किरण नगरकरांना प. जर्मनीचा गौरव - पुरस्कार

Submitted by pkarandikar50 on 11 November, 2012 - 04:36

रविवार दि. ११ नोव्हेंबर २०१२ च्या 'लोकरंग' पुरवणीतील श्री. किरण नगरकर यांची मुलाखत [ले. राम जगताप] व लेख [ले. प्रवीण बांदेकर] परस्पर-पूरक, अत्यंत समयोचित आणि वाचनीय वाटले. इंग्रजीत लेखन करणार्‍या एका भारतीय लेखकाला प. जर्मनीसारख्या देशात गौरविले जावे ही बाब अतिशय महत्वाची आणि कौतुकास्पद आहे. या पुरस्काराबद्दल श्री. नगरकरांचे, तसेच या घटनेची इतक्या सविस्तरपणे दखल घेणार्‍या 'लोकसत्ते'चेही अभिनंदन!

इंग्रजीतून लेखन [किंवा चित्रपट] करणार्‍या कलाकारांबद्दल एक आक्षेप नेहमी घेतला जातो की हे कलाकार पाश्चिमात्य वाचक आणि प्रेक्षकांना काय रुचेल किंवा पटेल ते विचारात घेउन निर्मिती करतात. ऑस्कर पुरस्कार प्राप्त 'स्लम डॉग' वरही अशीच टीका झाली होती. या आक्षेपाला नगरकरांनी चांगले उत्तर दिले आहे की, मराठी वाचक आणि समीक्षक पूर्वग्रहदूषित आणि पारंपारीक दृष्टीने विचार करतात.

कोणत्याही लेखनाचे बाबतीत वाचकांच्या प्रतिक्रिया भिन्न असू शकतात तथापि त्यासाठी त्या कलाकृतीला आधी मोठा वाचक-वर्ग मिळणे आवश्यक असते. मराठीत हे घडत नाही. या मरगळीबाबत केवळ वाचकांना जबाबदार धरणे पुरेसे नाही असे मला वाटते. समीक्षक, माध्यमे आणि शासन हे सर्वच जण कमी-अधिक प्रमाणात या पापकर्माचे वाटेकरी आहेत.

नगरकरांनी 'गटबाजी' कडे लक्ष वेधले आहे, त्यात नक्कीच तथ्य आहे. मराठीतले लेखक आणि समीक्षक यांचे एक 'बंदिस्त वर्तुळ' तयार झाले आहे. बहुसंख्य लेखक शिक्षकी पेशातले आणि समीक्षकही त्याच पठडीतले. त्यामुळे ही मंडळी फक्त एकमेकांसाठीच लिहितात की काय अशी शंका काही वेळा येते. त्यांच्या अनुभवविश्वावरच्या मर्यादा त्यांच्या लेखनातही उमटणे स्वाभाविक असते. त्यामुळे आपल्या समीक्षकांच्या पसंतीला उतरणार्‍या कलाकृती आणि त्याहूनही त्यांवरची समीक्षा यांची 'वाचनीयता' आणि 'विश्वसनीयता' बहुदा संशयास्पद असते.

माझ्या मते, कोणत्याही लेखनाच्या - विशेषतः ललित लेखनाच्या - बाबतीत 'वाचनीयता' हा प्राथमिक आणि अनिवार्य गुण असावा. साहित्यिक किंवा कलात्मक मूल्यमापन त्यानंतर येते. ज्या कथा-कादंबर्‍यांना समीक्षक 'उल्लेखनीय' मानतात [ नावाजणे किंवा शिफारस करणे असल्या गोष्टी ते करतच नाहीत] त्यांना 'वाचनीयते'ची प्राथमिक चाळणी लावली तर त्यापैकी बहुसंख्य बाजूला पडव्यात अशी परिस्थिती आहे. समीक्षा वाचून पुस्तक-खरेदी करू धजण्यार्‍या वाचकांच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता अधिक. वाचक आणि समीक्षक यांध्ये काही प्रमाणात एक पारंपारीक दरी नेहमीच राहिली असली तरी अलीकडच्या काळात ती अधिकाधिक रुंदावत चालली आहे असे दिसते.

'चांगल्या' वाचकांना उपयुक्त ठरेल अशा 'अभिप्रायात्मक' किंवा 'आस्वादक' समीक्षेला आपली माध्यमे फारच थोडी जागा देतात. त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी जागा रटाळ टिव्ही मालिका आणि देमार सिनेमांच्या परीक्षणांना आणि नट-नट्या तसेच गायक-गायिकांच्या मुलाखतींना मिळते. वाचनाची आवड आणि अभिरूची असणारे पत्रकार आणि संपादकही आताशा विरळा होत चालले आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांबाबत तर न बोलणेच बरे. एकंदरीत मराठी मध्यमांची भूमिका वाचन-संस्कृतीला पोषक ठरण्याऐवजी मारकच ठरली आहे.

राज्यात हजारोंच्या संख्येने 'शासन-अनुदानित' सार्वजनिक वाचनालये आहेत. त्यांना शासनाकडून फक्त अनुदानच नव्हे तर 'राजाराम मोहन रॉय' सारख्या योजनांद्वारे मोफत पुस्तकेही पुरविली जातात. जलसिंचन किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यांप्रमाणेच शासनाच्या ग्रंथालय विभागालाही 'टक्केवारी'च्या रोगाची लागण झाली आहे. वाचनालयांकडून होणार्‍या खरेदीतही पुस्तकांची निवड टेबलावरचे आणि खालचे 'कमिशन' या महत्वाच्या निकषावर केली जाते. अशा परिस्थितीत 'चांगल्या' साहित्याचा 'उठाव' किंवा 'गाजावाजा' कसा व्हावा? त्यामुळे, नगरकरांच्या एकमेव मराठी कादंबरीची एक हजाराची आवृत्ती खपण्यास २७ वर्षे लागावीत, याची खंत वाटली तरी आश्चर्य मात्र वाटत नाही. तसेच, नगरकरांसारख्या प्रतिभावंत लेखकाला, 'तुम्ही मराठीऐवजी इंग्रजीत का लिहिता?' असा प्रश्नही विचारणे अप्रस्तुत ठरते. त्यादृष्टीने, 'लेखक फक्त अर्धाच पूल बांधू शकतो' हे त्यांचे विधान सार्थ वाटते.

- प्रभाकर [बापू] करंदीकर.
७०५ सप्तगिरी अपार्टमेंटस, बाणेर, पुणे ४११०४५
दूरभाषः ८६०५०२१२३४ / ९३७१०४००१३
pkarandikar50@gmail.com

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री.करंदीकर.....

~ मराठीने दुर्लक्षिलेल्या पण इंग्रजीने स्वीकारलेल्या एका अभिजात लेखकाच्या कर्तृत्वाचा जर्मनीने केलेल्या उचित अशा गौरव बातमीला तुम्ही धाग्याला ज्या सुरेख लेखाचे रूप दिले आहे त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.

"सात सक्कं..." च्या मुखपृष्ठावर आरोतीचे "क्या फर्क पडता है ?" हे जर रोखठोक तत्त्वज्ञान आहे, नेमके तेच आता किरण नगरकरांच्या गौरवाबद्दल मराठी समीक्षकांचे झालेले असणार. विलक्षण क्षमतेचा एक अस्सल मराठी लेखक फक्त एकच कलाकृती मराठी भाषेत लिहून साता समुद्रापल्याड जातो आणि जागतिक समजल्या जाणार्‍या भाषेतूनच आपली अभिव्यक्ती सादर करतो म्हणजे त्यात मराठीचे काही नुकसान झाले असावे असे इथल्या सो-कॉल्ड एलिट क्रिटिक्सना वाटत नाही यात खरे तर मराठीचेच दुर्दैव आहे. प्रकाशकांची लॉबीदेखील अशा मायग्रेट होणार्‍या लेखकाच्या निर्णयाला कितीशी जबाबदार आहे याचा या निमित्ताने मागोवा घेतल्यास असेच दिसून येते की, एस्टॅब्लिश्ड लेखक सोडल्यास कोणत्याही नवोदिताला कसे नामोहरण करता येईल या विचारातच ही लॉबी दंग असते. होतकरू लेखक कवीच्या प्रतिभेचा अकाली मृत्यू कसा होतो आणि तो का होतो या मागे इथले व्यथीत करणारे जे आर्थिक राजकारण आणि कोंडी आहे तिचा मागोवा जसा भालचंद्र नेमाडे मित्रपरिवाराने घेतला होता तसाच किरण नगरकरांसारख्या साठीच्या दशकातील युवकांनीही.

श्री.पु.भागवत, मे.पुं.रेगे, रा.भा.पाटणकर आदी मान्यवरांना जरूर श्रेय जाईल किरण नगरकरांच्या प्रतिभेला पुस्तकरूपी सूर्य दाखविण्याचे, पण मग हेही तितकेच सत्य की असा लेखक परत मराठीत लिहिता का झाला नाही याची कारणमीमांसाही या ज्येष्ठांनी तपासली नाही. नेमाड्यांच्या 'बिढार' मधील नारायण केळकर हे पात्र थेट चांगदेव पाटलाला सुनावतेच, "चांग्या, मी तर मराठीत एक शब्दही लिहायचा नाही अशीच प्रतिज्ञा केली आहे. काय क्रांती अशी होणार आहे या मराठी साहित्यात ?" हजार प्रतींची एक कादंबरी संपायला जर तब्बल २७ वर्षे लागणार असतील तर काय आणि कसला विचार पोचणार सर्वसामान्यांपर्यंत ? काव्यसंग्रहाची तर ३०० ची आवृत्ती !! हास्यास्पद आहे सारा हा प्रकार. १९९५ च्या परभणी येथील साहित्य संमेलनाच्या वेळी अध्यक्ष नारायण सुर्वे यांच्या भाषणासाठी सुमार पन्नास हजारांच्या साहित्यप्रेमीची गर्दी उसळली होती असे त्यांच्या उमेदवारीचा प्रचार करणार्‍या समर्थकांनी सांगितले....पण पन्नास हजारांपैकी किती प्रेमींनी सुर्वे यांचे साहित्य वाचले असेल ? "माझे विद्यापीठ" आणि 'जाहीरनामा" निदान विविध विद्यापीठांच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात 'सिलॅबस' म्हणून लावली गेल्याने त्यांच्या आवृत्त्या संपल्या होत्या. पण त्यांच्या अन्य कवितासंग्रहातील क्रांतिकारी विचार तिथेच राहिले. मराठी विषयीची अशी अनास्था पाहूनच मग चित्रे, कोलटकर यांच्याप्रमाणेच नगरकरांनीही जर 'इंग्रजी' चा वाट चोखाळली असेल तर तो त्यांचा योग्य असाच निर्णय म्हणावा लागेल.

श्री.करंदीकर यानी सार्वजनिक वाचनालयातील ग्रंथखरेदीबाबत होत असलेल्या 'टक्केवारी' चे सार्थ असेच वर्णन केले आहे. फार डोकेदुखीचा विषय आहे हा. राज्यातील उच्च शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या महाविद्यालयीन ग्रंथालयांना राज्य शासन आणि यु.जी.सी.कडून अक्षरश: लाखो रुपयांची अनुदाने प्रतिवर्षी मिळत असतात. या अनुदानाची "विल्हेवाट' कशी लावली जातात आणि ती नेमकी ३१ मार्चच्या दरम्यानच का लागली जाते यावर काही लिहिणे म्हणजे सर आर्थर कॉनन डॉयल यानाच सोबतीला घेणे गरजेचे आहे.

असो. करंदीकर यांच्या धाग्याच्या निमित्ताने श्री.किरण नगरकर यांच्या एकूणच साहित्याची आठवण येथील वाचनप्रेमीना होईल अशी आशा आहे.

अशोक पाटील

अशोककाका अतिशय सार्थ प्रतिसाद !
बापू, या निमीत्ताने नगरकरांची मायबोलीवर दखल घेतली गेली हे पाहून खुप आनंद झाला. सद्ध्या त्यांचं 'सात सक्कं त्रेचाळीस' वाचतोय. एरव्ही चार-पाचशे पानी पुस्तकाचा २-३ दिवसात फडशा पडतो पण हे छोटेसे पुस्तक एकेक ओळ दोन-दोन वेळा वाचायला लावते, विचार करायला भाग पाडते. आंतरजालावरील एका स्नेह्यांनी या पुस्तकाची शिफारस केली होती. जबरदस्त पुस्तक आहे.
या सुंदर लेखाबद्दल तुमचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार Happy

" नदी सुदूर जनां पवित्र , विटाळति तिर्थ तिचेच पुत्र " !

अजूनही आपल्याला बहुतेकदां इतरानी ओळखलेलीच आपल्यातली गुणी माणसं दिसतात , सर्वच क्षेत्रात !

पुस्तकांच्या दुकानात, व प्रदर्शनात सर्वसाधारणपणे दर्शनी भागात पूर्वापार लोकप्रिय झालेल्या लेख़कांच्या पुस्तकांचीच [ मुखपृष्ठावर नव नवीन चित्रं घालून ] भरगच्च मांडणी केली जाते; जणूं, नवीन काही वाचकांच्या नजरेत पडूंच नये ही त्यांची नैतिक जबाबदारीच आहे !! म्हणूनच, लोकसत्तामधील मुलाखत व या लेखाचं अप्रूप. धन्यवाद.

थॅन्क्स विशाल.....

तुझ्यातील 'लेखक' या पुस्तकाला अतिशय योग्य न्याय देईल याची मला पक्की खात्री आहे. फार वेडे केले होते आम्हाला १९७४ मध्ये. तुझ्यासारखी आठदहा मुले [महाविद्यालयीने विद्यार्थी म्हणतो...] विद्यापीठाच्या लॉनवर या पुस्तकावर.....आणि 'कोसला'.... तासनतास चर्चा घडवीत असत. "सात सक्कं...." मधील पात्रांची नाव अशी काही भन्नाट आहेत की निव्वळ त्यावरही संध्याकाळ व्यतीत होत असे. नायक कुशंक, त्याची प्रेयसी आरोती, चंदनी, शिवाय संजयी, रेवा, राबोली, माना....इ.इ.

'रघू' नामक त्याचा W.H.O. मधील मित्र. संपूर्ण कादंबरीतील हेच एक नॉर्मल नाव, पण खुद्द रघू मात्र ज्याम अ‍ॅबनॉर्मल. त्याच्या आणि कुशंकच्या 'नंदाढेला' व्हिजिटचा किस्सा तर एक नंबरी.....निव्वळ तेवढ्या भागावर एक कादंबरी होऊ शकते.

हॅपी रीडिंग.

अशोक पाटील

धन्यवाद करंदीकर. Happy

'कोसला'ने घातली तशीच मोहिनी 'सात सक्कं त्रेचाळीस'ने घातलेली. पण कोसलाने अस्वस्थतेचा ह्युज कॅनव्हास मांडला आणि त्याचा परिणाम इतका दूरवर, जास्त काळापर्यंत टिकणारा होता की 'सात सक्कं..' ने जन्माला घातलेली सुक्ष्म अस्वस्थता मागे कुठेतरी नेणीवेत जाऊन पडली. नंतर जाणवलं, की या दोन्ही अस्वस्थतांची जातकुळी निराळी आहे. समोर पडद्यावर प्रत्यक्ष दिसणार्‍या नायिकेच्या उत्कट अभिनयामुळे मनात जन्मलेली व्याकुळता किंवा अस्वस्थता आणि तलत मेहमूदसारख्या रेशमी सुरांच्या गायकाच्या शब्दा-सुरांमुळे मनाला आलेली एखादी अनामिक अवस्था- असा कदाचित तो फरक असेल, पण तरी हे वर्णन संपूर्ण नव्हेच. 'सात सक्कं..' ने तीत जगण्यातल्या कोड्यांची, माणसातल्या असामान्यत्वाची-अ‍ॅबनॉर्मॅलिटीची आणि त्याचप्रमाणे जगण्यातल्या विसंगतीची-मजेची बेमालूमपणे सरमिसळ केली. नगरकरांनी ही सारी कोडी कोलाजाच्या स्वरूपात मांडली. नंतर नेणीवेत जाऊन पडलेली ती अस्वस्थता वेळोवेळी आणि विशिष्ठ प्रसंगी डोकं वर काढू लागली आणि मग जितका विचार 'सात सकं..' वर करत गेलो, तितकं ते महान वाटू लागलं. हे रत्न 'कोसला' पेक्षा जास्त गाजायला हवं होतं, असंही वाटू लागलं.

बिढार मधला तो नारायण केळकर 'मराठी लिखाण म्हणजे जागतिक साहित्य-सोसायटीतली झोपडपट्टी आहे'- असंही काहीसं म्हणतो. हे कितपत खरं आहे, ते ज्याचं त्याने ठरवावं, पण त्याबाबतीत विचार करावा अशी परिस्थिती नक्कीच आहे, हे करंदीकरांच्या लेखामुळे आणि अशोक यांच्या प्रतिसादांमुळे पुन्हा एकदा जाणवलं.

मी पण नगरकरांची मुलाखत व लेख वाचला. आता पुस्तके नक्की घेऊन वाचेन. त्यांचे हार्दिक अभिनंदन. मराठीत खूप वेळा फार सकस, खोल, विचार प्रवर्तक तसेच अगदी आतल्या आपल्या मनाला भावेल असे लिहीले जाते पण त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळत नाही. जे सूख उत्तम मराठी वाचून मिळते त्याची बरोबरी कश्याशीच नाही. इंग्रजी पण वाचतोच आणि आनंदाने. पण ती जातकुळी वेगळी आहे. सात सकं त्रेचाळीस माबो वर आहे का?

करंदीकर, लेख आवडला. अशोक आणि साजिराचे प्रतिसादही महत्त्वाचे आहेत.
सात सक्कं त्रेचाळीस वाचतानाच जाणवलं होतं की हे रसायन अजब आहे. ते पचवणं तितकं सोपं नाही. ज्या काळात ते लिहीले होते तेव्हाची सामाजिक स्थिती आणि प्रसिध्द पावलेली समकालीन पुस्तके, लेखक बघता तेव्हाच्या वाचकवर्गाच्या आवडीची कल्पना येते. त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक क्रांतिकारक होते. आजही ते वाचताना दम लागतो. तितकी विचारांची सुस्पष्टता आणि प्रगल्भता निर्माण व्हायला अजून किती वेळ लागेल माहीत नाही.
भाऊ पाध्ये, किरण नगरकर ही नावं आज अशी केवळ निमित्ताने पुढे येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे अजूनही आपल्याकडे पुस्तकवाचन हा एक छंद, मनोरंजनाचे माध्यम म्हणून पाहिले जाते. त्याचा ध्यास घेणारे, त्यातून काहीतरी मिळवू पाहणारे, नवीन प्रयोगाला दाद देणारे त्या मानाने विरळ.घटकाभर करमणूक हवी तर एवढे जडभारी तत्त्वज्ञान वाचून डोक्याला ताप कशाला? असा सरळसोट विचार करणारा वाचक. चर्चा झडणार, मैफिली रंगणार त्या फक्त पुलं, अत्रे, फडके आणि वपुंवर. नेमाड्यांसारखे आजन्म वादाचे मानकरी (पण निदान तेवढे तरी स्थान यशस्वीपणे मिळवले.) दोन्हीपैकी काहीही करायचे झाले तरी त्या संदर्भात काही पायाभूत वाचन आवश्यकच. मजा अशी की, फडक्यांचे, वपुंचे एक पुस्तक वाचले तरी अशा मैफिलीसाठी आवश्यक दारुगोळा भरमसाठ जमतो.नगरकर, भाऊ पाध्यांच्या पुस्तकांना हे भाग्य लाभले नाही कारण त्यांच्या विषयांचा आवाकाच इतका अजस्त्र आहे की त्यावर ठाम मत मांडायला चर्चा घडवायला वाचकांना खूप तयारी करावी लागेल. आणि घटकाभर मन रिझवण्यासाठी ही किंमत जास्त वाटत असावी.

प्रयोगांचे जे प्रयत्न या लेखकांनी केले ते तात्पुरते ठरले. त्यात सातत्य टिकवले गेले असते (नेमाड्यांनी काही प्रसिध्द केले नाही तर निदान ३१ वर्षं 'हिंदू येतेय' ची ललकारी तरी घुमत ठेवली!) तर आज असे लेखन वाचणार्‍या वाचकांचा छोटा का होईना एक वर्ग निर्माण झाला असता आणि कदाचित प्रकाशन संस्था, शासन सर्वांनाच त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागली असती. पण तसे झाले नाही हे आपले दुर्दैव. असे असूनही आज मायबोलीसारख्या मराठी साईटवर अशा पुस्तकांची हिरीरीने चर्चा होते, अनेक मागे पडलेली पुस्तके प्रयत्नाने मिळवून वाचली जातात हे ही नसे थोडके!

हा धागा सुरू करताना तो एक-दोन दिवसातच इतक्या झकासपणे पुढे जाईल असं वाटलं नव्हतं. मा.बो. वरच्या वाचन-प्रेमींना सलाम! गंमत म्हणजे मी 'सात सक्कं त्रेचाळीस' चा नामोल्लेख केला नव्हता पण आज इतक्या वर्षांनंतरही या 'न खपलेल्या' पुस्तकाची आठवण निघावी आणि तारीफ व्हावी याचं आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला.
सत्यकथा, रंगायन, [पूर्वीची] ग्रंथाली, शंकर सारडांनी चालवलेलं म.टा. मधलं सदर, अनुष्टुभ, ललित-मौजेचे दिवाळी अंक अशी काही संस्कार-केंद्रं त्यावेळी बहरत होती.१९७५ नंतर सगळं चित्रच पालटून गेल्यासारखं वाटतं खरं. हा nostalgia नव्हे, एक कटु वास्तव आहे.
- बापू.

बापू , धागा महत्वाचा आहे पण पहिल्याच प्रतिसादाकडे पहा प्लीजच.प. जर्मनी जरा खटकतेयच. बातम्यात सुद्धा सगळीकडे जर्मनी एवढेच म्हटलेय. चूक काढायची म्हणून नाही निर्दोष व्हावे म्हणून विनन्ती. बाकी सगळेच उत्तम. मूळ लेख आणि चर्चाही.