प्रत्येक वाट माझी जाते तुझ्या घराशी

Submitted by रसप on 11 December, 2012 - 03:35

प्रत्येक वाट माझी जाते तुझ्या घराशी
मी भांडतो स्वत:शी, तू थांब उंबऱ्याशी

बसलो तुझ्या पुढे अन स्मरले तुलाच जेव्हा
कळली गझल मलाही तेव्हा कुठे जराशी

मूर्तीस पत्थराच्या पाझर कधी फुटेना
अन मी तहानलेला ठरलो उगा अधाशी

मी मोगऱ्यास रात्री ओंजळ भरून नेतो
नसतेस तू म्हणूनी ठेवायला उशाशी

इच्छा नसून माझे चालूच श्वास असती
कारण अजूनही मी जपले तुला उराशी

ना पार जायचे वा मागे फिरायचेही
सागर बघून रमतो मी एक तो खलाशी

....रसप....
११ नोव्हेंबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/12/blog-post_11.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सागर बघून रमतो तो एक मी खलाशी - सहज आपले असे करून पाहिले. कृ गै न.

गझल आवडली.

बसलो तुझ्या पुढे अन स्मरले तुलाच जेव्हा
कळली गझल मलाही तेव्हा कुठे जराशी<<< छान शेर

मूर्तीस पत्थराच्या पाझर कधी फुटेना
अन मी तहानलेला ठरलो उगा अधाशी<<< मस्त खयाल

(अवांतर - तहानलेला अधाशी म्हंटला जाईल की भुकेलेला, असे एक मनात आले)

अनेक शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

बसलो तुझ्या पुढे अन स्मरले तुलाच जेव्हा
कळली गझल मलाही तेव्हा कुठे जराशी>>>

बिटवीन द लाईन्स मस्त आहे ह्या शेरात.

खलाशीच्या सुलभतेबाबत बेफिंशी सहमत.

बाकी अपेक्षा अधिक असल्याकारणाने गझल 'ठीक' ह्या सदरात मोडते असे म्हणावेसे वाटते.

शुभेच्छा!

गझल आवडली रणजित..

मी मोगऱ्यास रात्री ओंजळ भरून नेतो
नसतेस तू म्हणूनी ठेवायला उशाशी

क्या बात... एक नंबर.....

इच्छा नसून माझे चालूच श्वास असती
कारण अजूनही मी जपले तुला उराशी

मस्त आहे शेर...
पण 'इच्छा नसून माझे चालूच श्वास असती' च्या ऐवजी 'इच्छा नसूनही मी घेतोच श्वास आहे' जबरी वाटेल...( माझे वै. मत )

'नसून' पेक्षा 'नसूनही' मध्ये वजन आहे...

शुभेच्छा...

बसलो तुझ्या पुढे अन स्मरले तुलाच जेव्हा
कळली गझल मलाही तेव्हा कुठे जराशी
>>
वाह!
सुंदर शेर आहे हा! Happy

मी मोगऱ्यास रात्री ओंजळ भरून नेतो
नसतेस तू म्हणूनी ठेवायला उशाशी
>>
छान!

बसलो तुझ्या पुढे अन स्मरले तुलाच जेव्हा
कळली गझल मलाही तेव्हा कुठे जराशी
मी मोगऱ्यास रात्री ओंजळ भरून नेतो
नसतेस तू म्हणूनी ठेवायला उशाशी

'तुमच्याच 'गुड नाइट,स्वीट ड्रीम्स' ची आठवण झाली. मुक्त;च्छंद असो की गझल, तो हळूवार भाव सारख्याच नजाकतीने आलाय.

तुमच्याच 'गुड नाइट,स्वीट ड्रीम्स' ची आठवण झाली>>

धन्यवाद भारती ताई !

---------------------------------------
स्मितू, बेफिजी, कणखरजी, वैभव, शोभा१२३, रिया.... खूप आभार !

गझल खूप छान आहेच ;पण ..............

बाकी अपेक्षा अधिक असल्याकारणाने गझल 'ठीक' ह्या सदरात मोडते असे म्हणावेसे वाटते.>>>>>>+१

बेफीजी व फाटक साहेब म्हणताय्त तेही पटले

मी मोगऱ्यास रात्री ओंजळ भरून नेतो>>>>> या मोगर्‍या ऐवजी तिचा गजरा असता तर मला व्यक्तिशः जरा अधिक भावले असते अर्थात आहे ती ओळही प्रचण्ड आवडली आहेच

केसात माळलेला गजरा तुझा मला दे
नसतेस तू म्हणूनी ठेवायला उशाशी

वैभव,

तुझ्या सुचनेवर विचार करतो आहे..

-----------------------------------------

वैवकु,

तू सुचवलेल्या खयालाचा वेगळाच एक शेर डोक्यात नाचायला लागला आहे.... त्याला चिमटीत पकडण्याचा आधी प्रयत्न करतो..!! हा शेर तसाच राहावा... असे वाटते..!

------------------------------------------

बेफिजी...

तुम्ही सुचवलेला छोटासाच बदल.. जरा अजून सफाई आणतो आहे, निश्चितच.... त्यावरही विचार करतो.

-------------------------------------------

कणखरजी...

अजून सफाईदार प्रयत्न लौरच सादर करीन, अशी माझीच मला आशा आहे ! Happy

धन्यवाद !