सोनेरी रंगात नाहलेला "पर्वतगड उर्फ किल्ले हडसर" (फोटो वृतांत)

Submitted by जिप्सी on 9 December, 2012 - 00:24

दोन विकएण्ड दोन ट्रेक
कामात थकलेल्या जीवाला थोडासा ब्रेक
एक पालीचा "सुधागड" तर दुसरा जुन्नरचा "हडसर"
दोन महिन्यात न झालेल्या ट्रेकची भरून काढली कसर

खरंतर सुधागडचा बेत अचानक ठरला होता, त्या आधीच ऑफिसच्या गृपबरोबर रतनगडाचा ओव्हरनाईट ट्रेकचा बेत (१ डिसेंबर रोजी) झाला होता, पण अचानक ऑफिस क्रिकेट स्पर्धेची घोषणा झाली. सरावासाठी बर्‍याच जणांनी ट्रेकला येणे रद्द केले आणि रतनगडचा बेत बारगळला. त्यातच योचा फोन आला आणि सुधागड ओव्हरनाईट ट्रेक करून आलो. १ डिसेंबरचा रतनगडचा बेत रहित झाला पण त्याच दिवशी निदान एका दिवसाचा तरी ट्रेक करावा असा विचार होताच, त्यानुसार किल्ले हडसरला भेट द्यायचे ठरले. हडसरबद्दल जास्त माहिती नसल्याने साहजिकच भटकंती कट्यावर पोस्ट टाकली आणि मायबोलीकर मदतीला धावुन आले. सुरूवातीला एकुण आठजण तयार झालो पण आयत्यावेळेस काहीजण टांगारू निघाले. कुणीही नाही आले तरी आपण दोघे तरी जायचेच, असं माझं आणि दिपकच ठरलं. मी (मुंबईहुन) आणि मायबोलीकर दिपक पुण्याहुन बाईकने जुन्नरला भेटायचं ठरलं. जाण्याच्या दोन दिवस आधी सिद्धार्थचा ईमेल आला आणि त्याच्या ऑफिसमधले अजुन तीघेजण ट्रेकला येणार असं सांगितलं. सिद्धार्थची ओळख कोरलई ट्रेकला झाली होती. सरतेशेवटी मी, दिपक, सिद्धार्थ, मनिष, सुरभी आणि आशिष असे आम्ही सहाजण हडसर किल्ला सर करण्यास तयार झालो.

आधी ठरल्याप्रमाणेच दिपक पुण्याहुन जुन्नरला येणार होता आणि आम्ही पाचजण कल्याणहुन सकाळी साडेसहाच्या "कल्याण-शिवाजीनगर" या गाडीने जुन्नरला पोहचणार होतो (कल्याण ते जुन्नर- १५१ रूपये/माणशी (सेमी लक्झरी) ). अपेक्षेप्रमाणेच सकाळची हि गाडी पूर्णपणे रिकामी होती. गाडीत फक्त आम्ही ७-८ जणच होतो. गाडीत इतर तिघांशी ओळख झाल्यावर कळले कि हे सगळेच अमराठी असुन मुंबईत केपजेमिनीत जॉबला आहेत. त्यांना महाराष्ट्रातील आपल्या किल्ल्याचे खुप कौतुक होते. त्यातील सिद्धार्थ सोडल्यास बाकीच्या तिघांचाही हा पहिलाच ट्रेक. हे ऐकुन मला थोडेसे टेंशन आले. गप्पा मारत, माळशेजचा उजाड घाट पाहत साधारण साडेनऊ-पावणेदहाच्या सुमारास आम्ही जुन्नरला पोहचलो. दिपक आमची वाट पहातच होता. एसटी आगारात चौकशी केली असता हडसर मार्गे जाणारी "जुन्नर-राजूर" गाडी ११ वाजता होती. तोपर्यंत नाश्ता उरकुन घेऊया असे एकमताने ठरले.

नाश्ता उरकेपर्यंत गाडीची वेळ झाली आणि आम्ही जुन्नर डेपोत परतलो. जुन्नरला पार्किंग लॉट न आढळल्याने दिपकने बाईकवरच एसटीच्या मागे मागे हडसरला येण्याचे आणि हडसर गावातच गाडीत पार्क करायचे ठरवले. एसटीच्या खडखडात रोलर कोस्टरचा आनंद घेत साधारण साडेअकराच्या सुमारास आम्ही हडसर गावात पोहचलो (जुन्नर ते हडसर - १४ रूपये/माणशी). गाडीतच कन्डक्टरला परतीची गाडी किती वाजता आहे असे विचारल्यास त्याने एक दुपारी २ वाजता आणि एक ५ वाजता आहे आणि हिच गाडी परत पाच वाजता येईल असे सांगितले. हडसरगावात एका घराजवळ दिपकने बाईक पार्क केली आणि आम्ही त्या पर्वतगडाच्या कुशीत शिरायला दुपारी १२ च्या सुमारास निघालो. डोक्यावर ऊन होतं त्यामुळे सुधागडच्या वेळेस उन्हाचा त्रास झाला तसाच आता इथेही होणार असं वाटलं पण (कदाचित) माणिकडोहच्या जलाशयामुळे एक गारवा वातावरणात होता. या ट्रेकला निघताना किल्ल्याची माहिती आणि नकाशा याचे प्रिन्टआउट्स घरीच राहिल्याने एका आजोबा आज्जींकडे गडावर जाणार्‍या मार्गाची चौकशी केली. त्यांनी "त्या घळीमध्ये दिसतंय ना तिथुनच वाट आहे गडावर जायची. तिथुनच जा. पुढे गेल्यावर पायर्‍या लागतील" असं सांगितलं. त्याप्रमाणेच हडसरगावातील विहिरीच्या मागच्या बाजुने काही वेळातच आम्ही पठारावर पोहचलो. पठाराहुन आम्हाला दोन डोंगराच्या मधली घळ स्पष्ट दिसत होती आणि आम्ही नेमकं त्याच घळीच्या दिशेने आम्ही वर चढायला सुरूवात केली. पण फोटोत पाहिलेली आणि सेना/डोंगरवेड्याच्या वृतांतात वाचलेली वाट हि नाही हे लक्षात आलं. हातात नकाशा नसल्याने वाटेचा अंदाज येत नव्हता म्हणुन यो रॉक्सला फोन केला, पण त्यानेही हा हडसर केला नसल्याने वाट माहित नाही असे सांगितले. सेनापतीचा देशाबाहेर असल्याने यो ने मायबोलीकर स्वच्छंदी (मनोज)चा फोन नंबर दिला. मनोजला फोन केल्यावर त्याने सांगितले कि तुम्ही चालत असलेल्या वाटेनेच घळीला उजवीकडे ठेवत पुढे जा, पुढे हडसर किल्ल्याच्या बाजुला असलेल्या डोंगराला यु टर्न मारून पुढे चालत रहा, ती वाट थेट कोरलेल्या पायर्‍यांजवळ येऊन मिळते. यावाटेने थोडा वेळ लागेल आणि जर घळीतल्या वाटेने गेलात तर वेळ वाचेल पण तुमच्यापैकी काहीजण नवीन असल्याने शेवटचा छोटासा रॉकपॅच सांभाळुन चढा . मनोजशी फोनवर बोलत असतानाच उरलेले चार मावळे आणि एक मावळी Proud अर्धेअधिक घळ चढुन गेले होते. त्यांना परत खाली बोलावण्याऐवजी शेवटी मग राजमार्गाच्या ऐवजी आम्ही घळीतुन वर बुरुजाच्या पायथ्यापाशी गेलो आणि तेथुन सोप्पेसे कातळारोहण करून गडावर पोहचलो. सोबतचे चारहीजण नवखे असल्याने काळजीपोटी मनोजला फोनवर सतत "जमेल ना त्यांना ह्या मार्गावरून जायला" विचारून हैराण करत होतो आणि तोही न कंटाळता आम्हाला रस्ता सांगत होता.

घळीची वाटः
प्रचि ०१

प्रचि ०२

या चौघांचेही कौतुक कि कुठेही न दमता अगदी सहजपणे पायथ्यापासुन अवघ्या ४५ मिनिटात गडाच्या बुरुजाजवळ पोहचले. बुरुजाजवळ पोहचल्यावर सोप्पेसे कातळारोहण करून गडाच्या मुख्य दरवाज्याजवळ आलो आणि गडाचा माथा गाठला. उन्हाचा तडाका होता पण थंड हवेमुळे तो तितकासा जाणवत नव्हता. थोडावेळ विश्रांती घेतली, सोबत आणलेला खाऊ खाल्ला आणि गड फिरण्यास निघालो.

प्रचि ०३
गडाचा इतिहासः (साभार www.trekshitiz.com)
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून, या काळात गडावर मोठ्या प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटा ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या.

प्रचि ०४
गडावरील पहाण्याची ठिकाणे :
हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं, नळीत खोदलेल्या पायर्‍या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे म्हणजे दुर्गशास्त्रातील एक वेगळेच दुर्गवैशिष्ट्यच आहे.

प्रचि ०५
शोधा कुठे प्रवेशद्वार आहे ते? Happy

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०९

प्रचि १०

गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते, तर दुसरी वाट डावीकडे असणार्‍या दुसर्‍या प्रवेशद्वारापाशी जाते. दुसर्‍या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवट्याच्या दिशेने चालत जाऊन डावीकडे वळल्यावर कड्यालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. यांच्या कातळावर गणेश प्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत. येथून उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव आणि महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाड्यात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानाची मूर्ती स्थानापन्न आहे. मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते.

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके दिसते. येथून थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेली प्रशस्त गुहा लागते. मात्र ही गुहा म्हणजे पहारेकर्‍यांची देवडी आहे. मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर अत्यंत सुरेख दिसतो. तसेच चावंड , नाणेघाट , शिवनेरी , भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर न्याहाळता येतो. येथून परत फिरून प्रवेशद्वारापाशी यावे आणि परतीच्या वाटेला लागावे.

पोहोचण्याच्या वाटा :
या किल्ल्यावर जाण्याचे दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची असून, दुसरी वाट गावकर्‍यांनी त्र्‍यांच्या सोयीसाठी दगडात पायर्‍या कोरून बांधून काढलेली आहे. कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते.
हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात आपण बुरूजापाशी येऊन पोहचतो. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसर्‍या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणार्‍या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पायर्‍या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे. येथून किल्ल्यावर जाण्यास एक तास पुरतो.

प्रचि १४

हडसरच्या प्रवेशद्वाराच्या स्थापत्यशास्त्राबद्दल खुप वाचल होतं तस्सचं अनुभवल. अगदी प्रवेशद्वाराच्या जवळ आल्याशिवाय वाट कुठे आहे ते कळतंच नाही. पण गडावर फिरताना मात्र मन खिन्न झाले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ कुणीतरी गाईगुरं बांधायला जागा करून ठेवली होती आणि तेथे ६-७ फुटांचा ओल्या शेणाचा डोंगर रचुन ठेवला होता. Sad त्यातुन नाक मुठित धरून पुढे आलो तर गडावर जागोजागी शेण पडलेलं होतं, पाण्याच्या सगळ्या टाक्या शेवाळलेल्या होत्या. सोबत असलेल्या परराज्यातील आणि महाराष्ट्राबद्दल प्रेम असलेल्या चौघांनी मला प्रश्न केला कि महाराष्ट्रात इतक सौंदर्य असताना त्याची काळजी का नाही घेत? त्यांच्या मते महाराष्ट्राच एक असे राज्य आहे कि जेथे विविध प्रकारचे पर्यटन करता येते. त्यांच्या या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते. Sad

प्रचि १५

प्रचि १६

आम्ही पुढे निघालो आणि गडाच्या दुसर्‍या बाजुने दिसणारा परीसर न्याहाळत बसलो. या गडाच्या एका बाजुला माणिकडोह जलाशयाचा परीसर आणि दुसर्‍या बाजुस माळशेजजवळचा पिंपळजोगा धरण परीसर त्यामुळे भर उन्हातही थंड हवा येत होती. दुपारी दोन-तीन वाजताही उन्हाचा कसलाही त्रास होत नव्हता.

पिंपळजोगा धरण आणि परीसर
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

संपूर्ण गड फिरून झाल्यावर परत निघालो. हडसरहुन जुन्नरला जाणारी गाडी पाच वाजता असल्याने आरामात, फोटोसेशन करत चाललो. पुन्हा त्या स्थापत्यशास्त्राच्या चमत्काराचा अनुभव घेतला. गडावर येताना मधल्या घळीतुन आलो होतो पण जाताना मात्र राजमार्गाने जायचे ठरले. एका ठिकाणी मात्र दोन मार्ग आहे (प्रचि २८ ) त्यातील सरळ मार्ग हा हडसरवाडीत उतरतो. मी आणि दिपक गडाचे फोटो काढत असल्याने मागे राहिलो आणि हे चार जण त्या सरळ वाटेने जायच्या ऐवजी खाली उतरणार्‍या मार्गाने गेले. मला आणि दिपकला वाटलंच होतं कि सरळ जाणारी वाटच हडसरगावात जाणारी आहे (दिपक पुढे जाऊन पाहुनही आला), पण तोपर्यंत हे चारही जण खाली उतरल्याने आम्हीही तिथुनच उतरलो, हि वाट थोडीशी घसरणीची होती पण काही वेळातच आम्ही खालच्या गावात पोहचलो.

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

(प्रचि सौजन्यः दिपक )

प्रचि २९

प्रचि ३०

गावात चौकशी केली असता कळलं कि आम्ही हडसरच्या दोन गाव पुढे "पेठेची वाडी" गावात आलो (हडसर - राजुर नं.१ - पेठेची वाडी) Proud दिपकची बाईक हडसरला पार्क केली असल्याने तेथे पोहचण्यास किती वेळ लागेल याची चौकशी केली असता "चालत एक तास लागेल" असं गावकर्‍यांनी सांगितलं. Happy नशिबाने जुन्नरला जाणारी एसटी पेठेचीवाडी गावातुनच जात असल्याने आमची एका तासाची पायपीट वाचली. साधारण साडेचार वाजता आम्ही एसटी थांब्याजवळ आलो. गाडी सव्वापाचला आली. सकाळी अकराला जुन्नरहुन पकडलेली तीच गाडी (जी आता देवळे - जुन्नर अशी होती- (पेठेचीवाडी ते जुन्नर - १४ रूपये/माणशी)) आणि तोच कन्डक्टर होता, तोही आश्चर्यात पडला कि आम्ही या गाव कुठुन आलो. Proud वाटेत हडसरला दिपक उतरला आणि बाईक घेऊन पुन्हा एसटीच्या मागे मागे जुन्नरला निघाला.

प्रचि ३१

जुन्नरला पोहचल्यावर आगारात चौकशी केली असता कल्याण-ठाण्याला जायला आता गाडी नाही तुम्ही बनकर फाट्याला जा तिथुन चिक्कार गाड्या मिळतील असं सांगण्यात आलं. बनकर फाट्यामार्गे जाणारी जुन्नर ओतुर गाडीला पाऊण तास होता तेव्हढा वेळ टाईमपास करण्याऐवजी आम्ही काळीपिवळी गाडी करून बनकर फाट्याला पोहचलो (रूपये २०/माणशी) आणि तेथुन संपूर्ण भरलेल्या नगर-भिवंडी एसटीने कल्याणला निघालो (बनकर फाटा ते कल्याण - १०३ रूपये/माणशी).

अशा रीतीने कल्याण ते जुन्नर टु बाय टु सेमी लक्झरी बस
जुन्नर ते हडसर लाल डब्बा खडखडात
पेठेवाडी ते जुन्नर लाल डब्बा डब्बल खडखडात
जुन्नर ते बनकर फाटा ७ जणांची क्षमता असलेल्या काळ्या पिवळ्या गाडी १६ जण
बनकर फाटा ते कल्याण भरलेल्या एसटीत मध्ये पेपर टाकुन बसत प्रवास करत आमचा हडसर ट्रेक संपूर्ण झाला.

तळटीपः
१. हडसर परीसर फिरण्यास स्वत:चे वाहन असल्यास उत्तम. गड काही तासातच व्यवस्थित पाहुन झाला पण गाड्यांची वाट पाहण्यात आमचा चिक्कार वेळ वाया गेला.
२. हडसर गावात खाण्याची काहीच सोय नाही (निदान आम्हाला तरी नाही मिळाले).

मूड्स ऑफ हडसर ट्रेक Happy
प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या... मस्त झालायं वृतांत. )

हडसरच्या बांधीव पायऱ्या खुपच सुंदर आहेत. आणि त्या अश्या बांधल्या आहेत की समोर येईपर्यंत काही दिसत नाहीत. साधारण १००-१५० पायऱ्या चढून गेलो की समोर तटबंदीची भिंत लागते. दरवाजा एकसंध व कोरीव आहे आणि वरच्या बाजूला डावीकड़े लपलेला आहे. तिकडून आत गेल की आतली तटबंदी लागते. एकसंध पाषाणामधून कोरुन काढलेल्या ह्या पायऱ्या म्हणजे दुर्गबांधणीमधला एक उत्तम नमूना आहे.
...............१८८७२ मधून साभार.. Wink

त्याकाळी खोदकाम करण्याआधी नकाशे कसे तयार करत असतील याबद्दल मला जाम कुतुहल आहे. कसे दिसेल यचे त्रिमितीय चित्र वगैरे कढत असतील ना? इतके गड-किल्ले असुनही एकाचा नकाशा किंवा बांधकाम कसे केले याची माहिती उपलब्ध नाही आपल्याकडे... Sad

बर.. १८८७२ मध्ये लिहिल्याप्रमाणे गडावरच्या त्या देवळात मला आलेला अनुभव भारीच विनोदी होता. आणि गडावरून दिसतो तो माणिकडोह उर्फ शहाजी सागर जलाशय ना रे. पिंपळजोगा म्हणजे खिरेश्वरचे धरण ना?

सवयीप्रमाणे माझा झब्बू.. Wink

मस्त माहिती मस्त फोटो ! इकडे पण मुक्काम करायचा होतास ना... प्रखर उन्हातले फोटो काढण्यापेक्षा सुर्यास्त वा सुर्योदयाच्या वेळचे फोटो काढताना जास्त मजा आली असती ना..

नाही यो... पिंपळजोगा हे हायवे २२२ म्हणजे आपला मुरबाड - नगर मार्गाच्या डाव्या हाताला दिसते. हा रस्ता सोडुन आपण उजव्या बाजुला आत शिरलो की माणिकडोह आहे. माणिकडोहच्या मानाने पिंपळजोगा हे धरण खुप मोठे आहे.

वॉव.. छान फोटोज आनी वर्णन..
जिप्स्या किती उन्हातानात भटकता रे तुम्ही लोकं.. हॅट्स ऑफ.. ग्रेट हॉबी!!!

सेन्याचा झब्बूही मस्त!!!

हडसर ट्रेक वृतांत आणि प्रकाशचित्र दोन्ही सुंदर.

हडसर किल्ल्यावरुन माणिकडोह धरण(शहाजी सागर जलाशय) आणि पिंपळगाव जोगा धरण, ही दोन्ही धरण दिसतात.

मस्त फोटो आणि वर्णन. फोटोतील वाळल्या गवताची छटा अगदी यादोंकी बारात मधल्या मेरी सोनी, मेरी तमन्ना गाण्याची आठवण करून देते. तुम्ही सर्व पण फार गोड दिसत आहात. उड्या वगैरे तर मस्तच. Happy

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

गडावरून दिसतो तो माणिकडोह उर्फ शहाजी सागर जलाशय ना रे. पिंपळजोगा म्हणजे खिरेश्वरचे धरण ना?>>>>होय Happy

छान Happy

सही...एक नंबर फोटो! त्यातल्या त्यात सुस्थितीतला दिसतोय हा गड.
१८ नंबरचा प्रचि अगदी स्वप्नातलं गाव. चिमुकली कौलारु घरं, मंदिर, नदी आणि तिच्यावरचा पुल. मस्त!

हा किल्ला आमच्यासारख्या नवख्यांना आवाक्यातला वाटतोय. कठीण प्रस्तरारोहण नाही, की शिड्या पण नाहीत. Proud

गाडीत इतर तिघांशी ओळख झाल्यावर कळले कि हे सगळेच अमराठी असुन मुंबईत केपजेमिनीत जॉबला आहेत. त्यांना महाराष्ट्रातील आपल्या किल्ल्याचे खुप कौतुक होते. >>>>> वा वा - अमराठी मंडळींनाही सह्याद्रीची/ महाराजांच्या किल्ल्याची ओढ वाटते आहे हे वाचून खूप आनंद झाला.

बाकी सारे वर्णन व फोटो नेहेमीप्रमाणेच भारीएत........

मस्त रे...
महाराष्ट्रात इतक सौंदर्य असताना त्याची काळजी का नाही घेत?>>>
हे अगदी खरे. इतर राज्ये पर्यटनाबद्दल अतिशय जागरुक असतात. तिथल्या स्थळांची ते पुरेपुर काळजी घेतात. स्वच्छता तर वाखाणण्याजोगी असते.

सुंदर फोटो आणि माहितीही Happy
हा किल्ला आमच्यासारख्या नवख्यांना आवाक्यातला वाटतोय. कठीण प्रस्तरारोहण नाही, की शिड्या पण नाहीत. फिदीफिदी>>>>>>>>>>>.चल. कधी जायच? Wink (अग, आत्ता अगदी मनात हेच आल, की आपल्याला कधी असं फिरायला मिळणार? Uhoh )

महाराष्ट्रात इतक सौंदर्य असताना त्याची काळजी का नाही घेत?>>>>>>>>>>>>खरं आहे. वेळ आहे कुणाला, गड-किल्ल्यांची काळजी घ्यायला?

जीप्स्या... मस्तच रे.... फोटो तर क्लासच!!! छोटा आणि मस्त ट्रेक झाला....

शोधा कुठे प्रवेशद्वार आहे ते?>>>> खरोखर अप्रतिम बांधकाम... प्रवेशद्वार कुठुन आहे ते कळुनच नाहि येत...

अरे मस्तच फोटो रे...
पण तुम्ही खुंटीच्या मार्गानी नाही गेलात का...तो एक कडक रूट आहे....

हे काही फोटो पहा...आम्ही या जानेवारीत केला होता...जाताना खुंटीच्या मार्गाने गेलो आणि येताना नेहमीच्या वाटेने

जिप्सी.. मस्तच फोटो आणी वर्णन...पावसाळ्यात ह्याचे रुप तर अफलातून असते...त्या दिवशी मि तुला फोनवर शंकराच्या मंदिरासमोरच्या बुरुजावरून एक वाट खाली उतरते सांगत होतो, त्यावाटेचाच (खुंटीच्या) उल्लेख आशुचँप ने केलाय.. जबरदस्तच आहे.. ह्या वाटेने उतरायचे म्हणजे कस लागतो.. पण ह्याच वाटेने आपण एकदम शॉर्टकटने सितेवाडी मार्गे कल्याण-नगर रोडवर मढ गावात येतो Happy

Pages