फाईलींमधले क्षणकागद..

Submitted by रसप on 11 November, 2012 - 23:27

केव्हढा हा पसारा तू मागे सोडून गेलीस !
व्यवस्थित लावलेले कप्पे विस्कटून गेलीस..

तुझ्या जन्मापासून तुझ्या लग्नापर्यंत
एकेक क्षण
नंबरिंग केलेल्या वेगवेगळ्या फायलींमध्ये
जपून ठेवला होता...
आणि अनेक वेळा तुम्हां सगळ्यांच्या नकळत
गुपचूप, एकांतात तो प्रत्येक क्षण
पुन्हा पुन्हा पाहिला होता..
पण आज तुझ्या हुंदक्याच्या आवेगाने
अख्खं कपाटच पाडलं...
आणि घरभर पसरलेत क्षणकागद..

लहानपणी तू लपून बसायचीस..
पलंगाखाली, टेबलाखाली... अंगणात
तर कधी शेजारच्या आजोबांकडेही !
मी तुला शोधत राहायचो..
दिसलीस तरी शोधायचो...
तसेच आज हे क्षणकागद शोधतोय.. वेचतोय..

तुझ्या आईला कळायच्या आत
सारं काही परत फाईलून ठेवतो..
आता आधीसारखं नीटनेटकं, पद्धतशीर नाही जमणार
पण जसं जमेल तसं करावंच लागणार..
उगाच तुझ्या आईला त्रास नको !

....रसप....
११ नोव्हेंबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/blog-post_12.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिस झाली होती .सहज गुलमोहोर -कविता ग्रूपची पाने चाळत होतो तर मिळाली
खूपच सुन्दर !!.................शब्दच नाहीयेत माझ्याकडे
धन्यवाद या कवितेसाठी