माझे खरे कुणाशी कसलेही भांडण नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 22 November, 2012 - 21:28

गझल
माझे खरे कुणाशी कसलेही भांडण नाही!
माझ्या विषण्णतेला कुठलेही कारण नाही!!

होता खरा हिरा जो, त्याचीही परवड झाली;
आले कधीच त्याच्या वाट्याला कोंदण नाही!

चाहूल आज वारा कसलीही आणत नाही;
दूरातही कुठेही किणकिणते काकण नाही!

जाळून जिंदगानी केलेले चिंतन आहे!
हे वांझ घोषणांनी सजलेले भाषण नाही!!

येवून ठेपलेली दाराशी आज दिवाळी....
भिंती सुन्या सुन्या अन् दाराला तोरण नाही!

आयुष्य नेत आहे....मी तिकडे धावत आहे!
धरबंद त्यास नाही, मजलाही धोरण नाही!!

इतके नकोस देऊ कर्जाऊ श्वास मला तू....
माझ्याकडे पुरेसे कुठलेही तारण नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह सतीशजी...

होता खरा हिरा जो, त्याचीही परवड झाली;
आले कधीच त्याच्या वाट्याला कोंदण नाही!>> सुंदर विचाराला सुंदर शेराचे कोंदण!

आवड्ली..

येवून ठेपलेली दाराशी आज दिवाळी....
भिंती सुन्या सुन्या अन् दाराला तोरण नाही!

इतके नकोस देऊ कर्जाऊ श्वास मला तू....
माझ्याकडे पुरेसे कुठलेही तारण नाही!... सुन्दर..

आयुष्य नेत आहे....मी तिकडे धावत आहे!
धरबंद त्यास नाही, मजलाही धोरण नाही!! <<< व्वा ! खास ..>>>

छान गझल

वा बंडोपंत! छान बदल सुचवलात! ताबडतोब बदल स्वीकारीत आहे!
असाच लोभ असू द्या! असे परमेश्वर आपल्याकडून काही काही लिहून घेतो!
ईश्वर खरेच ग्रेट आहे!