विस्मृती झरतात संततधार हल्ली!

Submitted by सतीश देवपूरकर on 11 November, 2012 - 13:53

गझल(तरही)
विस्मृती झरतात संततधार हल्ली!
(दाटते आहे निराशा फार हल्ली!!)

शुद्ध झोपेची न खाण्याची, पिण्याची!
होय अंतरजाल हा आजार हल्ली!!

आज लाखोली कुणीही लाख वाहो.....
मी परत करतो शिव्या साभार हल्ली!

शायरी माझी जरा ऎकून घेते!
बायकोचा वाटतो आधार हल्ली!!

एकमेकांनाच श्रीफळ, शाल देती;
साजरे होती असे सत्कार हल्ली!

शांत मी आहे स्वभावाने तरीही....
शायरीमध्ये झरे अंगार हल्ली!

मायबोलीवर न माशांचा तुटवडा!
रोज भरतो मासळीबाजार हल्ली!!

थांबवू का शायरीची उधळमाधळ?
वाटतो घाट्यातला व्यवहार हल्ली!

काय तू प्रेमाबिमामध्ये न माझ्या?
कळत का नाही तुझा होकार हल्ली!

टंकतो दिनरात नुसती उत्तरे मी!
होय प्रश्नांचा किती भडिमार हल्ली!!

केवढा बाणा मराठी काय सांगू?
ते गझल लिहितात बाणेदार हल्ली!

दार ठोठावून मृत्यू काय गेला......
भेटुनी जातात वारसदार हल्ली!

वेतनेतर कैक भत्ते, लठ्ठ मिळकत!
राहती थाटात नोकरदार हल्ली!!

रेटण्यासाठी प्रपंचाचाच गाडा....
ठेवतो तारण उभे घरदार हल्ली!

कष्ट करतो, पोट भरतो, शांत निजतो!
चालला झोकामधे संसार हल्ली!!

नोकरीमधुनी जसा निवृत्त झालो.....
बायकोचा चालतो अधिकार हल्ली!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरविंदराव! संख्यात्मक वदलात. शेरांबद्दल नाही बोललात? काही खटकले काय?
शुभदीपावली! लेखनास हार्दिक शुभेच्छा!

मस्त सर , शुद्ध झोपेची न खाण्याची, पिण्याची!
होय अंतरजाल हा आजार हल्ली!!>>>>>>>बढिया

कमलाकरराव, अरविंदराव! धन्यवाद! असाच लोभ असू द्या!
आपल्यासारख्या रसिक गझलकारांमुळे लिखाणास व चिंतनास जोम येतो!

अमितजी, कैलासराव व बी! धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
मतला कसा वाटला आपणास कैलासराव?

जाणीव ना लोकांच्या भावनांची
दणकून गझला गाळतो हल्ली

शब्दांचे खेळ रचतो, निरर्थक काफिये लिहितो
वाचो न वाचो कुणी , दाबून जिलब्या पाडतो हल्ली

दिसामाजी लिहित जावे , करतो फॉलो मीही
अर्थावीन गझला झाल्या , कोण उलटा पुसतो हल्ली

धन्यवाद कैलासराव! गझल गोटीबंद वाटली, पण शेरांबद्दल काहीच बोलला नाहीत?
मतला कसा वाटला? आपण दिलेल्या ओळीची उंची आमची पहिली ओळ गाठू शकली का?

गझल चांगली असली तरी ही नित्याची टिका टिपणी सोडुन लिहीली तर अधिक आवडेल.

मुक्तेश्वरजी! धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
वस्तुस्थितीचे जे दर्शन आम्हास झाले ते आम्ही शेरांत लिहिले!

''विस्मृती संततधार झरणे '' या प्रकाराशी तादात्म्य होवू शकलो नाही.

दार ठोठावून मृत्यू काय गेला......
भेटुनी जातात वारसदार हल्ली!..............हा शेर मस्तच.

धन्यवाद कैलासराव!
विस्मृती झरतात संततधार हल्ली!
म्हणजे ज्या गोष्टी आम्ही पूर्ण विसरलेलो होतो, त्याच एकसारख्या हल्ली प्रकर्षाने आठवू लागल्या आहेत. जणू काही विस्मरणांच्या (सरी) आठवणी होवून संततधार झरू/पडू/कोसळू लागल्यात हल्ली!
हा आम्हास आलेला प्रत्यय! पहा पोचतो का तो आमच्या अभिव्यक्तीतून. हा अर्थ जर अभिव्यक्त होत नसेल, तर पर्याय सुचवावा, वाचायला आवडेल!
.................प्रा.सतीश देवपूरकर

मग त्यांस आपण विस्मृती कसे म्हणावे? त्या आठवणीच झाल्या की....

गत स्मृती झरतात संततधार हल्ली... किंवा

आठवे झरतात संततधार हल्ली...

असे जमेलसे वाटते.

कैलास,
विस्मृती हा शब्द बरोबर आहे. कदाचित सतीशजींना पराकोटीचा विरोधाभास दाखवायचा असेल. त्यामुळे विस्मृती या शब्दाची सांगड त्यांनी हल्ली या शब्दाशी घातली असेल. अर्थात, त्यांच्या विवेचनावरून तसे वाटत नाही आहे. पण , स्मृतीपटल एकाएकी उघडणे असा प्रयोग मराठीत केला जातो.

मला तर 'संततधार झरतात' असा प्रयोग नाहीये असं वाटतंय... संततधार धरणे हे वाचलंय... संततधार झरली असं नाही म्हणत आपण..

संततधार ह्या शब्दातून एक विशिष्ट पॅटर्न सूचित होतो.

झरणे ह्या शब्दातून नैसर्गिकता/अंगभूतता सूचित होते.

एकंदरीत गोंधळवणारा मतला आहे खरे!

शॉर्ट टाईम मेमरी लॉस ची व्याधी असल्यास 'विस्मृती झरतात' वगैरे होऊ शकते कैलासराव Wink

प्रोफेसर हलके घ्या.

शॉर्ट टाईम मेमरी लॉस य व्याधीत सुद्धा मेमरी थोड्या वेळाने येते...म्हणून

आठवण वारंवार येते हे योग्य आहे

विसरणे वारंवार होते ... हे म्हणजे माझ्या चाव्या,रुमाल मी वारंवार विसरतो अश्या थाटाची अभिव्यक्ती होते आहे.

कैलासराव, विजयराव, आनंदयात्रीजी, आपल्या प्रतिसादांवर अत्यंत बारकाईने चिंतन केले.
विस्मृतींची संततधार झरणे असा शब्दप्रयोग करण्याचा मोह झाला कारण स्मृती व विस्मृती या दोन शब्दांची प्रतिमा मनात चमकून गेली.
संततधार काफियाने तात्काळ मन वेधून घेतले.
हल्ली म्हणजे नेहमी नव्हे हा रदीफही एका बाजूने डोळे वटारीत होता.
संततधार म्हणजे सततची झरणारी/पाझरणारी/झिरपणारी/वाहणारी ही क्रिया समोर उभी ठाकली.
पावसाची संततधार पडते आहे असे काहीसे मनास चाटून गेले.
गतस्मृतीही मनात आले पण ते बाजूस सारले गेले कारण स्मृती ह्या गतकाळाच्या,गतक्षणांच्याच असतात असे मनाने बजावले.
आठवे झरतात हेही लगेच सुचले, पण ते अंतरंगास फारच मिळमिळीत वाटले.
स्मृती/विसमृती ही प्रतिमांची जोडगोळी आम्हास एकसारखी खुणावू लागली!
या दोन प्रतिमांमधील विरुद्ध अर्थ चमत्कृतीजनक वाटू लागला, व मनाला भुरळ पाडू लागला.
इतके चिंतन केल्यावर आम्ही सरळ आमच्या अंतरंगास आलेला प्रत्यय सोप्या गद्यात कागदावर लिहून काढला तो असा.........
ज्या गोष्टी आम्ही पूर्ण विसरलेलो होतो, त्याच एकसारख्या हल्ली प्रकर्षाने आठवू लागल्या आहेत. जणू काही विस्मरणांच्या (सरी) आठवणी होवून संततधार झरू/पडू/कोसळू लागल्यात हल्ली!
हे गद्य विवेचन वारंवार मनात घोळवून पाहिले. अंतरंगात महसूस करून पाहिले.
डोळे बंद करून या गद्य अर्थाशी एकरूप व्हायचा प्रयास केला.
शेवटी असा क्षण आला की, आमच्या ओठांवर उला मिसराच धाडकन आला (हल्ली या रदीफाचा धाक, करडी नजर असूनसुद्धा!).......तो असा.......
विस्मृती झरतात संततधार हल्ली!
हा मिसरा लिहिताना कैलासरावांच्या सानी
मिस-याच्या अलौकिक उंचीचाही धाक/ताण होताच.
विशेषत: हल्ली काफिया निभावणे हे आम्हास कलात्मक आव्हान वाटले.
वरील आमचा मिसरा कैलासरावांच्या मिस-यापुढे खुजा तर वाटत नाही ना, हे पडताळून पाहिले.
दोन्ही मिस-यांचा एकजीवपणा शांतचित्ताने महसूस करून पाहिला!
अन् आमचा मिसरा फायनल झाला व आमच्या मनातील कल्लोळ शांत झाला. मग पुढील १६ शेर हाहा म्हणता एका बैठकीत (म्हणजे एकदिवसाच्या चिंतनातून) कागदाच्या चिठोरग्यावर अवतरले!
महाविद्यालयातून परतल्यावर ही गझल तात्काळ डायरीत नोंदवली, laptopवर टंकली व इथे पोस्ट केली.
टीप: वर आम्ही आमची पूर्ण चिंतनप्रक्रिया जशी घडली तशी दिली आहे.(कलेजा निकालके आपके सामने रखा है). मतला मनाजोगता झाल्याशिवाय पुढे सरकायला आमचे मन धजवत नाही!
थांबतो!

..........प्रा.सतीश देवपूरकर

विस्मृती कशा झरतील असे मला वाटते .स्मृती मनात साठून राहिलेल्या असतात जसे ढगात पाणी बाष्पाच्या स्वरूपात असते म्हणून स्मृती झरू शकतात विस्मृती हा मेमरीतून डीलीट झालेला पोर्शन असतो ना?

आता शेराच्या समर्थनार्थ सान्गायचेच तर जसे सन्गणकाला डस्ट बिन असते तशी काही सोय मनाला असून त्यातून विस्मॄती झरत असतील/लीक आउट होत असतील तर शक्य आहे !!

असो

Pages