आयना का बायना - म्यूझिक लाँच वृत्तांत

Submitted by कौतुक शिरोडकर on 25 November, 2012 - 23:17

नेहमीच्या व्यापात सकाळीच आनंदमैत्रीचा उर्फ आनंद चव्हाण याचा फोन.
पहिलाच प्रश्न, "संध्याकाळी साडेसातला रिकामा आहेस का?"
म्हटलं,"काय विशेष?"
"म्यूझिक लाँच आहे."
"कोणता सिनेमा?"
"माहीत नाही. वरळीला जायचंय."
"वरळीत कुठे?"
"माहीत नाही."
"जे माहीत आहे ते सांग."
"मायबोली माध्यम प्रायोजक आहे."
"मी वृतांत लिहिणार नाही."
"तो मीही लिहिणार नाही. येशील की नाही, ते सांग."
"जाऊया."

दुसरा फोन.
"येताना कॅमेरा घेऊन ये."
"माझा कॅम आणि हॅन्डीकॅम दोन्ही उधारीवर गेलेत."
"बरं."
"एक काम कर. प्रमोदला सांग, तो घेऊन येईल". प्रमोद म्हणजे पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडीचा भाऊ. सहतंत्रदिग्दर्शक म्हणून ’एकापेक्षा एक’, ’फूबाईफू’सारख्या अनेक कार्यक्रमांतील पडद्यामागचा कलाकार.

तिसरा फोन.
"बोला."
"चिनूक्स बोलतोय."
"बोल."
"तू आणि आनंद मिळून वृत्तांत लिहाल ना? सचिन खेडेकर आणि इतर मंडळीना सिनेमाबद्दल काही प्रश्न विचारुन घे. छोटी मुलाखत वगैरे......."
"बरं." इथे मनातल्या मनात काही वाक्यं बोलल्याचं आठवतय. पण वाक्यं आठवत नाहीत.

या तीन संवादांनंतर आम्ही तिघे संध्याकाळी साडेसातला वरळीच्या 'मेफेयर'ला पोहोचलो. चहा ही अत्यंत गरजेची गोष्ट तिथे जवळपासच्या टप्प्यात न मिळाल्याने आलेली प्रवासाची मरगळ घालवण्यासाठी 'काय घ्यावं?' यावर विचारविनिमय केला. पण माध्यम प्रायोजकांचे आपण प्रतिनिधी आहोत, तेव्हा थोडं जबाबदारीने वागून आधी आत जावं, असं सर्वानुमते ठरलं. तोवर सिनेमा 'आयना का बायना' आहे हेही कळालं होतं. या सिनेमाचं पोस्टर मला फार अपील झालं.

aaynakabaynaposter.jpg

दुर्दैवाने अजून आम्ही या इंडस्ट्रीच्या संस्कृतीमध्ये रुळलेलो नसल्याने साडेसात म्हटल्यावर साडेसातला पोहोचलो होतो. काही तुरळक मंडळी हजर होतीच. गेल्यागेल्या दिग्दर्शक समित कक्कडला भेटू, असा आनंदमैत्रीचा धोशा होता. पण फोन लागला नाही, तेव्हा मायबोलीचे प्रतिनिधी हजर असल्याचा समस त्यांना सर्वसंमतीने धाडण्यात आला, त्यास 'suuper' असे उत्तर ताबडतोब आले. आता ते आनंदाने की उपहासाने, हे आम्हांला कळलेच नाही. पण तिघांनी आपापल्या परीने हवा तो अर्थ लावून घेतला. आत गेल्यागेल्या उजव्या हाताला केलेली जेवणाची सोय होतीच आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुख्य हॉलमध्ये 'पिण्याची' सोय होती. 'अ‍ॅन्टीक्विटी'च नाव स्पॉन्सर म्हणून झळकत असल्याने 'घेतल्याशिवाय जाईना' ही टॅगलाईन वास्तवात येणार, याचा अंदाज आलाच.

बायदवे, 'आयना का बायना'चा अर्थ चारोळीस्पर्धेच्या बाफवर कुणीतरी विचारला होता. त्याचं थोडं स्पष्टीकरण. कोळी समाजात होळीला फार महत्त्व आहे. आख्खी रात्र होळीची राखण करत जागणारे दुसर्‍या दिवशी मेहनताना घेण्यासाठी जेव्हा घरोघरी जातात तेव्हा गावकर्‍यांनी चालढकल न करता आपली होळीची भेट आपल्याला द्यावी, अशी त्यांची माफक अपेक्षा असते. पण तरीही दार उघडल्यावर कुणी म्हणतं की 'आय' (आई) नाही घरात, तर कुणी म्हणतं 'बाय' (बाईमाणूस) नाही घरात. या अशा चालढकलीमुळे आपला हिस्सा कमी होतो, या भावनेतूनच या घोषणेची निर्मिती झाली. आय ना का बाय ना, घेतल्याशिवाय जाय ना. इति सामान्यज्ञान पुरवणी समाप्त.

तर आम्ही चहाची तहान कोल्ड्रिंकवर भागवली. एव्हाना पत्रकारांनी आणि न्यूज चॅनलांच्या प्रतिनिधींनी मोक्याच्या जागा पटकावल्या होत्या. काही नवोदित चेहरे, विशेषतः मुलींचे, मनमुराद बागडत होते. (त्यामुळे मरगळ आपसूकच कमी झाली.) कोणत्या ना कोणत्या रत्नपारख्याची नजर पडून पुढेमागे आपणही रुपेरी पडद्यावर झळकूच, असा आत्मविश्वास त्या मुलींच्या हालचालीत सहज दिसत होता. या ललनांपेक्षा चॅनलच्या नवोदित वार्ताहरच जास्त नयनमनोहर आहेत, असं आमचं एकमत मात्र सेकंदाच्या हजाराव्या हिश्श्यातच झालं. हे अस असतं. ज्यांनी जिथे असायला हवं त्या व्यक्ती भलत्याच क्षेत्रात जातात. ज्या मुलीने पडद्यावर आपल्या अदा दाखवत रडावं, हसावं, नाचावं.. ती मुलगी हातातला लांबूडका माईक एखाद्याच्या तोंडासमोर धरत विचारते,"सर, तुम्हांला काय वाटते याविषयी?" त्या सराच्या मनात असलं तरी तो तिच्याविषयी बोलण्याएवजी भलत्याच विषयी बोलत बसतो.

काही दंडबैठका मारून आलेले 'मस्क्यूलर मॅन' त्यांच्या पिळदार दंडांचे दर्शन घडवत फिरत होते. तेही कदाचित भविष्यात आपलं मनोरंजन करण्याच्या उदात्त हेतूनं तिथे आलेले असावेत, असा माझा ग्रह आहे. साडेसातचा कार्यक्रम भारतीय प्रमाणवेळेएवजी भारतीय सिनेजगताच्या प्रमाणवेळेनुसार सुरु होईल, याची एव्हाना कल्पना आली होतीच. न्यूज चॅनेलांच्या पत्रकारांनी मुख्य दालनाच्या बाहेरील दालनात आलेल्या एकेका कलाकाराला गाठून बोलतं करायला सुरुवात केली. कॅमेरे इतके होते की कोण कुणाची मुलाखत घेतोय तेच कळत नव्हतं. 'सागरिका'वाले सविता मालपेकरांची मुलाखत घेत असताना दुसरा न्यूज चॅनेलवाला कॅमेरा सांभाळत त्यांच्यामधून बाहेर पडला. त्यामुळे त्यांनी चिडून सविता मालपेकरांना घेऊन सरळ बाहेर पाऊल ठेवलं आणि चक्क मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर मुलाखतीला सुरुवात केली. आता मुख्य जागाच त्यांनी अडवल्याने त्यांना मुलाखत दिल्याशिवाय पुढे जाण्याची कोणत्याच कलाकाराला मुभा नव्हती.

हळूहळू बरेच ओळखीचे चेहरे जमायला लागले. संतोष जुवेकर, क्षिती जोग, जयंत वाडकर, विजय पाटकर, मनवा नाईक, स्मिता तांबे, सचित पाटील, राजू पाटील, श्रीरंग गोडबोले, गीता गोडबोले वगैरे... प्रत्येकजण आल्याआल्या कॅमेर्‍याला बळी पडत होता. शुभेच्छा, अभिनंदनाला पूर आला होता. वातावरण खेळीमेळीचं होतं. मुलाखती दणक्यात सुरु होत्या. सचिन खेडेकर न कंटाळता दिलखुलासपणे प्रत्येक चॅनेलला उत्साहाने मुलाखत देत होते. सिनेमातील त्यांची भूमिका, एकंदरीत कथाप्रवाह वगैरे. इतर गोष्टी नेहमीच्याच असल्या तरी त्यांच एक वाक्य आवडलं. "मला निवेदन करायला आवडतं, कारण मला संगीत आवडतं. सिनेमा करायचं मुख्य कारण तेच."

मागच्या वर्षी जेव्हा मी "खल्लास.. डान्स एकच चान्स" हा शो ’मी मराठी’साठी करत होतो, तेव्हा त्या कार्यक्रमातील एक मास्टर सिद्धेश पै हे अधूनमधून गायब असत, ते याच सिनेमासाठी. या सिनेमात सिद्धेशची फार महत्त्वाची भूमिका आहे. सिद्धेश मित्र असल्याने त्याच्यापासूनच सुरुवात केली. त्याने कथेची थोडीफार पार्श्वभूमी सांगितली. त्याच्या स्वतःच्या आयुष्यात रिअलिटी शोला फार महत्त्व आहेच. या सिनेमातही त्याचं चित्रीकरण असल्याने एक वेगळा रिअलिटी शो केल्याचं त्याला समाधान मिळालं. खरतरं चॅनल शो आणि सिनेमा ह्या दोन्ही माध्यमांतील कॅमेर्‍याचा वापर वेगळ्या पद्धतीने होत असल्याने खूप काही शिकायला मिळालं, असही तो म्हणाला. या सिनेमात काम करण्याचे श्रेय मात्र त्याने त्याचा मित्र रोहन रोकडे, जो या सिनेमाचा नृत्य दिग्दर्शक आहे, त्याला आणि दिग्दर्शक समीत कक्कड यांच्या आईवडिलांना दिलं. रिअलिटी शोंचा स्पर्धक म्हणून सुरुवात केलेल्या सिद्धेशने फार मोठी मजल मारली आहे. लवकरच तो मुक्ता आर्ट्‌स्‌चा नवीन सिनेमा दिग्दर्शक म्हणून करणार असल्याची बातमी त्याच्याकडून मिळाली.

चहलपहल चालू आहे आणि अजून म्यूझिक लाँचला वेळ आहे. तेव्हा थोडी कल्पना सिनेमाबद्दल. बालगुन्हेगारांना सुधारगृहात पाठवल्यानंतर त्यांच्याकडे जग फक्त गुन्हेगार म्हणूनच पाहतं. पण त्या गुन्ह्याला परिस्थिती कारण असते. जन्मत:च कोणी गुन्हेगार नसतो, पण जन्मत:च तो कलाकार असू शकतो. ज्यांच्याकडून कसल्याच अपेक्षा करता येणार नाहीत, अशा बालगुन्हेगारातील नृत्याचे गुण हेरून त्यांना एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला जातो. अशी ९ मुले या सिनेमाचे मुख्य हिरो. या सुधारगृहाचे वॉर्डन असतात श्री. सचिन खेडेकर. त्या नवरत्नांपैकी एक प्रवीण नायरच्या शब्दात सांगायचं झालं, तर 'काकस्पर्श’नंतर या सिनेमात दिसणारा सचिन खेडेकर यांचा मेकओव्हर अविश्वसनीय आहे.

नवरत्नांचा जल्लोष चालूच होता. त्यातील प्रत्येकाने आजवर अनेक डान्स शो गाजवले आहेत. पण त्या सगळ्यांचा हा पहिलाच सिनेमा. त्यामुळे प्रत्येकाचा उत्साह उतू जात होता. प्रत्येक चॅनलला मुलाखत देताना "आयना का बायना, घेतल्याशिवाय जाईना" हा जयघोष पुन:पुन्हा ऐकू येत होता. एकदोनदा त्यांनी तिथेच नृत्याची एक झलक पण दाखवली.

akb1.JPG

साधारण नऊ - सवानऊनंतर सदाबहार सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांनी पोडीयमचा ताबा घेतला. "आईच्या हृदयाच्या ठोक्यांच्या तालावर गर्भातल्या बाळाच्या नृत्याचं पहिलं पाऊल पडतं. नृत्याचा वारसा असा जन्मजात असतो." या वाक्यानेच हा सिनेमा कशाशी बांधील आहे याची जाणीव करून दिली. त्यानंतर नवरत्नांनी ’आयना का बायना’ या शीर्षकगीतावर ताल धरला. नृत्याचा एक बहारदार अविष्कार सादर झाला. नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव हजर नसले तरी रोहन रोकडे होते.’बुगीवुगी’चा पाचवेळा विजेता असलेल्या या कलाकाराचा हा पहिलाच सिनेमा. त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाला त्याने सार्थ केल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर झळकत होता. त्यानंतर सिनेमाची एक जबरदस्त झलक. पुन्हा सूत्रसंचालक मंचावर. म्यूझिक लाँच असल्याने जितेंद्रने सर्वप्रथम मंचावर आमंत्रित केलं ते संगीतकार जोडीला. अजीत परब आणि समीर. पाश्चात्य नृत्यशैलीची मनमुराद लयलूट असल्याने संगीतही त्या धाटणीचं देण्याची जबाबदारी या दोघांवर होती. दोघेही या संगीताचं श्रेय एकमेकांना देत असताना जितेंद्रने एक गौप्यस्फोट केला. या सिनेमातील पाच गाणी जितेंद्रने लिहिली आहेत. जेव्हा त्याला गाणी लिहिण्यासाठी पाचारण करण्यात आलं, तेव्हा त्याने कथेच्या मागणीबद्दल विचारलं. तर त्याला सांगण्यात आलं की, सिनेमाची गाणी शूट झालेली आहेत. संगीत तयार आहे. आता गाण्यांचं चित्रीकरण पाहून फक्त शब्द भरायचे आहेत. असा प्रकार पूर्वी ’ब्लॅकमेल’ सिनेमातील 'पल पल दिल के पास' या गाण्याच्या बाबतीत झाला होता म्हणे. ती तारेवरची कसरत जितेंद्रने व्यवस्थित पार पाडल्याचं प्रशस्तीप्रत्रक संगीतकाराने दिलं. आपण गाणी ऐकल्याशिवाय असं प्रशस्तीपत्रक द्यायचं नाही, यावर एकमत झालं. यावेळी जितेंद्रने ठासून दिग्दर्शकाला आव्हान दिलं की, आज मेरे हात मे माईक है मै चून चूनके बदला लुंगा.

त्यानंतर मंचावर आगमन झालं दुसरे गीतकार बाबा चव्हाण यांचं, ज्यांनी शीर्षकगीत लिहिलंय. मग छायाचित्रकार संजय जाधव यांनी अननुभवी मुलांबरोबर काम करताना झालेल्या त्यांच्या कसरतीची माहिती दिली. कारण फ्रेमचं ज्ञान कुणालाच नव्हतं. 'किती त्रास झाला?' या जितेंद्रच्या पुढच्या प्रश्नावर जाधव म्हणाले की, ही मुलं परवडली, पण हा दिग्दर्शक नाही. त्यावेळी एक अनुभव त्यांनी शेअर केला. सिनेमाचा पहिलाच सीन, पहिलाच टेक. टेक ओके झाला आणि दिग्दर्शक समित कक्कड संजय जाधव यांना म्हणाले,"आपला जो तिसरा सिनेमा आहे ना त्यात..." त्यावर जाधव म्हणाले,"आधी पहिला तरी सुरू होऊ दे." थोडक्यात या सगळ्या गप्पाटप्पांमध्ये दिग्दर्शक समित कक्कड यांनी कसं छळलं, याचा जास्त आढावा घेतला जात होता. मुळात बदला घेण्याची ही वेगळीच कन्सेप्ट जितेंद्रने राबवली. त्याने सांगितलं की, या माणसाचं, म्हणजे दिग्दर्शकाचं समाधानच होत नाही. उदा., तो घरातून बाहेर पडताना आरशासमोर जातो, पण त्याला तो लुक आवडत नाही. तो पुन्हा आरशासमोर येतो. मग ते ठीक वाटतं. तिसर्‍यादा 'चालेल' ही श्रेणी. चौथ्यांदा 'नाईस' आणि पाचव्यांदा ' अब जा सकते है'. तोच माणूस, तोच आरसा पण पाच प्रयत्न. स्वतः जितेंद्र पहिल्या गाण्याची ओळ सुचली तेव्हा त्याला रात्री दीड वाजता भेटायला गेला होता. दिग्दर्शकाने पेट्रोलचे पैसे दिले, हेही त्याने कबूल केले. त्या पाच गाण्यांसाठी तो स्वतः बराच बागडला असल्याने, जितेंद्र प्रत्येकालाच दिग्दर्शकाने किती बागडवलं, हेच विचारत होता. जितेंद्र जोशीच्या हजरजवाबी सूत्रसंचालनामुळे वाक्यावाक्याला हंशा आणि टाळ्या होत्याच. कलादिग्दर्शक वासू पाटील यांनी 'प्रत्येक सेट दोनदा उभारायला लागला, काही सेट्‌स्‌ २५ वेळा पाहावे लागले', असं सांगतानाच हेही सांगितलं की 'हात जरी माझे असले तरी कल्पना दिग्दर्शकाच्या होत्या.'

निर्माते घरचेच असल्याने जितेंद्रने श्री. अमर कक्कड यांना विचारलं,"सिनेमाचं बजेट अपेक्षेपेक्षा जास्त वाढलं. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती?" त्यावर ते म्हणाले,"मैं तो कुछ बोल ही नही सकता. खामोश हूं|" यानंतर श्रीमती पुष्पा कक्कडसुद्धा 'खामोश' राहिल्या. प्रवीण नायरला जेव्हा विचारलं, तुला काय वाटतं या चित्रपटाबद्दल, तेव्हा तो म्हणाला, "वर्षभरापूर्वी मी आईला म्हणालो की, मी सिनेमात काम करतोय. तिला आनंद झाला. त्यानंतर वर्षभर तिने मला काहीच विचारलं नाही." यावर जितेंद्र म्हणाला,"चालयचंच. समितच्या आईने तरी त्याला कुठे काय विचारलंय? " (आपण दोन तास १० मिनिटांत बघून उठतो, त्या सिनेमामागे अनेकांची वर्षादीडवर्षाची मेहनत असते, स्वप्ने असतात. त्या सिनेमाची आपण सहज तासाभरात चिरफाड करतो. कारण प्रेक्षक म्हणून आपल्या अपेक्षा जर ते पूर्ण करु शकत नसतील, तर त्यांनी या क्षेत्रात असूच नये, असं आपलं एक ठाम मत असतं. असो.)

सिद्धेश पै म्हणाला,"मला पहिल्यांदा समितजी भेटले तेव्हा त्यांनी स्पष्टच सांगितलं, की ये नही चलेगा. ये क्या करेगा? पण श्रीमती पुष्पा कक्कड यांनी माझ्यावर विश्वास ठेवला." यावेळेस जितेंद्रने पटकन प्रेक्षकांकडे वळून "मी बोललो होतो ना!" असा लूक टाकला. सिद्धेश पुढे असं म्हणाला,"मी प्रत्येकाला हेच विचारायचो, की मी नेमकं काय करू, कारण पहिल्यांदाच कॅमेर्‍याला सामोरं जात होतो. माझ्या हातात पटकथा दिली गेली. मी समितजींना म्हणालो की, आधी दिली असती तर मी पाठ केलं असतं. पण त्यांनी तो सीन करायला लावला. पहिल्याच टेकमध्ये सीन ओके झाला. नंतर समितजी म्हणाले की, स्क्रीप्ट आधी दिली असती तर तू अभिनय केला असतास. मला इमोशन्स्‌ हवे होते."

या नवरत्नात एक अखिलेश विश्वकर्मा नावाचा मुलगा आहे. याच्या घरच्यांना त्याच्या या नृत्याबद्दलच्या पॅशनचा तिटकारा आहे. इतका की संपूर्ण सिनेमाचं शूटींग त्याने घरी न सांगता केलंय. त्याही वरची कडी म्हणजे म्यूझिक लॉंचलासुद्धा तो घरी काही न कळवता आला होता. आपल्या भावना व्यक्त करताना त्याच्या स्वरांत आनंद आणि त्याच्या आयुष्यातल्या अत्युच्च क्षणी त्याचे घरातले त्यात सामील नसल्याने होणारं दु:ख, या दोहोंचा मिलाफ होता.

व्हिडीयो पॅलेसचे नानुभाई, सुरेशभाई यांनाही मंचावर पाचारण करण्यात आलं. फक्त शीर्षकगीत ऐकूनच गाण्याचे हक्क घेतल्याचं नानुभाईंनी सांगितलं. मुख्य कारण म्हणजे इतर गाणी लिहिलीच गेली नव्हती, फक्त चित्रीत झाली होती.

त्यातच सचिने खेडेकर यांना 'पितृतुल्य' म्हणत जितेंद्र जोशींनी मंचावर पाचारण केलं.
"तू मला पितृतुल्य म्हणालास?" हे पहिलचं वाक्य सचिन खेडेकरांचं.
"नऊ मुलं आहेत ना सिनेमात... त्यांच्यासाठी पितृतुल्य." जितेंद्रने बाजू सावरली.
"या तरुण मुलांबरोबर काम करताना आपणही तरुण झाल्याचा फिल आला", असे खेडेकरांनी सांगताच मीही 'यापुढे फक्त लहान मुलांबरोबरच काम करेन' असं मनाशी ठरवलं. "हा सिनेमा मी स्वीकारलाच नव्हता. ती भूमिका आणि इतर अनेक बाबी (म्हणजे नृत्य असावं कदाचित!) आपल्याला शक्य होतील की नाही, ही शंका होती. पण समित फार मागे लागला, आणि ही भूमिका मी स्वीकारली याचं मला समाधान आहे." यावर जितेंद्र प्रेक्षकांना म्हणाला," या सिनेमातील पाच मिनिटांच्या एका दृष्यात तुम्ही सचिनजींना पाहा, त्यांच्या अभिनयक्षमतेची आपल्याला कल्पना येईल."
"अननुभवी मुलांबरोबर काम करताना कसं वाटलं?" या जितेंद्रच्या प्रश्नावर सचिनजींनी फार सुंदर उत्तर दिलं. "अननुभवी? अजिबात नाही. ते त्यांच्या कलेत इतके पारंगत आहेत, त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव इतके सहज आहेत, की मी प्रयत्न करूनही इतके जेन्यूइन भाव आणू शकत नाही. एखादी कला तुमच्यात असली तरी त्याला लागणार्‍या इतर गोष्टी आपोआप स्पर्शून येतात. त्यामुळे त्यांना अभिनय येतच नाही, असं मी म्हणूच शकत नाही."

akb2.JPG

सरतेशेवटी महागुरू सचिन पिळगावकर मंचावर आले. त्यांनी माईकचा ताबा घेतला आणि पुन्हा एकदा नव्याने सगळ्यांची ओळख परेड झाली. "मी वयाच्या दुसर्‍या वर्षापासून नृत्य सुरु केलं", या वाक्याने महागुरूंनी सुरुवात करताच मी दचकलो. इतक्या वर्षांचा इतिहास आता 'कमिंग अप' आहे की काय, या भीतीने. पण महागुरूंनी माझा हिरमोड केला. "पूर्वी नृत्यदिग्दर्शकाच्या तालावर नाचायचो आणि आता बायकोच्या तालावर नाचतो", असं म्हणून इतिहास दोन वाक्यात संपवला. माझ्या आणि त्यांच्या इतिहासाची दुसरी बाजू तंतोतंत जुळते, याचा मला उगाच आनंद झाला. महागुरूंनी निर्माते अमर कक्कड यांनी मुलावर दाखवलेल्या विश्वासाला दाद दिली. 'माझी मुलं' अशी त्यांनी नवरत्नांची ओळ्ख करून दिली. गाणी लिहून न घेता आधीच रेकॉर्ड करण्याचं कारण त्यांनी समित कक्कडला विचारताना, हल्ली संगीतकार वेळेत गाणी करुन देत नाहीत, म्हणून असं करावं लागलं का अशीही टोपी उडवून मोकळे झाले. ’पडोसन’ सिनेमातील 'मेरी प्यारी बिंदू' हे गाणं सिनेमात नव्हतं, ऐनवेळी किशोरदाने सिच्यूएशनला पकडून ते गाणं केलं आणि नंतर मग ते रेकॉर्ड करण्यात आलं, ही आठवण त्यांनी सांगितली. सगळ्यांची खिल्ली उडवत असलेल्या जितेंद्रला त्यांनी सोडले नाही. "म्यूझिक रिलिजला बोलावून माझ्या हातात विमोचनासाठी काहीच दिलं नाही", म्हणत त्यांनी त्याची विकेट काढली. आपण 'ज्येष्ठ कलाकार सचिन खेडेकर' यांचे फॅन असल्याचे सचिन पिळगावकर यांनी आवर्जून सांगितले.

त्यानंतर सचिन पिळगावकर यांनी सीडीचं विमोचन केलं. पुन्हा एकदा गाणी, नृत्य आणि मुलाखतीच्या फैरींना सुरुवात झाली आणि जितेंद जोशी यांनी प्रेक्षकांना बाहेरच्या जेवणावर आणि आतल्या पेयांवर मनसोक्त आडवा हात मारण्याची अनुमती दिली.

सिनेमातील मुख्य कलाकार अमृता खानविलकर या येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे काही लोकांचा हिरमोड झाल्याचे ऐकिवात आहे. असो.

एकंदरीत या सिनेमात पडद्यावर हिंदीमराठी कलाकारांची जशी सरमिसळ आहे तशीच पडद्यामागेही आहे. निर्माते, दिग्दर्शक अमराठी असले तरी त्यांनी सिनेमावर फारच मेहनत घेतली आहे, हे ट्रेलरवरून लक्षात आलंच. मराठीत अठरा विदेशी नृत्यप्रकार असलेला हा पहिलाच सिनेमा असावा. गाण्यातही हिंदी, मराठी, इंग्रजीची सरमिसळ आहे. खर्‍या अर्थाने याला कॉस्मोपोलिटीन सिनेमा म्हणायला हरकत नाही.

एकंदरीत कार्यक्रम सुंदर झाला. मनसोक्त खाणं पिणं झालं.

एक अनपेक्षित संध्याकाळ या निमित्ताने हाती आली. मित्रमैत्रिणींची भेट झाली. त्याबद्दल मी मायबोलीचे जाहीर आभार मानतो.

निघेपर्यंत अकरा वाजून गेले आणि घरी पोहोचेपर्यंत एक वाजल्याने चिनूक्सच्या नावाने बोटे मोडण्यात आली, हेही जाहीर करतो.

9_0.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कौ, फक्कड्च लिहीतोस .. मजा येतेय वाचायला.. काही कामामूळे अर्धेच वाचलेय... शॅल बी राईट बॅक Wink अजून एकदा प्रतिसाद देणार... बादवे आयना का बायना चा अर्थ फारच इंटरेस्टींग आहे

मस्तच लिहिलाय हा वृत्तांत.
>>> 'घेतल्याशिवाय जाईना' >>> Biggrin

मला शक्य नव्हतं त्यामुळे मी उपस्थित राहू शकले नाही. पण चिनूक्सचा फोन आला त्यावेळी साडेसात ते साडेआठ जमलं तर जावं असा एक विचार होता. म्हणजे साडेसात ते साडेआठ या वेळात तिथे काही घडलंच नाही तर!

इथे मनातल्या मनात काही वाक्यं बोलल्याचं आठवतय. पण वाक्यं आठवत नाहीत. Rofl

मीही 'यापुढे फक्त लहान मुलांबरोबरच काम करेन' असं मनाशी ठरवलं. >> Lol
मस्तच!

सिनेमा बघायलाच हवा Happy

मस्तच वृत्तांत...

ट्रेलर्स खत्रा आहेत.. डान्स जबरदस्त.. ए एक्स एन वाहिनीला अश्याच ग्रुप डान्सचा रीअ‍ॅलिटी शो चालु होता मध्यंतरी..

चारोळी स्पर्धा.. आणि .. मायबोली कृपेने मला पुण्यात चित्रपट बघायची संधी लाभेल असं वाटतयं. Wink
मला कधी येणार फोन? Uhoh Proud

चटपटित, कुरकुरीत, खमंग वृत्तांत.

सिनेमाची उत्कंठा चांगलीच वाढवलीस की......

धमाल वॄ..!

तर 'काकस्पर्श’नंतर या सिनेमात दिसणारा सचिन खेडेकर यांचा मेकओव्हर अविश्वसनीय आहे.>> वाह..

'हात जरी माझे असले तरी कल्पना दिग्दर्शकाच्या होत्या.' >> सह्ह्ही!! तू जे काही लिहीलं आहेस त्याने चित्रपटाबाबतच्या अपे़क्षा खरंच वाढल्यात, असा चोखंदळ दिग्दर्शक काय घेऊन येईल हे पहायचंय.

खर्‍या अर्थाने याला कॉस्मोपोलिटीन सिनेमा म्हणायला हरकत नाही.>> वाह... मराठी पाऊल पडते पुढे, असेच म्हणेन Happy

वृ एकदम मस्त... पंचेस टाकायची सवय चांगलीच भिनलिये. Happy

फोटो इतकेच काढलेत काय?
अमृता खानविलकर आली नाही म्हणून तुमचा हिरमोड झाला, मान्य. पण संतोष जुवेकर येऊनही तुम्ही त्याचे फोटो काढत नाही आणि इथे टाकत नाही,
त्याने आमचाही हिरमोड होतो याची कृपया नोंद घ्यावी. Proud

कौतुका.. तुझे करावे कौतुक तितके कमी... बाकी हा 'आयना का बायना..' माबोकरांच्या उडयांवर बेतलाय अशी अफवा आहे... Proud सो बघायलाच हवा...
बाकी सिद्धेश, रोहन ह्या दोघांची नावे ऐकूनच बरे वाटले... त्या डान्स इंडीया डान्सच्या सिद्धेशने तर म्हणे ह्या चित्रपटासाठी रेमोच्या 'ABCD' ह्या डान्सपटाकडे पण पाठ फिरवली..

कौतुक, सिनेमाचा सिनेमा दाखवलास, अनुभवला समारंभ खरोखर Happy
"मी वृतांत लिहिणार नाही." >>>>> सिक्स्थ सेन्स यालाच म्हणतात काय ? Proud

पण संतोष जुवेकर येऊनही तुम्ही त्याचे फोटो काढत नाही आणि इथे टाकत नाही, >>>> दक्षे एक फोटो आहे ना ? काय अल्बम करतेयस काय त्याचा Wink

Pages