समारंभ

Submitted by राजेंद्र क्षत्रिय on 3 December, 2012 - 11:02

आपल्या सर्वांच्याच घरात कधी कधी कोणत्या न कोणत्या प्रकारचा समारंभ आयोजित करण्याचा प्रसंग येतो. वाढदिवस, साखरपुडा, लग्न, लग्नाचा वाढदिवस, वास्तुशांती, उदघाटन असे कितीतरी समारंभ आपण साजरे करीत असतो. आपल्या आनंदात आपले नातेवाईक, हितचिंतक, मित्र-मैत्रिणी इ. सहभागी व्हावेत, अशी त्या मागील मुख्य भावना असते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनांत कित्येक वेळा जवळच्या नातेवाईकांची अथवा मित्रांची वर्षांनुवर्षे भेट होत नाही, या निमित्ताने ते भेटतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. नवीन ओळखी होतात, माणसं जवळ येतात, नाती अधिक घट्ट होतात.

पण अशा कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक वेळीच इतके सोपे नसते. कार्यक्रमासाठी सोयीस्कर दिवस, वेळ ठरविणे, आमंत्रिताची संख्या जास्त असेल तर त्यासाठी स्वतंत्र हॉल ठरविणे. हॉल म्हटला की, मग हॉलची सजावट, बसण्याची व्यवस्था, अल्पोपहार अथवा जेवणाची व्यवस्था, अशी एक की अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते. उत्सवमूर्तींच्या कपड्यांपासून, दागदागिन्यांपर्यंत अनेक वस्तूंची खरेदी होते.

सर्वात महत्वाचे म्हणजे निमंत्रणे. कोणत्याही कार्यक्रमाचा हा सर्वात महत्वाचा भाग असतो. त्यातही निमंत्रणांची यादी तयार करणे, हे अत्यंत जिकीरीचे काम असते. बऱ्याच वेळा जुन्या काही कार्यक्रमांच्या यादीवरून नवीन यादी तयार केली जाते. आठवतील तशी परिचितांची, मित्रांची, नातेवाईकांची नावे त्यात लिहिली जातात. कितीही आठवणीत ठेवले तरी कधीकधी अगदी जवळची माणसे राहून जातात. काही वेळा निमंत्रणपत्रिका छापल्या जात नाहीत. छोट्या कार्यक्रमांची बहुदा तोंडीच आमंत्रणे दिली जातात.

आमंत्रणे करतानाही प्रत्येकाकडे प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण देणे कधी कधी शक्य नसते. मग कधी फोनवरून आमंत्रणे केली जातात. तर कधी नातेसंबंधातील महत्वाची आमंत्रणे स्वतः प्रत्यक्ष भेटून केली जातात. दिवसभरात दहा-बारा ठिकाणी जाऊन आमंत्रणे द्यायची म्हटले तरी यजमानाची दमछाक होते. प्रत्येकाला आमंत्रण देताना कार्यक्रमाचा तपशील सारखाच सांगितला जाईल याचीही शाश्वती नसते.

यजमानाच्या दृष्टीने मुख्य कार्यक्रम महत्वाचा असतो. त्यामुळे कार्यक्रमाची वेळ, ठिकाण वगैरे गोष्टी सांगितल्या जातात, पण किती जणांचे आमंत्रण आहे? कार्यक्रमानंतर जेवण आहे की नुसताच अल्पोपहार आहे? अल्पोपहार असेल तर काय मेनू आहे? अल्पोपहारानंतर कॉफी की आईसक्रीम? असे तपशील कधी कधी सांगावयाचे राहून जातात. फोनवरून आमंत्रण देतानाही सर्वांना अगदी एकाच साच्यातील वाक्यात आमंत्रण दिले जाईल, असे होत नाही. निमंत्रण म्हणजे काही कॉन्ट्रॅक्ट नव्हे.

मग कार्यक्रमाच्या वेळी रूसवे, फुगवे सुरू होतात. "मी जवळचा नातेवाईक असून मला जेवायला सांगितले नाही". "किती जणांनी यायचे ते स्पष्ट सांगितले नाही, मग मुलांना घरी ठेऊन कसे यायचे". " जेवण देणार आहे हे आधी सांगितले असते तर आम्ही स्वयंपाक करून आलो नसतो "." माझ्या मिस्टरांना प्रत्यक्ष आमंत्रण दिले असते तर तेही आले असते ". " आम्ही आल्यावर ’या’ सुध्दा म्हटले नाही ". अशा एक की अनेक कारणांवरून यजमानाबद्द्लची नाराजी व्यक्त केली जाते. यात बहुतेक वेळा अत्यंत जवळची, नात्यातील प्रेमाचीच माणसे अधिक असतात. कधी कधी जुन्याच कुठल्यातरी गोष्टीचा राग या कार्यक्रमाच्या निमित्ताने उफाळून आलेला असतो.
यावेळी यजमानाच्या मनःस्थितीचा विचार केला जात नाही.
तो बिचारा दोन-तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात पूर्णपणे थकून गेलेला असतो. आयोजन कोठे ढासळू नये, कोठे काही उणेपणा राहू नये म्हणून त्याची लगबग, धावपळ सुरू असते. कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा, पाहुण्यांच्या सरबराईत कोणतीही उणीव राहू नये म्हणून तो प्रयत्नशील असतो. कोणालाही कार्यक्रमाला आमंत्रण देऊन, बोलावून त्यांचा अपमान करायाचा किंवा गैरसोय करायची असा त्याचा उद्देश मुळीच नसतो. सर्व आप्तांनी, मित्रमंडळींनी एकत्र येऊन काही थोडा वेळ एकमेकांच्या सहवासात आनंदात घालवावा, हीच यजमानाची इच्छा असते.

पण आमंत्रित मंडळी यजमानाची मानसिकता कधी कधी समजावून घेत नाहीत. आधीच तणावात असलेले यजमान आणखीच भांबावून जातात. कार्यक्रमाच्या मूळ उद्देशालाच सुरूंग लागलेला असतो. रूसवे-फुगवे काढण्यातच वेळा निघून जातो. काही समंजस मंडळी ’ कार्यक्रम छान झाला’ असा अभिप्राय देऊन जातात. यजमान थोडा सुखावतो.

एवढे सगळे होऊनही कार्यक्रम संपल्यावर यजमान आपल्याकडून नकळत झालेल्या चुकांची उजळणी करत, पुढच्या कार्यक्रमांत त्या कशा टाळता येतील, याचा विचार करण्यात गुंग होऊन जातो.
शेवटी मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यजमानाच्या दृष्टीने मुख्य कार्यक्रम महत्वाचा असतो. त्यामुळे कार्यक्रमाची वेळ, ठिकाण वगैरे गोष्टी सांगितल्या जातात, पण किती जणांचे आमंत्रण आहे? कार्यक्रमानंतर जेवण आहे की नुसताच अल्पोपहार आहे? अल्पोपहार असेल तर काय मेनू आहे? अल्पोपहारानंतर कॉफी की आईसक्रीम? असे तपशील कधी कधी सांगावयाचे राहून जातात.
------------------------------------
पटला हा मुद्दा,
कॅटरर्सकडून जेवणाचे मेनूकार्ड मिळवून ते ही लग्नपत्रिकेच्या एखाद्या कोपर्‍यात टाकायला हरकत नाही,
त्यासमोर रेटही लिहू शकतो..... ते ही जरा जास्तच, जेणेकरून पर प्लेट भाव बघून लोक आहेर जरा जास्तच आणतील.. Happy

जराशी गंमत केली, पण खरेच कोणी आमंत्रण दिले अन जेवायची सोय आहे की नाही हे समजले नाही तर जाम वांधे होतात राव.. Sad

मला लेख का ही ही समजला नाही.

(ईव्हेंट मॅनेजमेंटचा एक डिप्लोमा केलेला असल्याने) असले घरगुती समारंभ म्हणजे काही वाटतच नाही. प्रोफेशनल ईव्हेंट्समधे होणारे मानापमान पाहिले तर घरचे अगदीच मिळमिळीत वाटतील.

तरीपण काही टिप्स देते:

समारंभ हे मनापासून करायचे असतात. "लोकांना बोलवायलाच पाहिजे" यापेक्षा "लोकांनी आपल्याकडे आलंच्ग पाहिजे" ही मानसिकता ठेवा.

घरचे समारंभ कौशल्यपूर्वक आयोजित करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. सर्वांत आधी बजेट ठरवा, त्यानंतर समारंभाची तारीख, वेळ आणि स्थळ या तिन्ही गोष्टींचा सर्वाधिक विचार करणे गरजेचे. शक्यतो रविवार अथवा सुटीचा वार असावा. जास्तीत जास्त लोक येऊ शकतात. तुमचं बेजेट काय आहे त्यावरून वेळ ठरवा, म्हणजे मग जेवण, अल्पोपहार की हाय टी कि नुस्तं आईस्क्रीम सरबत हे ठरून जाईल. मग किती लोकांना बोलवायचं हे रफली ठरवा. हे ठरलं की मग स्थळ ठरवा. घरच्याघरी सोय होऊ शकेल का? नसल्यास कुठला हॉल पुरेल? त्या हॉलचे भाडे बजेटमधे बसते का? असल्यास, हॉल उपलब्ध आहे का? हे सर्व पाहून घ्या. हॉल ठरवलाच तर हॉलची सजावट, बस्ण्याची व्यवस्था वगैरे सर्व हॉल मॅनेजमेन्टकडे सोपवा. घरीच कार्यक्रम करणार असलात तर समारंभाच्या आधी किमान तीन दिवस आधी घर साफ करून घ्या. बसण्यासाठी खुर्च्या वगैरे ऑर्डर करा. परगावचे पाहुणे येणार असतील तर गादी-उश्या भाड्ञाने आणून ठेवा.

आता बसून व्यवस्थित रीत्या आमंत्रणांची लिस्ट काढा. कुणाला बोलवायचेच आहे, कुणाला पोस्टाने आमंत्रण पाठवायच, कुणाला ईमेल करायचे, कुणाला नुसते फोनवर सांगायचे आणि कुणाला व्यक्तीश: जाऊन आमंत्रण द्यायचे अशी स्वतंत्र लिस्ट काढा. त्या लिस्टनुसार आमंत्रणे पाठवायला लागा. आम्न्त्रण देताना सहकुटुन्ब सहपरिवार असे अवश्य म्हणा. एक वेगळी लिस्ट कन्फर्मेशनची बनवा. काही नाती अशी असतात की ज्यांना तुम्ही आमंत्रण तर करता, पण ते येणार नाहीत हे माहित असतं. त्यामुळे कन्गर्मेशन लिस्टमधे "येणारेच" लोक लिहून ठेवा. {ज्यांना आमंत्रण येतात अशांना एक सूचना: आपण जर समारंभाला जाणार नसूतर यजमानांना कळवावे. त्यांना ते सोयीचे पडते}

हॉल ठरल्यावर केटररचे बघून ठेवा. बहुतेक हॉलमधे केटरर ठरलेला असतो. नसल्यास, चांगला केटरर बघून मेनू ठरवा. मेनू ठरवताना ढीगमढाग गोष्टी न ठेवता मोजक्याच परंतु समारंभाला उचित होतील अशा ठेवा. आमंत्रितांमधे असणारे बहुसंख्य लोक आस्वाद घेऊ शकतील अशा पदार्थांचा समावेश करा. पाच वर्षाच्या मुलाचा वाढदिवस आणि आजोबांचे सहस्त्रचंद्रदर्शन या दोन्ही कार्यक्रमांचा मेनू भिन्न असायला हवा. अति मसालेदार, अति तेलकट आणि अति गोड्पदार्थांचा भरणा टाळावा. बुफे सिस्टीम असल्यास खायला ट्रिकी होतील अशा गोष्टी साधारणपणे ठेवू नयेत (उदा. पाकातील पुरी, आमरस) केटररला किती ताटांचा अंदाज सांगाल तो त्याच्यापेक्षा थोडं जास्त बनवून ठेवतो हे लक्षात ठेवा. ड्रिंक्स, नॉनव्हेज मेनू असल्यास तो व्हेज जेवणापेक्षा थोडासा लांब ठेवा. शाकाहारी लोकांची अन्यथा गैरसोय होते.

मेनू ठरल्यावर लगेच इतर काही छोट्या गोष्टी असतील त्यादेखील ठरवून टाका "नंतर बघू" कॅटेगरीमधे एकही काम ठेवू नका. आयडीयली हातात एक वही ठेवा त्यामधे जे लागेल ते आठवेल तसं लिहून ठेवत जा. तेच काम करून झाल्यावर त्यावर टिकमार्क करा. समारंभाच्या दिवशी कोणी काय करायचे आहे ते ठरवून कामे द्या. समारंभाची टाईमलाईन आणी शेड्युल बनवून घ्या. शक्यतो त्या शेड्युलनुसार समारंभ होऊ द्यात.

समारंभाच्या दिवशी सर्व काही आवरून वेळेपूर्वी तयार रहा. तयार होण्याआधी व्यवस्थित पोटभर खाऊन घ्या. आयत्या वेळेला घोळ नको म्हणून कपडे, दागिने, वेशभूषा, केशभूषा याची सर्व तयारी आदल्याच दिवशी करून ठेवा. समरंभाच्या आधी दोन तास "हा ब्लाऊझ मला बसतच नाही, या साडीला इस्त्रीच नाही, या कुत्याला बटण नाही" हे सर्व नको.
वेळ थोडा असल्यास प्रोफेशनल ब्युटीशीअन बोलवावी. स्त्रियांची सर्व तयारी एकदम व लवकर होऊन जाते.

पाहुणे मंडळी यायला लागल्यावर उत्साहाने त्यांचे स्वागत करा. त्यासाठी दरवाज्यामधे एकाव्यक्तीने उभे राहणे इष्ट. सकुसप उभे राहण्याची आवश्यकता नाही. आत हॉलमधे आल्यावर यजमानीण स्त्रीने त्यांना बसण्याची जागा देऊन सरबत चहा कॉफी असे जे काय असेल ते देण्याची व्यवस्था करावी. सर्वांशी हसून आदबीने बोला, कुण्या एकाच व्यक्तीशी सरबराई करण्यामधे लागू नका. सर्वाना सारखीच ट्रीटमेंट द्या. काही सांस्कृतिक कार्यक्रम असल्यास (मुंगेरीलालांचा लेख वाचून घ्या!!!) त्याची सर्व तयारी आधीच करून ठेवा. मुख्य समारंभामधे कुणी काय कराय्चे ते ठरवून ठेवा.

समारंभानंतर जेवताना अतिआग्रह करूनका. त्याऐवजी "आवडलं का जेवण?" "अजून घ्या" "सावकाश होऊ द्या" यासारखी वाक्ये बोला. एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला हवे ते पदार्थ वाढून देणे. एखादी लेकुरवाळी पाहुणी जेवत असताना तिचे लेकरू कडेवर घेऊन फिरणे असे अवश्य करा. Happy बहुतेकांचे जेवण झाल्यावर त्याना निरोप द्या. कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यान्चे आभार माना. हे आभार मानणे अत्यंत अकृत्रीमरीत्या करा.

आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आपण स्पेशल आहोत असे वाटले पाहिजे. याची खबरदारी घ्या. एवढे सर्व झाल्यावर जेवून घ्या. Happy

काही कारणामुळे हे जमत नसेल तर सरळ ईव्हेंट मॅनेजर बोलवा. ही इज वर्थ फॉर युअर मनी. Happy