नर्मदे हर हर पुस्तक परिक्षण

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

नर्मदे ऽऽ हर हर - पुस्तक परिचय

नर्मदे त्वं महाभागा सर्वपापहरी भव|
त्वदप्सु या शिला: सर्वा: शिवकल्पा भवन्तु ता:||

नर्मदा परिक्रमा अतिशय खडतर तीनहजार किलोमीटर अंतर असलेली (धरणामुळे आता साडेतीनहजार किलोमीटर झाली आहे) परिक्रमा आहे. एकंदरीत चौदाकोटी पावलं चालावी लागतात. तिथे लागतो तुमच्या शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस आणि हो श्रद्धेचाही! हे कोण्या येर्‍यागबाळ्याचे काम नाही. परिक्रमा नर्मदेचीच का? तर त्याची कथा अशी आहे - नर्मदा व गंगा तपश्चर्येला बसतात. भगवान शंकरजी हे बघतात. शंकरजी गंगेवर प्रसन्न होतात. गंगा वर मागते, मला तुमच्यात सामावून घ्या. गंगेला शंकरजींच्या जटेत स्थान मिळतं. कालांतराने नर्मदेवर प्रसन्न होतात. नर्मदा वर मागते, तुमच्या पंचायतनासकट माझ्यात सामावून जा. शंकरजी शेवटचे देव म्हणून तिची परिक्रमा. अमरकंटक हे तिचे उगमस्थान. पुराणातल्या उल्लेखाप्रमाणे भगवान शंकरांनी श्रीनर्मदेला तिच्या उत्पत्तीनंतर असं वरदान दिलं की, "हे भाग्यशालिनी नर्मदे, तो सर्व पापांचे हरण करणारी होशील, तुझ्या पाण्यात स्थित असलेले सर्व पाषाण शिवतुल्य होतील."

या वरदानानुसार, सर्वांत प्राचीन आणि पुण्यदायिनी अशा नर्मदा मातेच्या परिक्रमेला संपूर्ण भारत वर्षात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही परिक्रमा तीन प्रकारे करता येते. एक सर्व साधन-साम्रगीसह वाहनाने, दुसरी काही अंतर किनार्‍याने पायी व काही वाटेने, व तिसरी पूर्ण किनार्‍याने अनवाणी. तिसर्‍या प्रकारात बरेच कडक नियम आहेत. अनवाणी चालायचं, संग्रह नाही (वस्तूंचा अथवा माणसांचा), आसक्ती नाही आणि 'मी'पणा विसरायचा, कोणाला काही मागायचं नाही, कोणी काही दिलं तर नाही म्हणायचं नाही.

परिक्रमेदरम्यान आयुष्‍य सूर्योदय ते सूर्यास्त या दोन दररोज घडणार्‍या अत्यंत महत्त्वाच्या घटीकांमध्‍ये बांधले जाते. सूर्य उगवला की जिथे आहात तिथून तीरावरुन चालायला लागायचं आणि हव्या त्या ठिकाणी स्नान आटोपायचं. दिवसभर मानवेल तेवढ्‍या आणि रस्ता जसा सापडेल त्या वेगाने चालत रहायचं. सूर्य मावळला की मात्र थांबावं लागतं. अंधारातून तीरावरुन चालताच येत नाही.

नर्मदा परिक्रमेवर अनेकांनी मराठी भाषेत पुस्तके लिहिली आहेत. गोनिदांचे 'कुणा एकाची भ्रमणगाथा', धृव भट्ट यांचे 'तत्वमसि', श्री. रघुनाथ रामचंद्र गुण्ये ह्यांच 'नर्मदे हर' (जगन्नाथ कुंटे ह्यांना जे पुस्तक वाचून नर्मदा परिक्रमा करायची प्रेरणा मिळाली तेच हे पुस्तक!), श्री. जगन्नाथ कुंटे ह्यांचे 'नर्मदे हर हर', गोनिदांचे 'नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा". ह्यापैकी जगन्नाथ कुंटे यांचं 'नर्मदे हर हर' कितीही वेळा वाचलं तरी मन भरत नाही. नर्मदा परिक्रमेमधे आलेले अनुभव, भौतिक आणि अध्यात्मिक या दोन्ही पातळीवरचे, त्यांनी या पुस्तकात सांगीतले आहेत. लेखकाने पुस्तकभर विनोदाचा वापर सुरेख केलाय. त्यामुळे ते कोरडं आध्यात्मिक पाल्हाळ झालं नाहिये. येवढ्या वेळा परिक्रमा करणं त्याला कसं जमलं देव जाणे. माझी वाचूनच दमछाक झाली.

पायी परिक्रमा करताना कुंटे यांचा काटकपणा, मोजका आहार, सहनशीलता, त्यांचे वाऱ्याच्या गतीने चालणे, खडतर रस्ता...या साऱ्या वर्णनात आपण गुंतून, गुंगून जातो. मनातल्या इच्छांची पूर्तता किंवा अडचणींचे निवारण आपोआपच होण्याचे प्रसंग अचंबित करणारेच. नर्मदा परिसर, काठचे भिल्ल, आदिवासी, अनेक गावांची, प्रदेशांची नावे इत्यादी भौगोलिक माहिती या पुस्तकातून नव्यानेच कळते. तिन्ही परिक्रमांमध्ये शूलपाणीच्या भयप्रद, खडतर जंगलातून कुंटे यांनी प्रवास केला. अचानक उंचावरील खोली. तीत चार माणसे. वाफाळलेला चहा. डोळे मिटून चहा पिताना क्षणार्धात सर्व अदृश्‍य होणे; खोलीसकट नर्मदेच्या प्रवाहातून मोतीचुराच्या लाडवांची टोपली घेऊन येणारी व्यक्ती व तिचे अदृश्‍य होणे यासारखे अनेक अद्‌भुत अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात. खिळवून ठेवतात.

कुंटे यांनी पुस्तकात वर्णन केलेले काही प्रसंग विलक्षण गूढ आणि अनाकलनीय आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी म्हटले आहे, की तिसर्‍या परिक्रमेत त्यांना अश्‍वत्थाम्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. अजनाला या संगमात नदी पार करताना छोट्या मुलीच्या रूपात प्रत्यक्ष नर्मदामाईचे दर्शन झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय, पुण्यात आल्यावर परिक्रमा पूर्ण झाल्याचा प्रत्यय म्हणून वृद्ध व्यक्तीच्या रूपात पुन्हा नर्मदामाईने दर्शन दिल्याचा अनुभवही त्यांनी कथन केला आहे.

या पुस्तकात वर्णन केलेली एक व्यक्ती वाचकाला मोहवून टाकते, ती म्हणजे कुंतल चटर्जी. कुंटे यांच्या बऱ्याच प्रवासात कुंतल या बंगाली तरुणाने सोबत केलेली आहे. एकुलता एक, सधन घरातला, लाडाकोडात वाढलेला; पण शांतीच्या शोधात बाहेर पडलेला असा हा कुंतल स्मरणात राहतो.

मध्यप्रदेशातील शूलपाणीचे जंगल. एक साधक प्रवासी अनोळखी जंगलातून वाट काढत निघालेला. अचानक समोर येतात दोन भिल्ल. रापलेला पण झगझगीत काळा रंग, राकट बांधा, हातात तीरकमठा, विषारी बाण; एकाच्या हाती धारदार कोयता. प्रवाशाला थांबण्याची खूण करतात. प्रवासी तयारीत, कारण त्याला यांचे आगमत अपेक्षितच. भिल्ल एक एक करून प्रवाशाचे सारे काही लुटून घेतात, जीर्ण चिंध्या झालेले जाकीट निरुपयोगी म्हणून त्याचे त्याला परत देतात. प्रवाशाजवळ बेदाणे नि मनुकांचे पाकीट, पण भिल्ल ते फेकून देतात, कारण ते खाण्यालायक काही आहे याची त्यांना जाणीवच नाही. प्रवासी स्वत:हून त्यांना ते खाण्याचे पदार्थ आहेत हे सांगू पाहतो, पण तिकडे साफ दुर्लक्ष करून ते बाकी सारे लुटून आल्या वाटेने परत गेले. शिल्लक ठेवलेले नित्यपाठाचे पुस्तक, काडेपेटी नि उदबत्त्या एवढा ऐवज घेऊन कमरेची लंगोटी वगळता संपूर्ण दिगंबर झालेला प्रवासी अत्यानंदाने 'नर्मदे ऽऽ हर' अशी आरोळी ठोकून पुढच्या प्रवासाला निघतो.

शूलपाणीच्या जंगलात एक भिल्ल जमात राहते, 'नर्मदापुराणात' त्यांना 'नर्मदेचे भाऊ' म्हटले आहे म्हणून त्या भागात त्यांचा उल्लेख 'मामा' असा केला जातो. परिक्रमा करण्याच्या हेतूने शूलपाणीच्या जंगलात येणार्‍याला लुटणे हे त्यांचे काम. परिक्रमा करणार्‍याने आयुष्यभर हे माझे, हे माझे असे करत आसक्तीने जे जमवले ते हे 'मामा' लुटून घेतात, परिक्रमा करणार्‍यानेही आनंदाने लुटून घ्यायचे असते. त्यानिमित्ताने आसक्तीचा त्याग करायचा असतो. त्यामुळे या लुटीचा नि लुटले जाण्याचा हेतू चांगला नि परिणामही दोघांच्याही दृष्टीने चांगलाच होतो.

वर उल्लेख केलेला प्रसंग हा जगन्नाथ कुंटे या अवलियाच्या नर्मदा परिक्रमेदरम्यान घडलेला नि त्यांच्या 'नर्मदे ऽऽ हर हर' या पुस्तकात वर्णन केलेला, नर्मदा परिक्रमेच्या काळात साधकाला सामोर येणार्‍या अनेक अडचणींपैकी एक. कुंटेंनी तर अशा चार परिक्रमा आजवर केलेल्या आहेत. त्यांच्या पहिल्या तीन परिक्रमांवर आधारित 'नर्मदे ऽऽ हर हर' ह्या पुस्तकाने अल्पावधीतच खपाचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. गेल्या पाच-सहा वर्षात या पुस्तकाच्या तेरा आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. शेवटच्या नि चौथ्या परिक्रमेवर आधारित ’साधनामस्त’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. याशिवाय आपल्या साधना नि अध्यात्म या विषयावरील अनुभव नि चिंतनावरील आधारित अशी अन्य तीन पुस्तके (नित्य निरंजन, कालिंदी आणि ’धुनी’) देखील आजवर प्रकाशित झालेले आहे.

त्यांची कुंडलिनी जागृत होणं, नर्मदा माईनं कोणत्याना कोणत्या रूपात दर्शन देणं, अश्वथाम्याचं दर्शन होणं, गुरुनं आदेश देणं. ह्या गोष्टी निदान माझ्यातरी आकलनशक्तीच्या बाहेरच्या आहेत. एखादा माणूस ज्याअर्थी एक नाही, दोन नाही तर चार वेळा ह्या मार्गावर जातो, हेच माझ्यासाठी 'असामान्य' सिद्धीला पोचलेल्या माणसाचं लक्षण आहे. निदान ह्या येवढ्या भावनेसाठी तरी हे पुस्तक नक्कीच म्हणजे नक्कीच वाचण्यासारखं आहे.

जगन्नाथ कृष्णमेघ कुंटे हा माणूस जरा हटके आहे. वयाच्या दहाव्या वर्षी हिमालयात जाण्यासाठी घरातून पळून गेलेला माणूस वेगळाच असणार! साधनेत असताना, परिक्रमेत घराची, बायको-मुलांची त्यांना आठवण नाही, ओढ नाही. जेव्हा साधनेची मस्ती उतरते तेव्हा एक सामान्य, अशिक्षित माणूस. सतत सिगरेट ओढतात, त्यामुळे अध्यात्मातला माणूस असेल असं सांगूनही खरं वाटणार नाही. व्यावहारिक जगात सगळ्यांच्यात देव बघायची त्यांची वृत्ती वाक्यागणिक दिसून येते.

त्यांच्या इतकच कौतुक वाटत ते त्यांच्या बायकोचं. सौ. जानकी कुंटे यांचं. नवरा घरातून उठुन 'मी निघालो' असं सांगतो, बायकोला नमस्कार करतो आणि हिमालयात जाउन, किंवा हे असं नर्मदा परिक्रमा करून ३-४ वर्षांनी घरी परत येतो. घरी परत येऊन एक आठवडा होत नाही तर परत 'हा मी निघालो' असे ते बायकोला म्हणतात. पण ह्याबद्दल सौ. जानकी कुंटे ह्यांची कुठेही तक्रार नाही. ह्या बाईची संसारात राहून केलेली 'साधना' महान वाटते.

ह्याच पुस्तकातला आणखी एक प्रसंग. मध्यप्रदेशामधे खाणे देताना थाळी वाढून देण्याची पद्धत आहे. हीच पद्धत वाटेतील मठांमधे असे. भाताचा ढीग, डाळ, नि पाच-सहा तिक्कड (म्हणजे भाकरीच्या दुप्पट जाडीचा रोट) एका महंताने अशी थाळी कुंटेंना दिली. त्या तिक्कडकडे पाहूनच आपण जेमतेम अर्धा खाऊ शकतो याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी त्या महंताला अशी विनंती केली की हे एवढे अन्न त्यांच्या थाळीत वाढू नये. दुसर्‍याच क्षणी न भूतो न भविष्यती अशा आई-बहिणीवरून दिलेल्या शिव्या त्यांना ऐकायला मिळाल्या. (या भागात शिव्या विपुल नि संबोधनाच्या जागी सहज वापरल्या जाणार्‍या; यात अगदी साधू, बैरागी नि महंतही अपवाद नाहीत.) अन्य प्रसादाबरोबरच हा प्रसादही ग्रहण करायचा आज योग आहे असे समजून ते शांत राहिले. पण त्यांच्या बरोबर कुंतल चॅटर्जी नावाचा तरुण होता तो या विना-अपराध नि अस्थानी अपमानाने संतापला. अन्नाला नमस्कार करून कुंटे बाहेर आले, तसा तो महंतही त्यांना शिव्या देत बाहेर आलाच. नि त्याने त्यांना एक दगड फेकून मारला, जो त्यांना पाठीत बसला. ज्यांनी लाडू दिले त्यांचे दगडही खावेत असा विचार करून कुंटे शांत राहिले. दगडांचा मारा सहन करीत असता कुंतल बाहेर आला नि त्यांना घेऊन पुढे चालू लागला. कुंटेंना झाल्या प्रकाराचे हसू येऊ लागले. कुंतल वैतागून कारण पुसता झाला. एरवी अरे ला का रे करणारी व्यक्ती जर असा अपशब्दांचा मार शांतपणे सहन करु लागली तरच ती खर्‍या अर्थान साधक झाली असे म्हणावे. स्वाभिमान सोडूनच खरी परिक्रमा होते ना? आणि जो इतका क्रोधाविष्ट झाला त्याला अधिक त्रास झाला की मला असा प्रश्न विचारून कुंटेंनी कुंतलला निरुत्तर केले.

नर्मदा परिक्रमेचा मार्ग खडतर, प्रबळ इच्छाशक्ती नि अनासक्ती असल्याशिवाय ती पार पाडणे अवघड. तुम्हा आम्हा नागर जनांच्या आयुष्यात तो योग येणे दुर्मिळच. परंतु अशा एक नव्हे चार परिक्रमा केलेल्या विभूतीच्या अनुभवातून उतरलेली त्या परिक्रमेची अद्भुत कहाणी स्तिमित करते, अप्रत्यक्ष अनुभव देते हे नक्की. हे पुस्तक वाचून झाल्यानंतर मी नर्मदामैयापुढे नतमस्तक झालो. भारतातील अशा गूढरम्य स्थळांचा, तेथील सच्च्या साधकांचा, भारताच्या आध्यात्मिक परंपरांचा, वारशांचा, नद्यांना माईच्या, आईच्या रूपात पाहणार्‍या आपल्या भारताबद्दल ऊर अभिमानाने भरून येतो आणि हिमालयातील केदार-बद्रीप्रमाणेच नर्मदादर्शनाची आस, ओढ लागून राहते...!

नर्मदे हर हर
लेखक: जगन्नाथ कुंटे
प्राजक्त प्रकाशन
किंमत २२० रुपये

विषय: 
प्रकार: 

छान परीक्षण लिहिलेत.

पुस्तकही वाचनीय आहे. पुर्ण होईपर्यंत खाली ठेऊ नये असेच वाटते.

आपण लेखकाच्या नावाचा उल्लेख "जगन्नाथ कृष्णमेघ कुंटे " असा केला आहे. कृष्णमेघ हे जगन्नाथ कुंटे यांचे पुत्र आहेत.

मी वाचलं आहे ते पुस्तक. अदभूतरम्य आहे हे नक्की. पण त्यातल्या बर्‍याच अनुभवांवर माझा विश्वास बसला नाही.
सिगारेट वगैरेच्या प्रकारांवर तर अजिबातच नाही.

मला नवल वाटते ते हि प्रथा कशी सुरु झाली असेल आणि का करावीशी वाटत असेल, याचे. पुस्तक वाचून मलाही ती करावीशी वाटतेय खरी. मला तसे अनुभव येतील का, याची शंका आहे. ( म्हणजे माणसांचे नक्कीच येतील, पण मी ते माणसांचेच म्हणून स्वीकारेन. ) बघूया जमेल का ते !

छान परीक्षण लिहिलेत + १. माझ्या वाचायच्या यादीत आहे हे पुस्तक.. माझ्या मामी ने ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. तीनेही सगळा प्रवास लिहून ठेवला आहे.. अर्थात त्यांनी वाहनाचा उपयोग केला होता.

मी जुन्या मायबोलीवर ह्यावर परीक्षण लिहिलं होतं. २००६ साली बहुतेक...
नर्मदा परीक्रमा माझ्याही इच्छा लिस्टवर आहे... भक्ती म्हणून नाही कदाचित आत्ता ह्या स्टेजला, पण प्रचंड उत्सुकता आहे परिक्रमेविषयी.
जगन्नाथ कुंटे ही व्यक्तीच भारीये. मी फार लहान असल्यापासून त्यांना आधी शिव्या देत बोलणारे काका, सिगरेट ओढणारे कुंटे, घरातून वर्ष वर्ष बाहेर अचानक निघून जाणारे वल्ली, हक्काने आइच्या हातचा चहा प्यायला घरी येणारे बाबा-आईंचे मित्र ते 'अध्यात्मात पोचलेले/ट्रान्स मधे गेलेले 'ह्या सगळ्या रूपात पाहिलंय. आता ते गुरु झाले आहेत अनेकांचे. लोक त्यांच्याकडे संवाद साधायला येतात, तसे ते माझ्या आई-बाबांकडे गप्पा मारायला येतात. बाबा कधी आश्रमात गेले की कुंटे त्यांचा आसनावर बसून शेजारी बसलेल्या माझ्या बाबांना हसत हसत टाळ्या वगैरे देतात. अश्या वेळी त्यांच्या शिष्यांचा ' हे शेजारचे गृहस्थ भगव्या कपड्यात नसले तरी अध्यात्मात पोचलेले दिसतात' असा गैरसमज होतो , आणि लोक माझ्या बाबांनाही नमस्कार करुन आशीर्वाद वगैरे मागतात. माझे बाबा ह्या अवघ्या प्रसंगाचं भारी वर्णन करतात Lol

परिक्षण सुरेख आहे. मी वाचलंय.त्यावर विश्वास नाही,तरीकुतुहल नक्कीच आहे.त्यांच्या पत्नीचे कौतुक(?) वाटते.