त्रिपुरी पौर्णिमेचं दीप-दर्शन

Submitted by pkarandikar50 on 25 November, 2012 - 10:01

त्रिपुरी पौर्णिमेचं दीप-दर्शन

त्रिपुरी पौर्णिमा शिव आणि विष्णु या दोन्ही देवांविषयीच्या पुराणकथांतून महत्वाची मानली गेली आहे. त्रिपुरासुर नावाचा एक शक्तिशाली राक्षस विष्णूचा परमभक्त होता. विष्णुच्या कृपेने त्याला तीन 'पुरे' म्हणजे अवकाशात विहंग करू शकतील असे अभेद्य 'किल्ले' मिळाले होते. त्यात बसून तो कुठेही जाउन हल्ला करू शकत असे. त्याने भूतलावर उच्छाद मांडला. पौराणिक प्रथेप्रमाणे मग त्याला इंद्रपद मिळवण्याची महत्वांकाक्षा उत्पन्न झाली. त्याने देवांविरुद्ध युद्ध छेडलं. त्याचा बंदोबस्त कसा करावा या चिंतेत देव पडले. नारद मुनींनी त्रिपुरासुराला जाऊन सांगीतलं की देवभूमीवर स्वारी करण्याअगोदर तू कैलासावर हल्ला कर आणि शंकराचा पाडाव कर. त्यानंतर तुला आपसूकच देव शरण येतील आणि तुला इंद्रपद प्राप्त होईल. ते ऐकून त्रिपुरासुराने कैलासावर स्वारी केली. तपभंग झाल्यामुळे संतप्त झालेल्या शंकराने त्रिपुरे भेदली आणि त्रिपुरासुराला कंठस्नान घातलं. तो दिवस म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा. तेंव्हापासून शंकराला 'त्रिपुरगौर' असं नाव पडलं आणि त्याचा विजय दीपोत्सवाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.

दुसर्‍या एका कथेनुसार, बळी राजावर विजय मिळवून विष्णु परतले तो हा दिवस, देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो.

याच दिवशी तुळशीचे लग्नही लावलं जातं. त्याची कथा अशी आहे की असुर कुळातल्या जालंधर राजाची पत्नी - वृंदा- महान पतिव्रता होती. तिच्या तपोबलामुळे जालंधराचा पराभव करणं कुणालाही शक्य होत नव्हतं. त्यालाही इंद्रपद मिळवण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि त्याने देवांबरोबर युद्ध सुरू केलं. भयभीत झालेल्या देवांनी विष्णुला साकडं घातलं. जोपर्यंत वृंदेचे पातिव्रत्य भंग होत नाही तोपर्यंत जालंधराचा पराभव करणंशक्य नाही हे विष्णुने ओळखलं. त्याच्या अनुपस्थितीत विष्णु जालंधराचे रूप धारण करून वृंदेकडे गेला. तिला हे कपट ओळखू आले नाही आणि विष्णुने तिचा शीलभंग केला. अशा रितीने तिचे पातिव्रत्य कलंकित खाल्यावर मग विष्णुने जालंधराशी युद्ध करून त्याचा शिरच्छेद केला. हे कपट-कारस्थान वृंदेच्या लक्षात आल्यावर ती संतापाने कृद्ध झाली. तिने सती जाण्याची तयारी केली आणि चितेत प्रवेश करताना विष्णुला शाप दिला की, " तुला जळून खाक झालेल्या रंगाचा - काळा- देह घेऊन अवतार घ्यावा लागेल आणि एका अवतारात तुला पत्नी-वियोग होईल." त्याप्रमाणे पुढे विष्णुला 'शाळीग्राम' रुपात एक अवतार घ्यावा लागला आणि रामचंद्रांच्या अवतारात याला सीता-वियोगही झाला. विष्णुला आधीच आपल्या दुष्ट कृत्याचा पश्चात्ताप झालेला होता त्यामुळे वृंदेने दिलेले शाप त्याने मु़काट्याने स्वीकारले. वृंदेच्या राखेचा एक हिस्सा त्याने आपल्या आंगठ्याखाली चुरडला आणि त्यातून तुळस उत्पन्न झाली. विष्णुने वर दिला की, " इथून पुढे या तुळशीला पवित्र वनस्पति मानले जाईल. लोक आपल्या घराच्या प्रवेश द्वारावर तुळस लावतील आणि रोज तिची पूजा करतील. तसेच पुढच्या जन्मात मी तुझ्याशी विवाह करीन आणि तुला महासतीचा दर्जा मिळेल." तुळशीला 'विष्णुप्रिया' असंही नाव मिळालं. आजही विष्णुची पूजा तुळशीपत्र वाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. शाळीग्रामाच्या अवतारात विष्णुने याच पौर्णिमेच्या दिवशी वृंदेशी विवाह केला. तो सोहळा 'तुळशीचे लग्न' म्हणून साजरा केला जातो.

या झाल्या पुराणातल्या गोष्टी. तसं पाहू गेलं तर हरसाल बारा पौर्णिमा येतात नि जातात. पावसाळी ढगांनी आभाळात दाटी केली तरच एखाद्या पैर्णिमेला चंद्र-दर्शन होत नाही. असे काही सन्मान्य अपवाद वगळता, आपण तो अलौकिक सोहळा दरमहा साजरा करू शकतो पण म्हणून सगळ्याच पौर्णिमा काही एकसारख्या नसतात. प्रत्येक पौर्णिमेला स्वतःचं असं आगळेपण असतं, स्वतंत्र स्वभाव असतो. त्यामुळे कोजागिरीचं सौंदर्य वेगळं आणि त्रिपुरीचं अगदी वेगळं भासतं. कोजागिरी म्हणजे आप्त-स्वकीयांच्या समूहानं एकत्र येऊन करायचा उल्हास असतो तर त्रिपुरी म्हणजे अंतर्मुख होऊन ऐकण्याचं गूढ-गूंजन असतं. एकीकडे उत्फुल्ल रसोत्कर्ष तर दुसरीकडे हळूवार उदात्तता. कोजागिरीला रसपानाची तृष्णा असते तर त्रिपुरेला आत्मानंदाचा आभास आणि विलीनतेची आस. तिथी एकच, चंद्रही तोच पण या दोन पैर्णिमांचे अभिप्राय मात्र अगदी भिन्न.

मी राहतो त्या इमारतीच्या पश्चिम बाजूला हमरस्ता आहे. बस-गाड्या, लहान-मोठ्या मोटारी, महाकाय ट्रक, बांधकामाचे सिमेंट मिक्सर्स आणि इतर अवजड यंत्रं, छोट्या लॉर्‍या,हल्ली ज्यांचा सुळसुळाट झाला आहे त्या बाईक्स, तीन चाकी रिक्षा यांची रीघ त्या रस्त्यावर लागलेली असते. जणू काही गेल्या जन्मीचा सूड उगवत असल्यासारखं सगळेजण त्या रस्त्याला तुडवत, धोपटत असतात. मग रात्री नऊ-दहाच्या सुमाराला त्या वाहनांची रग जिरल्यावर ती वर्दळ हळू हळू थंडावत जाते. पण पूर्व दिशेला मात्र छान हिरवळ आणि बगीचा आहे, त्याच्या काठाला धरून झाडांची रांग आहे आणि त्या पलीकडे कोणतीही ऊंच इमारत नाही. शेती-वाड्या, माळरानं आणि मधूनच एखादं कौलारू घर असा निवांत देखावा अजून तरी टिकून आहे.

काल रात्री त्रिपुरारी पौर्णिमा होती. बाल्कनीत खुर्ची टाकून मी एकटाच बसलो होतो. समोर आकाशाचा एक भला-थोरला तुकडा टांगलेला आणि त्या कॅनव्हासवर मधोमध पूर्णाकृती, लोभसवाणा, अविचल चंद्र .... तोही माझ्यासारखाच एकटा. एरव्ही त्याच्याभोवती लहान-मोठ्या चांदण्यां फेर धरून आपल्याकडे त्याचं लक्ष वेधून घेण्याचा आटापिटा करत असतात पण, काल का कोण जाणे, त्या चंद्राचा व्रतभंग करायला कोणीही जवळपास फिरकलं नव्हतं. काल त्याला स्पर्धा कसलीच नव्हती आणि मलाही. तो आणि मी समोरासमोर असा थेट मामला होता.

एकमेकांशी बोलण्यासारखं, म्हटलं तर खूप होतं, तसं ते नेहमीच असतं, पण कालची रात्र एकमेकांची ख्याली-खुशाली विचारणार्‍या क्षुल्लक संभाषणांची नव्हती. कोणतेही संदर्भ, अर्थ, विकार, वासना नसलेली एक निखळ, नितळ आणि निव्वळ अनुभूती द्रोण भरभरून पिण्याचा तो योग होता. स्वर आणि शब्द यातून आपण रस आणि भाव प्रकट करू पहात असतो पण नाद स्वयंभू असतो, तो स्वतः कसलीच भाव-निष्पती करत नाही, फक्त आपल्या निरामय आस्तित्वाची प्रचिती देत राहतो. तसंच कालचं चांदणं होतं. त्याच्या पाठीवर कसलीच ओझी नव्हती, त्याला कसलाच आगा-पीछा नव्हता. माझ्या आस्तित्वावरून मुक्तपणे ओसंडणं हाच आणि तेवढाच तो एक अनावृत अनुभव होता, त्याला कोणत्याच भाव-भावनांनी लांछित केलेलं नव्हतं.

त्रिपुरी पौर्णिमेला घाटावर जाऊन दीप-दान करण्यामागचा शास्त्रार्थ काय असेल तो असो पण मला तरी वाटतं की दूर कुठे तरी, त्या घनदाट अंधारात कोणीतरी आपली वाट पहात थांबलेलं असतं आणि एक मिणमिणता दिवा पाण्याच्या प्रवाहात लोटून आपण त्या अनामिक आप्ताला एक संदेश पाठवत असतो - ' होय, मला माहीत आहे, एक दिवस मला तुझ्याकडे यायचं आहे. पण सध्या प्रयाणाची तयारी चाललीय. ती झाली की निघणारच आहे.'

माझ्या गावी सिद्धेश्वराचं एक प्रचीन आणि नितांतसुंदर देऊळ आहे. तिथल्या नंदीचं रेखीव, घाटदार शिल्प तर खूपच प्रसिद्ध आहे. मला आठवतं की त्रिपुरी पौर्णिमेला त्या देवळाच्या अंगा-खांद्यांवर तेलाच्या पणत्या लावून सुरेख आरास केली जायची. ती पहायला आईचं बोट धरून लहानपणी मी जात असे.शांतपणे लखलखणार्‍या असंख्य दिव्यांच्या उजेडात त्या शिवालयाचं गंभीर, उदात्त आणि आश्वासक रूप अधोरेखीत व्हायचं. त्यात ना भव्यतेची प्रौढी असायची ना डोळे दिपवणारा श्रीमंती डौल. ते दृश्य अजूनही माझ्या मनात घर करून राहिलं आहे त्या दीप-दर्शनाची सर कोणत्याच रोषणाईला आल्याचं मी पाहिलं नाही.

अलीकडे गणपतीत किंवा नवरात्रात केली जाणारी झगमगीत रोषणाई, संगीताच्या दणदणाटावर उघडझाप करणारी रंगीबेरंगी वर्तुळं, भिरभिरणारी चक्रं आणि चित्रविचित्र आकृत्या पहात राहिलो तर थोड्या वेळानं भोवळ आल्यासारखं वाटतं. मला तरी ती रोषणाई उठवळ आणि छचोर वाटते. मला कोणी संस्कृत आणि प्राकृत यातला फरक विचारला तर मी सांगेन की त्रिपुरी पौर्णिमेला गावच्या शिवालयावर केलेली आरास म्हणजे संस्कृत आणि गल्ली-बोळातून केली जाणारी हल्लीची इलेक्ट्रॉनिक रोषणाई म्हणजे प्राकृत!

काल माझ्या घरी, इमारतीवर किंवा आसमंतात कसलीच रोषणाई नव्हती. त्या स्थिरचित्त आणि शांत-शीतल चंद्राकडे बघताना आत कुठेतरी ज्योती प्रकाशल्याचा पुसटसा भास होत होता. कालचं ते दीप-दर्शन अपूर्व होतं, सुसंस्कृत होतं!

प्रभाकर [बापू] करंदीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मायबोली नियमित वाचते. मायबोलीवर आलेले नवीन धागे मला नवीन लेखनमधे दिसतात.
कृपया इमेलमधे रिक्षा फिरवू नका. ही विनंती आधीही इमेलमधे केली होती पण काहीच फरक नाही म्हणून इथे जाहिरपणे विनंती करावी लागतेय.

' होय, मला माहीत आहे, एक दिवस मला तुझ्याकडे यायचं आहे. पण सध्या प्रयाणाची तयारी चाललीय. ती झाली की निघणारच आहे.' >>>>>

कोणतेही संदर्भ, अर्थ, विकार, वासना नसलेली एक निखळ, नितळ आणि निव्वळ अनुभूती द्रोण भरभरून पिण्याचा तो योग होता. >>>>>>

मला कोणी संस्कृत आणि प्राकृत यातला फरक विचारला तर मी सांगेन की त्रिपुरी पौर्णिमेला गावच्या शिवालयावर केलेली आरास म्हणजे संस्कृत आणि गल्ली-बोळातून केली जाणारी हल्लीची इलेक्ट्रॉनिक रोषणाई म्हणजे प्राकृत! >>>

कालचं ते दीप-दर्शन अपूर्व होतं, सुसंस्कृत होतं! >>>>>

सुंदर लेख. दीपत्कारच घडला की तुम्हाला .....