गुप्तहेर

Submitted by प्रकाश कर्णिक on 27 November, 2012 - 21:24

श्रीकांत मला अनपेक्षितपणे दादर स्टेशनवर भेटला. म्हणजे मी माझ्या केईएम मधील दिवसपाळी साठी डोम्बिवलीहून सुटणाऱ्या सकाळच्या आठ सतराच्या फास्टने उतरलो आणि त्याच गाडीतून पहिल्या वर्गाच्या डब्यातून त्याला उतरताना पहिले. त्याने निळ्या जीन्सवर चॉकलेटी रंगाचे लेदर जँकेट, डोक्यावर पनामा हँट आणि डोळ्यावर काळा चष्मा आणि पायात चकचकीत पॉलिश केलेले ब्राऊन शूज घातले होते. जँकेटची कॉलर वर केलेली आणि हातात लेदर बँग असा हा पेहेराव, त्यात क्षणभर दिसलेला त्याचा गोरा रंग आणि चालण्याची ढब यावरून मला एका नजरेत एवढ्या गर्दीतही कळले की तो श्रीकांत आहे. आता तुम्ही म्हणाल की दादर स्टेशनवर फास्ट गाडीतून उतरलेल्या माणसांच्या लोंढ्यात मला श्रीकांतचे चकचकीत पॉलिश केलेले ब्राऊन शूज कसे दिसतील? तुम्ही अगदी अचूक आहात पण मग पुढे ऐका! त्याच्या शर्टाच्या डाव्या खिशाला काळे पारकर पेन आणि डाव्या मनगटात ओमेगा घड्याळ होते. कमरेवरच्या काळ्या बेल्टवर उजव्या बाजूला मोबाईल फोन ठेवण्याचे काळे पाकीट जोडलेले आणि डाव्या बाजूला दुसऱ्या छोट्या पाकिटात एक दुमडणारी कार्ल झेईस दुर्बिण होती. हे सर्व विस्तृतपणे सांगण्याचे कारण म्हणजे मी श्रीकांतला गर्दीत ओळखल्यावर सर्व वर्णन केलेल्या गोष्टी अभावितपणे आल्याच. इतकेच नव्हे तर आहेतच याची एकशे एक टक्के ग्वाही मी देऊ शकतो. हो, आणखी दोन गोष्टी राहिल्या त्या म्हणजे त्याच्या उजव्या हाताच्या अंगठीच्या बोटात हिऱ्याची अंगठी आणि जँकेटच्या खिशात एक छोटे होकायंत्र !

मी श्रीकांतला टाचा उंचावून मोठ्याने हाक मारली. मला श्रीकांत क्षणभर थबकल्या सारखा वाटला पण नंतर तो झपाझप गर्दीतून वाट काढत चालू लागला. फलाटावरच्या जिन्यावर त्याच्याकडे लक्ष ठेऊन त्याच्या मागोमाग जाताना तर मला खूप दम लागला. स्टेशनच्या बाहेर कमानीपाशी लोकांची पांगापांग झाली आणि मी एक दीर्घ श्वास घेण्यासाठी थांबलो असताना कमानीच्या खांबाच्या थोड्या आडोशाने श्रीकांतने वळून माझ्याकडे पहिले. उजव्या हाताच्या दोन बोटांनी त्याने गॉगल डोळ्यावरून खाली सरकवला आणि त्याची आणि माझी नजरभेट झाली. मी काही बोलण्यासाठी उघडलेले तोंड उघडेच राहिले कारण तेवढ्यात श्रीकांत वळून परत वेगाने चालू लागला होता. माझा चेहेरा पडला, मी आजुबाजुला कोणी माझ्याकडे बघते आहे का ते पहिले पण सगळे आपापल्याच घाईत होते आणि कोणालाही माझ्याकडे पहायला उसंत नव्हती. पूर्वी अनेकदा श्रीकांतने सूचना देऊन सुध्दा मी असा गाढवपणा करत आलो आहे. अतिशय सरळ सोप्या आणि लहान मुलाला समजावतात अशा पद्धतीने श्रीकांतने मला सांगितले होते की गर्दीत ओळख दाखवायची नाही आणि नावाने हाक तर कधीच मारायची नाही, दुरून खुणेने संवाद साधायचा आणि ठरलेल्या गुप्त जागी भेटायचे. आता माझ्या लक्षात आले की श्रीकांत गल्लीतल्या इराण्याच्या हॉटेलमधे जातोय.

मी धाप टाकत इराण्याच्या हॉटेलात शिरलो आणि समोर रिकाम्या दिसलेल्या खुर्चीत विसावलो. आजूबाजूला नजर टाकली पण खात्री होती की श्रीकांत बाहेरच्या टेबलावर नसणार. तिरकी नजर फिरवली आणि एक अर्ध्या पार्टीशनचे दार अजून हालत होते. खालून मला श्रीकांतचे चकचकीत पॉलिश केलेले ब्राऊन शूज दिसले आणि हायसं वाटलं.
“ दिवाकर ये, बस .” श्रीकांत म्हणाला
त्याचा गॉगल आणि लेदर बँग टेबलावर होते पण बँगला लावलेली साखळी अजूनही श्रीकांतच्या मनगटाला गुंडाळलेली होती. माझे लक्ष गेल्याचे श्रीकांतच्या नजरेस आले आणि तो म्हणाला
“क्लासिफाइड डॉकस् !”
“अरे श्रीकांत, कुठे बेपत्ता झालास तू? खूप शोधला पण कोणालाच तू कुठं ते माहित नाही. वर तुझा फोनही कधी लागत नाही “ मी आता उद्विग्नतेने बोललो आणि समोरच्या लाकडी खुर्चीवर धपकन बसलो.
“ अरे हो दिवाकर, जरा दमानं ! पण अगोदर तुझी स्टोरी. तू कसा काय दादर स्टेशनवर? तू तर वरळीला बीडीडी मधे राहतोस नं? का मामानं हाकलला घरातून? “ श्रीकांत चेष्टेत बोलला.
त्याला माहित होतं की माझ्या आईनं आणि मामानं माझं लग्न सुमीशी म्हणजे मामाच्या मुलीशी करायचा घाट घातला होता आणि कित्येकदा मी मामाच्या घरातून पळून जाण्याचा विचार श्रीकांतकडे बोलून दाखवला होता.
“ अरे श्रीकांत, जखमेवर मीठ चोळू नकोस. आईनं आणि मामानं माझा घात तर केलाच पण मला सुमी आवडायला लागली आणि मीच हो म्हटलं. येत्या माघात लग्न आहे. मामानं लग्न ठरल्यावर मात्र खरच घराबाहेर काढलं. कळव्याला रूम घेऊन दिली. लग्नाअगोदरच हुंडा मिळाला “ मी जोरजोरात हसलो.
“ शू शू , हळू ” श्रीकांत ओठावर बोट ठेऊन म्हणाला. “ मग आत्ता तू कळव्याहून आलास तर आणि जातोयस कुठे?” चौकशीच्या स्वरात श्रीकांतने विचारणा केली.
“ केईएमला या महिन्यात दिवस पाळी मिळालीय. देशाच्या घटनेनं दिलेल्या हक्कानं डॉक्टर झालो तोच हक्क वापरून सरकारी नोकरी मिळाली. सुरळीत चालू आहे. वर्षभरात सिनिअर होईन.”
“ वा ! अभिनंदन ! माझी माँ मला हिणवून नेहमी म्हणायची, आठवतं? अहो श्रीकांत गुमास्ते, तुमचा मित्र दिवाकर खोब्रागडे एक दिवस तुमच्यापेक्षा चांगला डॉक्टर होईल. “
मला एकदम श्रीकांतच्या आईंची आठवण झाली. मेडिकलच्या पहिल्या तीन वर्षांमध्ये एका वेळचं पोट त्यांनी प्रेमाने दिलेल्या अन्नावर होतं. त्यांना मी कसा विसरू?
“ मां कशा आहेत? “ मी खऱ्या आत्मियतेने विचारलं.
“ मां ठीक. बाबा गेल्या वर्षी स्ट्रोकनं गेले आणि मां खचली. तिने पण प्रँक्टीस बंद करायचं ठरवलं. तुला माहिती आहे माझा हा कामाचा व्याप !”
“तरीच, तुमच्या शिवाजी पार्कच्या बंगल्यावर गुजराती डॉक्टर नवरा बायकोची नावे लागलेत.” मी उद्गारलो.
“ हो. मीच मांला प्रँक्टिस सकट बंगला विकायचा सल्ला दिला. पण तिला खरे कारण ती घाबरेल म्हणून मुद्दामच सांगितले नाही.” श्रीकांत मला विश्वासात घेत म्हणाला.
मी चिंतित झालो आणि हळू स्वरात म्हणालो “ काय झालं? कोणी बंगला खाली करायला धमकी वगैरे ........”
श्रीकांतनं अतिशय तुच्छ नजरेने माझ्याकडे पाहिलं पण क्षणात त्याच्या नजरेत माझ्या अज्ञानाबद्दल कणव दिसून आली.
तेव्हड्यात पार्टीशन दुभंगलं आणि हनुवटीवर फ्रेंच दाढी व डोक्यावर विणलेली गोल टोपी असलेला वेटर आत आला म्हणून मी वाचलो.
“ दो मस्का पाव, दो आमलेट और दो स्पेशल चाय “ श्रीकांतने ऑर्डर दिली आणि वेटर पाण्याचे ग्लास टेबलावर आदळून झंझावातासारखा बाहेर गेला. त्यानंतर बराच वेळ आम्ही पार्टिशनची दारे हलताना पाहत होतो.
थोडया वेळाने श्रीकांत तंद्रीतून बाहेर आला.
“तुला थोडीफार कल्पना आहेच, या आंतरराष्ट्रीय एजन्सीज कशा काम करतात ते! “ मी न कळून देखील होकारार्थी मान डोलावली.
“ इस्राईली आणि रशिअन हेर अंतराळातून सँटलाईटद्वारा माझ्या घरावर नजर ठेऊन होते. मी ब्रिटीश सरकारला थोडीफार जाणीव करून दिली पण शेवटी फील्डमध्ये आपण एकटयानेच काम करावे लागते. पाच करोडला बंगला फुकून टाकला आणि ठाण्याला येऊरच्या डोंगरावर गर्द झाडीत घर घेतलं. आता रात्री मीच दुर्बिणीतून परकीय सँटलाईटवर लक्ष ठेऊन असतो. माझ्या कामाचा भाग नाही पण एक सराव म्हणून, काय?“ श्रीकांतने भुवया उंचावून माझ्याकडे पाहिलं, आणि मी सहमत असल्याचे दर्शविले.
“मग तू ठाण्याला गाडीत चढलास तर? “ मला मोठ्ठा उलगडा झाल्यासारखा मी बोललो.
श्रीकांत माझ्या प्रश्नरुपी वाक्याकडे दुर्लक्ष करून हळू आवाजात म्हणाला “ ब्रिटीश राणीच्या जिवाला धोका आहे. त्याबद्दलचा हा माझा सत्ताविसाव्वा गुप्त अहवाल ब्रिटीश कॉन्सुलेट मधे द्यायला चाललोय.“
मी अतिशय आदराने टेबलावरील त्याच्या साखळीने बांधलेल्या लेदर बँगकडे पाहिलं. मी काही वेळा त्याला गुप्त रिपोर्ट घेऊन जाताना पाहिलं होतं पण तो अतिशय घाईत असे. आज प्रथमच तो इतक्या शांतपणे बसलेला मला मिळाला होता. एवढ्यात वेटर आला आणि त्याने कसरत करत एकत्र आणलेल्या साऱ्या गोष्टी टेबलावर मांडल्या. आमलेटचा खमंग वास दरवळत होता आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलं. कळव्याला राहायला गेल्यावर गावाकडून आई राहायला आली. तिला वाटत होतं की बायको येईपर्यंत तिच्या लेकाचे खाण्यापिण्याचे हाल होतील. आई दररोज ताज्या भाकरीची न्याहारी खाऊ घाले आणि भात व सांबारं डब्यात भरून देई. आईच्या गळ्यात तुळशीची माळ होती आणि तिला सामिष अन्न वर्ज्य होतं. मी तिला चिडवत असे “ आये, आता बामणं पण मिटक्या मारत खातात. आपण का बंद करायचं?” त्यावर आई ओरडून म्हणे “ मेल्या, तुझ्या बापदाद्यानं पिढ्यानपिढ्या माप ढोरं खाल्ली, आता पुरे.” खूप दिवसांनी मस्त आम्लेट समोर आलं आणि आम्ही दोघे न बोलता आस्वाद घेऊ लागलो.

श्रीकांतची आणि माझी पहिली भेट मला आठवते. औरंगाबाद जिल्ह्यात मी प्रथम आलो आणि कोट्यातून केईएम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बनायला हजर झालो. जातीत खूप नावाजलो आणि आमच्यासाठीच्या आंबेडकर वसतीग्रहात रहाण्यापेक्षा माझ्याकडे राहील असे मामा आईला म्हणाला. आई आणि मामाची हुशारी माझ्या ध्यानात खूप उशिरा आली, असो.

कॉलेजच्या पहिल्या दिवशी आम्ही काही गावाकडची मुलं सभाग्रहात शेवटच्या बाकावर बसलो होतो. शहर, लोकं आणि एकंदरितच वातावरण मला नवीन आणि भीतीदायक होते. गावाला पळून जायचा विचार सतत येत होता. सगळ्यात मोठ्ठी भीती इंग्रजी भाषेची वाटत होती आणि इथे तर सर्वजण न समजणाऱ्या इंग्रजी भाषेत बोलत होते. मला कळेना माझा या वातावरणात किती काळ टिकाव लागणार. वर्गात एक प्राध्यापक सुटाबुटात आला, बहुदा पहिला दिवस म्हणून असेल. त्याने फेऱ्या मारत आणि हातवारे करत कडक इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. मला काय पण कळत नव्हतं.
अचानक दरवाज्यातून आवाज आला “ मे आय कम इन सर?”
एक गोरा, सडपातळ, मध्यम उंचीचा हसतमुख मुलगा उभा होता. खेळाडू घालतात तसे झिपचे जँकेट घातले होते, एका हातात टेनिसची रँकेट आणि दुसऱ्या हातात लाल गुलाब होता.
“ मिस्टर गुमास्ते, पहिल्या दिवशी कॉलेजला उशिरा अन या तऱ्हेने येतात?” शब्दा अभावी प्राध्यापकाने वर पासून पायापर्यंत हात हलवला.
“ सॉरी सर. पण प्रिंसिपल मिराशींबरोबर रँली थोडी लांबली.“ इतके बोलून मिस्टर गुमास्ते आत आला, त्याने शांतपणे हातातले गुलाबाचे फूल एका पहिल्या बाकावर बसलेल्या फ्रॉक मधील इंग्रजी मँडम सारख्या दिसणाऱ्या गोऱ्या मुली समोर ठेवले आणि लांब ढांगा टाकत पायऱ्या चढून शेवटच्या बाकावर माझ्या शेजारी येऊन बसला. सगळेजण त्या मुलीकडे बघत होते. तिने मागे वळून पाहीले आणि ती चक्क लाजली. प्राध्यापकाने निराश होऊन हात वर केले आणि आपले अगम्य भाषण तो पुन्हा करू लागला.
“ माझं नाव गुमास्ते, श्रीकांत गुमास्ते.” त्याने हात पुढे केला. मी पण त्याचा हात दोन्ही हातात घेऊन म्हणालो “ दिवाकर खोब्रागडे. जिल्हा औरंगाबाद.”
“ लक्ष देऊ नकोस, प्रोफेसर कानविंदे काही महत्वाचं सांगत नाहीत आणि सेमेस्टर भर काही सांगणार नाहीत. डोन्ट वरी. सगळे प्रोफेसर माझ्या आई आणि बाबांचे मित्र आहेत. मी लहान पणापासून ओळखतो.”
“ तुमचे आई आणि वडील प्राध्यापक आहेत का?” मी आदराने विचारले
“ दिवाकर, रूल नंबर एक. अरे तुरे करायचं आणि पहिल्या नावाने हाक मारायची. माझे आई आणि बाबा या लोकांबरोबर शिकले आणि शिवाजी पार्कला प्रँक्टिस करतात.” श्रीकांत हळू आवाजात पण जरबेनं बोलला.
“इथे बोलूया नको. क्लास झाल्यावर कँटीनमधे बसू. तुझी रोशनशी ओळख करून देतो.” श्रीकांत चोरट्या स्वरात म्हणाला. “ रोशन??” माझ्या तोंडातून त्याच स्वरात उद्गार आले.
“ रोशन “ “ रोशन दस्तूर” “ती काय पहिल्या बाकावर बसलेय. माझी फ्रेंड. स्कॉटिश पासून एकत्र आहोत. “ माझ्या चेहेऱ्यावरचे निर्बुद्ध भाव पाहून त्याने सुधारणा केली “ म्हणजे शाळेपासून.”
श्रीकांत क्लास सुटल्यावर गुल झाला पण नंतर मी त्याला त्या मुलीबरोबर गाडीतून जाताना पाहिलं, म्हणजे रोशन बरोबर.
श्रीकांतची आणि माझी दोस्ती का व्हावी, त्याने माझ्याशी एव्हढ्या आपुलकीने का वागावे आणि आमचे संबंध इतके घनिष्ट का व्हावेत याला माझ्याकडे कारणमिमांसा नाही. प्राक्तन म्हणावं तर तुम्ही तर्कशुद्ध लोकं हसाल आणि केवळ योगायोग म्हणावं तर कपोकल्पित वाटेल. श्रीकांत आणि मी दोन धृवावरची माणसे होतो. आमच्यात विसंगती एवढी होती की त्याच्याबरोबर असताना लोकं मला त्याचा मित्र नव्हे तर घरगडी समजत. आर्थिक परिस्थिती, संस्कृति, भाषा, हुशारी, शारीरिक आणि मानसिक घडण काय काय गोष्टी सांगू ज्यात आम्हा दोघांत खूप अंतर होते इतकेच नव्हे तर कोणी साम्य काय असा प्रश्न विचारला असता तर उत्तर देणे कठीण गेले असते. तरीही श्रीकांतने मला हा फरक कधीच जाणवू दिला नाही. खरं म्हटलं तर त्यालाच हा फरक कधी वाटला नाही. त्याच्या प्रमाणे त्याच्या घरच्यांनी मला सहजपणे सामावून घेतलं.
आमची मैत्री दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेली. असे नाही की श्रीकांतला दुसरे मित्र नव्हते. श्रीकांत जगन्मित्र होता, त्याच्या लहानापासून मोठ्यांपर्यंत अनेकांशी ओळख होती. पण मी गुळाला मुंगळा कसा चिकटतो तसा त्याला धरून होतो. त्याच्या भोवती नेहमी मुला मुलींचा गराडा असे तेंव्हा मात्र मी दुरूनच पाही कारण त्याच्या आणि माझ्या खास नात्यात मला दुसरे कोणीही नको होते, अगदी रोशन सुध्दा!
रोशन एका परीसारखी दिसायची, म्हणजे मी काही कोणी परी पाहिली नव्हती पण मला म्हणायचे आहे की गोष्टीच्या पुस्तकात जशी मलमलच्या फ्रॉक मधल्या आणि पंख असलेल्या मुलींची चित्रे असतात तशी. ती आपल्याच विश्वात असे आणि कोणाकडेही न बघता सर्व काही पाही. शानदार गाडीतून उतरल्यावर ती तरंगत चाले आणि तिच्या भोवती एक दोन मुली नेहमी तिची चापलुसी करत तिच्याबरोबर फिरत. कॉलेजच्या वार्षिक समारंभाला स्टेजवर तर ती एवढी सुंदर आणि अवर्णनीय दिसत होती की माझे टक लावून पाहणे बहुतेक श्रीकांतच्या लक्षात आले असणार.
श्रीकांत माझ्या कानात म्हणाला “लाँग गाऊनमधे दिसते की नाही गाँर्जस?” मी ओशाळून म्हणालो “ हो, एखाद्या राणीसारखी दिसते.”
श्रीकांत तिच्याकडे कौतुकाने पाहत बोलला “ तिच्यात साम्राज्जाची महाराणी एलिझाबेथची ऐट आणि
एलिझाबेथ टेलरचे सौंदर्य आहे.”
तो पर्यंत मी कधी महाराणी एलिझाबेथचे चित्र पाहीले नव्हते आणि माझी एलिझाबेथ टेलर या श्रीकांतच्या मैत्रिणीशी ओळख झाल्याचे आठवत नव्हते एवढ्यात श्रीकांत बोलला “ बाय द वे. एलिझाबेथ टेलरचा जुना सिनेमा “क्लिओपात्रा” मेट्रोत लागलाय. उद्या जाऊ. तुला कळेल राणी कशी असते ते.”

पहिल्या वर्षात माझी दोन विषयात दांडी गुल झाली. श्रीकांत पहिला आला होता, कसा कोण जाणे. अभ्यास तर मी त्याच्या बरोबर आणि त्याच्या व्यतिरिक्त सुध्दा केला होता. शरमेची गोष्ट होती पण मला आता कधी नव्हती ती एटीकेटीची सवय करून घ्यावी लागणार होती. तसं बघायला गेलं तर राखीव जागा असलेल्या मुलांत सरळ पास होत जाण्याची प्रथा नव्हती आणि मी पण ती मोडण्याला कारण झालो नाही. रोशन पण बहुदा दोन विषयात फेल असणार कारण आम्ही दोघेही लेक्चर अटेंड करत होतो. श्रीकांत विनाकारण आमच्या लेक्चरना येऊन बसत असे. प्राध्यापकांना संशय आला असणार कारण त्यांनी एक दोन वेळा आम्ही बोलत असताना रागाने पाहिले.

तिसऱ्या वर्षात पदार्पण करायला श्रीकांतने माझ्यावर खूप मेहनत घेतली. म्हणजे तो मला कॉलेजच्या वाचनालयात एकट्याला बसवून सिनेमाला जात असे आणि शिवाजी पार्क जिमखान्यावर खेळून आल्यावर रँकेट फिरवत तोंडी उजळणी घेई. त्याच्या तोंडून रोशनशी झालेल्या गाठीभेटी मला कळत. त्याच्याकडूनच रोशनने परीक्षेत सपशेल आपटी खाल्याचे मला समजले. रोशन आता कॉलेजला येईनाशी झाली होती. श्रीकांत सुध्दा बऱ्याचदा बेपत्ता असे. मधेच एकदा रोशन कॉलेजला येऊन गेल्याचे समजले. कॉलेजमध्ये तिचे लग्न लंडनमधल्या कोणा पारशी डॉक्टर बरोबर ठरल्याच्या वावड्या उठल्या.
श्रीकांतचा काही पत्ता नव्हता.

अचानक एके संध्याकाळी श्रीकांत बीडीडीत आला. मामी दळण आणायला गेली पाहून मी सुमीची टिंगल उडवत होतो आणि सुमी बोबड्या स्वरात भांडत होती. श्रीकांतने स्कूटर वर बसण्याची खूण केली. भरधाव वेगाने स्कूटर चालवत तो मला मलबार हिल वर घेऊन गेला. पोर्णिमा होती आणि चंद्र वर आला होता. बराच वेळ आम्ही दोघे चंद्र प्रकाशात न्हाऊन निघालेल्या शहराकडे न बोलता बघत बसलो. श्रीकांत उठला आणि त्याने एका बंगल्याकडे बोट दाखवलं “ रोशनचं घर.“ त्या दोन शब्दात सर्व काही आलं. मला कळत नव्हतं की रोशनच्या लग्नाचं जास्त वाईट कोणाला वाटतंय, श्रीकांतला का मला!

बशीतला चहा संपला आणि मी घेतलेल्या जोरदार भुरक्याच्या आवाजाने मीच दचकलो. श्रीकांत माझ्याकडे टक लावून पहात होता. त्याने शांतपणे मी बशी दूर सारे पर्यंत वाट पहिली आणि म्हणाला “ ब्रिटीश साम्राज्याचा जरी अस्त झाला असला तरी कॉमनवेल्थ अजून आहे आणि राणीच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर तिसऱ्या महायुद्धाची नांदी होईल. तेंव्हा राणीचे संरक्षण ही काही लहानसहान बाब नाही.”
हे मात्र खरच मला माहित नव्हतं. श्रीकांतचा राणीविषयीचा आदर पाहून मी सुध्दा गेली काही वर्षं मराठी पेपर मधील तिची आलेली चित्रं कापून ठेवत असे. पण बऱ्याच दिवसांनंतर माझ्या लक्षात आले की राणीचे सारे फोटो एकाच तऱ्हेचे आहेत म्हणजे तो ठीक न शोभणारा मुकुट आणि कधी सिंहासनाच्या डाव्या बाजूने तर कधी उजव्या बाजूने काढलेले. कधी एक उभा राहिलेला माणूस तिच्या बरोबर असे जो म्हणे राजा नव्हे आणि एक तसाच दिसणारा माणूस कधी कधी असे ज्याला राजकुमार म्हणत. खरा राजकुमार इतका विद्रूप असतो हे मला त्या चित्रांवरून उमजले. राणी बरीच वर्षे राज्य करत होती, अगदी माझ्या जन्मा अगोदरपासून आणि तिची एकंदरीत तरतरीत प्रकृती पहाता, राजकुमार कधी राजा बनेल असे वाटत नव्हते. या सर्वपरिचित गोष्टी जरी मला माहित असल्या तरी राणीचा आणि तिसऱ्या महायुद्धाचा परस्परसंबंध मला कसा ठाउक असणार? मी धीर करून श्रीकांतला म्हटलं “ अरे पण ते कसं शक्य आहे?”
श्रीकांतला दिलेलं आव्हान तो स्वीकारणार नाही असं कसं होईल?
“ का नाही? मी म्हणतो का शक्य नाही?” श्रीकांतचा आवाज जरा चढला पण आजुबाजुला बघून लगेच त्याने स्वतः ला सावरले.
टेबलावर पुढे झुकून तो म्हणाला “ सध्याच्या जीओपोलीटीकल, म्हणजे भौगोलिक व राजकीय परिस्थितीचा अभ्यास केल्यावर हाच धोका संभवतो. मी माझ्या अहवालात त्याचेच विवरण केले आहे. बाकी लंडन वर अवलंबून !” त्याच्या बोलण्यात थोडा निराशेचा सूर लागला.
त्याला चिअर अप करण्यासाठी मी म्हणालो “ रिपोर्ट खूप मोठ्ठा आहे का? “
त्यावर श्रीकांत म्हणाला “ तुला कळणार नाही, पण तुझ्यापासून काय गोपनीय ठेऊ?”
अतिशय हळुवारपणे त्याने लेदर बँगची साखळी सोडवली आणि बँगवर असेलेले आकड्यांचे कुलूप उघडले. बँगेतून एक फाईल काढून माझ्या हातात दिली. मी सुध्दा आपण एक स्फोटक पदार्थ हाताळतो त्या काळजीपूर्वक फाईल उघडली आणि त्यातले कागद उलटू लागलो, पण मला तर सारे कागद कोरेच दिसत होते “
मी अचंब्याने श्रीकांतकडे पाहीलं “ मला तर काहीच दिसत नाही, फक्त कोरे कागद !” मी उद्गारलो.

“हां ! म्हटलं नाही तुला काही कळणार नाही म्हणून?” श्रीकांत फाईल परत बँगेत ठेवत म्हणाला.
“ अदृश्य शाई ! न दिसणाऱ्या शाईने लिहिलाय अहवाल. तुला कसा दिसेल? आणि दिसला तर त्यात गुप्त काय?”
“ पण श्रीकांत, तू हा रिपोर्ट कुठे आणि कसा पोचता करणार आहेस?” मला चिंता वाटू लागली.
“ डोन्ट वरी माय फ्रेंड. मी पाठलाग चुकवून दादरला उतरलो. आय एस आय ची मंडळी फसली असणार. आता मी टँक्सी घेऊन जाईन. कॉन्सुलेटच्या मागे गल्लीत एक लाल बॉक्स आहे. त्यात ही फाईल टाकणार. बॉक्स रात्री बरोबर बाराला उघडला जाईल व विमानाने फाईल लंडनला रवाना होईल. “ श्रीकांतने मला धीर दिला. “ चल. वेळ दवडून चालणार नाही “ श्रीकांत उठला .
“ आणि हो!” श्रीकांत पार्टिशन पाशी थबकून हळू आवाजात बोलला “ तो वेटर इराणी खबऱ्या आहे. आपण सुरक्षित असल्याची माहिती काही वेळातच स्कॉटलंड यार्डला पोहोचेल. बघ.”
आम्ही केबिनच्या बाहेर पडलो. दुपार होत होती आणि हॉटेलात तुरळक लोकं होती. वेटरचा पत्ता नव्हता. पैसे द्यायला काऊंटर पाशी उभे होतो. मालकाने मोठ्ठ्याने हाक दिली “ इस्माईल. बिल कितना?”
इस्माईल किचन मधून डोकावला आणि ओरडला “ एक इसम, तो मस्का पाव, दो आमलेट, दो चाय, पैतालीस पचास “
मी पन्नास रुपयांची नोट काऊटरवर टाकली आणि म्हणालो “ बाकी खबऱ्याको देना. “
मालक माझ्याकडे वेडयासारखा बघत राहिला.
बाहेर पडताना श्रीकांत म्हणाला “ पाहिलंस? खबरे सुध्दा किती काळजीपूर्वक वागतात ते? नाहीतर तू. भर गर्दीत हाका मारत सुटतोस ”
मी त्याला फोन नंबर विचारला तेंव्हा तो म्हणाला “ दिवाकर, मी सुरक्षिततेसाठी सतत नंबर बदलत असतो. तुला कोणता देणार ? मीच करेन तुला, केईएमला. “
श्रीकांतला लगेच टँक्सी मिळाली आणि पुन्हा लवकरच भेटण्याच्या आश्वासनानंतर तो टँक्सीतून रवाना झाला. त्याच्या टँक्सीच्या मागोमाग आणखी दोन टँक्सी भरधाव जाताना मला दिसल्या पण मला खात्री होती की आय एस आय च्या लोकांना श्रीकांतला गाठणे अशक्य आहे.
खूप उशीर झाला होता आणि आता केईएमला जाण्यात काही अर्थ नव्हता. मी यार्डात शिरलो. “पंजाब मेल ” लिहिलेली गाडी पाण्याच्या फवाऱ्याने धुण्याचे काम चालले होते. शांतपणे एका स्वच्छ बोगीत चढून मी माझा जेवणाचा डबा उघडला.

माघ महिन्यात मी बोहोल्यावर चढलो. कळव्याला गेल्यापासून सुमी मला जास्त आवडायला लागली होती. खरं सांगायचं तर रोशन एवढी काही ती सुंदर नव्हती, तिचे डोळे सुध्दा जरा तिरळे होते पण तिच्या डोळ्यात एक निरागसता होती. श्रीकांतबद्दल तिने माझ्याकडून असंख्य वेळा ऐकलं असेल तरीही पुन्हा पुन्हा ऐकताना ती एकटक पाही आणि गोष्ट संपल्यावर लहान मुलं टाळी वाजवतात तश्या टाळ्या वाजवी. तिच्या लक्षात आले होते की आमचे लग्न होतेय म्हणून कारण ती खूप खुश दिसत होती. फेरे घेताना अचानक थांबून तिने हॉलच्या दाराकडे पाहीले आणि टाळया वाजवायला सुरुवात केली “श्रीकांत, श्रीकांत “ मी पाहिलं तर दारातून कोणीतरी मोठ्ठा पुष्पगुच्छ आणत होतं. मी सुमीला म्हटलं “येईल, नक्की येईल.“
समारंभात कधीतरी मामानं एक फोटो कार्ड आणून दिलं. त्यावर बकिंगहॅम पँलेसचा फोटो होता.
गिचमिड मराठी अक्षरात त्यावर लिहिलेलं होतं “ प्रिय दिवाकर, अपरिहार्य कारणामुळे तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही याचा खेद आहे. तुझे आणि सुमीचे वैवाहिक जीवन सुखाचे जावे यासाठी खूप शुभेच्छा. रोशनला विसरण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. तू पण विसर. तुझा आजिवन शुभचिंतक आणि मित्र, श्रीकांत. लंडन “
मी कार्डावरचा शिक्का पहिला. एक वरळी पोस्टाचा होता आणि दुसरा कळव्याचा.
मी हसलो आणि स्वत:शीच पुटपुटलो “श्रीकांत तरी असा आहे नं!”

------******--------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथेबद्दलचे औत्सुक्य शमले असलेतरी प्रतिसादांबद्दलचे औत्सुक्य वाढते आहे.

......सोमवारी हापिसे उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेला वाचक

अहो खूपदा डोळे वाचतात पण मेंदू वाचत नाही. कथा वाचतांना वाचकाच्या मनात एक प्रकारचा आकृतिबंध उदयास येत असतो. त्याच्याशी सुसंगती साधण्याकडे वाचकाचा कल असतो. त्याविरुद्ध काही वाचनात आलं तर तुमच्यासारखे काही वाचक दुसरा आकृतिबंध शोधतात, तर काही जण विसंगतीकडे दुर्लक्ष करतात. नवीन लेखकाची शैली असेल, किंवा इतर काही कारण म्हणून.

......
थोडक्यात काय तर कुणाची ट्यूब कशी पेटेल ते सांगता येत नाही.

>>
एग्झॅक्टली! माझी आकलनाच्या पातळीबद्दलची पोस्ट ह्या अर्थाची होती. कुणीतरी उगीच उपरोधिक वगैरे असल्याचा रंग त्याला दिलाय आणि लगेच नंदिनीची पोस्ट की "असे बोलण्याचा व त्याला उत्तर देण्याचा मला सराव नाही इ."

उलट मी तर नंदिनीला इतके वाईट कशाचे वाटतेय असे कुणीतरी विचारल्यावर तिच्या बाजूचेच स्पष्टीकरण दिलेय वरच्या कुठल्यातरी पोस्टीत. माबोवर समोरासमोर बोलणे नसल्याने हा असला सावळो गोंधळ कायमचाच आहे. Sad

असो.

टुनटुन, तुझा ग्रेड नक्की काय आहे हे कळला. मी तुझ्या अधात ना मधात तरी देखील तू मधे पडते आहेस!

नंदीनी, तुझे मला आणि माझे तुला कळत नाही आहे असे दिसते. मी तुझ्यशी जेंव्हाही बोलायला गेलो तेंव्हा आपले भांडण झालेले आहे. त्यात मंजूडी, टुनटुन खतपाणी घालतात.

>>मला वाटले श्रीकांत ला तो गुप्तहेर आहे आणि पुढील सर्व घटनांचा भास होतोय..आणि म्हणुन तो लंडन असे जरी पत्राखाली लिहितोय तरी ते पत्र खर वरळीतुन आलेय..

मला पण असेच वाटले - "एक इसम" हा उल्लेख वाचूनही. नंदा प्रधानची आठवण मलाही झाली.

>>कथेबद्दलचे औत्सुक्य शमले असलेतरी प्रतिसादांबद्दलचे औत्सुक्य वाढते आहे.

भरत Happy

आम्हाला शेतीतले काहीच कळत नाही, तर खत कुठुन आणणार? आणी पाण्याचा दुष्काळ असतांना पाणी कुठुन घालणार्?:फिदी:

कथा मस्त.

एक आवर्जुन सांगावे वाटते - सर्वांना सर्वच समान पातळीवर कळते असे नसते. त्यामुळे कोणी जास्त स्पष्टीकरण मागितले तर चालवुन घ्यावे.

गेल्या आठवड्यापासून प्रतिसाद देऊ देऊ म्हणत राहून जात होतं.
सुरुवातीला एकदाच वाचल्यामुळे श्रीकांत ही व्यक्ती अस्तित्वातच नसून ते दिवाकरच्या मनाचे खेळ आहेत हे अजिबातच लक्षात आलं नाही, शंकाही आली नाही. >>>एक इसम, तो मस्का पाव, दो आमलेट, दो चाय, पैतालीस पचास >> ह्याकडेही विशेष लक्ष दिलं नाही. शेवटच्या वाक्यावरुन काहीतरी गडबड आहे हे कळलं पण थोडक्यात कथा अजिबात कळली नाही. प्रतिसादांमुळे कळायला मदतच झाली.

फायनली रोशन खरी का खोटी ?

स्कूटरवर श्रीकान्तच्या मागे बसून जाणं खटकलं. श्रीकान्तला मागे बसवून जास्त सयुक्तिक झालं असतं. अर्थात अख्खा प्रसंगच काल्पनिक असं म्हणायचं असेल तर ठीक आहे. (देवराईमधे एका नाटकात काम केल्याचा प्रसंग आहे तसा.)

लेखकाची हितगुज दिवाळी अंक २०१२ मधिल "अज्ञातवास" कथा जास्त आवडली पण त्या कथेला फारसे प्रतिसाद नाहित बहुतेक ग्रुप वेगळा आहे म्हणुन असेल. लेखकाची "रिप्ले" कथा पण कळायला कठिण आहे.

कथा अफाट आहे. Happy
माझाच मुर्खपणा फार कॅ़युअली वाचलेली.
नंदिनीचे आभार कारण तिच्यामूळे मी कुठे हुकलेलो ते लक्षात आलं. Happy

आताच काही दिवसापुर्वी A Beautiful mind movie मध्ये असाच काहिसा प्रसन्ग पाहिला. त्या मुळे कथा लगेच समजली.Just want to clearify the character is not exactly Schizophrenic.... may be he suffering from Hallucinations.. which is one of the symptoms of schizophrenia

लई भारि गोष्ट आहे.
मला पण आधी श्रिकांतच्या वर्णनापर्यन्त दिवाकर भूत असेल असे वातले होते. मग ते राणी वगैरेमुळे श्रिकान्त स्किजो असेल असे. आणि मग रोशनच्या उल्लेखामुळे कळले.. तरी आधी नानबाच्या आणि मग नंदिनिच्या पोस्टमुळे नीट कळले.
प्रतिसाद फार आवडले. किती मोकळेपणाने भान्डताय यार! लगे रहो मुन्नाभाय.. Happy

कथा आणि कथेवरची चर्चा (चीरफाड नव्हे) आवडली. एकाच कलाकृतीकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातुन कसे बघता येते ते कळले.

अर्थातच केजिबी, सिआयए किंवा तत्सम उल्लेख आले की कळतेच.... पुढे बाँडटाईप कथा असेल तरी स्क्रिझो.. वगैरे वाटेल की काय अशी शंका आहे...

बी | 30 November, 2012 - 12:33
नंदीनी, तुला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता पण तू कितीतरीवेळा आगपाखड करतेस ह्याचे तुला काहीच नाही वाटत ह्याचे मला नवल वाटते कारण तुला जर ही कथा साहित्य वगैरे कळत असेल तर माणसामाणसाच्या भावनाही कळत असतील.

दुसरे असे की इथे सगळेच जण घरी बसून कथा वाचत नाहीत. मला मायबोली कधीच एकांतात वाचायला मिळत नाही. सदैव लोकांची ये जा सुरुच असते. तीही ऑफीसमधे. त्यामुळे कित्येकदा मी लिंक तोडून तोडूनच वाचन करतो. अशा कथा वाचायच्या म्हणजे तो एकांत हवा असतो तो नाही मिळाला की कळत नाही. घरी जेंव्हा परत येतो तेंव्हा निवांत वेळ मिळायला १२ वाजतात रात्रिचे. माझ्यासारखे इथे अनेक जण असतील.

ही वस्तूस्थिती तू लक्षात घे. तू अगदी रिकामटेकडी असे मला सुचवायचे नाही आहे.

---> हा हा हा … अशक्य हसलो …. पुण्याचे दिसताय …
"बी" तुमच्या कडे लोकांना हसवायाची कला आहे…
आय इन्सिस्ट तुम्ही एक विनोदी कथा घ्याच लिहायला …

बाकी प्रकाश कर्णिक यांची कथा अप्रतिम… जबरदस्त लिहिली आहे… टोप १० मध्ये आहे …

Pages