खूप दिवसांनी ..
खूप दिवसांनी अत्यंत नवखेपणाने शब्दांपाशी थांबणे :
मागत त्यांच्याकडे अधलेमधले सगळे साचलेले जगणे
तुला नाही समजायची ती कुतरओढ आतल्या तंतूंची
वैराण ओसाडीचा मध्यबिंदू शोधून तोल साधण्याची.
कशाचाच कशाशी तसा नसतो संबंध कुठूनही .
रोजचेच येणे-जाणे-व्यवहार. आत हलणारे काहीबाही
अस्वस्थ ढगाढगांचे पुंजके ऋतुऋतू रंगचाहूल
हट्ट स्वतःचे सर्वांचे जोजवत उचललेले पाऊलपाऊल.
सगळीकडून स्पष्ट झालेली बाह्यरेषा संबंधांची
मर्यादांचं नक्षीदार जगणं लपेटून झोकात वावरण्याची.
कुंपणाच्या अलिकडून पलिकडून जिव्हाळ्याने बोलताबोलता
अंतर्याम गदगदा हलवतात क्षोभाच्या वादळलाटा.
मग एकटीने तुडवणं सारी संकेतस्थळं पुनःपुनः
स्तब्ध वाचनालयं,स्थानकांची गाज, खुणा नव्याजुन्या
समुद्राकडे जातात काही शहररस्ते चित्रप्रदर्शनावरून
तसे स्वतःला दुरावतो आपण अर्थांचे तळ उसवून उसवून.
खूप दिवसांनी उफाळून येते अवघीच तक्रार उत्कट:
चढते पाणी,बुडतात पायर्या तशी ओळींची घुसमट.
जमते/ जमत नाही योजलेले अगदी श्वासांशी भिडवलेले
दोन्ही तर्हांनी होते फसवणूक आपण सदाचे हरवलेले.
भारती बिर्जे डिग्गीकर.
('मध्यान्ह' कवितासंग्रहामधून )
सगळीकडून स्पष्ट झालेली
सगळीकडून स्पष्ट झालेली बाह्यरेषा संबंधांची
मर्यादांचं नक्षीदार जगणं लपेटून झोकात वावरण्याची.
कुंपणाच्या अलिकडून पलिकडून जिव्हाळ्याने बोलताबोलता
अंतर्याम गदगदा हलवतात क्षोभाच्या वादळलाटा.
खूप दिवसांनी उफाळून येते अवघीच तक्रार उत्कट:
चढते पाणी,बुडतात पायर्या तशी ओळींची घुसमट.
जमते/ जमत नाही योजलेले अगदी श्वासांशी भिडवलेले
दोन्ही तर्हांनी होते फसवणूक आपण सदाचे हरवलेले.
-----------------
ही दोन कडवी जास्त आवडली
बाकी कविताही सुंदरच.
अप्रतिम!! तुला नाही समजायची
अप्रतिम!!
तुला नाही समजायची ती कुतरओढ आतल्या तंतूंची
वैराण ओसाडीचा मध्यबिंदू शोधून तोल साधण्याची.
सगळीकडून स्पष्ट झालेली बाह्यरेषा संबंधांची
मर्यादांचं नक्षीदार जगणं लपेटून झोकात वावरण्याची.
समुद्राकडे जातात काही शहररस्ते चित्रप्रदर्शनावरून
तसे स्वतःला दुरावतो आपण अर्थांचे तळ उसवून उसवून.
या ओळी खाsssस आवडल्या!
धन्स अश्विनी,तुला खूप
धन्स अश्विनी,तुला खूप दिवसांनी कवितांच्या रिंगणात पाहिलं म्हणून छान वाटतंय :))
आभार आनंदयात्री, माझी ही आवडती कविता आवडून घेतल्याबद्दल.
खूप मस्त कविता समारोप मस्तच
खूप मस्त कविता
समारोप मस्तच
नेहमीपेक्षा अधिक ओघवत्या बोलक्या शैलीतल्या ओळी त्यामुळे वेगळी म्हणून अधिक भावली
चढते पाणी,बुडतात पायर्या तशी ओळींची घुसमट.>>>>> आमच्या पंढरपुरात पूर्वी दरवर्षी हटकून पूर यायचा तेंव्हा घाटाच्या पायर्या रोज एक-एक करत बुडताना अनेकदा पाहिल्या आहेत त्यामुळे ही घुसमट अक्षरश: अंगावर काटा आणून गेली
वैभव, अक्षरशः तीच प्रतिमा
वैभव, अक्षरशः तीच प्रतिमा आहे, नदीच्या घाटाच्या पायर्या पुराच्या पाण्यात बुडतात ती.. तशाच वहीच्या ओळी शब्दांच्या उसळत्या आवेगात बुडतात - धन्स ,समजून घेतलेत.
तशाच वहीच्या ओळी शब्दांच्या
तशाच वहीच्या ओळी शब्दांच्या उसळत्या आवेगात बुडतात >>>> ऑ! मला अख्ख्या कवितेचा अर्थ काही वेगळाच लागत गेला होता
काही हरकत नाही अश्विनी,
काही हरकत नाही अश्विनी, वाचताना ती तुझी कविता असते. जगण्यातली घुसमट शब्दात उतरताना अर्थांचे बदलणारे फसवणारे रंग हाच तर विषय :))
ह्म्म्म. प्रत्येकाला वेगवेगळा
ह्म्म्म. प्रत्येकाला वेगवेगळा अर्थ लागू शकतो
मला माणसा माणसातल्या, माणूस आणि नियतीतल्या मूक संवादाच्या संदर्भाने काहीतरी अर्थ लागत गेला. खूप काही मनातले दडवलेले/दडपलेले ओठांवर येऊ पहाते पण व्यक्त होऊ शकत नाही, व्यक्त करता येणार नाही, व्यक्त करु पाहिले तरी समोर पोहोचणार नाही... असा काहीसा...
मस्त आणि आशघन कविता..... खूप
मस्त आणि आशघन कविता.....:)
खूप आवडली.
तू तसेच तर म्हणते आहेस
तू तसेच तर म्हणते आहेस अश्विनी, व्यक्त होण्याची प्रक्रिया म्हणजे अमूर्त भावनांना शब्दांच्या आधारे मूर्तरूप देणे. या प्रक्रियेवर अनेक संस्कारांची, सामाजिक दडपणे. शिवाय व्यक्त करण्याचे घटकद्रव्य म्हणजे फसवे,निसरडे शब्द. अनुभव शब्दात उतरतो तेव्हा मुळातच विस्कळत असतो.
फक्त, इथे अनुभव नुसताच प्रकट होत नाहीय तर तो कवितेच्या अनावर आवेगाने येतो आहे असा एक संदर्भ आहे..
धन्स योगुली :))
आधी आह मग वाह अशी प्रतिक्रीया
आधी आह मग वाह अशी प्रतिक्रीया उमटली भारती..
नक्की काय आवडलंय हे नाही नमूद करता येणार पण अव्यक्त व्यक्त करतानची एक तडफड किंवा एक अदभूत प्रवास जाणवला.. पोचला थेट
ओळ न ओळ आशय
ओळ न ओळ आशय संपन्न,
अर्थांच्या व्यामिश्रतेमुळे प्रत्येकाला आपली वाटावी अशी कविता.
धन्स शाम्,बागेश्री .. .
धन्स शाम्,बागेश्री ..
.
>>नक्की काय आवडलंय हे नाही नमूद करता येणार>>
होय बागेश्री, असं होतं कधीकधी, एखादी कविता अशीच असते..
फार आवडली कविता. तुमचे
फार आवडली कविता. तुमचे शब्दवैभव, डिटेलिंग, चपखल योजना आणि मन, हे सगळेच सुंदर आहे. पुन्हा पुन्हा वाचावीशी कविता. धन्यवाद.
धन्यवाद बेफिकीर, फार मोठी
धन्यवाद बेफिकीर, फार मोठी काँप्लिमेंट दिलीत.. आपण जाणतोच की कुठून येतात हे शब्द, हे आपण जाणत नाही..
मग एकटीने तुडवणं सारी
मग एकटीने तुडवणं सारी संकेतस्थळं पुनःपुनः
--------------------------------------
-------------------------------------
तसे स्वतःला दुरावतो आपण अर्थांचे तळ उसवून उसवून.
खूपच मस्त!
प्रतिक्रियेला खुप उशीर
प्रतिक्रियेला खुप उशीर होतोय.
कधी कधी मनातील प्रतिक्रिया लिहायाची राहते असो.
सर्व कवी मनातील सत्य तुम्ही शब्दात मांडले आहे .अप्रतिम शब्दात .