सहजीवन

Submitted by abhishruti on 5 December, 2012 - 01:28

तुमच्या कधी असं लक्षात आलयं का एक असं चित्र, जिथे आपण एकाच माणसाला काम करताना पहातोय आणि बाकीचे सारे आरामात बसलेत. अगदी लहानपणापासून, म्हणजे मला कळायला लागले तेंव्हापासून, मला हे दृश्य अजिबात आवडत नाही. मग ते घ्ररात असो वा बाहेर! लहानपणी वाटलं नव्हतं की हे आपल्याला वारंवार पहायला लागेल. कारण आमच्या घरी अगदी घर साफ करण्यापासून ते दिवाळी, लग्न समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमापर्यंत सगळ्या कामात घरातील सर्व सभासदांचा थोडा सहभाग असायचा. मग आजोबा असोत, मोठ्ठे काका असोत की छोटा पाच वर्षाचा बंड्या असो प्रत्येकाला जमेल ते काम तो तो माणूस करत असे, तशी कामाची विभागणीही केली जात असे.
लहानपणीची सर्वात खास आठवण म्हणजे उन्हा़ळयाच्या सुट्टीतली! उन्हाळ्यातली वाळवणं (आत्ता हा शब्द कदाचित बर्‍याच जणांना माहितही नसेल), लोणची, आमरस म्हणजे आम्हा लहान मुलांना पर्वणी असायची. घरातलेच नाही तर शेजारीपाजारी देखील या कामात सहभागी होतं.. पापड, पापड्या, सांडगे असे नाना पदार्थे सग़ळे मिळून मोठ्या मेहनतीने व एकजुटीने करत. हे सर्व वाळवून निगुतीने ठेवायचं आणि वर्षभर आस्वाद घ्यायचा. या कामाची स्त्री-पुरुष, लहान-मोठे सर्व मजा घेत. आमच्यासारख्या लहान मुलांना साचे धुवून देणे, तेल लावाणे, प्लास्टिकचा कागद पसरविणे आणि राखण करणे अशी लहानसहान कामं दिली जायची. मग अशा वेळी अंगणात किंवा गच्चीत आमचा बराचसा वेळ जायचा. ओले पापड (बटाट्याचे असतील तर आहा!), पापड्या खायला खूप मजा यायची. आज्जीच्या लक्षात यायचं की राखण करताकरता आम्हीच काही पापड पापड्या गट्टम केल्या आहेत पण ती रागवायची नाही.जाता जाता म्हणायची "आज नजर चुकवून कावळे आलेले दिसतायत". सुट्टीत सगळे जमलेले असल्याने भरपूर प्रमाणात आमरस केला जायचा. तेंव्हा मामा, दादा सगळे पैलवान लोक आंबे पिळायला बसायचे. दिवाळीत तर चकल्याचा सोर्‍या जुना असल्याने शक्ती वापरून चकल्या कराव्या लागत. हे काम बहुतेक वेळा आजोबा किंवा मोठे काका करत. माझे आजोबा अत्यंत सॉफिस्टिकेटेड होते त्यांना दिवाळीत फटाके वाजवणं म्हणजे रानटीपणाचं लक्षण वाटे पण आज्जी आमच्यासाठी खूप फटाके आणत असे व पहिल्या दिवशी पहाटे चार वाजता पहिला फटाका तीच लावत असे.
आमच्या घरी काही कामं न चुकता पुरुष मंडळींकडे असत. माझ्या आजोळी सकाळचा पहिला चहा-कॉफी माझे आजोबाच करत अगदी पाहुणेमंडळी असली तरीही! दूध आणायला सेंटरवर आज्जी जायची. बागेतली सगळी मातीतली कामे आज्जी करत असे पण झाडाना पाणी घालायच काम आजोबांकडे! नारळ सोलून फोडायचं काम आजोबांच! अंथरुण नीटनेटकी आजोबा घालत, तोपर्यंत आज्जी स्वैपाकघर आवरत असे माझ्या आजी-आजोबांएव्हढ पूरक जोडप आत्ता शोधून सापडणार नाही. त्याकाळातही एकमेकांना समजून घेउन साथ देणार एक आदर्श जोडपं! आज्जी सत्तरी नंतर थोडी विसरभोळी झाली होती, पॅरालिटिकही झाली होती. एकदा रव्याच्या लाडवांमध्ये साखरेऐवजी तिने मीठ घातलं. असं काहीतरी झालं की तिला फारच वाईट वाटायचं पण त्यावेळी कोणाच्या लक्षात यायच्या आत आजोबांनी त्याच डब्यात विकतचे लाडू आणून भरले. हे खर्‍या अर्थाने होतं सहजीवन किंवा संसार!
हे सगळं सांगायच कारण असं की हल्ली का नाही पहायला मिळत असे संसार? साथ, समजूत, सहवास, सहजीवन हे शब्द असे पोकळ का वाटू लागलेत? एकतर हल्ली कुटुंब लहान (सुख महान आहे की नाही कोण जाणे!) त्यात प्रत्येकजण आपापल्या व्यापात बुडलेला. "आला दिवस ढकल" या पद्धतीने जगणारे लोक जास्त! जे नवरा बायको एकमेकांना मदत करतात ते दुसरा पर्याय नाही म्हणुन तरी, नाहीतर उगाच कटकट नको म्हणुनतरी! घरात इकडची काडी तिकडे न करणारे महाभागही आहेतच! माझ्या मैत्रिणीकडे गेलं की बरेच वेळा मला अशी दृश्य पहायला मिळतात. एकतर ती हौसवाईफ, म्हणजे हौसेने पत्करलेलं गृहिणीपद! न कमावणारी.. त्यामुळे always at the receiving end! नवरा आणि त्यासोबर घरातले लहानमोठे ऑर्डर्स सोडण्यात पटाईत. समोर ठेवलेल्या तांब्यातलं पाणीसुद्धा ओतून घेणार नाहीत. ही एकीकडे भाजी फोडणीला टाकतेय, दुसरीकडे चहा उकळून आत्महत्या करायच्या बेतात आहे, बाथरूममधून नवरा "टॉवेल" म्हणुन ओरडतोय, मुलगी डबा अजुन झाला नाही, पाण्याची बाटली सापडत नाही म्हणुन किंचाळतेय, सासूला बेडपॅन हवयं... एकीकडे फोन ठणाणतोय, दुसरीकडे दारावरची बेल वाजतेय. पण ही सोडून घरातील सर्वजण अविचल! कशी वागू शकतात माणसं अशी? मला अगदी न उलगडलेलं कोडं आहे. मुलं तरी आईला समजून घेतील तर ती बापाच्या एक पाऊल पुढेच! का एकाच माणसाने मरमर मरुन कामं करायची, सर्वांची मर्जी सांभाळायची, वेळा पाळायच्या .. ते ही कसलीही अपेक्षा न ठेवता? मला खात्री आहे बर्‍याच बायका थोड्याफार प्रमाणात हेच सोसत असतात.
त्यात आता हौसवाईफ असली तरी स्त्री सुशिक्षित असते त्यामुळे बिलं भरणे, बँकाचे व्यवहार करणे, मुलांचे अभ्यास घेणे... झालच तर पालक-शिक्षक सभांना हजेरी लावणे, मुलांना विविध क्लासेसना घेऊन जाणे, वेगवेगळ्या स्पर्धांसाठी तयार करणे हे सगळ तर ती करुच शकते, नाही का? परत घरकामाला जर दोन बाया लावल्या तरी त्या त्यांच्या मर्जीनुसार काम करणार, दांड्या मारणार म्हणजे झाडू परत हिच्याच हातात! वर ऑफिसमधुन आल्यावर जरा एखादी वस्तू इकडची तिकडे दिसली की नवरोजी म्हणायला रिकामे " तू दिवसभर करतेस तरी काय?" नोकरी करणार्‍या बाय़कांनाही हे थोड्याफार फरकाने लागू आहेच.
असं कधी मी लहानपणी पाहिल नव्हत अगदी आजोळीही... यामुळे असेल पण मला या गोष्टी फार डिस्टर्ब करतात. एकतर माझ्या आज्जीकडे "अमुक काम मला येत नाही" म्हणायची सोयच नव्हती, असं म्हटल रे म्हंटल की ती ताबडतोब ते काम शिकवायला बसायची. त्यात आमच्याकडे अमुक एक काम पुरुषाचं आणि तमुक बाईचं असा फरक नसे. आम्हाला पाढे-परवचा, रामरक्षा, गीता पासून ते पत्त्ते, कॅरम, बॅडमिंटन पर्यंतचे सर्वकाही आज्जीने शिकविले.माझ्या आजोबांना पेटी वाजवायला व चित्रं काढायला खूप आवडायची. अनेक नाटकही त्यांनी बसवली होती. त्यांना साहित्याची आवडही होती आणि जाणही होती. तर आज्जीला भजनापासून, मैदानी खेळांपासून ते स्वैपाकापर्यंत सगळ्याचीच आवड होती. माझी आज्जी सर्व विषयांवर पुरुषांशी मोकळेपणी चर्चा करु शकत असे मग ते दिर असोत किंवा नणंदेचा नवरा असो. त्यामुळे स्त्री-पुरुष भेदभाव मी कधी पाहिला नाही आणि केलाही नाही. निसर्गाने केलेला भेद कधी नाकारलाही नाही.
अगदी हेच चित्र मला अमेरिकेत असताना दिसलं. भारतीय संस्कृतीत स्वावलंबनाला खूप महत्त्व होतं. महात्मा गांधीपासून ते हल्लीच्या गावगांधींपर्यंत सर्व जण आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करतात. पण त्याचा खर्‍या अर्थाने अवलंब सध्या पाश्चिमात्य देशातच होताना दिसतो. मोठ्या कंपनीचा डायरेक्टर असो, शास्त्रज्ञ असो. लहान असो वा मोठा सर्वजण आपले काम आपण स्वतः करण्याचा प्रयत्न करतात. अगदी घरातली कामे देखील! मी ज्या कंपनीत काम करत होते तिथल्या मॅनॅजिंग डायरेक्टरची बायको नर्सरी स्कूलमध्ये असिस्टंट टीचर होती (आपल्या दृष्टीने साधी शाळा मास्तरीण तीपण पाच वर्षाखालील मुलांना शिकविणारी) पण तो तिच्याविषयी अत्यंत आदराने बोलत असे. घरात तिला लागेल ती मदत करत असे... अगदी साफसफाई पासून स्वैपाकापर्यंत, मुलांना न्हाऊ-माखू घालण्यापासून त्यांच्या हॉबी-क्लासेस ना सोडण्यापर्यंत! अर्थात ऑफिसमधे त्याला कधी कधी २४ तास थांबावे लागे, टूरवर जावे लागे, (त्याची पोस्टच तशी होती) त्यावेळी त्याची बायको ही सर्व कामे आनंदाने करत असे.
गंमत म्हणजे अमेरिकावारी करुन आलेले पुरुष थोड्याफार प्रमाणात हे शिकतात, निदान तसं तिथे दाखवतात तरी! पण भारतात पाय पडताक्षणी त्यांची विस्मरणशक्ती जागृत होते. कदाचित इथे असं काम केलं तर बघणारे आपल्याला "बायल्या" म्हणतील अशी त्यांना भीती वाटत असेल, कदाचित पुरुष म्हणुन घरात आपला मान राहणार नाही असे वाटत असेल किंवा मूळ स्वभाव दाखवण्याची आयती संधी चालून आली आहे असे वाटत असेल. याला अपवादही आहेत पण अक्षरशः शंभरात दोन-तीन! बाकी सगळे ऑर्डर्स सोडण्यात आणि तक्रारी करण्यात धन्यता मानतात. काही स्त्रियांनाही आपल्या घरातली पुरुषांनी कामं करणं आणि ती देखील इतरांसमोर म्हणजे अप्रतिष्ठेच वाटतं. अश्या भारतीय स्त्रिया मला अमेरिकेतही भेटल्या. आत्तातरी आपण जागरुक व्हायला हवं, या भ्रामक कल्पना, जुनाट विचार सोडून द्यायला हवेत.
कधीकधी मला काम करताना उजवा हात दुखू लागला किंवा उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे डावा हात वापरायची वेळ आली तर तो हात नॉर्मल असुनही वापरता येत नाही आणि मग माझी चीडचीड होते. लहानपणापासून डावा हातही उजव्या हाताएव्ह्ढाच सक्षम असतो, सशक्त असतो. दोन्ही हात वापरले पाहिजेत ही संकल्पनाच मनात न रुजवल्याने तो असुनही नसल्यासारखा असतो. असं आपल्या संसारात होउ देऊ नका. आपलं सहजीवन खर्‍या अर्थाने सह-जीवन होईल याची सुरुवातीपासून काळजी घ्यायला हवी. नवविवाहितांनी ही शिकवण लवकरात लवकर अमलात आणयला हवी. आमच्यासारख्या चाळीशी ओलांडलेल्या बायका-पुरुषांनी better late than never म्हणुन आजपासून सुरु करायला काय हरकत आहे? लग्न होउ घातलेल्या मुलामुलींनी या विषयावर आधीच चर्चा करुन आपली मते, अपेक्षा जोडीदाराच्या कानावर घातल्या पाहिजेत. ज्येष्ठांनीही यात डावं-उजवं करु नये. यात सहकार्य दोन्ही कडूनही अपेक्षित आहे.
काही बायकांना असेही वाटते की आपल्याशिवाय घर एक मिनिटही चालू शकणार नाही, believe me यात धन्यता मानण्यासारखे काहीच नाही. कोणा एका व्यक्तीला चढवून त्याव्यक्तीकडून सगळे काम करुन घेणारेही आहेत आणि त्यातच स्वतःचा मान आहे असे समजणारे बळीचे बकरेही वरेच आहेत. महाभारतात गांधारीच्या भुमिकेचं उदात्तीकरण इतरांनीच आधी केलं आणि जरुरतीपेक्षा जास्तच केलं. तिने रागाने अथवा अहंकाराने घेतलेला निर्णय कसा योग्यच आहे असं तिचे तिलाच नंतर वाटू लागलं. घरातल्या कुठल्याही सदस्याने गांधारीची भुमिका घेउन त्याग, समर्पण इत्यादी भ्रामक कल्पनेत अडकून पडणे कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नाही. सह या शब्दातच कुठेतरी समानता आणि सहकार्य हे अर्थ दडलेले आहेत. Perfect किंवा परिपूर्ण कोणीच नसतं पण आपण एकमेकांना पूरक नक्कीच होऊ शकतो, कुठलंही नातं असो ते जर समानता आणि सहकार्य या दोन गोष्टींवर आधारीत असेल तर ते यशस्वी होण्याची, परिपक्व होण्याची शक्यता जास्त! प्रत्येकासाठीच जीवनाचा प्रवास खडतर असतो पण कुठलाही प्रश्न सोडवताना, आव्हानं पेलताना, सुख-दु:ख झेलण्यासाठी आपण कोणाची तरी साथ देऊ शकतो, आपली कोणीतरी साथ देऊ शकतो हा आत्मविश्वास त्या नात्यात हवाच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख मला दिवाळी पूर्वीच पोस्ट करायचा होता पण इतर दिवाळी अंकांच्या लेखनामुळे व मायबोलीच्या दिवाळीअंकात हा कुठल्या भागात बसू शकेल हे न समजल्यामुळे आत्ता इथे पोस्ट करत आहे. BTW कोकंणातले दिवाळी अंक कोणी वाचत असेल तर 'किरात' या वेंगुर्ल्याच्या दिवाळी अंकात व 'अक्षरदीप' या सावंतवाडीच्या दिवाळी अंकात माझे लेख आले आहेत. कोणी वाचल्यास जरुर प्रतिक्रिया द्या. आणि हो या लेखावरही तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील.
आभार!
-- श्रुती

लेख वाचायला वेळ लागेल.. नंतर निवांत प्रतिसाद देते Happy

सहजीवन नवीन abhishruti 1
1 नवीन गुलमोहर - इतर कला

असे दिसतेय.. खरच सहजीवन ही एक कला आहेच. Wink Light 1

सहजीवन एक कला आहेच.
Happy

लेख आवडला, पटला.

स्त्रिया शिकल्या आणि घरकामाबरोबरच बाकीच्या कामांची जबाबदारीही त्यांनी घेतलि पुरुषांच्या मानसिकतेत फार बदल झाला नाही.

इथे आंतरजालावरचीच उदाहरणे घ्या. स्वयंपाक किंवा इतर घरकामाशी रिलेटेड गोष्टींच्या चर्चेत किती लग्न झालेले किंवा पत्नीसह रहाणारे पुरुष भाग घेतात? पुरुष शिकायला नोकरीला घरापासून दूर ऑनसाईट वैगेरे रहात असतील तरच स्वयंपाक घरव्यवस्थापन अशा काही गोष्टी असतात हे त्याना सुचते. सतत कुणी घरकामस्वय्पाक इ. गोष्टीत रस घेत असेल तर त्याला लग्न करा असे सल्ले मिळतात किंवा मग सरळ बायकी म्हणून अवहेलना. भले समोरासमोर कुणी म्हणत नसेल पण खरडवह्यांतून करतातच.

अमेरिकेत पाय टेकवून आलेल्या पुरुषांच्या बाबतीतले निरीक्षणहि योग्यच.
मला माझ्या मुलीनंतर यथार्थ अनुभव आला. एकदा असंच माबोवर टाईमपास करत अस्ताना एका अमेरिका रिटर्न्ड बाब्याने 'तुला डायपर ड्युटी नाही का ' असे विचारले. गंमत म्हणजे या बाब्याला पण तेव्हाच बाळ झाले होते पण तो मात्र आरामात चकाट्या पिटत बसला होता.
Happy

परदेशात असताना ट्रेन स्टेशनवर नोंदवलेलं एक निरिक्षण - देसी नवरे हापिसातून यायच्या वेळेला त्यांच्या बायका स्टेशनपर्यंत गाडी चालवत यायच्या. पण नवरोबा आले रे आले की घरी जाताना ते ड्रायव्हिंग करायचे आणि सौ. शेजारी 'मम' म्हणायला बसल्यासारख्या Happy

तुमच्या आजी-आजोबांचे उदाहरण अगदी आदर्शच आहे यात वाद नाही.
पण त्या काळी काय किंवा आजच्या काळी काय असे एखादेच जोडपे दिसते...
यात पूर्वी आणि आजकाल असे काहीच नाही..

तुमच्या आजी आजोबांच्या काळातले कितीजण त्यांच्या बायकोला अशी वागणूक द्यायचे?

अभिश्रुती, लेख चांगला जमलाय. निरिक्षणं अचुक आणि उतरवलीयेतही चांगली.
पण हे "तेव्हा अन आता"... इतकं स्वच्छं नाही राहिलेलं.
बदलता काळ, टेक्नॉलॉजी, माणसांचं बाहेरच्या जगाशी वाढत चललेला संपर्कं हेच परिणाम करणारे घटक नाहीत...
माझ्या आज्जी-आजोबांच्या काळात खरतर घरकामं स्त्रीयांची अन बाहेरची अन घरातलीही काही अंगमेहनतीची पुरुषांची अशी विभागणी होती. पण त्याच्वेळी अनेक घरांतून बायका शेतीची कामं, बागायती (नारळ उतरवणे, सोलणे सारखी श्रमाचीही) करत असतच. सगळ्याच घरातून पुरुषांना सगळा स्वयंपक येत होता असं नाही. काही घरातून पुरुष वरण-भात टाकणे, चहा करणे, भाजी निवडून देणे... असं करत असंतही. पण हे समजुतदार घरातूनच. पगार दारूत, बाहेरख्यालावर उडवून बायकोला बडवणारेही होतेच की तेव्हाही.

हीच सरमिसळ आजही दिसतेच. "समजुतदार" घरांमधून पुरुष घरकामं आनंदानं करतात आणि बायका बाहेरगावचीही नोकरी करतायत.

अहंगंड आणि न्यूनगंड बाजूला ठेवून आवश्यकतेनुसार बदलायची तयारी असलेल्या घरांमधून सुखी आहेत संसार... तेव्हाही अन आताही.

पण तुझं निरिक्षण - स्वावलंबनाचं अवलंबन परदेशात अधिक होतं... हे खरय. माझ्या मते अधिकाधिक माणसं "शिकून/जग बघून समजुतदार" होतील तेव्हा हेच चित्रं भारतातही दिसू लागेल.

लेख आवडला.

साती.. स्पष्ट सांगायचं तर त्या दिवशी बर्‍याच बाफंवरच्या तुझ्या आगाऊ आणि मुर्ख पोस्टी वाचून वैताग आल्यावर "पुरे झालं.. या आता.." हे सुचवण्यासाठी ती पोस्ट होती.. डा.ड्यू. निमित्ताने तरी तू थांबली असतीस म्हणून.. (हे त्या बाफवर नंतर सांगितलं होतं.. तू वाचलं नाहीत बहूतेक).. पुढच्या वेळी आडवळणाने न सांगता स्प्ष्ट सांगेन.. Wink

बाकी तू डा.ड्यू केली आणि मी चकाट्या पिटल्या तर त्याचा सहजीवनाशी काय संबंध हे काही कळलं नाही.. पण ते असो.. Proud

धन्यवाद दोस्त हो!
जी-एस बर्‍याच दिवसानी भेटलास इथे! नुसता न्युनगंड नाही रे अहंगंड असतो. आणि नवरा असा वागणारा असला तर कधीकधी मुलही काहीही मदत करत नाहीत. हे फक्त पुरुषांच्या बाबतीत नाही मी अशा कामचोर बायकाही बघितलेल्या आहेत ज्या काहीही कारण सांगून कामं टाळतात फक्त त्यांच प्रमाण कमी आहे किंवा तेव्हढ obviously हे दृश्य दिसत नाही.
दाद, थॅक्स! तुझही बरोबर आहे 'तेंव्हा आणि आत्ता... इतक स्वछ राहिलेलं नाही' आणि फरक पाहिलास तर फारच धीम्या किंवा भारतात अदृश्यपणे होताना दिसतो. मी माझ्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांच्या निरिक्षणावरुन लिहिल्यामुळे दारु पिऊन मारहाण करणार्‍यांविषयी इथे लिहायचं राहून गेलं पण त्यांना हे कितपत समजेल हा एक मोठ्ठा प्रश्नच आहे. गंमत म्हणजे मला हे का लिहावसं वाटलं त्याच कारण माझ्या कडे कामाला ज्या बाई येतात, पोळ्या करायला त्या अगदी जुन्या आहेत आणि कधी वीकेन्डला त्या यायच्या वेळी माझा नवरा स्वैपाकघरात काम करत असला तर त्यांच्या चेहर्‍यावर लगेच नाराजी दिसते. most of the time काय होतं की मी सर्वाना डोसे, इडली खायला घालून शेवटी स्वतः खायला बसते आणि शेवटचा घाणा हा मला काढून देतो (मला गरमगरम खायला आवडते म्हणुन, आणि हा इडली डोसे माझ्यापेक्षा चांगले करतो म्हंटल तरी चालेल) एकदा मी असचं गडबड करुन ह्याला सांगितलं की त्या यायच्या आत तू तिथून बाहेर ये आणि मग मी का ते सांगितल तेंव्हा माझी मुलगी भडकलीच! मला म्हणली मी त्यांना समजावून सांगते. पण त्यांना काही ते पटेना कारण त्यांची सून नवव्या महिन्यात देखील नवरा दारू पिऊन उशीरा घरी आल्यावर त्याला जेवण वाढ, त्याची सेवा कर असे करत होती. यांना समानता किंवा सहजीवन कसं कळणार? माझी तक्रार आहे ती सुशिक्षित लोकांविषयी! असो.
तुमच्या प्रतिक्रिय नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असतात. Thanks once again!
-- श्रुती