भिजवून ठेव अवघी सकाळ

Submitted by बेफ़िकीर on 21 November, 2012 - 14:18

भिजवून ठेव अवघी सकाळ
मन आशयासमवेत तू
खळबळ करून छंदास पाळ
गंगेस ओत मदिरेत तू
मिसळत दुपार पाणी विटाळ
जे भोगशी दुनियेत तू
ओतून दे संध्येस गाळ
उधळून दे संकेत तू
सांगत मनास 'तिमिरात वाळ'
गंगेस शोध मदिरेत तू
अंधार मान सिगरेट...... जाळ
जाळत तुझी तब्येत तू
हा अन्यथा संपेल काळ
मानत जणू की प्रेत तू
हो 'बेफिकिर' चिंतेस टाळ
मन लख्ख धू कवितेत तू

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खळबळ करून छंदास पाळ>> मला आधी मुक्तछंदाबद्दल तक्रार असणारे काव्य आहे की काय असे वाटले Proud
काही काही ओळी व कल्पना आवडल्या

अवांतरः बेफिकीर, अशा कवितांखाली डिस्क्लेमर टाकत जा हो : सिगरेट स्वास्थ्य के लिये हानिकारक है

कवितेतला आशय भावलाच,
ओळी- ओळीतली बेफिकीरीही पोहचली.

शेवटची ओळ तर नितांत सुंदर... तरीही भिजलेले मन , वाळवून पुन्हा धुवायचे? हे काही पचनी पडले नाही.

दारु-सिगारेट प्रतिकात्मक असले तरी "ते" म्हणजेच बेफिकीरी, असे नाही... बेफिकीरी म्हणजे मनाची अशी अवस्था असावी जिच्या पुढे कुठलाही काळ (परिस्थिती) गुढघे टेकवून निघून जातो. अशा मनोभुमिकेसाठी दारू , सिगारेट किंवा तत्सम उपचारांची गरज असावी हे न पटण्यासारखे आहे.

.... पु.ले.शु!

धन्यवाद!

मला काल कविता प्रकाशित करताना असे वाटत होते की त्या प्रतिकांचा अभिप्रेत अर्थ नोंदवून ठेवावा की काय! Happy

आता नोंदवतो.

चौथी ओळ - गंगेस ओत मदिरेत तू

छंद ही कवितेच्या मदिरेच्या शुद्धीसाठी असलेली गंगा आहे, असे म्हणायचे आहे. (खळबळ करून छंदास पाळ)

दहावी ओळ - गंगेस शोध मदिरेत तू

नव्या कवितेमार्फत स्वतःची शुद्धी करायला जा

अकरावी ओळ - अंधार मान सिगरेट ...... जाळ

मन तिमिरात वाळत असले तरी तू तुझ्याभोवतीचा तिमिर पेटवून दे, मग त्यामुळे तू पेटलास तरी बेहत्तर

असे काहीसे:

पोचत नसल्यास क्षमस्व!

प्रतिसादासाठी सर्वांचे आभार!

बागेश्री - डिस्क्लेमर - Proud

त्यामुळे बेफिकीरीच्या मनोवस्थेसाठी ते उपाय योजले जात आहेत असे कवितेत म्हणायचे नाही आहे. Happy

शाम यांच्याशी सहमत.भाव पोचले पण प्रतीके नीटशी पोचली नाहीत,

>>छंद ही कवितेच्या मदिरेच्या शुद्धीसाठी असलेली गंगा आहे, असे म्हणायचे आहे>>>>
हे पटले नाही कारण ' मदिरेच्या शुद्धीसाठी गंगा ' हेच धूसर वाटले.

तसेच सकाळ दुपार आदि कालमापनांचाही अर्थ लागला नाही.( कधीकधी कवीला स्पष्ट असलेला अर्थ वाचकाला कळत नाही याची पूर्ण कल्पना आहे..)

कदाचित एक वेगळा मार्ग चोखाळण्याच्या प्रयत्नामुळे असेल,एक अस्वस्थ अभिव्यक्ती वाटली.अर्थ लावण्याचा आग्रह सोडल्यास एक बेफिकीरी व्यक्त करणारा अमूर्त आकृतीबंध जाणवला.

कविता समजून घ्यायला अवघड प्रतिमासृष्टी क्लिष्ट !! भारतीताई व शामजी म्हणताय्त ते पटते आहे बेफीजीन्नी दोनही प्रतिसादात बरेच काही सान्गायचा प्रयत्न केला आहे पण तोही पुरेसा नाहीये
असो
मी अशीही वाचली.............मोठी गम्मत वाटली

मन आशयासमवेत तू
भिजवून ठेव अवघी सकाळ

गंगेस ओत मदिरेत तू
खळबळ करून छंदास पाळ

जे भोगशी दुनियेत तू
मिसळत दुपार पाणी विटाळ.........
_____________________

शेवटच्या चार ओळी नीट समजल्या
सिगरेट जाळ .....जाळत तुझी तब्येत तू >> हा भागही समजला प्रांमाणिक भावना पोचल्या

तसेच सकाळ दुपार आदि कालमापनांचाही अर्थ लागला नाही.>>>> अवघडय नक्की पण लावता येतोय

सकाळ दुपार सन्ध्याकाळ रात्र क्रमवार अन सुसुत्रतेने आल्यात य कवितेत

कवीने स्वतःची नियोजित काव्य-दिनचर्या उलगडली आहे कवितेत जणू..पण त्या त्या वेळेला काय करायचे हे जे स्वतःस सान्गीतले ते गूढ या पठडीतले आहे
जराशी ....म्हणतात ना बण्डखोर प्रवृत्ती......"उधळून दे सन्केत तू"........... जी बेफिकीरीच्याही पुढे जावून भाष्य करू पाहते .....ती दिसते जागोजागी जी निवडलेल्या प्रतिमान्मधून अनुभवता येते ('हटके' आहेत त्या सर्वच!!...")

चार चार ओळी वेगळ्या करा या कवितेच्या चार कडवी होतील
पहिल्यात सकाळी काय ते दुसर्‍यात दुपारी अन सन्ध्येस काय ते आले आहे तिसर्‍यात अन्धारात ...तिमिरात ...रात्री काय ते अन चौथ्यात तीही सम्पून जाणार ची जाणीव ...तोवर काय करून घ्यायचे आहे आपल्याला नेमके काय साधायचे आहे ....ते आले आहे

विशेष म्हणजे दिवस आशयापासून सुरू होतो अन कवितेत सम्पतो अख्खा दिवस फक्त कविता-कविता-कविता बस्!!

एकूण या रचनेत बेफीजी त्यान्च्या "ऑफ हिस ओन क्लास"लाही लान्घून जरा पुढेच गेलेले मलातरी दिसत आहेत

______________________________
वाह बेफीजी मजा आली

छान उलगडलीत वैभव, काव्य दिनचर्येबरोबरच एक आयुष्य व्यतीत करण्याचाही भाव त्यात आलाय हे आता स्पष्ट जाणवले. वेगळा, अनेकार्थवाही प्रयोग.

एकूण या रचनेत बेफीजी त्यान्च्या "ऑफ हिस ओन क्लास"लाही लान्घून जरा पुढेच गेलेले मलातरी दिसत आहेत

+१

२/३वेळा वाचल्यावर गूढगर्भता कमी झाली आणि प्रतीके पोचली.

धन्यवाद भूषणजी.