कविता अशीच असते

Submitted by सागर कोकणे on 3 December, 2012 - 07:35

मी एक कविता लिहिली
आणि फेकून दिली रस्त्यावर...
आता तिचे भवितव्य तीच जाणे !

ती वाऱ्याशी गुजगोष्टी करेल
त्यावर स्वार होऊन तरंगत राहील
तेव्हा कुणीतरी सहज खिडकीपाशी गुणगुणताना
सापडेल त्याला अलगदपणे...

कदाचित मातीत मिसळूनही जाईल
आणि उगवेल एखाद्या रातराणीच्या रूपात
मग कुणीतरी हिची तुलना तिच्याशी करेल
तेव्हा मोहरून जाईल ती...

अगदीच नाही तर मग
पावसात चिंब चिंब होऊन
जलसरींच्या नादाशी एकरूप होईल
बेमालूमपणे एखादे गीत होऊन...

अन हेही जमले नाही तर
ज्या ठिकाणी शेवटचा श्वास घेतला
तेथून जाणाऱ्या एखाद्या कवीला झपाटून टाकेल
पण आपले ध्येय साध्य केल्याशिवाय तिला शांती लाभणार नाही...

कविता अशीच असते...कविता अशीच गवसते.

-काव्य सागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह छानच !! थेट मनाचा ठाव घेतात या ओळी
एक प्रश्न पडलाय ; की ही रचना ओळी एकापुढे एक लावुन लिहिली तर एक सुन्दर ललित होईल ना??
सागरजी माफ करा मला कवितेतील काहीच समजत नाही मला कविता शिकायची आहे प्लीज मार्गदर्शन करावे

छान आहे रे. अगदी सहज आलेली Happy
कविता आणि ललीत, स्फूट यात बर्‍याचदा गल्लत होते बार्‍याच जणांची. तुला जे योग्य वाटतं, तसं लिहीत रहा. जाणत्यांचं मार्गदर्शन आणि नवख्यांना प्रेरणा आपोआप मिळते Happy

धन्यवाद हर्षल.
मी कविता लिहितो म्हणून मलाच कविता कळते अशी भूमिका घेणे बरोबर नाही.
प्रत्येक कवितेला वाचक आपापल्या दृष्टीकोनातून पाहतो.
त्यामुळे चांगल्या-वाईट सर्व प्रतिक्रिया गोड मानून घेतो.

पहिले कडवे वगळता खूप आवडली, मस्तच विचार आहेत.

मी एक कविता लिहिली
आणि अलगद सोडून दिली वार्‍यावर...
>>>> असे छान वाटले असते. फेकून देण्यात तिचा कचरा होतोय असे वाटते. कवितेत पुढे जी तरलता आहे त्याला तुमची ओळ मारक ठरते आहे.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत, कृपया गैरसमज नसावा.

शशांक
धन्यवाद....हा पर्याय देखील चांगलाच आहे.
कविता लिहिताना माझ्या डोळ्यापुढे जे चित्र होते त्यात ती ओळ योग्य वाटत होती.
प्रत्येक वाचकाला त्याच्या दृष्टीकोनातून कवितेत वेगळे काही सापडते.
कदाचित पहिल्या कडव्यानंतर तेथे लय बदलणेच अपेक्षित होते मला.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

छान आहे कविता
निंदकांकडे लक्ष देवू नका
श्री. शशांक यांचे म्हणणे बरोबर आहे बदल आवश्यक आहे कराल तर बरे होईल

विचार करायला हवा...
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

आवडेश Happy