रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते

Submitted by बेफ़िकीर on 26 November, 2012 - 05:10

रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते
लेखणीच्या यौवनाला आवरावे लागते

आशयाचे थेंब गुंते सोडुनी झटकायला
मन तुझ्या केसांप्रमाणे विंचरावे लागते

यामुळे सत्यात नाही फारसा दमवत तुला
की तुला स्वप्नातसुद्धा वावरावे लागते

रोज संध्याकाळचा मी डगमगत जातो जिथे
चालतो जो नीट त्याला सावरावे लागते

होइतो प्रत्यक्ष धोका मी तरी हे मानतो
वर्ष तर प्रत्येक धोक्याचे सरावे लागते

मैफिलीसाठी नको धाडूस तू बोलावणे
बैठकीसाठी मनाला अंथरावे लागते

गाठला हा वास्तवाचा काठ की भीतीमुळे
तीव्र ओहोटीप्रमाणे ओसरावे लागते

यापुढे आयुष्य बहुधा याचसाठी राहिले
जे इथे केलेस ते ते निस्तरावे लागते

त्या जगामध्ये मिळावा जन्म एखादा जिथे
मी तुझ्यासाठी न काहीही करावे लागते

चार शिंतोडे कुणाला दाखवत आहेस तू
ऐन वैशाखात ज्याला पाझरावे लागते

दिवसभरच्या दगदगीने गार पडलेली मने
एकमेकांना मिठीने पांघरावे लागते

आज झाली दोन वर्षे जाउनी आई तुझी
'बेफिकिर' हो, पोरकेपण विस्मरावे लागते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच आवडली.

एकेक बहारदार शेर आहेत.

मैफिलीसाठी नको धाडूस तू बोलावणे
बैठकीसाठी मनाला अंथरावे लागते
>>>
आआहा!!

बेफिकीर, प्रतिभेचे यौवन दाखवणारी ही अत्यंत सुंदर रचना..असा वसंतकाळ तुमच्या प्रगल्भ लिहिण्याचा जाणवत आहे. तो नव्या प्रयोगांचाही आहे. आम्हा वाचकांना खूप आनंददायी.शेवटचा आईचा उल्लेख एकदम वेगळ्या आर्ततेच्या पातळीवर नेणारा. लेखन शुभेच्छा.

मात्र शब्द ' षोडशा ' हाच बरोबर आहे,

गझल चांगली आहे तरी मुद्दाम कोट करावा असा एकही शेर सापडला नाही.
मला काफियांची उधळण वाटली, त्यामुळे निवडक ६-७ शेर ठेवले असते तर अधिक प्रभावी वाटली असती.
शुभेच्छा!

गझल चांगली आहे तरी मुद्दाम कोट करावा असा एकही शेर सापडला नाही.>>>

नचिकेत,

हे अधिक विस्ताराने लिहाल तर बर्‍याच लोकांना(गझलकार्/रसिक) एक दृष्टीकोन मिळावा असा एक अंदाज त्यामुळे तसे लिहावेत अशी विनंती. आपल्यासारख्या गझलकाराचे विचार सर्वांना नक्कीच मोलाचे ठरतील.

कृपया हा उपरोध समजू नयेत अशी विनंती. आम्हाला(विशेषतः मला) ह्या विषयांवर(गझलेसंदर्भातील) तुमच्याशी नव्या पिढीतील एक चांगले गझलकार म्हणून चर्चा करायचीच होती/आहे. इतर ज्येष्ठ आणि आजच्या गझलकारांशी अधूनमधून ह्या चर्चा होत रहातात. आपल्याशी चर्चेचे ही गझल निमित्त समजून मत मांडावेत ही विनंती करतो.

धन्यवाद

षोडशा बरोबर आहे की शोडषा? Wink मला वाटतं दोन्ही पोटफोडे हवेत.

सोळावं लागलेल्या मायबोलीची कविता आहे का ही?

प्रचंड आवडली गझल....

अवांतरः

एकच शंका आहे. फक्त षोडशा म्हणजे सोळावं लागलेली कन्यका. तिला पुन्हा पंधरावं कसं लागतं? काहीतरी घोळ आहे>>>

भूषणराव तसे नेहमीच आकड्यांचे घोळ घालतात ..... Proud Light 1

रोज बहराला स्वत:च्या सावरावे लागते!
लेखणीच्या यौवनाला आडवावे लागते!!

मतला असा करून पाहिला भूषणराव!
कारण षोडशेस पंधरावे लागणे........तितके भावले नाही!
किंवा
यौवनाच्या पालवीला सावरावे लागते!
बहरलेल्या लेखणीला आडवावे लागते!!

कुठलाही बहर "आडवता" कसा येतो सतीश जी? बहरणे ही अतिशय नैसर्गिक स्वाभाविक प्रक्रिय ना? आवर घालण्याची तरलताच जास्त सुशोभनिय आहे

आडवणे म्हणजे इथे अर्थ आहे मुरड घालणे, बोचेल/खुपेल/डोळ्यावर येवू नये म्हणून/ नजर/द्रुष्ट लागू नये म्हणून मुरड घालणे.
एक बहराचा शेर देतो........
बांधून चाळ, वारा नाचे चहूकडे.....
चौफेर गंध झाला, झाकू कसा बहर?

>>रोज रात्री शोडषेला पंधरावे लागते
गझलेत गणित डोकावले की अर्थाचा हिशेब लागत नाही... Happy बहुदा असेच काहीसे हा शेर वाचून शंका ऊपस्थित करणार्‍यांचे झाले असावे.
मी हा शेर वाचला तेव्हा एक "अनुभूती" जास्त जाणवली.. कारण वाचताना "रात्री" हा शब्द या शेराचा पिव्होट/टेकू आहे असे वाटले.. . कारण दुसरी ओळ या शेराला अधिक गर्भीतार्थ देते-

"लेखणीच्या यौवनाला आवरावे लागते..."

माझ्यापुरता अर्थ असा जाणवला: प्रगल्भ्/मॅचुअर (वयात आलेली या अर्थी) लेखणीमध्ये ऊत्साह, ऊन्माद, ताव, क्षणिक ऊचंबळा, याला लगाम घालून नेमके काय व कसे लिहावे याची समज आलेली असते. त्या ऊलट निव्वळ यौवन अवस्थेतील लेखणी म्हणजे काय तर त्या वेळी जे जसे वाटते, सुचते, मनाला रुचते, सुखावते, ते लिहून मोकळे व्हायचे (जसे यौवन सहज असते नैसर्गिक असते.. ते विचारपूर्वक प्रकट होत नाही... आपसूक होते..).. थोडक्यात एक आपल्याला आलेली "समज" याशी प्रामाणिक असते तर दुसरी आपल्या "भावनेशी"... प्रगल्भ लेखणीच्या/लेखकाच्या मनात मात्र ते द्वंद्व चालूच असते, कारण यौवनातील सहजता त्याला व्यक्त होताना अधिक अपिलींग वाटत असते.

आता या पार्श्वभूमीवर पहिली ओळ वाचली तर असे जाणवते की १५ व्या वयातून १६ व्या वयात जाताना- त्या अर्थी "रात्र" हे त्या संक्रमणाचे कालाचे प्रतीक.. बहुतेक वयात येणार्‍या त्या मुलीला (१६ व्या वर्षी मुलगी वयात येते असा सर्वसाधारण शास्त्रीय तर्क्/समज) वयात आल्यानंतर मात्र १५/१६ च्या त्या सीमेवरील भाव भावना अधिक खुणावत असतात... थोडक्यात मनाची एक दोलायमान स्थिती... एक अर्धवट संक्रमीत अवस्था जिथे संवेदना, सहजता, ही १५ वर्षाच्या मनाची असते पण शारीरीक स्थिती मात्र १६ व्या वयात येण्याच्या ऊंबर्‍यावर ऊभी असते.. म्हणून प्रत्त्येक रात्र ही जणू पुन्हा त्या मुलीला आपण पुन्हा १५ चे भावविश्व जगावे असे वाटत असते.

अगदीच अजून अ‍ॅडल्ट एक्स्ट्रापोलेशन करायचं तर संभोगाच्या परमोच्च क्षणाच्या आधी आणि नंतर या मधला जो "अनुभव" आहे, तो जो ऊत्कट क्षण आहे, जो आर्तता व पूर्तता यांमधली एक पुसटशी सीमारेषा आहे.. तो क्षण अधिक भुलावतो.. त्यातही "पहिल्याच" संभोगाच्या वेळी (जसे १५ ओलांडुन १६ मध्ये प्रवेश हा पहिल्यांदाच व एकदाच होणार असतो) हा अनुभव, भविष्यातील नंतरच्या अनुभवांपेक्षा, निश्चीतच अधिक वेगळा, अधिक पाक, अधिक पवित्र, अधिक परीपूर्णतेचा असावा.

थोडक्यात एखाद्या संक्रमणाच्या आधीची आर्तता व संक्रमणानंतर आलेला संपूर्तीचा अनुभव याच्या मध्ये जे काही दोलायमान आहे, जे काही ऊस्फूर्त आहे, जे काही ऊर्मीशी प्रामाणिक आहे, त्या भावनेकडे पुन्हा ओढले जाणे...

अगदी तोच भाव संबंध मला वाटते या दोन ओळीत आहे.. दोन्ही ओळी एकत्र वाचल्या तरच हा शेर खर्‍या अर्थाने संपूर्ण व आकर्षक ठरतो. अन्यथा नुसते १६ नंतर परत १५ कसे हे कोडे पडायची शक्यता अधिक Happy

आता माझ्या त्रोटक ज्ञानानुसार या दोन्ही ओळी अकर्तृक भावे प्रयोग वगैरे वाटत आहेत... थोडक्यात हटके व्याकरण व हटके शेर...

रच्याकने: जरा साधं सोपं सरळ लिहीत चला हो बेफिकीर... Happy

योग यांचा प्रतिसाद आजच, पण झोप झाल्यावर वाचेन. नो ऑफेन्स!

प्रोफेसर साहेब -

>>>मतला असा करून पाहिला भूषणराव!<<<

कसाही करून पाहा, माझी हरकत नाही

योग ह्यांचा प्रतिसाद फार आवडला.

शेराचे अगदी यथार्थ रसग्रहण.

कविता वाचताना वाचकाकडेही एक जबाबदारी असते असे म्हणतात. शिवाय कवीला काय म्हणायचे आहे हे प्रत्येकवेळी प्रत्येक वाचकाला जसेच्या तसे समजेलच असेही नाही.

षोडशा च्या शेराबाबत अर्थाच्या बाबतीत उगाचच गोन्धळ उडवू नये सही सही शेर अहेत तो मी वर एका प्रतिसादात अर्थ सान्गीतलाय बेफीजी ही म्हणाले बरोबरय म्हणून (षोडशा हा शब्द कसा लिहितात ते मलाही नक्की माहीत नाही)
____________________________________
आपण दिलेला पर्याय मूळ नेहमीप्रमाणेच फरच फडतूस अन अगदीच अनावश्यक आहे याची देवपूरकरानी प्लीज नोन्द घ्यावी
____________________________________
यत्रीजी प्रतिसाद अगदीच हेतुपुरस्सरतेने दिलात !! काही लोकाना चान्गले ते चान्गले म्हणयला काय जाते ते मला कळत नाही
ही गझल उगाचच नावे ठेवावीतशी नाही आहे शेर छानच अहेत कफिये अन रदीफ समर्थतेने हाताळलीय प्रत्येक शेरात खयाल अतीव सुन्दर अहेत
यात्रीजी शायर कोण हे पाहण्याऐवजी मीतरी त्याचा शेर काय योग्यतेचा आहे हे पाहतो तसेच प्रतिसाद देणारी व्यक्ती कोण यापेक्षा मुद्दा काय हे अधिक महत्त्वाचे मानतो
तुमचा मुद्दा अत्यत्न्त चुकीचा वाटतो आहे नसेल तर पटवून द्याच ही विनन्ती
त्यामुळेच...................
कणखरजीन्च्या प्रतिसादास सर्वतोपरी समर्थन
त्यान्च्या चर्चेच्या प्रस्तवास विचारपूर्वक अनुमोदन

योग जी राग मानू नये प्रतिसादात कल्पनाविस्तर = पाल्हाळ जरा जास्त झालेय

षोडशेस पन्धरावे लागणे =एक वर्षाने ती अधिक तरुण होणे मी माझ्या प्रतिसादात दिले आहेच बेफीजी म्हणले तसे चौदहवीका चान्द हा पौर्णिमेच्या पेक्षा अधिक सुन्दर असतो......बरोबरय करण त्यात वाढ होणार आहे उद्या अन तो पूर्ण होणार पण त्यानन्तर मात्र पुन्हा कमी कमी होत जाणार म्हणून १४ चा चन्द्र हाच खरा सर्वाधिक सुन्दर १५ चा नाही
मी जो कडेलोट शब्द वापरलाय तो चपखल आहे १५वे वर्ष त्या मानाने यौवनाचा कडेलोटच

अतिशय पर्फेक्ट खयाल कवीची व्यावहारिक अन बौधिक प्रगल्भता भावनीकतेतून उतरवणारा खयाल

विजयजी, तुमची कळकळ (उपरोधाने म्हणत नाहीये) पोचली. गझल आवडणे/ न आवडणे हा फारच वैयक्तिक भाग झाला असं माझं मत. दृष्टिकोन वगैरे म्हणाल तर ते प्रत्येकाचे स्वतंत्रच असावेत. खुद्द माझ्या गझलेमधला मला किंवा इतरांना फार आवडलेला शेर तुम्हाला कोट करावासा वाटला नाही, हे अनेकवेळा झाले आहे. आणि दरवेळी चर्चा करून मतं बिंबवणं शक्यही नसतं आणि ते योग्यही नाही! तरीही, 'प्रत्येकाची आवड वेगळी' असा स्टँड घेऊन प्रत्येक चर्चा संपवायच्या नसतात हे ही बरोबर आहे. तेव्हा, भेटू तेव्हा याबद्दल नक्की बोलू. तूर्तास हा विषय संपवायला हरकत नसावी.

बहुतेकवेळी आवडलं तरच मी प्रतिसाद देतो. या गझलेबद्दल अपवाद करावा वाटला. पण ते (इतरांना) आवडलेलं दिसत नाहीये.

अवांतर - तुमच्या स्वत:च्या गझलेबद्दल माझ्या एखाद्या प्रतिक्रियेची अशी दखल घेतलीत तर अधिक आनंद होईल.
"आपल्यासारख्या गझलकाराचे विचार सर्वांना नक्कीच मोलाचे ठरतील"
>> इतका मी मोठा नाहीये हे आपणही जाणताच. त्यामुळे गैरसमज नसावाच! Happy

धन्यवाद!

तुमच्या स्वत:च्या गझलेबद्दल माझ्या एखाद्या प्रतिक्रियेची अशी दखल घेतलीत तर अधिक आनंद होईल.>>>

घेतली नाही असे कधी झालेय का राव! वेळ असेल तर माझ्या लेखनातल्या आपल्या प्रतिक्रीया आणि त्यावरचा माझा अ‍ॅप्रोच पुन्हा एकदा पहावात.

बहुतेकवेळी आवडलं तरच मी प्रतिसाद देतो.

अगदी योग्य अ‍ॅप्रोच आहे. फक्त आपण गझल चांगली आहे असे म्हटलात म्हणून अधिक जाणण्याची इच्छा झाली. माझ्या दृष्टीने 'चांगली असणे' हे सापेक्ष मत असू शकत नाही, 'आवडली/न आवडली' हे सापेक्षच असते.

इतका मी मोठा नाहीये हे आपणही जाणताच. त्यामुळे गैरसमज नसावाच!

आपला गैरसमज झाला बहुधा. इथे लहान मोठ्याचा प्रश्न नाही. फक्त भूमिका जाणून घेण्याचे औत्सुक्य होते इतकेच. असो, प्रत्यक्ष भेटीत बोलूयात म्हणताय तर अवश्य बोलू. असा योग लवकरच यावा अशी प्रार्थना.

दुखावले गेला असाल तर क्षमस्व!

अवांतरः माझी गझल, ह्याची गझल, त्याची गझल ह्या गोष्टींमधे मला इंटरेस्ट नाही. आपण माझा इथला वावर जाणताच त्यामुळे अधिक सविस्तर भेटीतच बोलू.

मतल्याचा सरळ गद्यात समजलेला अर्थ असा.......
तारुण्यात आलेली लेखणी (षोडशा....हा बोध सानी मिसरा वाचल्यावर होतो/ समजून घ्यावा लागतो....गैर काहीच नाही यात) दररोज रात्री जरा जास्तच तरूण होते, जणू तिच्या यौवनाला/बहराला मुरड घालायला लागतो!
असा मनातील विचार आहे काय की रात्र झाली की, शायरास निवांत वेळ मिळतो चिंतनास, ज्यामुळे त्याच्या लेखणीस जणू बहर येतो, लिखाण करायला, इतका की, कवीस वाटते की अशा वाळेस जोश असतो पण होश असणे/भान असणे हे त्यामुळे महत्वाचे आहे! नुसताच निवांत आहे, मूड लागतो आहे, लिहिण्याचा उचंबळ दाटतो आहे, अनावर होत आहे, म्हणून काहीबाही लिहिणे वा बरळणे बरोबर नाही. म्हणूनच तर कवी लेखणीच्या यौवनाला आवरावे लागते रोज रात्री असे म्हणत आहे.

टीप: इतक्या साध्या अर्थाला षोडशेला पंधरावे वर्ष लागते म्हणून उगाचच शेर शब्दबंबाळ व विवाद्य वाटत आहे!

म्हणून आम्ही मतल्याची अभिव्यक्ती बदलून पाहिली
वैभवा!
आधी निर्दोष, अर्थपूर्ण व सकस चार मिसरे तरी आपणास लिहिता येतात का, ते पहा व मग दुस-यांच्या शेरांवर सूज्ञ व संसदीय भाषेत जो काय विरोध करायचा तो कर! अर्थात आपल्या म्हणण्याचे समर्थन करता येत असेल व तेवढी नैतीक हिंमत असेल तरचा हा प्रश्न आहे!

योगजींचे स्पष्टीकरण एकामार्गी व काल्पनीक वाटले!

>>योग जी राग मानू नये प्रतिसादात कल्पनाविस्तर = पाल्हाळ जरा जास्त झालेय
वैकु,
हरकत नाही... षोडशा, यौवन, असे "ऊत्तेजनार्थ" शब्द गझलेत आल्याने रसग्रहणात दोन ओघळ जास्त झाले.

षोडशेला पंधरावे लागल्यामुळे गझलकारांना नववा लागल्याचे दिसत आहे.
>>>>>>>>>>>>>>

तेरावं घालतेय का कोणी...... कावळा टपून बसलाय Proud

आधी निर्दोष, अर्थपूर्ण व सकस चार मिसरे तरी आपणास लिहिता येतात का, ते पहा>>>>>
देवसर : माझे तसे मिसरे अनेक आहेत !! तुम्हाला दिसत नसतील (पहायचेच नसतील )तर माझा कय दोष ??
.......... म्हणतात ना पर्यायी गाढवाला ओरीजनलच्या गुळाची चव काय!!!!

चार शिंतोडे कुणाला दाखवत आहेस तू
ऐन वैशाखात ज्याला पाझरावे लागते

आज झाली दोन वर्षे जाउनी आई तुझी
'बेफिकिर' हो, पोरकेपण विस्मरावे लागते
>>>> सहीये!

व्वा..! सुंदर गझल..!!

आज झाली दोन वर्षे जाउनी आई तुझी
'बेफिकिर' हो, पोरकेपण विस्मरावे लागते
.....
.....
स्तब्ध..!

वा! क्या बात है! अप्रतिम. एक शेर आवडला म्हणून पुढे जावं तर आणखिनच बहार. शेवट तर काळजालाच हात घालणारा !

Pages