हल्लो, मैक टेस्टिन्ग..

Submitted by मुंगेरीलाल on 3 December, 2012 - 12:54

‘तर यायचं बरं का सगळ्यांनी, सुरवातीला सांस्कृतिक कार्यक्रमही ठेवला आहे आपल्याच लोकांचा, तो मात्र मुळीच चुकवू नका’, असं पुन्हा बजावत परिचित निरोप घेतात आणि मी हो-हो करत त्यांना दारापर्यंत पोहोचवतो.

आजकाल कुठलाही छोटेखानी समारंभ असला की मला तिथले प्रेक्षक, माईक-सिस्टीम आणि त्यावरून बोलणाऱ्या मंडळींचं जे एक खास समीकरण असतं ते सहन करत बऱ्याचदा कार्यक्रमभर बसून राहावं लागतं कारण मी कुणाला तरी सोबत म्हणून आलेलो असतो आणि तो मला घरी परत सोडणार असतो.

प्रसंग घरगुती असो की सार्वजनिक, आणि मनोरंजनाचा असो की कार्यालयीन, एक प्रोफेशनल मंडळी सोडली तर इतरांची माईकशी चाललेली झटापट पाहून समोर बसून मलाच टेन्शन येतं. उदा. एखादा निरोप समारंभ किंवा पुरस्कार वितरण सोहळा असतो आणि त्यात काही मिनिटांसाठी वर आलेल्या व्यक्तीला दोन शब्द बोलण्याची विनंती केली जाते. मग त्याचा स्वीकार करून ती माईक हातात घेते आणि बोलायला चालू करते. काही लोक जिंकलेली ट्रॉफी धरावी तसा माईक पोट आणि छातीच्या मध्ये धरतात आणि ते काय बोलत आहे ते जाम ऐकू येत नाही.

याउलट काहीजण जणू कोन मध्ये दिलेलं बटरस्कॉच आइस्क्रीम चोखावं अशा अविर्भावात इतकं जवळून बोलतात की त्यांचे शब्द नुसतेच भुज-भुज, भूम-भूम असे काहीतरी कानावर पडतात. अगदी नंतर बोलणाऱ्याला आपण रुमालावर sanitizer टाकून माईक पुसून घ्यावा असं वाटावं. काही मंडळी तर इतकी उत्साहित आणि उल्हसित झालेली असतात की आपण बोलण्यासाठी माईक हातात घेतला आहे हे विसरून जाऊन शिकाऱ्यानी जंगलात अंधारात बॅटरी मारावी तसा तो नुसताच इकडे तिकडे हलवत असतात. मग आजूबाजूचे तिला वर-वर अशा खाणा-खुणा करतात, ज्या तिला अजिबात कळत नाहीत. शेवटी कुणीतरी पुढे होऊन तिचा माईकवाला हात धरून वर करतो तोच ‘एवढे बोलून मी आप माझे दोन शब्द संपवते’ हे शेवटचं वाक्य बोलून ती व्यक्ती काढता पाय घेते.

तर परवा असं एका घरगुती कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग आला. छोटासा हॉल, त्यात माईक-सिस्टीम, स्पीकर वगैरे जामानिमा. हेतू हा की घरच्याच काही होतकरू कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव देता यावा आणि उपस्थितांचीही जरा करमणूक. कल्पना छान होती. त्यात काही जण तयारीचे तर काही यानिमित्ताने पहिल्यांदाच स्टेज वर चढलेले. पण मंडळी तशी उत्साही होती. सुरवात एका नृत्यानी झाली. सीडीवर गाणं वाजत होतं. आयटम चांगला झाला. नंतर निवेदक आणि निवेदिका यांची खट्याळ जुगलबंदी सुरु झाली आणि अचानक स्पीकर मधून काळीज चिरून टाकणाऱ्या किंकाळ्या ऐकू आल्या आणि प्रेक्षकांच्या अंगावर काटे आले.

असं अधून-मधून होत असतं त्यामुळे त्याचं कोणी विशेष वाटून घेतलं नाही. एक कटाक्ष माईक-सिस्टीम पाशी उभ्या असणाऱ्या पोऱ्याकडे टाकून तो कर्कश्य आवाज कमी झाला की लोक पुन्हा कार्यक्रमात गुंतले. पण आता निवेदक मंडळी नुसत्याच ओठांच्या हालचाली करत होती, आवाजाचा पत्ताच नाही. मग पुन्हा माईकरावांकडे कटाक्ष, त्याची निवेदकांकडे आता बोला अशी मानेनेच खूण, मग त्यांचं थबकलेले चेहेरे हसरे करत बोललेली वाक्य पुन्हा बोलणं, तोच पुन्हा स्पीकर-किंकाळी, मग त्यांचं हातातल्या माईक चे खटके खाली वर करून पाहणं, मग माईकरावांनी दुसरे चांगले माईक (हे आधीच का देत नाहीत हे कोडं असतं) हातात देणं असे प्रकार होईतो प्रेक्षकांचा पेशन्स आणि इंटरेस्ट दोन्ही संपतात.

त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या आपापसात आधी कुजबुज आणि मग मस्त गप्पा चालू होतात. सगळेच बोलत असतात त्यामुळे मग बाजूच्याचं नीट ऐकू येत नाही अन त्यामुळे सगळेच आवाजाची पट्टी चढवतात आणि रिकाम्या रांजणात शंभर गांधीलमाशा गोल-गोल फिराव्यात तसा आवाज येत गोंगाट इतका चढत जातो की बिचारे नवीन माईक मिळालेले निवेदक काय बोलतायेत ते त्यांना आपसात सुद्धा समजत नाही. असं वाटतं की आता हिंदी सिनेमातल्या कोर्टसीन सारखं कुणीतरी लाकडी हातोडा आपटत ‘ऑर्डर.. ऑर्डर’ ओरडावं.

तेव्हढ्यात काही समाजसेवा अंगी मुरलेली आणि स्वतःला थोर तंत्रज्ञ समजणारी माणसं बायकोनं मघापासून हातात चिकटवलेलं पोरगं हीच संधी साधून तिच्याकडे ‘दोन मिंट’ म्हणत परत देत माईक-सिस्टीमवाल्या पोऱ्याच्या अवती-भवती गोळा होऊन उगीचच हे बटण फिरव, ती पिन काढून पुन्हा घाल, त्याला ‘मोनो कर के देख, लाईन-आउट किधर है’ अशा चौकशा आणि सल्ले देणं वगैरे उद्योग चालू करतात. मग कुणीतरी पोक्त गृहस्थ (बहुदा यजमान) स्टेजवर चढून एक माईक हातात घेऊन शक्यतो गोड भाषेत ‘मित्रहो, आपण मुलांचा कार्यक्रम शांततेने पाहूया’ वगैरे नम्र आर्जवं करू पाहतो. पण तो नेमका मघाचा किंकाळीवाला माईक घेऊन वर चढलेला असतो त्यामुळे पुन्हा च्युई.. चिर्र.. शुई असे कर्ण-कटू आवाज चालू होतात.

मी शक्यतो समोरच्या रांगेतली पण कडेची अशी खुर्ची पटकावलेली असते की जिथून स्टेजवरचे चेहेरे पण नीट दिसतील आणि कंटाळा आला तर झटकन उठून पळही काढता येईल. पण माझं नशीब असं की मला नेमकी अशी खुर्ची मिळते की जिच्या बाजूलाच स्पीकरचा ठोकळा मांडलेलं स्टूल असतं. तर नम्र विनंती मुळे नाही पण ती करताना आलेल्या कर्कश आवाजामुळे उपस्थित क्षणभर स्तब्ध होतात आणि अल्पावधीतच गांधीलमाशा परत घोंगावायला लागतात.

मग आपला आवाज आणि त्याच्या दमदारपणाचा अभिमान असलेला निवेदक माईक बाजूला ठेवून दोन पावले स्टेजच्या कडेपर्यंत येतो आणि माईकविना माझं काही अडत नाही असा आविर्भाव आणत (जुन्या नटांच्या थाटात) उच्चरवात ‘येतोय न मागे माझा आवाज?’ असं विचारत आपलं घोडं दामटून न्यायला पाहतो. पण एव्हाना त्याचा आवाज ऐकू आला किंवा नाही याची मंडळीना कसलीच फिकीर नसते. पोरं हातातून सुटून अवती-भवती पकडा-पकडी खेळत पळायला लागलेली असतात. आई-बाप जागा न सोडता लांबूनच त्यांना डोळे वटारून कंट्रोल करायचा निष्फळ प्रयत्न करत असतात. बरं आजकाल पोरांची नावं ही अशी ठेवलेली असतात की खच्चून धाक वाटेल अशी हाक मारायला त्यांचा काहीही उपयोग नसतो. उदा. ‘ओम’ ला चारचौघात ‘ए ओम्या’ पण म्हणता येत नाही आणि घशातून जोर लावलाच तर ओंब, ओंब असं व्हायला लागतं.

एरवी आजोबा किंवा आजीच्या ऐकण्यात असलेलं हे पोरगं अशा ठिकाणी इतकं चेकाळतं की त्याची हॉर्सपॉवर त्यांना अजिबात झेपत नाही. पळापळीचा शेवट ठरलेलाच. माईकच्या वायरला अडखळून खाल्लेली आपटी, नंतरची रडारड आणि आई-बापाचं एकमेकांकडे ‘कुठे पाहत होतास/होतीस तू’ छाप कटाक्ष टाकणं. हे होईतो एव्हाना लोकांचं स्टेजवरून पार लक्ष उडालेलं असतं. होतकरू कलाकारांचा पार पोपट झालेला असतो आणि ते पाहून मला स्वतः बरोबर त्यांची पण दया यायला लागते. पण क्षणभरच. कारण केटररची पोरं चहा, बटाटेवड्याचे ट्रे घेऊन आलेली असतात आणि त्यांना ताटकळत ठेवणं मला फार क्रूरपणाचं वाटतं. मग मीही इतरांसारखा त्यांच्याकडे धाव घेतो आणि माझी सांस्कृतिक भूक वड्यावर भागवतो.

- धनंजय दिवाण

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>बरं आजकाल पोरांची नावं ही अशी ठेवलेली असतात की खच्चून धाक वाटेल अशी हाक मारायला त्यांचा काहीही उपयोग नसतो. उदा. ‘ओम’ ला चारचौघात ‘ए ओम्या’ पण म्हणता येत नाही आणि घशातून जोर लावलाच तर ओंब, ओंब असं व्हायला लागतं.

एरवी आजोबा किंवा आजीच्या ऐकण्यात असलेलं हे पोरगं अशा ठिकाणी इतकं चेकाळतं की त्याची हॉर्सपॉवर त्यांना अजिबात झेपत नाही. पळापळीचा शेवट ठरलेलाच. माईकच्या वायरला अडखळून खाल्लेली आपटी, नंतरची रडारड आणि आई-बापाचं एकमेकांकडे ‘कुठे पाहत होतास/होतीस तू’ छाप कटाक्ष टाकणं. हे होईतो एव्हाना लोकांचं स्टेजवरून पार लक्ष उडालेलं असतं. होतकरू कलाकारांचा पार पोपट झालेला असतो आणि ते पाहून मला स्वतः बरोबर त्यांची पण दया यायला लागते.<<<

मनापासून हासलो मुंगेरीलाल. मी कुठेतरी प्रामाणिकपणे म्हणालो होतो की हसू येत नाही. पण आज हासलो. उत्तम निरिक्षण आणि त्यापेक्षा उत्तम चपखलता! (असा शब्द आहे?)

व्वा वा!

Lol

-'बेफिकीर'!

एकदा एक पांढरा शुभ्र शर्ट, पांढरी शुभ्र पँट घालून एक अतिशय जाड मिश्या ठेवलेला व रापलेल्या चेहर्‍याचा बुटका पहिलवान गृहस्थ कर्वेनगरहून सहवासला चालत चाललेला दिसला. मागे दोन (एकमेकांतील वयाचे अंतर साधारण सव्वा वर्षे) मुले हिंदकाळत उडत उडत चाललेली होती. त्यामागे एक बालक, ज्याला आपण का आहोत याची यत्किंचितही जाणीव नव्हती ते त्या पुढच्या दोघांना गाठायचा निरर्थक प्रयत्न करत होते व त्याच्या (फक्त) नाकातून शेंबूड गळत होता. त्याच्या मागून एक अजाण बालिका खांदा व पोट यांच्यामध्ये अमानवीरीत्या धरून एक स्त्री तरातरा चालत होती व तिने मारलेली हाक मला अजून आठवते (शेंबड्या बालकाला व अत्यंत कर्णकटू आवाजात)

"ए अभिमन्यू, बाजूला हो, गाड्या यतायत"

मुंगेरीलाल... कस्लं निरिक्षण आणि त्याहुनही झक्कास हे असं शब्दांत उतरवणं. हा प्रसंग बघण्याचा, सहन करण्याचा प्रसंग महिन्यातून एकदातरी येतोच येतो. तुमच्या लेखाची आठवण येत राहील...
आम्ही वाद्य वाजवतो... काहीजण स्पीकर वाजवतात. तो कर्णकटू आवाज खरच काळीज चिरणारा आहे Happy

आम्ही वाद्य वाजवतो... काहीजण स्पीकर वाजवतात.<>><< Lol

मुंगेरीलाल, हापण लेख मस्त आहे. अजून थोडं लिहायला हवं होतं. खासकरून शाळेचे गॅदरिंग. या गॅदरिंगमधले ड्यान्स, गाणी, नाटकं, वेशभूषा, मेकप हे स्वतंत्र लेखाचे विषय होतील...

भारी निरीक्षणे.
"काही लोक जिंकलेली ट्रॉफी धरावी तसा माईक पोट आणि छातीच्या मध्ये धरतात आणि ते काय बोलत आहे ते जाम ऐकू येत नाही."" हे मी केलेले आहे :D. लोकांना ऐकायला आले नसेल तर उत्तमच.
मुलांची नावे, बटरस्कॉच , मुलांचे पडणे अगदी परफेक्ट.
पण थोडक्यात आटपलेत असे वाटले.
दोनच शब्द बोलायला स्टेजवर येणार्‍यांना ते दोन शब्द बोलून झाल्यावर हातातल्या माइकचं काय करायचं असा प्रश्न पडतो हे अगदी फिल्मी अवॉर्ड फन्क्शन्समध्येही दिसतं.
माइक टेस्टिंग होईपर्यंत लोकांचा पेशन्स संपतो याचा अनुभव आमच्या सोसायटीच्या गेल्या स्नेहसंमेलनात घेतला. तिथे हा प्रकार इलेक्ट्रिक गिटारवर चालला होता. त्यातून त्या बिचार्‍या किशोराने आपल्या कलादर्शनासाठी लोकांनी ताटं घेऊन जेवायला बसण्याचा मुहूर्त निवडला होता.

बरं आजकाल पोरांची नावं ही अशी ठेवलेली असतात की खच्चून धाक वाटेल अशी हाक मारायला त्यांचा काहीही उपयोग नसतो. उदा. ‘ओम’ ला चारचौघात ‘ए ओम्या’ पण म्हणता येत नाही आणि घशातून जोर लावलाच तर ओंब, ओंब असं व्हायला लागतं.
>>>>>>>>>>>
अगदी अगदी... Happy

मजा आली वाचायला..

माईक हातात घेतल्या घेतल्या माझ्या तोंडातून पहिला आवाज निघतो.. अंअंअं ... आणि तो माईक इफेक्टमुळे एवढ्या मोठ्याने येतो की मग मला पुढे बोलायची भितीच वाटते.. Proud

मस्त लिहिलंय! अगदी अचूक निरिक्षण आहे.
येत्या काही दिवसांत असाच एक घरगुती कार्यक्रम आहे. तो पाहताना या लेखाची आठवण होईल. Lol

अगदी अचूक निरिक्षण आहे हो तुमचं आणि वर्णन किती छान केलं आहे. त्या प्रसंगातुन पुन्हा जाऊन आल्यासारखे वाटले. खरतरं अशा प्रसंगावर असं विनोदी अंगाने जाणारं ललित होऊ शकतं ही कल्पनाच वेगळी आहे. Happy

बेफिकीर, तुमच्या यादीत माझी काही नावं : अर्जुन, अंगद

बरं आजकाल पोरांची नावं ही अशी ठेवलेली असतात की खच्चून धाक वाटेल अशी हाक मारायला त्यांचा काहीही उपयोग नसतो. उदा. ‘ओम’ ला चारचौघात ‘ए ओम्या’ पण म्हणता येत नाही आणि घशातून जोर लावलाच तर ओंब, ओंब असं व्हायला लागतं. >>>:D Lol Lol

Pages