भाबड्या मनाला माझ्या पढवून नको ते बसलो!

Submitted by सतीश देवपूरकर on 16 November, 2012 - 03:49

गझल
भाबड्या मनाला माझ्या पढवून नको ते बसलो!
ती सहज हासली अन् मी समजून नको ते बसलो!!

अद्याप समजले नाही मन तिचे म्हणावे तैसे;
मी अर्थ तिच्या नजरेचे जुळवून नको ते बसलो!

ठसठसू लागल्या माझ्या प्राणांत गुलाबी जखमा.....
मी नकळत काही धागे उसवून नको ते बसलो!

माझ्याच मनाची आता समजूत कशी घालू मी?
मी मनोगतांचे कित्ते गिरवून नको ते बसलो!

लोटल्या बघ्यांच्या झुंडी, मी नव्हतो भानावरती;
फुटलेल्या धरणासम मी बरळून नको ते बसलो!

शेवटी जुंपले त्यांनी मजलाच हाय घाण्याला!
मी ठरलो दीडशहाणा, सुचवून नको ते बसलो!

आवरू कसा मी आता स्मरणांचा सर्व पसारा?
मी तुला शोधण्यासाठी, पसरून नको ते बसलो!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवरू कसा मी आता स्मरणांचा सांग पसारा?
मी तुला शोधण्यासाठी, पसरून नको ते बसलो!
............ वाह.!! ( फार आवडलेल्या या शेरात ''सांग'' हा भरीचा शब्द आहेच. असो )

अद्याप समजले नाही मन तिचे म्हणावे तैसे;
मी अर्थ तिच्या नजरेचे जुळवून नको ते बसलो!

ठसठसू लागल्या माझ्या प्राणांत गुलाबी जखमा.....
मी नकळत काही धागे उसवून नको ते बसलो!

आवरू कसा मी आता स्मरणांचा सांग पसारा?
मी तुला शोधण्यासाठी, पसरून नको ते बसलो!

>> झक्कास!!

आशय आवडला. बसलो रदीफ क्वचितच चपखलपणे वापरला गेलाय..

व्वा! सुरेख गझल...

आवरू कसा मी आता स्मरणांचा सांग पसारा?
मी तुला शोधण्यासाठी, पसरून नको ते बसलो!
>> अप्रतिम...

आवरू कसा मी आता स्मरणांचा सर्व पसारा?
मी तुला शोधण्यासाठी, पसरून नको ते बसलो!....... वा वा.. मस्तच बदल. Happy

नको ते.......बसलो
उदा. नको ते समजून,उमजून,उसवून वगैरे बसलो.
खरं तर असं हवंय..तरच सुसंगती दिसून येईल..एरवी कर्ता कर्माची झालेली उलटापालट रसभंग करतेय.

प्रमोदजी, आनंदयात्रीजी!
एरवी कर्ता कर्माची झालेली उलटापालट रसभंग करतेय<<<<<<<
आपल्या मताचा आम्हास आदर आहे.
तरीही आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो की, काव्यात कर्ता, कर्म, क्रियापद वगैरेंचा क्रम बदललेला चालतो.
या गझलेतील नको ते बसलो हा रदीफ हीच या गझलेची उजवी बाजू आहे. असा रदीफ पेलणे/तोलणे यात शायराचा खरा कस लागतो. नीट तालात गुणगुणून पाहिले तर रदीफाची मौज जरूर आनंददायी वाटते असे आम्हास प्रामाणिकपणे वाटते. अनेक मुशय-यांतून अनेक लोकांनी हीच बाब बोलून दाखवली होती. असो.
पुनश्च प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
टीप: गझलेतील वृत्ताचे ताल, प्रासादिकता, बोलकेपणा, व्यक्त व्हायला असलेले तोकडे अवकाश, विचारांचा थेटपणा, साधायचा कडेलोट, प्रभावी अभिव्यक्ती, नाट्य, रदीफ व काफियांची यशस्वी व अकृत्रीम हाताळणी, शेरांचे सुभाषितत्व, इत्यादी बाबी सांभळणे ही एक कर्मकठीण गोष्ट असते. म्हणून शायर त्याची शब्दयोजना
त्याला पाहिजे तशी वापरू शकतो. शेराचा अर्थ वाचताक्षणीच भिडणे हे महत्वाचे! शब्दकळा व प्रतिमांचे गुंफण या
गोष्टी नंतरच्या आहेत, तरीही त्या महत्वाच्याच आहेत.
काही गझल या गायला अनुकूल असतात, काही वाचायला/चिंतन करायला, तर काही गझल मैफिलीत पेश करायला योग्य असतात.गहन आशयघन, व्यामिश्र असे शेर चिंतनानंतरच कळायला लागतात. असो.
प्रा.सतीश देवपूरकर
........................................................................................................................................................

नको ते बसलो या रदीफातील शब्दसमूहाला तसा फारसा अर्थ नाही. पण जेव्हा शेरात ते येतात, तेव्हा समग्र शेराची उंची व गोडवा ते निश्चितच वाढवतात असे आम्हास वाटते.
अनेक उर्दूतील नामवंत शायरांच्या गझला जर आपण पाहिल्यात तर त्यांत रदीफ व काफियांनी आणलेली बहार फारच दिलखेचक असते.........वैयक्तीक मत!
.............प्रा.सतीश देवपूरकर

एखाद्या गायकीचे अंग असणा-या शायराने/संगितकाराने या गझलेच्या गायनानुकूलतेवर, रदीफ, काफियांवर व वाक्यरचनांवर प्रकाश टाकावा.

गझल छान आहे
वर चर्चा वाचली
मला असा एक बदल सुचला आहे ...........

आवरू कसा मी आता स्मरणांचा मोरपिसारा?
मी तुला शोधण्यासाठी, पसरून नको ते बसलो!.