तुलना

Submitted by रसप on 26 November, 2012 - 01:27

छाती फुगवुन माझ्यासोबत करू कुणाची तुलना ?
माझ्याशी मी करून हरतो रोज स्वत:ची तुलना !

जागृत आहे कुणी तर कुणी नवसाचाही आहे
पिढ्या-पिढ्या देवासोबत चाले देवाची तुलना

सौंदर्याच्या प्रसाधनांची हावच ज्याला त्याला
मुखडा पाहुन केली जाते मना-मनाची तुलना

तू असल्याची खात्री पटते डोळे मिटल्यानंतर
परिस्थितीशी नकळत होते मग स्वप्नाची तुलना

हात पकड, चल तुझ्या मंदिरी आज तुला मी नेतो
होउन जाऊ दे देवासोबत भक्ताची तुलना

आत्ताच्या ह्या क्षणात आहे बरेच जगण्यासाठी
वाया जाइल क्षण करण्याने आज-उद्याची तुलना

....रसप...
५ नोव्हेंबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/blog-post_26.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू असल्याची खात्री पटते डोळे मिटल्यानंतर
परिस्थितीशी नकळत होते मग स्वप्नाची तुलना
आवडला.

सहजपणा आवडला तरी बाकी गझल फारशी भावली नाही. रोजच्या जगण्यातील गोष्टीही शेरामध्ये सांगता येऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे ही गझल..

खयाल छानय्त
रदीफेमुळे जरा बन्धन आले असे वाटते प्रत्येक शेराच्या खयालात ती 'बसवली' (ओढून ताणून )गेली आहे असे वाट्ले किम्बहुना शेर काहीसे रदीफ-अनुगामी वगैरे वाटले

माझे हे वैयक्तिक मत आहे चुकीचे असल्यास क्षमस्व

गझल न आवडण्यासारखी नक्कीच नाही
मक्ता सर्वाधिक आवडला

तू असल्याची खात्री पटते डोळे मिटल्यानंतर
परिस्थितीशी नकळत होते मग स्वप्नाची तुलना >>> मस्तच

काही काही खयाल मस्त आहेत बाकीच्या शेरातील

तू असल्याची खात्री पटते डोळे मिटल्यानंतर
परिस्थितीशी नकळत होते मग स्वप्नाची तुलना

आत्ताच्या ह्या क्षणात आहे बरेच जगण्यासाठी
वाया जाइल क्षण करण्याने आज-उद्याची तुलना<<<

विशेष आवडले हे शेर. छान गझल.

धन्यवाद

छाने.

हरेकासवे करून बघतो रोज स्वत:ची तुलना!
अतुलनीय मी! माझ्याशी होणार कुणाची तुलना?

वाहवा!!! छान गझल. सगळेच शेर चांगले झाले आहेत.

छाती फुगवुन माझ्यासोबत करू कुणाची तुलना ?
माझ्याशी मी करून हरतो रोज स्वत:ची तुलना !

छान Happy

जागृत आहे कुणी तर कुणी नवसाचाही आहे
पिढ्या-पिढ्या देवासोबत चाले देवाची तुलना

तू असल्याची खात्री पटते डोळे मिटल्यानंतर
परिस्थितीशी नकळत होते मग स्वप्नाची तुलना

आत्ताच्या ह्या क्षणात आहे बरेच जगण्यासाठी
वाया जाइल क्षण करण्याने आज-उद्याची तुलना ...व्वा!!

हे तीन शेर आवडले..!

गझल आवडली. "तुलना" हा रदीफ आवडला. गझल लिहिताना थोडी तंत्राशी झटापट करावी लागल्याचे वाटते आहे. पण ती करावीच लागते काहीवेळा. अन्यथा प्रयोग करण्याची क्षमता निघून जाईल/जाइल. Happy