एक न सुटलेले कोडे !

Submitted by अवल on 11 December, 2012 - 07:43

सकाळी उठले तीच एका मंजुळ आवाजाने. तसा नेहमी येत असे, पण आज जरा जास्तच जवळून अन खणखणीत. वृटिव्हSS, वृटिव्हSS, वृटिव्हSS
अन बाहेर हॉलमध्ये आले तर चक्क टेरेसच्या बांधावर दोन बुलबुल साद घालत बसले होते. आधी टेरेसवरच्या बागेत सगळ्या झाडांची पाहणी त्यांनी केली.

IMG_4301.jpg

मग उडून गेले. साधारण अर्ध्या तासाने पुन्हा साद आली. वृटिव्हSS मी स्वयंपाकघरात काम करत होते, तर सुळ्ळ्कन बुलबुल हॉलमध्येच दाखल झाला.

pahuna.jpg

मस्त पंख्यावर बसून पाहणी करू लागला. मग थोडा पुढे येऊन झुंबरावर त्याने दोन घिरट्या घातल्या अन मग पुन्हा स्वारी बाहेर गेली.
१० मिनिटातच दोघे जोडीने आले. आता तर त्यांना कंठच फुटला. लालबुडी चक्क झुंबरावर जाऊन बसली.

4_10.jpg

ती झुंबरावर अन तो पंख्यावर अशी काही चर्चा झाली. मग लालबुडी ग्लाईड घेऊन टेरेसच्या बांधावर टेकली. लालबुड्या तिच्या पाठोपाठ कुंदाच्या फांदीवर विसावला. पुन्हा त्यांची चर्चा झाली. अन मग ती भुर्र दिशी उडून गेली. अन तो कुंडीतल्या झाडंमध्ये खुडबुड करू लागला.
एव्हाना माझा लेक डोळे चोळत उठला. " कसले आवाज करत्येस गं ? " माझ्या गोड गळ्याबद्दल त्याचा असा गोड गैरसमज ऐकून मला भरून आलं Proud " आज सुट्टी होती, चांगलं झोपणार होतो, तर सकाळपासून काय गं किरकिर करतेय्स? " झालं माझं विमान धाडदिशी जमिनीवर आपटलं. बहुदा या सगळ्याचा परिणाम लालबुड्यावरही झाला, अन तो नारज होऊन निघून गेला.
मी लेकावर दुहेरी चिडले. एकतर माझा भ्रमनिरास केला, वर लालबुड्याला घाबरवले. मी रागारागाने काही बोलणार इतक्यात महाशय परत भर्रकन आले अन झुंबरावर येऊन बसले. अन चोचीत लांब वाळके गवत. ते बघताच मी सारे विसरले. "असे बघ बघ, बुलबुल घरटं करतोय बहुदा." " हॅ, घरटं बिरटं काही नाही. मागे तू मारे दोन बी एच के चा फ्लॅटही देऊ केला होतास की. कोणी ढुंकून बघितलं नाही त्या कडे. " फिदी फिदी हसत लेक सुनाऊन गेला. मग मी गप्पच बसले. काय करणार, त्याचं खरच होतं की. इथे अनेकांनी सांगितलं होतं, पण तरीही मला फार आशा होती, कोणीतरी भाडेकरू येईल म्हणून. पण छे! अन माझ्या बरोब्बर दुख-या नसे वर दाब देण्याचे कौशल्य लेकाने बापाकडून वारसा म्हणून मिळवलं होतं ते देऊन लेक आपलं आवरायला निघून गेला.
आमच्या प्रेमालापाने नवराही उठला. त्याने फक्त एक कटाक्ष टाकला. खांदे उडवले, बस तेव्हढे पुरले. मग हे सारे आपल्या घरचे नाहीच असा ठाम विचार करून त्याने विषय संपवला, न बोलताच.
मग मीही नेहमीची कामे आवरायला घेतली. एक कान अन एक नजर लालबुड्यावर होतीच. तेव्हढ्यात कामवाली आली. केर काढताना तिने गवगवा केलाच. "ताई, घरटं होऊ देऊ नका, लई ताप असतो त्याचा. एकतर भारी कचरा करतात. तुम्ही काही काढणार नाही त्ये. थांबा मीच काढते." तीने केरसुणी सरसावलीच. मी "अगं थांब थांब. नको त्यांना त्रास देऊ" म्हणे पर्यंत बुलबुल आलाच. "ताई अवो, असं काय करता. नका असं करू. नंतर तुम्हीच वाईट वाटून घेत बसाल, एखादं अंड फुटलं, पिल्लं उडून गेली की..." "असू दे गं . मुकी पाखरं ती. मी नाही वाईट वाटून घेणार. राहू दे काही दिवस. " " बरं राहू दे तर राहू दे. पण नंतर तुम्हीच काळजी करात बसाल बरं... "
झालं, प्रत्येकाने माझ्या आनंदावर पाणी घालणे, विरजण घालणे अन कुंपण घालण्याचे काम केले. अन सगळे आपापल्या कामांना भिडले. लेक नवरा बाहेर पडले. कामवालीही सगळे आवरून गेली. जाताना झुंबराकडे नाराज्-नाराज नजर टाकायला कोण्णी कोण्णी विसरले नाही.

कधी नव्हे ती मी चक्क आग्रही राहिले. अन मग माझी दुपार सुरू झाली. सहसा मी आमच्या टेरेसच्या दाराजवळच्या खुर्चीवर बसून वाचन, लिखाण, टिव्ही बघणे वा विणकाम करते. आजही यशीच बसायला गेले. पण आज उन जरा जास्तच होतं, म्हणून तिथला पंखा लावायला हात पुढे केला तेव्हढ्यात साद ऐकू आली, वृटिव्हSS
अर्रेच्चा, विसरलेच मी, आज नवीन पाहुणा आहे नाही का घरी. अन त्याच्या जाण्यायेण्याच्या वाटेवरचा पंखा लावून मोठाच वेडेपणा करणार होते मी. मग मी पंखा न लावताच माझ्या खुर्चीवर बसले. आज एक नवीन पुस्तक हाती आले होते. काही पाने वाचून होताहेत तोच जवळून भुर्रकन बुलबुल उडाला. आता त्याच्या फे-या वाढल्या. अन मला अजिबात न घाबरता त्याने काम चालू ठेवले. मधूनच तीही येऊन बघून जात होती. थोड्यावेळाने सहज टिपॉयकडे लक्ष गेले अन हसूच आले. एक नवीन, काटक्यांची रचना तिथे रचली जात होती. वरती ते दोघे घरटे विणत होते. अन खाली आपसूकच काटक्यांचा इकेबाना तयार होत होता. "चला हे एक बरं झालं. मला रोज नवीन फ्लॉवर अ‍ॅरेंजमेंट करायला नको. अन बाईलाही कच-याचा त्रास व्हायला नको. फक्त नव-याला हे पटवणे एव्ह्ढेच जिकीरीचे काम " असा विचार करत शांतपणे पुन्हा पुस्तकाकडे वळले.

आता तर त्या दोघांनी माझ्याकडे पार दुर्लक्ष केले. जणू मी माझ्याच घरात एक पुतळा झाले होते. अंधार पडू लागला तशा त्यांच्या फे-या थांबल्या. रात्री त्यांनी कोठेतरी आसारा घेतला असावा.
दुस-या दिवशी जरा उजाडले नाही तोच गजर झाला; वृटिव्हSS , अन मग कालचाच प्रयोग मागून पुढे सुरू झाला. त्यांचे घरटे आता आकार घेऊ लागले. जेमेतेम आठवड्यात एक सुरेख घरटे विणले गेले. त्या विणीची मी प्रत्यक्ष साक्षीदारही बनले. एक एक गवत घेऊन, त्याची चोचीने गंफण करत त्यांनी आपला विसावा तयार केलेला मी पहात राही.

3_16.jpg

किती कौशल्य. किती चिकाटी. किती कष्ट. किती प्रयत्न. त्यासाठी त्यांनी माझ्या बागेतल्या पामच्या झाडच्या पानांच्या बारीक बारीक उभ्या रेषा ज्या कौशक्याने तोडल्या त्याला तर वादच नाही. आपणही ते करू शकू असे वाटत नाही.

अन मग दोघे बराच वेळ आपल्या प्रेमकुजनात राहू लागले. कधी अगदी हळुवार आवाजातले त्यांचे कुजन चाले. तर कधी जोरात चर्चा चालत. कधी घरट्यात, तर कधी टेरेसच्या बांधावर, तर कधी कुंदाच्या झाडावर. अन मग एक दिवस ती एकटीच घरट्यात दिसली. तो कुठे गायबच झाला. एक दोनदा तो आला मग ही बाहेर गेली २ मिनिटात परत आली. ती आपले घरटे सोडेना तेव्हाच कळले की आता घरटे मोकळे नाही. माझा आनंद गगनात मावेना. भावी पिल्लांची, त्यांच्या नाजूक चिवचिवाटाची मी आतुरतेने वाट पाहू लागले. एक दिवस दोघे नाहीत हे बघून अत्यंत चपलाई करून आत डोकावायचा प्रयत्न केला. पण काहीच दिसेना. मग कॅमेराचा वापर केला ( फ्लॅश आवर्जून टाळला) चटकन खाली उतरले.

1_14.jpg

स्टूल जागेवर ठेवे पर्यंत ती आलीच. मी कॅमेरात डोकावले. दोन ऊलुशी, रंगीत गोजिरवाणि अंडी विराजमान झाली होती घरट्यात ! त्यांचे रुटिन चालूच राहिले. आता तर माझ्या अगदी एका फुटावरून ती अन तो ग्लाईड करू लागले.

अन मग एका संध्याकाळी अंधार झाल्यावर राणी बाहेर गेली. माझं लक्षच नव्हतं. ती तिच्या घरट्यात इतकी शांत बसलेली असे की ती आहे की नाही हे कळतच नसे. माझ्या अन माझ्या लेकाचे प्रेमळ भांडणाचे आवाज, टिव्हीवरच्या सिरियल्स, लेकाच्या आवडत्या डिस्कव्हरीवरचे चित्रविचित्र आवाज; कश्श्या कश्श्याचा तिला त्रास होत नसे. अन तिचाही कसलाच त्रास आम्हाला होत नसे. अन त्या दिवशी ती अशी अवेळी बाहेर गेली. अन परत येताना तिला आमचे घरच सापडेना. नेहमी उजेडात आमच्या टेरेसवरचा रस्ता माहिती होता. पण आता अंधार झाला होता. त्यातून आमच्या टेरेसला ओनिंग असल्याने हॉलमधला उजेड बाहेर जात नव्हता. बाहेरून उजेड दिसत होता तो स्वयंपाकघराचा. अन मग चुकून तिने तीच वाट धरली. स्वयंपाकघरातून ती आत आली अन मी दचकलेच. पण लगेच लक्षात आले, ही तीच आहे म्हणुन मग मी आपली निवांत झाले. पण ती मात्र बावरली. आल्या आल्या स्वयंपाकघराच्या फॅनवर विराजली. पण समोर घरटं दिसेना. ती भिरभीरली. स्वयंपाकघरात तिने गोल गोल चकरा घातल्या. मध्येच चितकारलीही. मग माझं लक्ष गेलं. अन मला तिचा झालेला गोंधळ लक्षात आला. बिचारीला वाटले ती नेहमीच्या वाटेने आलेय, अन समोर घरटं दिसत नाहीये, अंडी सापडत नाहीये म्हटल्यावर तिचा जीव था-यावर राहिला नव्हता. बिचारी गरा गरा फिरत होती.

आता काय करावं अन तिला वाट दाखवावी सुचेना. खरं तर स्वयंपाकघर आणि हॉल यांच्यामध्य भींत नाहीये. परंतु मधल्या एका पीलरने तिला आपले घरटे दिसत नव्हते. रादर ती हॉलच्या दिशेने बघतच नव्हती. मध्येच तिने बाहेर जायचा प्रयत्न केला पण ते ही तिला जमे ना (स्वयंपाकघराच्या खिडकी बाहेर उभे खांबांचे डिझाईन आहे.त्यात बाहेर काळोख) ती अगदीच कावरी बावरी झाली होती. मग मी तिला दिशा दाखवण्यासाठी स्वयंपाकघराचे दिवे बंद केले. मग ती उडून हॉलमध्ये आली. पण तरीही तिला घरटे दिसेना कारण आता ती हॉलमधल्या दुस-या पंख्यावर होती. अन झुंबरातले तिचे घरटे समोरच्या फॅनच्या बाजूला होते.

ती पुन्हा कावरी बावरी झाली. तिचा तो कळवळलेला चेहरा मला बघवेना. मग मी हॉलमधले पहिल्या पंख्याजवळचा दिवा ठेवला अन बाकीचे सगळे घालवले. आता ती पहिल्या पंख्यावर येऊन बसली. पण तोंड उलट्या बाजूला. मग मी या बाजूला थोडे खटखट केले. त्या बरोबर ती उलटी वळली. एक क्षण तिने माझ्या कडे बघितले. एव्हाना मी तिला मदत करतेय हे कळले असावे. मी झुंबराकडे बोट केले. कसे कोणजाणे पण तिलाही कळले. तिने नजर वळवली. अन जिवाच्या आकांताने तिने झेप घेतली, घरट्याकडे. तिचा धपापलेला ऊर मला दिसत होता. हुश्श. मलाही हुश्स्य झाले. पोचली बाई एकदाची आपल्या घरट्यात.

मी स्वयंपाकघरात परत आले. माझ्या पायाला काहीतरी ओलसर लागले. बहुदा मगाशी घाबरून तिची कढी पांतळ झाली होती Happy बिचारी पक्षिण झाली म्हणून काय झालं ? शेवटी घरावरचा, पिल्लांवरचा तिचा जीव आईचाच होता ना !

मग एक आठवडा झाला. त्या दोघांचे रुटिन चालू राहिले. आता मला पिल्लांची चाहूल हवी होती. त्याच सुमारास मला अन माझ्या नव-याला एक दिवस बाहेरगावी जावे लागले. लेक घरीच होता. त्यामुळे त्या दोघांची चिंता नव्हती.
आम्ही रात्री ८-९ वाजता घरी आलो. तर बया गायब होती. मी लेकाला विचारले. तर तो म्हणाला, " हो बाई तुझी लेक अन जावई बरे आहेत. ती बया संधाकाळपासून सारखी जा ये करतेय." " हो रे, रागवू नको. शेवटी माया मुलीलाच असते हो" असं त्याला चिडवून मी कामाला लागले. थोड्या वेळात ती परत आली. लगेच पुन्हा परत गेली. आज ती रस्ता अजिबात चुकत नव्हती. पण रात्रीच्या वेळेस अंधार झाल्यावर तिच्या या फे-या मला घोर लावून गेल्या. अगदी ११ पर्यंत तिच्या फे-या चालू होत्या. मग रात्री ती आली की नाही मला काही कळलं नाही.
दुसरा दिवस उजाडला पण माझा नेहमीचा गजर झालाच नाही. वृटिव्हSS असा आवाजच आला नाही. कालच्या दमणूकीने जर उशीराच जाग आली. अन लक्षात आलं की ती नाहीचये. अरेच्चा काय झालं ? सकाळचं सगळं भराभरा आवरलं. अन मग बाहेर जरा तिचा शोध घेतला. पण ते दोघेही दिसेनात. शेवटी हिय्या करून स्टुलावर चढले. मनात धाकधूक होतीच, काहीतरी विपरित घडलं होत,....
अन कॅमेरा पुन्हा क्लिक केला. पटकन खाली उतरून पाहिलं कॅमेरात ,... अन विश्वासच बसेना.... घरटं मोकळं होतं. अगदी कशाचाही मागमूस नव्हता. मला काहीच कळेना, मग वाटलं मी बघण्या, क्लिक करण्यात काही चूक केलीय. लेकाला चढवलं वर. उंच असल्याने त्याला दिसलं. म्हणाला " आई अगं यात काहीच नाहीये." " अरे नीट बघ अंडी, अंड्याची चरफलं, काही तरी असेल..." "नाही, ग, अगदी मोकळं आहे घरटं..."
मी चकीत होञ्न त्याने काढलेला फोटो बघत राहिले. स्वच्छा, मोकळे सुबक घरटे....

DSC_0428.jpg

नक्की काय घडलं ? मी पुन्हा मागचे फोटो बघितले. होती छान छोटीशी रंगीत दोन अंडी होती तिथे. मग ती काय झाली? पिल्लं झाली का? ती मला का दिसली नाहीत? अंडी उबलीच नाहीत का? पण मग न ऊबलेली अंडी तरी कुठेत? त्याने, तिने काल इतक्या फे-या का मारल्या? पिल्लांना घेऊन गेली? की अंडी घेऊन गेली ? मला या कोड्याचे उत्तरच नाही सापडले. कोणी पक्षी तज्ज्ञ सांगतील का काय घडलं असावं ? का ? त्यांना अचानक घरटं सोडावं असं का वाटलं असावं ? माझावरचा त्यांचा विश्वास असा अचानक का उडाला?
मी नंतर आठवडाभर वाट पाहिली पण ती दोघे नाहीच आली. अखेर ते घरटे मी उतरवले. त्या दोघांची आठवण म्हणून आता त्याला धबधब्यावर ठेवलेय.

DSC_0547.jpg

एक न सुटलेले कोडे !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल
खरेतर निसर्गाच्या जवळ जावून,मनावर संयम ठेवून,मुद्दाम वेगळा वेळ खर्चून,जो अपरमित असा सृजनाचा आनंद मिळण्याचे भाग्य, ज्या थोड्याफार निसर्ग प्रेमींच्या वाट्याला येते ते या जोडीने आपल्या दारी आणले. भाग्यवान आहात.
नव निर्मितीच्या दुसऱ्या टप्प्याचे साक्षीदार होता आले नाही हि रुखरुख राहणे साहजिकच आहे. पण असे ऐकले होते कि पक्ष्यातील काही जाती सुरक्षिततेच्या दृष्टीने नेहमीच असे स्थलांतर करून दुसरा टप्पा नवीन ठिकाणी नवीन घरट्यात पार पाडतात.
असो लवकर आपणास दुसऱ्या टप्प्यावरील त्या क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभू दे हीच बुलबुल चरणी प्रार्थना.

अवल, कथा उत्कंठावर्धक आहे पण शेवट अनपेक्षित. पक्षी घरट्यात अजिबात घाण करत नाहीत. पण पिल्ले इतक्या लवकर मोठी होऊन उडतील हे शक्यच नाही, पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यावर, कवचे तरी खाली पडली असती. ते घरटे तिथेच ठेवायला हवे. त्यांना सुरक्षित वाटले असेल तर पुढच्या वर्षी नक्की परत येतील.

किंकर, धन्यवाद >>>हीच बुलबुल चरणी प्रार्थना. <<< वा !
दिनेशदा, परत ठेऊ का तिथे? पण आता ते तेव्ह्ढे सुरक्षित राहिल का Uhoh

किंकरला १००० मोदक...
अवल, किती सुंदर उतरलाय हा लेख... तुझ्या निसर्गप्रेमाला मनापासून नमस्कार. मी खरच इतका सहानुभुतीपुर्वक विचार केला नसता...

अवल, किती प्रेमाने निरीक्षण करता तुम्ही!! फार आवडलं लेखन. सगळा प्रसंग आत्ता डोळ्यापुढे घडलाय असं वाटतं.

दिनेशदा, चनस, कथा नाही हो, मला नाही लिहिता येत कथा बिथा Uhoh हे आपले एक रोजचे अनुभव कथन.
धन्यवाद सर्वांना Happy

अवम, एकदम मस्त लिहिलंयस. धक्कादायक शेवट! अंड्यांचं काय झालं असेल? बुलबुलाच्या चोचीत राहतील इतकीही ती अंडी लहान नव्हती ना? मला नाही वाटत बुलबुल घरटं बदलतात. जागूच्या घरी बुलबुलांची अंडी ते पिल्लं असं सगळं यथासांग पार पडलं होतं की.

अवल, घरटं जपून ठेवण्याच्या तुझ्या कल्पकतेला ___/\___

माझ्या माहेरी टेरेसमध्ये बरीच झाडं लावली होती. त्यात एका झाडावर शिंपी पक्ष्यानं घरटं केलं होतं. दोन्-तीन पानं निवडून कडांना शिलाई घातली होती. किती सुबक होतं ते.

खरच ना, कोडंच आहे.. आता अंड्यांचं झालं काय ही हुरहुर लागुन राहणारच..

माझ्या खिडकीत कबुतरांनी घरटं करु नये म्हणुन बरेच दिवस त्यांना तिथुन हुसकवुन लावत होतो आम्ही. एका दिवशी घरी कोणी नव्हतं तर एकाच दिवसात अतिशय युद्धपातळीवर घरटं तयार करुन एक अंडं पण घातलं. संध्याकाळी मामे भावाने पाहिलं अन कबुतरांना तिथे घरटं करु न देण्याची जबाबदारी मी त्याच्यावर टाकलेली असल्याने त्याने शहाणपणा करुन मी घरी पोहचायच्या आत ते घरटं उचलुन गॅलरीत ठेवलं अन अंडं फ्रीजवर. घरी आल्यावर त्याचे पराक्रम कळल्यावर सर्वानुमते ते घरटं पुन्हा त्या जागी ठेवुन त्यात ते अंडं ठेवायचं ठरलं. कबुतरांनी त्या घरट्यात परत वास्तव्य केलच शिवाय अजुन एक अंडं घातलं. परंतु जेव्हा पिल्लं बाहेर आली अन त्यांची वाढ बघितली तेव्हा त्यातलं एक पिल्लु अशक्त दिसलं. त्याला उडायला यायला लागायलाही बराच जास्त वेळ लागला दुसर्‍या पिल्लाच्या मानाने.

मामी धन्यवाद !
चिमुरी, >>>घरटं उचलुन गॅलरीत ठेवलं अन अंडं फ्रीजवर <<< रामा !
अगं तेच ते पिल्लू असेल असही नाही गं. निसर्ग आहे, थोडं डावं उजवं असणारच ना Happy

अवल....

हळवेपणाने एखाद्या घटनेकडे कशारितीने पाहिले जाते यासाठी कुणाला तरी लिखित उदाहरण द्यायचे झाल्यास मी तुमच्या वरील लिखाणाकडे निर्देश करीन. जनसामान्यांना ज्या गोष्टीचे बिल्कुल अप्रूप नसते अशा एखाद्या छोट्याश्या गोष्टी आपल्या मनी....काहीही कारण, नातेसंबंध नसतानाही....असे काही घर करून बसतात की त्यामागील तर्कसंगती नेमकी काय असू शकते याचा धांडोळाही ती व्यक्ती करण्याचा विचार करत नाही. तुमच्याबाबतीतही याच काही क्षणांनी तुमच्यातील लेखिकेला त्यासंबंधी मुक्त विचार शब्दबद्ध करण्यास उद्युक्त केल्यासे दिसते.

श्री. व सौ. बुलबुल लालबुडे यानी संसाराची तयारी तुमच्या घरी केली....आपले असे छोटेसे 'घर अमर मानसी का' तयारही केले.....त्यांच्या संसाराला फुटलेली वेलही तुम्हाला पाहाण्यास मिळते आणि एक दिवस काहीतरी करणी होते आणि ती दोन्ही इटुकली पिटुकली अंडी गुप्त होतात. त्यांचा 'तलाश' करणे तुमच्यासाठी क्रमप्राप्त आणि त्याला कुणाचीच साथ मिळत नाही हे पाहून होणारी तुमची तगमग छान रेखाटली गेली आहे.

काही रहस्यांचा भेद न होणे ही बाब काहीवेळा फार मोहक असते..... जसा खानोलकरांना प्रश्न पडला होता "....तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे ?"....आणि त्याचा मागोवा त्यानी घेतला नव्हता. का? तर ते समजले असते तर मग त्याना पुन्हा त्या गुलाबांकडे पाहण्याचे कारणच राहिले नसते.....त्याच सुरात मीही असेच म्हणेन की तुम्हीही त्या अंड्यांचा शोध घेऊ नका इथून पुढे. त्या दोन्ही हीररांझा लालबुडेंना वाटले तर पुनःश्च तुमच्या घरी येऊन टपकतील....नव्याने पाने पिसण्यासाठी.

अशोक पाटील

अशोकमामा, काय म्हणू.....धन्यवाद
कविता हो ग, माझेही तसेच झालेय...
अमा Uhoh

आरती, किती सुंदर लिहिला आहेस लेख. सगळेच वाचक 'पुढे काय'ची वाट बघत असताना अनपेक्षित शेवट झाला. गुढ कथाच लिहिलीस तु. Happy किती लकी आहेस. तुझ्याकडे नेहमीच वेगवेगळे पक्षी किती विश्वासाने येतात. आणि तु क्लीक करेपर्यंत थांबतातही. Happy

एक शंका - मांजराने तर नसतील पळवली अंडी? किंवा तुझ्या घरात कुत्रा आहे का? किंवा दुसर्‍या कोणी मोठ्या पक्ष्याने? तु म्हणालीस तसं नवरा आणि मुलगा असेल तुझ्या धाकात, Wink पण आपल्या मेड्स इतक्या आगावु असतात कि रोज रोज कचरा होतो म्हणुन ती अंडी टाकुन दिली असतील. तु आता प्रद्युम्न किंवा दया होच. आम्हाला सगळ्यांना फार उत्सुकता आहे रहस्य जाणून घ्यायची.

नाही ग मनी, तु नव्हती आलीस घरी. अन झुंबर खुप वर आहे. अन माझी संगीताही चांगली आहे ग. पक्षांचे काही निसर्ग नियम/चक्र आपल्याला माहिती नाही असच असावं काही तरी...'पण अशोकमामा म्हणतात तसं काही कोडी तशीच न सुटलेली ठेवावीत...

खरंच अवल, हे एक कोडेच आहे - कुठे गेली ही अंडी???? बुलबुल तर ती कुठे घेऊन जाऊ शकणार नाही, तुझ्या घरातच ते घरटे आहे म्हटल्यावर इतर कुठला शिकारी पक्षी यायचीही शक्यताच नाही

बाकी तुझा लेख मात्र अतिशय सुंदर, वाचकाला खिळवून ठेवणारा आहे. या तुझ्या प्रेमासाठी का होईना ती जोडी पुढच्या वेळेस नक्कीच येईल परत - नवीन घरटे करायला......

साधारणतः बुलबुल एकदा केलेले घरटे परत वापरत नाहीत. तुझ्याकडे एक आठवण म्हणून राहू दे आता.

अवल, गूढ आहे हे खरंच..
पण एकदा पक्ष्यांना कळलं की तुझ्या घरी सुरक्षित जागा मिळते की येतील परत. स्वानुभव. गेले अनेको वर्षं आमच्याकडे बाल्कनीत वरती लोफ्टसारख्या जागेत चिमण्या रहात होत्या, घरात मांजरं असूनही. कुठल्याच मांजराने त्या चिमण्यांना खाल्लं नाही. शिवाय पिल्लं खाली पडली की चिवचिवाट करून लक्ष वेधून घ्यायच्या मग आम्ही पिल्लं परत वरती उचलून ठेवायचो. गेले काही महिने मात्र घरटी दिसत नाहीयेत, पण नक्की कधीतरी परत येतील असं मला आपलं वाटत रहातं

मला पण मोलकरणीवरच संशय आहे.

किंवा, तुम्ही घरी नसताना मुलाने घरटे बघितले असेल आणि त्याच्याकडुन चुकुन अंडी फुटली असतील.

From Holy Book of Sherlok Holmes:

"When you have eliminated the impossible, whatever remains, however improbable, must be the truth?"
The Sign of the Four, ch. 6 (1890)
Sherlock Holmes in The Sign of the Four (Doubleday p. 111)

जेव्हा सर्व शक्याता पडताळुनही काही हाती लागत नाही तेव्हा जी सगळ्यात जास्त साधी / सोपी आणि दुर्लक्षीलेली शक्याता असते तीच खरी ठरते. - इती शेरलॉक होल्म्स.

Pages