोलिसांना नाही का वाटत की मुंबई शहरात अगदी रामराज्य असावं. आमच्या दैनंदिनीत कुठलीही नोंद नसावी. वेळेवर जेवावं आणि संध्याकाळी आपापल्या कुटुंबाबरोबर टीवी पाहावा. पण नाही! या सदैव जागणाऱ्या शहरात सतत दुर्दैवी घटना घडत असतात त्यांची दखल घ्यावीच लागते आम्हा पोलिसांना. आणि ते काय म्हणतात ‘ मन जे चिंती ते वैरी नं चिंती “, तसच काहीसं पोलिसांचं असतं. ‘पोलिस जे चिंती ते वैरी नं चिंती!” इन्स्पेक्टर सोनटक्के गंभीरपणे बोलले.

“त्या जखमी माणसाची काय स्थिती आहे? म्हणजे सुधारणा आहे नं?” शिवराजनं विषय बदलला
“हो, तो हळू हळू शुद्धीवर येतोय पण त्याला माईल्ड सेडेटीव देताहेत. डोक्याला बाहेरून तरी इजा झालेली दिसत नाही. बहुतेक एमआरआय काढतील. तुमची मुलं कूठ असतात? म्हणजे कोणी बोर्डिंग स्कूलमध्ये आहे का जेथे तुमच्या मिसेस तातडीने गेल्या असतील? किंवा कोणी आजारी, जवळचे नातलग वगैरे?” इन्स्पेक्टर अजून आपल्याच विचारात असल्यासारखे बोलले.
“नाही इन्स्पेक्टर. सँडली दो, पण आम्हाला मूल नाही.” शिवराज मृदु आवाजात बोलला “आणि स्मृतीचे पेरेंट्स आता नाही आहेत. कृतीची आई गोव्याला असते.”
“म्हणजे? स्मृती आणि कृती बहिणी आहेत नं?” इन्स्पेक्टर सोनटक्के गोंधळात पडले
“हो पण डिफरंट मदर्स.” शिवराजनं खुलासा केला “स्मृतीच्या आईनं पण एका शिकलेल्या, मध्यम वर्गीय माणसाशी लग्न केलं होतं. स्मृती साधारण दहा वर्षांची असताना त्यांचा घटस्फोट झाला कारण त्यांना संशय आला की स्मृतीच्या वडिलांचं त्यांच्या सेक्रेटरी बरोबर अफेअर आहे. असं म्हणतात की सूड म्हणून त्यांनी नंतर सेक्रेटरी बरोबर लग्न केलं. त्या कृतीच्या आई, ख्रिश्चन आहेत.“
इन्स्पेक्टरना हे सर्व समजायला थोडा वेळ लागला. ते म्हणाले “तुम्ही म्हणालात स्मृतीच्या आईनं पण... म्हणजे काय? आणखी काही या ड्रामामधे ट्वीस्ट आहे का?”
शिवराज हसला “काही नाही हो. चुकून तोंडून निघालं. म्हणजे काय, मी पण एका मध्यम वर्गीय कुटुंबातला आहे. माझे वडील सर्विसेस मधून कर्नल म्हणून निवृत्त झाले. नागपुरात असतात. माझी आणि स्मृतीची भेट पुण्यात इंजिनिअरींगला असताना झाली. पप्पांचं पोस्टिंग तेंव्हा पुण्यात होतं“
“ओ आय सी “इन्स्पेक्टर पुटपुटले “इंटरेस्टींग“
“म्हणजे दोन्ही बहिणीत वयाचं अंतर असेल?” इन्स्पेक्टरनी स्वताला प्रश्न केला
“हो, साधारण अकरा वर्षांचं. डँडी गेल्यापासुन स्मृतीला जबाबदारी असल्यासारखं वाटतं. स्मृतीचा डँडींवर खूप जीव होता. म्हणून तिनं कृतीला लंडनला उच्च शिक्षणासाठी पाठवलं. आता कृती पुण्याहून माझ्या डिविजन मधे काम करते.” शिवराज बोलत राहिला

“शिवराज, एक सेन्सिटिव्ह प्रश्न विचारू का? म्हणजे राग येणार नसेल तर आणि ऑब्जेक्टीवली घेणार असाल तर विचारतो?” इन्स्पेक्टर सोनटक्के म्हणाले
“अहो वाघानं शेळीला नम्रपणे विचारण्यासारखं आहे. तुम्ही विचारणार की माझं आणि कृतीचं काही ..” शिवराजनं इन्स्पेक्टर सोनटक्केच्या डोळ्याला डोळा दिला
“नाही, नाही. ते तर तुम्ही केंव्हाच क्लिअर केलंय.” इन्स्पेक्टरनी खालच्या आवाजात खुलासा केला “तुम्हाला काही संशय आहे का तुमच्या मिसेसवर? म्हणजे त्यांची कोणाबरोबर तरी इनवॉल्वमेंट?”
प्रश्न ऐकताच शिवराज मोठ्यानं हसायला लागला “स्मृती? अहो ऑफिस मधे लोकं तिच्या समोर थरथर कापतात. सोशल गँदरिंगला ती आली की थोडया वेळात तिच्या भोवती फक्त लेडीज दिसतात. मी गॉसिप ऐकतो की तिला आमच्या मित्रमंडळीत ‘मँन हेटर’ का ‘मँन इटर’ म्हणतात. नाही, ते शक्य नाही. मला नाही वाटत.”
“बरं. म्हणजे तश्या दृष्टीनं तपास करायची आत्ता तरी जरुरी नाही. पण तुमचं काय? “इन्स्पेक्टरनी प्रश्न केला.
“माझं? माझं काय? माझं काही नाही.” शिवराज बोलला
“नाही, म्हणजे तुम्ही कोणाच्या प्रेमात किंवा कोणी तुमच्या?” इन्स्पेक्टरनी हसून विचारलं
“नाही, नथिंग सिरीअस.” शिवराज म्हणाला
“ठीक तर. मी जरा अप डेट घेतो.” इन्स्पेक्टर उठून गेले.

संध्याकाळ तशी कंटाळवाणी गेली. शिवराजनं चहा वाल्याला पैसे देऊन पेपर मागवला होता. काही खास नव्हतं. बातम्या सुध्दा जसा विकेंड येईल तश्या निरस असत आणि पेपरवाले रकाने आणि पानं निरर्थक लिखाणानं किंवा चटपटीत फोटोनं भरतात असं शिवराजला वाटलं. अजूनतरी त्याचं नाव पेपरात आलं नव्हतं. इन्स्पेक्टर बराच वेळ फोनवर होते पण नंतर बाहेर गेले. ते नसताना पोलिस स्टेशनात आवाजाची पातळी मोठ्ठी असे. पोलिस लोकं एकमेकाशी बोलताना आणि मस्करी करताना दिसत. कॉलर धरून पकडून आणलेल्या पोराटोरांना थोबाडीत द्यायला आणि शिव्यागाळ करायला हवालदार कुचरत नसत. जशी रात्र झाली आणि त्याचं जेवण आलं तसं शिवराजनं हवालदाराला विचारलं “साहेब कधी येतील?”
“ते काही आता येणार नाहित आणि उद्या पण. एकदम सोमवारी.” हवालदार म्हणाला
“अहो पण!” शिवराजनं प्रयत्न केला
‘हे पहा साहेब. उद्या सर्व साहेबलोकांना मुंबई पोलिसांच्या सर्वात मोठ्ठ्या साहेबांच्या घरी जेवण आहे. नवीन चार्ज घेतलाय म्हणून. आणि साहेब, सोमवारी पण कोर्टाला सुट्टी आहे कसली तरी जयंती म्हणून तेंव्हा शांतपणे बसून रहा. पेपर हवा का?“ असं म्हणून त्यानं मराठी पेपर पुढे केला.

इन्स्पेक्टर सोनटक्के रविवारी संध्याकाळी पोलिस स्टेशन मधे आले. बराच वेळ ते त्यांच्या टेबलावर बसून फाईल पहात आणि नंतर फोनवर बोलत होते. मग उठून ते सेल मधे आले आणि हवालदाराला त्यांनी खुर्ची आणायला सांगितलं. शिवराज अपेक्षेनं त्याच्याकडे पहात होता. त्यानी विचारलं “काही कॉंटँक्ट झाला का स्मृतीशी?”
इन्स्पेक्टरनी नकारार्थी मान हलवली “चहा घेणार? अरे, जरा दोन चहा पाठवा इकडे.“
“आता मला काळजी वाटायला लागलेय“ शिवराज म्हणाला “ इट इज सो अनलाईक स्मृती.”
“हो, काळजी करण्या सारखीच बाब आहे.” इन्स्पेक्टर म्हणाले, “शिवराज, लेट अज गो ओव्हर द फँक्टस् अगेन.”
“कसल्या फँक्टस्? तुम्ही जे जे विचारलं ते ते मी तुम्हाला सांगितलं. तो माणूस आहे नं जिवंत? मग बाँड लिहून घ्या हवा तर.” शिवराज म्हणाला
“शिवराज, एक तर मी तुम्हाला अरेस्ट केलेलं नाही तर तुम्ही माझ्या कस्टडीत आहात. परवा सकाळी मी तुम्हाला कोर्टात उभं करीन. कृतीनं मला विचारलं की वकील करू का पण मी सांगितलं की तो तुमचा हक्क आहे पण जामीन द्यायची वेळ येणार नाही. चार्जशीट करून रिलीज करू. माणूस जगेल, त्याचा एम आर आय ठीक आहे.“ इन्स्पेक्टर म्हणाले
“मग काय फँक्टस् हव्यात. तुम्ही सोडलत तर मी धावाधाव करू शकतो स्मृतीला शोधायला. स्मृतीच्या आणि माझ्या एक एक मित्राला फोन करून विचारेन. माझा फोन पण तुम्ही देत नाही आहात.” शिवराज रागात बोलला
“शिवराज, आम्ही काही हातावर हात धरून बसलो नाही. तुमच्या घरच्या डायरीतून आणि तुमच्या फोनवरील कॉंटँक्ट लिस्ट वरून बरेच फोन केले. परिणामी, उद्या प्रेसला कळेल. कोर्टात नक्की रिपोर्टर असतील. मी आज याबद्दल कमिशनर साहेबांशी बोललो” इन्स्पेक्टर म्हणाले
“ओह माय गाँड!” शिवराज हताशपणे म्हणाला
“आता तुम्हीच फँक्टस् क्लीअर करू शकाल आणि तुमच्या मिसेसना शोधायला मदत करू शकाल“ शिवराज कडे पहात इन्स्पेक्टर बोलले.
“तुम्ही एअरपोर्टवर इमिग्रेशनला विचारलत? स्मृती अचानक परदेशी गेली का?”
“त्याची जरूर वाटली नाही कारण त्यांचा पासपोर्ट त्यांच्या सेक्रेटरीकडे आहे. हे पण सेक्रेटरीने सांगितलं की मुंबईत त्या स्वतः काही इंटरव्ह्यू घेणार आहेत मंगळवारी, सूर्यवंशी इंडस्ट्रीजच्या मँनेजिंग डायरेक्टर पदासाठी, ताजमहाल हॉटेलात, बिजिनेस सेंटरमध्ये. अर्थात तुम्हाला माहित असेलच म्हणा.” इन्स्पेक्टरनी खडा टाकला.
“शी इज नटस्. नाही मला माहित नाही.” शिवराज त्राग्यानं बोलला
“स्मृतीशी तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं, म्हणजे फोनवर, कारण तुम्ही तर मुंबईत होतात!”
इन्स्पेक्टरनी विचारलं.
“शुक्रवारी सकाळी, नक्की वेळ लक्षात नाही“ शिवराज धुसमुसत बोलला
“दँट इज ओके. मला माहित आहे.” इन्स्पेक्टर म्हणाले
“तसं आहे तर विचारता कशाला? “ शिवराज खेकसला
“मला विचारायचं आहे की तुमचं स्मृतीशी फोनवर भांडण कशावरून झालं?” इन्स्पेक्टरनी बाँम्ब टाकला
“कशावरूनही असेल. नवरा बायकोचं भांडण. तुम्हाला काय करायचंय?“ शिवराजने आवाज चढवला
“नाही म्हणजे तुम्हाला त्या एम डी करत नाहित म्हणून नव्हे नं?” इन्स्पेक्टर म्हणाले
“हे पहा इन्स्पेक्टर, मुद्द्यावर या. आमच्या भांडणावरूनच काय पण कुठल्याही बिकट प्रसंगावरुन स्मृती बेपत्ता होईल अथवा आत्महत्या वगैरे करेल इतकी कमकुवत किंवा भावनिक नाही.” शिवराज म्हणाला
“हे बरं सांगितलंत, पण काय आहे नं की तुम्ही दोघं कूठं इंवाँल्व नाही, मुलबाळ नाही, पैशाची कमतरता नाही, स्वतंत्रपणे आयुष्य जगता, मित्र मंडळी आहेत, कामात बिझी असता तर भांडणाचं कारण फक्त प्रोफेशनल असू शकतं असा एक अंदाज मी बांधला म्हणून विचारलं.“ इन्स्पेक्टर समजुतीच्या स्वरात म्हणाले
“इन्स्पेक्टर, मला दिलं तरी एम डी पद नको. अहो राखट रंगाच्या मांजराला आता तुझ्यावर पट्टे रंगवतो म्हटलं तर त्याला काही फरक पडेल का? मांजर ते मांजरच रहाणार, वाघ नाही होत! स्मृतीला आता नेहमीच्या जबाबदाऱ्या प्रोफेशनल वर सोपवायच्या आहेत. तिला आता खूप “नॉट फॉर प्राँफीट” संस्थां मधे लक्ष द्यायचय.” शिवराज थकलेल्या आवाजात बोलला

“नॉट फॉर प्राँफीट संस्था म्हणजे काय?” इन्स्पेक्टरनी बालिश प्रश्न केला
“म्हणजे चँरिटी हो. तिनं वेगवेगळे ट्रस्ट काढायला सुरुवात केलीय, नॉनसेन्स, नाहीतर काय!” शिवराज म्हणाला
“म्हणजे त्यांचा सामाजिक कार्य करण्याकडे कल आहे तर.” संभाषण चालू ठेवण्यासाठी इन्स्पेक्टर म्हणाले
“सामाजिक कार्य माय फुट. जायंट इगो, नथिंग एल्स.”
“अच्छा. पण इगो नेहमीच वाईट नसतो. इगो मुळेच ताजमहाल सारख्या भव्य गोष्टी बनतात. एनी वेज तुम्ही लोहियांना ओळखता का? “इन्स्पेक्टरनी विषय बदलला
“कोण लोहिया? लोहिया एंटरप्राईझ वाले? आमचे चांगले दोस्त आहेत.” शिवराज म्हणाला
“तुम्ही त्यांना शुक्रवारी भेटणार होतात का?” इन्स्पेक्टरनी विचारलं
“मी? नाही, तसं काही ठरलं नव्हतं. का?” शिवराजनं आश्चर्य व्यक्त केलं.
“त्यांचा पण विकेंड बंगला आहे नं?“ इन्स्पेक्टरनी कुतूहल दाखवलं
“बंगला? अहो त्यांची एकर्स मधे प्राँपर्टी आहे अँबी व्हँली साईडला.” शिवराज म्हणाला
“त्यांना स्मृतीचा मिस्ड कॉल होता शुक्रवारी साडेआठच्या सुमारास पण जेंव्हा रात्री त्यांनी रिटर्न केला तेंव्हा लागत नव्हता.” इन्स्पेक्टर म्हणाले
“ओ गाँड. त्यांच्या बंगल्यावर गेली का?” शिवराज म्हणाला
“नाही. ते नवरा बायको मुंबईत होते. तुम्ही नाही नं सांगितलंत स्मृतीला त्यांच्या बंगल्यावर जायला?” इन्स्पेक्टरनी रोखून पाहिलं
“मी? मी कशाला सांगेन?” शिवराज मऊ आवाजात म्हणाला
“नाही, तुमचा फोन झाल्यावर त्या फारियास मधून निघाल्या, म्हणून विचारलं.” इन्स्पेक्टर म्हणाले

“असं? मला कसं कळणार?” शिवराज तोंडातल्या तोंडात पुटपुटला “खरंच तुम्हाला वाटतं का इन्स्पेक्टर की स्मृती धोक्यात आहे?”
“शिवराज, मी काही तुमच्याएवढा शिकलेला नाही. फक्त बारावी सायन्स केलंय. पण अनुभवाने सांगतो” इन्स्पेक्टर कडक आवाजात बोलले “तुमच्या मिसेस जिवंत असण्याची शक्यता आता एक्स्पोनेन्शली कमी होत चालली आहे.”
शिवराजला हुंदका आवरला नाही. तो रडवेल्या आवाजात म्हणाला “असं का म्हणता इंस्पेक्टरसाहेब?”
“शिवराज तुम्ही शिकलेले आहात, बुद्धिमान आहात आणि मँचुअर आहात म्हणून सांगतो. हरवलेली व्यक्ती तरुण मुलगी असेल तर ती प्रियकराबरोबर पळून तरी गेलेली असते किंवा अनैतिक कामासाठी पळवली गेलेली असते. लहान मुलांच बेपत्ता होणं म्हणजे बहुतेक खंडणीसाठी, अतिशय वृद्ध माणसं विस्मरणामुळे हरवतात किंवा चोरीसाठी वा जायदादीसाठी मारली जातात, हल्ली धडदाकट माणसं सुध्दा बेपत्ता होतात, बरीचशी म्हणे अवयवांसाठी पण माझ्या स्वताच्या अनुभवात तशी केस झाली नाही, मोस्ट डिफिकल्ट, बाँडी कधी सापडत नाही. पण बाकी सर्व अपघात, आत्महत्या किंवा खून यापैकी कारणामुळे असतात.“ इन्स्पेक्टर म्हणाले.

“मी तुम्हाला तेच दोन दिवस विचारतोय की स्मृतीला अपघात तर नाही नं झाला?” शिवराजने घसा आणि नाक मोकळं करत विचारलं
“पण ते समजायला बाँडी मिळायला हवी कारण शंभर किलोमीटरच्या रेडीअस मधल्या सर्व हॉस्पिटल मधे केंव्हाच विचारून झालंय.” इन्स्पेक्टरनी खुलासा केला
“पण याचा अर्थ ती शंभर किलोमीटरच्या बाहेर ड्राईव्ह करून गेली.” शिवराजनं तर्क लढवला
“नाही, कारण त्यांची गाडी सापडली.” इन्स्पेक्टर म्हणाले
“काय? गाडी मिळाली? कुठे? आणि स्मृती कशी नाही?” शिवराजला परत हुंदका आवरेना “आता हो काय इन्स्पेक्टर साहेब?” शिवराजनं हमसाहमशी रडत विचारलं

“अँम्बी व्हँली रोडला पवना डँमच्या दिशेने सनसेट पाईंट जवळ. स्मृतीचा डायव्हर आणि कृती यांना दिसली. ते सतत शोध घेत फिरत होते.” इन्स्पेक्टरनी माहिती दिली
“मग, गाडी मधे बेशुध्दावस्थेत किंवा झोपलेली? लवकर सांगा इन्स्पेक्टर“ शिवराज ओरडला
“नाही. गाडी लॉक होती पण ड्रायव्हरनं अतीशहाणपण केलं. त्याच्या कडच्या चावीनं गाडी उघडली आणि कृतीनं त्यावर आणखी मात केली.” इन्स्पेक्टर बोलले
शिवराज आता डोकं धरून बसला होता. तो काहिच बोलला नाही. इन्स्पेक्टरनी पुढे सांगितलं
“कृतीनं ग्लव्ह बॉक्स उघडला. गाडीची डिकी उघडली. पण गाडीच उघडायला नको होती. स्मृतीचा मोबाईल नाही मिळाला. परंतु तुमच्या, कृतीच्या आणि स्मृतीच्या कॉल्सचे डिटेल्स आम्हाला मोबाईल कंपन्यांकडून केंव्हाच मिळालेत.” इन्स्पेक्टरनी सांगितलं
“मग आता पुढे?” शिवराजनं विचारलं “कसा शोध घेणार स्मृतीचा?”
“पाहू. कातकऱ्यांची टीम उतरेल दरीत सकाळी. सबंध जंगल शोधावं लागेल. जंगलात श्वापदं आहेत. बॉडी दूर खेचत नेऊ शकतात. मी निघतो आता. खंडाळ्याहून आलोय, सकाळी जे बाहेर पडलो ते बाहेरच आहे.” इन्स्पेक्टर सेलच्या बाहेर निघून गेले.

सोमवारची सकाळ अगदीच मंद गतीनं सरली. सार्वजनिक सुट्टीचा दिवस होता त्यामुळे किंवा रविवारच्या सुस्तीमुळे असेल, गुन्ह्याचे प्रमाण कमी असावे. स्टेशनात वर्दळ कमी होती. हवालदारांची संख्या पण नेहमी प्रमाणे नव्हती. इन्स्पेक्टर सोनटक्के आले नाहित. शिवराज वाट पहात होता. त्याने अनेकदा हवालदाराला ते कधी येणार आहेत हे विचारलं पण हवालदाराच्या उत्तराने त्याचं समाधान होत नव्हतं. त्याने नाश्त्याला आणि जेवणाला हात लावला नव्हता. तो फक्त चहावर होता. सकाळी दोन तीन प्रेस रिपोर्टर आणि फोटोग्राफर येऊन पोलिसांशी हुज्जत घालून गेले, पण त्यांना आत येऊ दिलं गेलं नाही. शिवराजला आज पेपर मागवण्याचा धीर झाला नव्हता पण दोन हवालदार मराठी पेपर वाचताना त्याच्याकडे पाहून कुजबुजताहेत असं त्याला वाटलं.
दुपारी कृती आली, वकिलांना घेऊन पण तिला पोलीसांनी सेलमधे येऊ दिलं नाही. ती दूरवर बाकावर बसलेली शिवराजनं पाहिलं. वकिलसाहेब सेल मधे आले. ते वकीलनामा घेऊन आले होते त्यावर शिवराजनं सही केली.
वकील म्हणाले “तुम्हाला पोलिसांना काहीही सांगायची आवश्यकता नाही. ते खूप गोड बोलतील पण तुम्ही चूप रहा. पण बोलला असाल तरीही काही चिंता करू नका. कस्टडीत असतानाचं तुमचं कुठलंही स्टेटमेंट कोर्टात ग्राह्य नाही. तुमच्यावर चार्जशीट होऊन प्राँपर स्टेटमेंट घ्यावं लागेल त्यांना. तुम्हाला उद्या कोर्टात सोडतील. फार फार तर जामीन द्यायला लागेल एवढच.”
शिवराज गप्प होता, ”थँक यू वकिलसाहेब.” एवढंच म्हणाला. “सी यू“ म्हणून वकील गेले. जाताना कृतीनं त्याला हात केला.

रात्री आठच्या सुमारास इन्स्पेक्टर आले. आपली कँप टेबलवर ठेऊन तडक सेलमधे आले. शिवराजनं
काळजीनं त्यांना विचारलं “स्मृतीचा काही ठावाठिकाणा मिळाला इन्स्पेक्टर?“
इन्स्पेक्टर सोनटक्के म्हणाले “आय एम व्हेरी सॉरी शिवराज, युअर मिसेस स्मृती इज नो मोर!”
हे ऐकताच शिवराज ढसाढसा रडायला लागला.

शिवराजच्या भावनांचा पहिला ओघ ओसरल्यावर इन्स्पेक्टर म्हणाले “त्याची बॉडी दरीत मिळाली. लगेचच ओळखण्याच्या स्थितीत नव्हती. त्या कड्यावरून दूर फेकल्या गेल्या होत्या जसा फुटबॉल फेकला जाईल. म्हणजे ट्रँजेक्टरीच मोठ्ठी असावी. नक्कीच गाडीनं उडवलं. बॉडी बरीच डीकम्पोज झाली पण ड्रायव्हरने त्यांचा पुण्याहून निघतानाचा पेहराव ओळखला, कृतीने त्यांचं हिऱ्याचं कानातलं, गळ्यातलं आणि बोटातल्या अंगठ्या ओळखल्या. पोस्ट माँर्टेमचा अहवाल उद्या मिळेल.
शिवराज, माय कन्डोलन्सेस टू यू.” इन्स्पेक्टर शिवराजला सेल मधे सोडून बाहेर निघून गेले.

मंगळवारची सकाळ उजाडली होती आणि शिवराजला इन्स्पेक्टर सोनटक्केंची वाट पहात बसावं लागणार होत. त्यानं चहावाल्याला हात केला. त्याच्याकडून दोन चहाचे ग्लास घेऊन त्याला पैसे देऊन पेपर आणायला पिटाळलं.
पेपरमध्ये हेड लाईन होती “उद्योजक स्मृती सूर्यवंशी डेड.” मग तपशीलात स्मृतीचं पूर्ण नाव आणि तिच्या कर्तुत्वाचा आलेख होता. पोलिसातील कोणा बिननावी अधिकाऱ्याच्या वतीनं ही आत्महत्या असावी असा तर्क पण रिपोर्टर लाऊन मोकळा झाला होता. शिवराज यांना चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे व स्मृती सूर्यवंशी यांच्यावर आत्महत्येसाठी कोणता दबाव आला असेल याचा पोलिस तपास करत आहेत अशी महत्वाची माहिती सुध्दा रिपोर्टरनं दिली होती. पेपरभरून मोठ्या मोठ्या लोकांची हळहळ आणि स्मृती बद्दल चांगल्या चागल्या गोष्टी लिहून आल्या होत्या. शिवराजनं पेपर दूर केला आणि तो वकिलाची वाट पाहू लागला.

पावणे अकराच्या सुमारास इन्स्पेक्टर आणि वकील दोघेही बरोबरच आत शिरले. बहुतेक त्यांचं बोलणं अगोदरच झालं असावं. इन्स्पेक्टर म्हणाले “चला शिवराज, कोर्टात जायची वेळ झाली.”
वकील शिवराजला म्हणाले “मी कोर्टात भेटतो, काळजी करू नका.” शिवाराजला कृती दिसली नाही.

हवालदाराने शिवराजचा हात धरला तसं इन्स्पेक्टर म्हणाले “मागच्या दारानं जाऊ. मी जीप तिथं घ्यायला सांगितली आहे. बाहेर प्रेसची गिधाडं जमलीत.”

कोर्टाच्या बाहेर खूप गर्दी होती. शिवराजनं गर्दीकडे पाहणं टाळलं, कोणी ओळखीचे दिसतील म्हणून. त्याला जाणवलं की कितीतरी फोटो घेतले जात आहेत. त्यानं हवालदाराची पकड सोडवायचा प्रयत्न केला तेंव्हा हवालदारानं त्याच्या दंडावरची पकड अधिकच घट्ट केली.

कोर्टात मँजिस्ट्रेट समोर सर्वच उभे होते. अनेक वकील आपापल्या अशिलां बरोबर होते. पाच सहा केसेसच्या तारखा ठरवेपर्यंत कोर्टाचा बराच वेळ गेला. अचानक त्याचं नाव पुकारलं गेलं. इन्स्पेक्टर पुढे सरसावले, हवालदारानं शिवराजला कोर्टाच्या पुढे ओढलं आणि वकील मँजिस्ट्रेटपाशी गेले. त्यांचं बोलणं काही एकू आलं नाही पण मँजिस्ट्रेटनं इन्स्पेक्टरना विचारलं “इन्पेक्टर, रिलीज करायला तुमची काही हरकत?”
“नो युअर ऑनर” इन्स्पेक्टर म्हणाले
“ओके देन, बॉंड ऑफ फाइव थाऊजंड“ मँजिस्ट्रेटनं लाकडाचा हँमर आपटला “नेक्स्ट”
हवालदारानं शिवराजचा दंड चटका लागल्या प्रमाणे सोडला.
वकील इन्स्पेक्टरना म्हणाले “तुम्ही यांना घेऊन जा पोलिस स्टेशनवर. मी आलोच कोर्टाचे पेपर घेऊन थोडया वेळात.”
इन्स्पेक्टरनी शिवराजला खुण केली “चला“

पोलिस स्टेशनमधे शिरताच इन्स्पेक्टर सोनटक्के म्हणाले “बसा शिवराज. चहा मागवतो. तुम्ही कालपासून काही खाल्लं नाही असं हवालदार म्हणाला. थांबा सँडविच पण सांगतो”
शिवराज म्हणाला “नको इन्स्पेक्टर साहेब. काही खावंसं वाटत नाही.”
इन्स्पेक्टर सोनटक्के म्हणाले “असं करू नका शिवराज. यू हँव अ लॉंग डे अहेड”
त्यांनी हवालदाराला हाक मारली आणि चहा बरोबर एक सँडविच आणायला सांगितलं “आणि हे पहा, कोणालाही आत सोडायचं नाही.” त्यांनी ऑर्डर दिली

“लवकरच काँरोनर कडून बॉडी रिलीज होईल आणि मोर्ग मधे नेली जाईल. तुमचे फँक्टरीचे लोक आहेतच तिथे पण तुम्हाला सह्या करून बॉडी ताब्यात घ्यावी लागेल. माझी जीप तुम्हाला तेथे सोडून येईल.” इन्स्पेक्टरनी सौजन्य दाखवलं
“थँक यू इन्स्पेक्टर साहेब” शिवराज म्हणाला
“प्लीज डू नॉट थँक मी शिवराज. पेपरवाले काही लिहु देत. ही एक हाय प्रोफाइल केस आहे. पोलिसात वर पासून माहित आहे की स्मृती सूर्यवंशी क्षेत्रपाल यांची हत्या झाली आहे. नशिबानं ही केस माझ्या अखत्यारीत येत नाही. याचा असा अर्थ नाही की मी काही करणार नाही. मला कमिशनर साहेबांनी या केसवर मुख्य तपासणी अधिकारी म्हणून नेमलंय.” इन्स्पेक्टर म्हणाले

“चांगलीच गोष्ट आहे. तुमच्या सारखा सौजन्यशील आणि अनुभवी अधिकारी या जबाबदारीसाठी निवडला गेला ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे.” शिवराज बोलला
“शिवराज इतक्यात सामोपचाराची भाषा करू नका.” इन्स्पेक्टर तिखट स्वरात बोलले
“का इन्स्पेक्टर साहेब? असं का बोलताय?” शिवराज म्हणाला
“कारण स्मृती सूर्यवंशी हत्या प्रकरणी शिवराज तुम्ही माझे पहिले संशयीत आहात, प्राइम सस्पेक्ट!”
“काय? म्हणताय काय इन्स्पेक्टर तुम्ही? मी तर चार दिवसात तुम्हाला माझा मित्र समजायला लागलो होतो.“ शिवराज आश्चर्यानं म्हणाला
“मित्र? शिवराज अशी जर आम्ही लॉकप मधल्या व्यक्तींशी मैत्री करायला लागलो तर तपास निपक्षपातीपणे कसा करणार? आमची नोकरी आम्हाला सौजन्याने वागायला भाग पाडते म्हणजे आम्ही आमच्या कामाचं उद्दिष्ट विसरून चालणार नाही.” इन्स्पेक्टर म्हणाले
“मला समजतंय तुमच्या कामाचं स्वरूप” शिवराज म्हणाला “पण असं काय झालं की तुम्ही अचानक माझ्यावर संशयाचं बोट ठेवलंत? तुम्हाला कळतंय नं की माझ्यावर काय प्रसंग ओढवला आहे ते?”
शिवराज आवाजात मार्दव आणून बोलला
“हो शिवराज. पण मी सुध्दा एक माणूस आहे. स्मृती सूर्यवंशींच्या भीषण हत्या प्रकरणी माझा तुमच्यावर संशय जर चार दिवसात बळावला असेल तर थोडाफार बदल माझ्या तुमच्याशी वागण्यात येऊ शकतो, नाही का? माझी या गुन्ह्याबद्दल एक थिअरी आहे, अंदाज म्हणा मत म्हणा किंवा अगदी भ्रम म्हणा हवं असेल तर.” इन्स्पेक्टर म्हणाले
“असं, काय थिअरी आहे? अगदी गोपनीय नसेल तर मला घोर चिंता लावू नका, ऐकण्यासाठी.” शिवराज उपहासानं म्हणाला.
“त्यासाठी तर तुम्हाला बसवलंय, वर चहा मागवून” इन्स्पेक्टर सोनटक्के तितक्याच कुत्सितपणे म्हणाले
शिवराज गप्प बसला हे पाहून इन्स्पेक्टर उठले आणि खिडकी पाशी गेले आणि बाहेर पहात म्हणाले
“मला शुक्रवारी रात्री तुम्ही आलात तेंव्हाच थोडं ऑड वाटलं होत. असं नाही की लोकं आपणहून पोलिस स्टेशनात येत नाहीत. येतात. अपघात झाल्यावर मॉब पासून वाचण्यासाठी सुध्दा येतात. पण मला प्रथम शंका आली की तुम्ही नशेत आहात, दारूच्या किंवा अमली पदार्थाच्या, म्हणून आय प्लेड अलॉंग. शुक्रवारी रात्री कोणतीही रोड अपघाताची घटना एअरपोर्ट रोड वर नमूद नाही. कोणी बाबू नावा चा मजूर जखमी झालेला नाही. पण रात्रीच तुमच्या गाडीला झालेलं नुकसान आम्ही टॉर्चच्या प्रकाशात पाहिलं म्हणून गस्त घालणाऱ्या पोलीसांनी खूप शोध घेतला. नाही कोणी जखमी मिळालं. सकाळी तुमच्या गाडीचा पंचनामा झाला आणि प्रथम एका सर्व्हेयरला बोलावण्यात आलं नंतर गाडी फोरेंसिक तज्ञाना दाखवली. गाडीला एकच जबरदस्त इम्पॅक्ट झाल्याचं तज्ञांच मत पडलं पण गाडी धुतल्यामुळे बाकी काही समजलं नाही.”

“अहो इन्स्पेक्टर पण तो जखमी माणूस उठून निघून गेला असेल किंवा टँक्सीनं घरी गेला असेल. मला काय माहित. दुसरी गोष्ट म्हणजे गाडी अगोदर धुतली असेल.” शिवराज म्हणाला
इन्स्पेक्टरनी शिवराज कडे वळून पाहिलं “ हो शक्य आहे पण सर्व गोष्टी एकत्र पहायच्या, वेगवेगळया नाही. तुम्ही तुमच्या नावानं सुईट बुक केला होतात. कृतीचं विमान साडेपाचला उतरलं आणि सहा पर्यंत तुम्ही हॉटेलात होतात. तुम्ही अगोदर चेक इन केलं होतत. होटेल फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर आहे. कृतीच्या सांगण्या प्रमाणे ती खूप थकली होती आणि जेट लँग गेला नव्हता आणि झोप पण पुरेशी झाली नव्हती कारण दुबईत थोडया तासाच्या हॉल्टमधे खूप काम आवरायचं होत. त्यामुळे तिनं झोप काढायचं ठरवलं आणि तुम्ही सिगारेट आणायला बाहेर गेलात. तुमच्याकडे रुमच्या दरवाज्याचं दुसरं कार्ड होतं.”
“ठीक आहे इन्स्पेक्टर पण हे तर तुम्ही मला माहित असलेलंच सांगताय.“ शिवराज मधेच म्हणाला
“शिवराज, तुम्हाला सर्वच महित आहे, मीच अंदाज बांधतोय. मुख्य म्हणजे जेंव्हा कृती उठली तेंव्हा जवळ जवळ सव्वा नऊ झाले होते. ती उठलीच मुळी तुमच्या फोननं. तुम्ही तिला सांगितलंत की तुमची गाडी स्टार्ट होत नाही. तुम्ही बेसमेंट मधे आहात आणि चेक आउट केलेलं आहे तेंव्हा हॉटेलचा काऊच घेऊन एअरपोर्टला जा आणि गाडी सुरु होताच तुम्ही एअरपोर्टला याल. त्या नंतर तिला तुमचा फोन लागला नाही म्हणून एवढे मिस्ड कॉल कृतीचे तुमच्या फोनवर.” इन्स्पेक्टरनी परिणामासाठी शिवराज कडे रोखून पाहिलं
“हो नं. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गाडीच्या इंजिनमध्ये पाणी गेलं असणार कारण बराच वेळ गाडी सुरु होत नव्हती. नंतर झाली आणि मी गेलो एअरपोर्टला पण तेव्हड्यात कृती सेक्युरीटी चेक मधून गेली असणार कारण तिचा फोन लागत नव्हता. मग तसच मी निघालो घरी जायला.” शिवराजनं खुलासा केला.
“नाही शिवराज, तेंव्हा तुम्ही खंडाळ्याहून येत होतात.“ इन्स्पेक्टरनी घणागाती घाव घातला
“असं, तुमची कथा इथं टर्न घेते तर. मग काय सरळ आहे. शॉर्ट मधे मी स्मृतीला कड्यावरून ढकलून परत आलो.” शिवराज रागानं बोलला
“शिवराज, प्रत्येक खुनाची कथा ही दीर्घकथाच असते, निदान पोलिसांसाठी तरी. ज्यांना फक्त लघुकथा आणि चुटकुले आवडतात त्यांनी खुनाची कथा ऐकू किंवा वाचू नये कारण सर्व काही तपशीलात असतं. द डेविल इज इन द डीटेल.” इन्स्पेक्टरनी पुढे बोलायला सुरुवात केली
“स्मृतीचा फोन आला तेंव्हा तुम्ही खंडाळ्याच्या वाटेत होतात. स्मृतीनं प्रथम घरच्या नोकराला केला आणि मग तुम्हाला पण तुम्ही गाडी वेगानं चालवत होतात म्हणून फोन घेतला नाहित. पाच मिनिटांनी थांबून तुम्ही फोन केला. तुम्ही स्मृतीला लोहियांच्या घरी भेटू म्हणालात पण प्रथम सनसेट पाँईंट भेटायचं ठरलं. लोहिया दांपत्याला नॉनव्हेज आणि ड्रिंक चालत नाही म्हणून नेहमी प्रमाणे सनसेट पाँईंटला ड्रिंक घेऊन जायचं ठरलं. तुमच्या गाडीत कुलर आहे त्यात बीअरचे कँन होते. स्मृतीला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती तुम्हाला. बहुतेक सकाळच्या भांडणाशी संबंधित असावी अथवा वैयक्तिक. म्हणून त्या एवढी तुमची वाट पहात होत्या. तुम्ही त्यांना सनसेट पाँईंटला भेटलात. पोलिसांना चार बीअरचे कँन मिळाले. दोन कँनवर स्मृतीचे बोटाचे ठसे होते तर दोन एकदम क्लीन. स्मृतीच्या पोटात अल्कोहोल आणि अँटी एँग्झायटी ड्रग मिळाला.“ इन्स्पेक्टर क्षणभर बोलायचे थांबले.
“मग तुम्हाला माहित असेलच की स्मृती किती तरी वर्षं औषध घेते आणि खूप ड्रिंक पण घेते हे!” शिवराज मधेच बोलला
“त्यांच्या अवस्थेत ठीक नव्हतं पण दारू ही अशी गोष्ट आहे नं.” इन्स्पेक्टर बोलले
“तिला कूठं आहे कसली पर्वा. सांगितलं तर उलट करेल.” शिवराजचा कंठ भरून आला
“पुढचा तपशील आणि काही सांगण्याची आवश्यकता नाही इतका भयंकर आहे” इन्स्पेक्टर म्हणाले
“पण तुम्ही म्हणालात की स्मृतीचा लोहियांना फोन होता.” शिवराजनं उलट तपासणी केली
“हो, प्रथम तुम्ही स्मृतीला थांबून एका फोन बूथ वरून फोन केलात. तुमचा फोन बंद पडलाय असं तुम्ही सांगितलं असणार. तो फोन बूथ पण पहिला मी. रात्री अंधार असतो तिथं. स्मृतीच्या फोनवरचे नंतरचे कॉल्स तुम्ही केलेत आणि नंतर फोन टाकून दिलात. आता तो मिळणं अशक्य आहे.” इन्स्पेक्टर म्हणाले.

शिवराज काही बोलणार इतक्यात हवालदार चहा घेऊन आत आला. त्यानी चहा आणि सँडविच टेबलवर मांडलं आणि म्हणाला “वकिलसाहेब आलेत बाहेर.”
“त्यांच्याकडून पेपर्स आत घेऊन ये. त्यांना सांग ते जाऊ शकतात, थांबायची गरज नाही”
हवालदार बाहेर जाता क्षणी शिवराज बोलला “मग ते दोन बीअर चे कँन संपवले कोणी?”
“शिवराज तुम्ही. तुमचा ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह आला याचा अर्थ एवढाच की अल्कोहोलचं प्रमाण
कायद्यात सांगितलेल्या प्रमाणाच्या आत होतं. दोन बीअर कँन प्यायल्यावर तीन तास पुरे आहेत पचवायला.”
हवालदार परत आत आला आणि त्यानं पेपर्स इन्स्पेक्टरना दिले.
“चला, तुमची रिलीज ऑर्डर आली. चहा संपवा मग तुम्हाला गाडीपर्यंत सोडतो. सही करा येथे.” इन्स्पेक्टर थकलेल्या आवाजात म्हणाले
शिवराज चहा एका घोटात संपवून म्हणाला “तुमचा चहा मात्र खूप छान असतो.”
इन्स्पेक्टर म्हणाले “पुन्हा याल तेंव्हा याच्यापेक्षा चागला चहा पाजू.”
स्टेशनच्या बाहेर पडताना शिवराज म्हणाला “इन्स्पेक्टरसाहेब तुमच्या कथेत जर तुमचा एवढा विश्वास आहे तर तुम्ही मला अटक का नाही केलीत. का आता आपण मित्र झालो?”
“नाही शिवराज, आपण मित्र कधीही होणार नाही. तुमच्या सारख्या मोठ्ठ्या व्यक्तीला खुनाच्या आरोपावरून अटक करायला सुध्दा प्रथम दर्शनी पुरावा लागतो पण महत्वाची गोष्ट म्हणजे मोटिव.
मला मोटिव जर सिद्ध करता आलं असतं तर मी या स्टेशनच्या बाहेर तुम्हाला पडू दिलं नसतं.”

शिवराज हसला “तुम्ही काय म्हणताय हे तुम्हाला कळतंय का इन्स्पेक्टर? सगळं जग हसेल तुम्हाला स्मृतीच्या मरणात तिच्या नवऱ्याला मोटिव नाही म्हणालात तर.”

“खात्री आहे नाही हसणार. तुम्ही पण देवाचे आभार मानायला हवेत खरं तर. कालच देवस्थळी वकिलांनी मला स्मृतीच्या मृत्यू पत्राची प्रत दिली. आज ते कोर्टात प्रोबेट फाईल करताहेत.
त्यात त्यांना जर अकाली मृत्यू किंवा अनैसर्गिक मृत्यू आला तर सूर्यवंशी इंडस्ट्रीची सारी सूत्रं कृतीला बहाल केली आहेत.”
“व्हॉट “ शिवराज एवढंच बोलू शकला
“हो. त्यांच्या विम्याच्या दहा कोटी रकमेचे बेनिफिसीअरी सूर्यवंशी इंडस्ट्रीज कामगार ट्रस्ट आहे.
त्यांचं वरळी सी फेसचं घर अपंग मुलांच्या वेलफेअर साठी डोनेट केलंय आणि पुण्याचा बंगला कृतीला वय्यक्तिक स्वरुपात दिला आहे.” इन्स्पेक्टरनी पुढे माहिती दिली
“ओ माय गाँड. स्मृती इस क्रेझी “ शिवराज पुटपुटला
“शिवराज तुम्हाला उघडयावर नाही टाकलं त्यांनी. खंडाळ्याचा बंगला तुम्हाला दिलाय. काय प्राक्तन असतं पहा. वर तुम्हाला सूर्यवंशी इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनाने उचित पेन्शन द्यावी अशी शिफारस केली आहे. अर्थात तुम्ही निवृत्त व्हाल तेंव्हा.” इन्स्पेक्टरनी पुष्टी केली

“हे कधी केलंय विल? मला माहित नाही.” शिवराज एकदम सुन्न झाल्यासारखा दिसत होता

“तीन महिन्यांपूर्वी असावं, तारीख लक्षात नाही पण गेल्या आठवड्यातच देवस्थळी वकिलांना स्मृतीनं फोन केला होता. मृत्यूपत्रात काही फेरफार करायचे आहेत एवढंच म्हणाल्या.” इन्स्पेक्टरनी सांगितलं “तुम्हाला मिळेल प्रत”
“हेही मला माहित नाही” शिवराज स्वतःशीच बोलला
“पण कृतीला माहित होतं कारण त्या होत्या नोटरीकडे स्मृती बरोबर सह्या करताना, म्हणजे असं देवस्थळी वकिलांनी सांगितलं.” इन्स्पेक्टरनी ठिणगी टाकली
“कृती कधी बोलली नाही मला.” शिवराज आता अंतर्मुख झाल्यासारखा दिसला
“मग त्यांनी हे पण सांगितलं नसेल की त्यांचं लंडनमध्ये एका अनिवासी भारतीया बरोबर लग्न झालं.” इन्स्पेक्टरनी आगीत तेल टाकलं
शिवराज आता पूर्ण पराभूत झाला होता “तुम्ही मला शॉक वर शॉक देताय.”
“सधन आहे म्हणे. म्हणजे कृतीचा नवरा. कॉलेजात भेटला पण ख्रिश्चन आहे. या लग्नामुळे तर नसेल ना स्मृतीला मृत्युपत्रात फेरफार करावेसे वाटले? पण आता काय उपयोग म्हणा!” इन्स्पेक्टरनी जीपकडे हाथ दाखवत म्हटलं

शिवराज आता अचानक वयस्कर दिसायला लागला. जीपमधे चढून तो ड्रायव्हर शेजारी बसला
“थँक यू इन्स्पेक्टरसाहेब. यू हँव्ह बीन व्हेरी काईंड “

इन्स्पेक्टर म्हणाले “हो आणखी एक गोष्ट सांगायचीच राहून गेली.”
शिवराजनं त्यांच्याकडे पाहिलं
“पोस्ट माँर्टेमच्या रिपोर्टनुसार स्मृती वाँज इंन्टू एट वीक्स ऑफ प्रेग्नन्सी. एखादेवेळेस हिच गोष्ट त्यांना तुम्हाला सांगायची असेल, काय?” जीप सुरु व्हायची वाट नं पहाता इन्स्पेक्टर सोनटक्कें वळून पोलिस स्टेशन मधे निघून गेले.

---------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवट अजिबात अपेक्षित नाहीय. (म्ह्णजे त्याने खुन केलाय हे खुपच लवकर कळतय पण तो शेवट नाहिय Wink )
अप्रतिम... Happy

गोष्ट आवडली..

<<<शेवट अजिबात अपेक्षित नाहीय. (म्ह्णजे त्याने खुन केलाय हे खुपच लवकर कळतय पण तो शेवट नाहिय )>>>
ऑ...कुणीतरी उलगडून सांगा शेवट मला..

मला वाटत की त्याने खुन केला हे अभिप्रेत नाही तर वाचकांवर सोड्लय. इंस्पे़क्टरला वहिम आहे व त्याची थिओरि एक कंजेक्चर आहे. संशयाचं बोट क्रुतीवर पण जात, तिसरच कोणी असु शकतं. नाहीतर कथेच्म नाव सन्शयीत असन्यापेक्शा खुनी असतं Happy

हॅटस् ऑफ.

जबरदस्त उतरलीये कथा. चांगला प्लॉट, व्यवस्थित बांधणी आणि ओघवती शैली. किंचित फास्ट वाटली. ईन्स्पेक्टर जास्त स्मार्ट वाटला... पण एकूणात मस्त.

मस्त प्लॉट! पण शिवराजने नसून कृतीने खून केला असेल असे मला वाटले. तसा शिवराजच्या पोलिसात जाणे अटक करवून घेणे याला काही अर्थ वाटला नाही. त्याने खून करून अ‍ॅलिबी तयार करण्याचा प्रयत्न केला म्हणावे तर एअरपोर्ट रोड ला अ‍ॅक्सिडेन्ट झालाच नव्हता हे पोलिस २ मिनिटात ओळ्खतील की.

Pages