दुपारची वेळ होती. उन्हाचा चटका वाढला होता. भाजी बाजारात म्हणावी तशी गर्दी नव्हती. बायजा आपल्या भाजीपाल्याच्या दुकानावर बसली होती. पालेभाज्या वाळू नयेत म्हणून मधून-मधून त्यावर पाण्याचा शिडकावा करीत गिऱ्हाइकांची वाट बघण्यात वेळ चालला होता. अलीकडेच बायजाने नगरपालिकेकडून भाजी बाजारात हा आठ-बाय-आठचा गाळावजा ओटा भाड्याने घेतला होता. बायजाचे आता बरे चालले होते. शेजारीच म्हादबाचा गाळा होता. चांगला पोरगा होता बिचारा. वेळीकाळी बायजाला त्याचा आधार असायचा. बायजा म्हादबाला म्हणाली, " म्हादबा, आज काय धंद्याचं खरं दिसत न्हाई बुवा". म्हादबा बायजाकडे वळत म्हणाला, " मावशे, तुला त्या दिशीच म्हणलं, आजकाल सांजेच्या वक्तालाच गिऱ्हाईक सुटतं. पण सांजेपोतर तूला दम निगत न्हाई. सांजेला डब्बल धंदा हुतोय ".
संध्याकाळी उशीरापर्यंत बाजारात थांबणे बायजाला शक्य होत नसे. नुकतीच बारावीत नापास होऊन घरी बसलेली सुमी आणि पाचवीत शिकणारा गणपा दिवसभर घरात दोघेच असत. तरूण, देखणी मुलगी छोट्या गणपाच्या भरवंशावर घरी एकटी सोडायला तिचा जीव होत नसे. कोणाची वाईट नजर पडेल, या भितीने तिच्या जीवाचा थरकाप व्हायचा. पण इलाज नव्हता.
बायजाला दोनच मुलं, मोठी मुलगी सुमी, अठरा वर्षाची व धाकटा गणपा दहा वर्षाचा. सुमीच्या पाठीवर दोन मुलं होऊन वारली होती.
अंधार पडायला सुरूवात झाली तसे बायजाने दुकान आवरले. उरलेला माल ओट्याखालच्या मोकळ्या जागेत कोंबला. लोखंडी दरवाजाला कुलूप लावले आणि दुपारच्या जेवणाचा रिकामा डबा असलेली पिशवी हातात घेऊन घराकडे निघाली.
बायजाचे घर बाजारापासून पाच-सहा किलोमीटर दूर वस्तीवर होते. दहा-बाय-दहा फूटाच्या, मातीत बांधलेल्या दोन खोल्या, छताला लोखंडी पत्रे, पुढे अंगण, अंगणात एक खाट टाकलेली, मागच्या मोकळ्या जागेत धुण्या-भांड्यासाठी जागा, अंघोळीसाठी आडोसा असलेली मोरी.
मुख्य रस्ता संपून आता बायजा कच्च्या रस्त्यावरून झप-झप घराकडे चालली होती. तिच्या रोजच्या सवयीचा रस्ता होता. दररोज हा कच्चा रस्ता लागला की, बायजाचं विचारचक्र सुरू होत असे.
बायजा दहावी पर्यंत शिकलेली. पूढे ऐपत नाही म्हणून बापाने शाळेतून काढून टाकले. वयात आलेली मुलगी किती दिवस घरात ठेवायची? बापाने स्थळं बघायला सुरुवात केली होती. बायजाने घरकामात स्वतःला गुंतवून घेतलं होतं.
अशीच एकदा दुपारी बायजा दारात उभी होती. शेजारची कुसूम नवऱ्याबरोबर पहिल्यांदाच माहेरी येणार म्हणून शेजाऱ्यांकडे बरीच गडबड, धावपळ सुरू होती. बऱ्याच दिवसांनी कुसूम भेटेल म्हणून बायजाही थोडावेळ ओट्यावर रेंगाळली. तेवढ्यात एक पांढरी गाडी शेजारच्या घरापूढे थांबली. गाडीतून कुसूम व तिचा नवरा दोघेही उतरले. कुसूमचा नवरा छान रूबाबदार होता. तिनेही छान, सुंदरशी साडी नेसली होती, डोळ्यांवर गॉगल लावलेला होता. गाडीतून उतरलेली ती कुसूम आहे, यावर बायजाचा विश्वासच बसेना इतकी ती छान दिसत होती. कितीतरी वेळ बायजा त्या लक्ष्मी-नारायणासारख्या जोड्याकडे एकटक बघत उभी होती.
आपले ही लग्न होईल. आपणही कुसूमसारखे माहेरपणासाठी नवऱ्याबरोबर अशाच गाडीतून येऊ. कसा असेल आपला होणारा नवरा? कसे असेल आपले घर? असे अनेक विचार तिच्या मनांत रूंजी घालत असत.
कितीतरी वेळा ती आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने बघण्यात रंगून जात असे.
वडिलांनी एक स्थळ आणले. मुलगा चांगला होता. हाडापेराने मजबूत, उंचापूरा, गव्हाळ रंगाचा. दोघेच भाऊ होते. हा धाकटा. चार-दोन एकर शेती होती. लोक चांगले होते. बायजाने होकार दिला. बापाने ऐपतीप्रमाणे चांगले लग्न करून दिले.
बायजाचा संसार सुरू झाला. सुमीचा जन्म झाला. चार-पाच वर्षे आनंदात गेली. पुढे दोन वर्षे सतत पावसाने ओढ दिली. शेतीचं उत्पन्न घटलं. कर्जाचा बोजा वाढला. शेतीची जबाबदारी मोठ्या भावावर सोपवून बायजाच्या नवऱ्याने वीट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हरची नोकरी धरली. आणि इथेच चूक झाली. दोघांनी मिळून घेतलेला निर्णयही चूकीचा ठरला. नोकरीबरोबरच वाईट संगत मिळाली. नवऱ्याल्या दारूचे व्यसन लागले. दारूच्या पूर्ण आहारी गेला. दिवस-रात्र त्याला दारूशिवाय चैन पडत नव्हती. सगळा पगार दारू पिण्यात खर्च करू लागला. घरात बायजाची ओढाताण होऊ लागली. मुलांची आबाळ होऊ लागली. दोन-दोन दिवस हाता-तोंडाची गाठ होईना. आपण काहीतरी काम करावे म्हणजे थोडे पैसे मिळतील, थोडे बरे चालेल, या विचाराने बायजाने काम शोधायला सुरूवात केली. योगायोगाने म्हादबाची भेट झाली. तो बाजारात भाजी विकत असे. आपणही थोडी, थोडी सुरूवात करावी म्हणून बायजाने बाजारात जेथे जागा मिळेल, तेथे बसून भाजी विकायला सुरवात केली. हळूहळू जम बसला.
घर जवळ आले होते. बायजाचं विचारचक्र थांबलं.
दोनशे पावलांवर घर होतं. अंगणातला दिवा चालू होता, खाटेवर गणपा अभ्यास करीत बसला होता. आईची चाहूल लागताच गणपा अंगणाच्या कोपऱ्यापर्यंत पूढे आला. बायजा जवळ येताच म्हणाला, " आये, ह्या सुमीला काही सांगून ठेव बरं का. तू घरी नसल्यावर मला सारखं-सारखं काही बाही आणायला बाहेर पाठविती. आता मी नाही तिचं ऐकणार जा. अभ्यास करीत बसलं तर म्हणती गोप्याच्या घरी जा अभ्यासाला, मी नाही जाणार गोप्याकडं ". लाडाने गणपाच्या डोक्यावर हात फिरवीत बायजा म्हणाली, " आल्या आल्या झाली का तुमची सुरूवात? का गं सुमे, का त्रास देती लेकराला?". असं बोलून बायजा घरात गेली. आत बघते तर सगळीकडे पसारा पडलेला होता. बायजा चिडून गेली. " सुमे, हा पसारा आवरला न्हाई अजून. एवढी मोठी घोडी झाली, सगळ्या गोष्टी सांगाव्या लागत्यात का गं तुला? दिवसभरात इकडची काडी तिकडं करीत न्हाई, काय करतीस काय दिवसभर?. मी मेली दिवसभर राबून येते अन इथं बघावं तर कोणाला त्याचं काहीच नाही. वर आल्यावर हा पसारा आवरीत बसू ? " बायजाचा राग अनावर झाला, ती मागच्या दारी गेली. मोरीवर खसाखसा हात-पाय धूतले अन भाकऱ्या थापायला बसली.
जेवणं आटोपली. गणपाचा बाप अजून घरी आला नव्हता. बायजा थोडावेळ नवरा येईपर्यंत पडावे म्हणून खाटेवर जरा लवंडली. सुमी गणपाला का बरं बाहेर पाठवित असेल? तिला एकटीला घरात काय एवढे करायचे असते की, गणपाची अडचण व्हावी? एकटी असताना तिला कोणी भेटायला तर येत नसेल ना? कोणी तिचा काही गैरफायदा तर घेणार नाही ना? अशा एक की अनेक प्रश्नांनी तिच्या मनांत काहूर माजवले होते. आठ-दहा दिवसांपूर्वी अशीच संध्याकाळी बायजा घरी आली तेव्हा गणपा घरी नव्हता. सुमी एकटीच होती. बायजा मोरीवर हात-पाय धूवायला म्हणून गेली तर मागच्या बाजूच्या अंधारातून कोणीतरी जाताना ओझरते दिसले होते. नीट बघितले पण नंतर कोणीच दिसले नाही. आपल्यालाच काही भास झाला असेल म्हणून बायजाने दुर्लक्ष केले होते.
सारखा विचार करून करून बायजा कमालीची अस्वस्थ झाली होती. कधी नव्हे ते आज तिला खूपच असुरक्षित वाटू लागले. संसार जणू तिचा एकटीचाच होता. नवऱ्याला कशाचीच काळजी नव्हती. तो आपल्या शौकपाण्यातच गुंग होता. अशा वेळी तरी नवऱ्याची साथ असावी पण तीही नव्हती. आपलं नशीबच खोटं त्याला कोण काय करणार? बायजाने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
सकाळीच बायजाने स्वतःचा व नवऱ्याचा दुपारच्या जेवणाचा डबा तयार केला. नवरा कामावर निघून गेला होता. तिने नेहमीप्रमाणे नवऱ्याला दारू न पिता व लवकर घरी परत येण्यास बाजावले होते. बाजारात जाण्यास निघणार तोच बाहेर कोणी आल्याची चाहूल लागली. पदर सावरत बायजा अंगणात आली तर समोर दिनकरकाका दिसले. दिनकरकाका सासऱ्यांचे बालमित्र. मोठे बागाईतदार होते. त्यांची सगळी मुलं शिकली सवरलेली होती. खातं-पितं घर होतं. नोकर-चाकरांचा राबता होता. फार दिवसांनी बायजाकडे आले होते. सोबत एक तरूण होता. तेवीस-चोवीस वर्षांचा. गोरा, उंचापूरा, रूबाबदार, डोळ्यांवर बारीक काड्यांचा चष्मा, चॉकलेटी पॅंट, पांढरा शर्ट इन केलेला. पायात बूट. बायजाने त्याला ओळखले नाही.
दिनकरकाकाकडे बघत बायजा म्हणाली, " या काका, लई दिसांनी आठवण काडली माझी ’.
काका आढेवेढे न घेता म्हणाले, " सोयरिकीच्या कामासाठी तुला भेटायला आलो पोरी. हा माझा नातू. थोरल्याचा मुलगा. पदवी पर्यंत शिकलेला आहे. कलेक्टर कचेरीत नोकरी करतो. पगारही चांगला आहे. कलेक्टरच्या परीक्षाही देतोय नोकरी करता करता. याच्याकरीता तुझ्या सुमीचा हात मागायला आलो होतो ".
ते ऐकून बायजा सर्दच झाली. काय बोलावे हेच तिला कळेना. दाराआडून सुमी अंगणातलं बोलणं ऐकत होती. सुमीकरीता इतक्या पट्कन असे स्थळ सांगून येईल असे बायजाला स्वप्नातही वाटले नव्हते. बायजा बावरून म्हणाली ," मी बापडी काय ठरवणार? गणपाच्या बाच्या कानावर घालते. आज उद्या कळवते तुम्हाला ". काका पूढे म्हणाले, " बायजा, तुझी सर्व परीस्थिती मला माहिती आहे, पण पोरी तू काहीही काळजी करू नको, लग्नाचा सगळा खर्च आम्ही करू. दोन्हीकडून लग्न करून घेऊ, मग तर झालं. तू फक्त हो म्हणं ". काका हट्टालाच पेटले. गणपाच्या बापालाही समजावतो, असे म्हणून बायजाचा होकार घेऊनच गेले होते. सुमीची पसंती होतीच.
महिन्याभरातच सुमीचं लग्न काकांनी थाटात करून घेतलं. कार्य व्यवस्थित पार पडलं. सुमी संसाराला लागली. सुमीचा पायगुण की काय पण दोन महिन्यांतच जावई कलेक्टरची परीक्षा पास झाले. प्रोबेशनवर दुसऱ्या गांवात रूजू झाले.
आज अचानक जावयाने माणसाबरोबर निरोप धाडला. सासऱ्यांना म्हणजे गणप्याच्या बापाला पुण्याला व्यसनमुक्ती केंद्रात भरती करावयाचे आहे. त्यांना उद्या कामावर पाठवू नका. आम्ही उद्या दुपारी त्यांना घ्यायला येतोय.
ठरल्याप्रमाणे दारावर गाडीचा आवाज आला. बायजा, गणपा, गणपाचा बाप सगळेच अंगणाकडे धावले. दारात पांढऱ्या रंगाची लांब, अलिशान गाडी उभी होती. जावई व सुमी गाडीतून उतरत होते. बायजा कौतूकाने त्या दोघांकडे बघत होती. बायजाला ते लक्ष्मीनारायणाच्या जोडीसारखे भासत होते. सुमीला लग्न मानवलं होतं. छान दिसत होती ती. सुंदरशी सिल्कची साडी नेसली होती. तिच्या गोऱ्यापान रंगावर ती साडी खूपच खुलून दिसत होती. क्षणभर ती आपली सुमी आहे, हे बायजाला खरेच वाटेना. आपली सुमी इतकी सुंदर दिसू शकते यावर तिचा विश्वासच बसेना. आयुष्यभर संसाराचा गाडा ओढता ओढता पोरीकडे डोळे भरून पहायलाही तिला फुरसत झाली नव्हती.
जेवणं झाली. गप्पा गोष्टी झाल्या. मागच्या दारातून जाताना ओझरता दिसलेला तो तिचा जावईच होता अशी कबुली दोघांनी दिली. दोघांचे आधीपासूनच सूत जमले होते. सुमीला हवा तोच नवरा मिळाला होता. दोघेही एकमेकांना जीव लावत होते. त्यांच्या संसारात सुखी होते. दुपारीच दोघेही परत जायला निघाले. जाताना गणपाच्या बापाला घेऊन गेले होते.
दारूचं व्यसन पूर्ण सुटल्यावरच आता त्याला परत पाठवणार होते. सुमी आली त्या रस्ताने परत निघून गेली.
बायजा कितीतरी वेळ दरवाजाला टेकून सुमीची गाडी गेली त्या रिकाम्या रस्त्याकडे बघत उभी होती. काबाड कष्ट करून, फ़ुलासारखं जपत लहानाची मोठी केलेली मुलं त्यांच्या संसारात सुखी असतील तर आईला या पेक्षा जास्त ते काय हवं असतं? बायजाला कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. बायजा भरून पावली होती. खतपाणी घालून कष्टाने वाढवलेल्या झाडाला गोमटी फळं लागलेली बघून व्हावा तसा आनंद तिला झाला. आनंदाश्रूंना पापण्यांवर जागा पुरेनाशी झाली. ते गालावरून ओघळू लागले. गणपा कधी आईकडे, तर कधी त्या रिकाम्या रस्त्याकडे बघत होता. काय झाले ते त्याला कळेना. तो हळूच आईच्या कमरेला बिलगत म्हणाला, " आई, मी होईन का गं मोठेपणी दाजींसारखा कलेक्टर ". बायजा लाडाने त्याचे केस कुरवाळत म्हणाली, " होय रे माझ्या राज्या, मनं लावून अभ्यास केल्यावर का नाही होणार माझा गणपा कलेक्टर ".
आवडली. छान आहे कथा.
आवडली. छान आहे कथा.
सुन्दर
सुन्दर
साधी सरळ, गोड शेवट असलेली
साधी सरळ, गोड शेवट असलेली गोष्ट. आवडली.
छान गोष्त आहे, आवदली.
छान गोष्त आहे, आवदली.
छान आहे
छान आहे
आवडली, आवडली.
आवडली, आवडली.
(No subject)
छान कथा. आवडली!
छान कथा.
आवडली!
शहरी भागात सुशिक्षित महिला
शहरी भागात सुशिक्षित महिला आपल्या संसारातल्या कौटुंबिक तसेच आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नोकरी, व्यवसाय करतात तशाच ग्रामीण भागात अशिक्षित, अल्पशिक्षित महिलाही शेत मजूरी, इतरांकडे घरकाम, शिवणकाम इ. जमतील ती कामे करून आपल्या कुटूंबास हातभार लावत असतात. कौटुंबिक, आर्थिक जबाबदाऱ्या घेत असतात. घरातील पुरूष जर व्यसनाधिन असेल तर या जबाबदाऱ्या आणखीच वाढतात. बायजा ही अशाच एका महिलेची कथा आहे. नांव, संदर्भ बदलले आहेत.
बायजाचा नवरा आता व्यसनमुक्त झाला आहे. दोघे नवरा-बायको आपल्याच शेतात भाजीपाला पिकवून होलसेल मार्केटमध्ये पाठवतात. त्यांचा व्यवसाय तेजीत आहे. सुमीने लग्नानंतर मराठी विषय घेऊन एम.ए केले आहे. छोटा गणपा एम.बी.बी.एस च्या तिसऱ्या वर्षाला आहे. ’बदल’ हा सृष्टीचा नियम आहे. दिवस बदलतील. यावर श्रध्दा ठेवून जगत, अत्यंत प्रतिकूल परीस्थितीतून हिमतीने, जिद्दीने बायजाने आपल्या कुटूंबास एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. तिची कथा मला भावली म्हणून शब्दबध्द् करण्याचा प्रयत्न केला आहे.
आपणांस आवडली, आनंद झाला. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
सुरेख! किती गोड शेवट!!
सुरेख! किती गोड शेवट!!
छान!! बायजाचा नवरा
छान!!
बायजाचा नवरा आता व्यसनमुक्त झाला आहे. दोघे नवरा-बायको आपल्याच शेतात भाजीपाला पिकवून होलसेल मार्केटमध्ये पाठवतात. त्यांचा व्यवसाय तेजीत आहे. सुमीने लग्नानंतर मराठी विषय घेऊन एम.ए केले आहे. छोटा गणपा एम.बी.बी.एस च्या तिसऱ्या वर्षाला आहे. ’बदल’ हा सृष्टीचा नियम आहे. दिवस बदलतील. यावर श्रध्दा ठेवून जगत, अत्यंत प्रतिकूल परीस्थितीतून हिमतीने, जिद्दीने बायजाने आपल्या कुटूंबास एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. तिची कथा मला भावली म्हणून शब्दबध्द् करण्याचा प्रयत्न केला आहे>>> हे तर फारच छान!!
सत्य आहे वाचून आणखीन मस्त
सत्य आहे वाचून आणखीन मस्त वाटलं!
चांगली लिहिली आहे.
सगळीकडे शोषण, सूड,
सगळीकडे शोषण, सूड, मारामाऱ्या, अशा प्रकारच्या गोष्टी वाचून वैताग आला होता. त्या पार्श्वभूमीवर ही कथा खूप आवडून गेली.
"म्हादबा, आज काय धंद्याचं खरं
"म्हादबा, आज काय धंद्याचं खरं दिसत न्हाई बुवा" असं बायजा म्हणाली ???
ह ह पु वा
आश्चर्य आहे. बायकांना कधी "बुवा" म्हणताना ऐकलं नव्हतं.
छान. खरी आहे म्हणुन अजुन
छान. खरी आहे म्हणुन अजुन आवडली.
सुंदर कथन राजेंद्र! अगदी छान
सुंदर कथन राजेंद्र! अगदी छान चित्र उभे केलेत कष्टाळू बायजाचे. बायजाचा राग अनावर झाला, ती मागच्या दारी गेली. मोरीवर खसाखसा हात-पाय धूतले अन भाकऱ्या थापायला बसली. या सारखी वाक्ये अगदी चित्र डोळ्यासमोर उभे करतात. कथा शेवटाकडे अजून रंगवता आली असती. एकदम आटोपती घेतल्या सारखी वाटली. असे लिखाण अजून वाचायला आवडेल.
सत्यकथा आहे अरे वा!!!
सत्यकथा आहे अरे वा!!!
सुन्दर
सुन्दर
साधीशी सुंदर गोड गोष्ट.
साधीशी सुंदर गोड गोष्ट.