टवाळखोरी - २

Submitted by राजेंद्र क्षत्रिय on 8 November, 2012 - 12:57

सातवी इयत्तेत चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर बाबांनी मला कबुल केल्याप्रमाणे माझ्या आवडीची सायकल घेऊन दिली. सुरवातीला काही दिवस सायकल शिकण्यात गेले. आठवीत मी सायकलवरच शाळेत जाऊ लागलो. सायकलवर शाळेत येणारे बरेच मित्र होते. या सर्व सायकलस्वारांचा म्हणजे आमचा एक ग्रुपच तयार झाला. त्यातील काही आमच्या कॉलनीतच राहात असत. सायंकाळी शाळा सुटल्यावर घरी गेलो कि पाच-दहा मिनिटांत हातपाय धुवून, थोडे फार खाऊन पुन्हा एकत्र जमून सायकलिंग करत असू. सायकल चालवण्याचे जणू आम्हांला वेडच लागले होते. नंतर नंतर आम्ही दोन-दोन, चार-चार किलोमीटर सायकलिंग करायचो. रप-रप पॅडल मारत एकमेकांच्या पूढे जाण्याची चूरस लागत असे. सर्वांग घामाने चिंब झाल्यावर कोठेतरी थोडी विश्रांती घेऊन पुन्हा घरी परतत असू.

एकदा रविवारचा दिवस बघून कोठेतरी लांब सायकलवर ट्रीप काढायची असे ठरले. सर्वांच्या मते गांवापासून सात-आठ किलोमीटरवर असलेल्या प्रसिध्द अशा शंकराच्या मंदीरात जायचे ठरले. दिवस नक्की झाला. अर्थातच सर्वांनी घरची परवानगी घेतली होती. दुपारीच्या जेवणाचा डबा, पाण्यासाठी वॉटर बॅग, बसायला एक मोठी सतरंजी असे सर्व सामान घेऊन ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व सायकलस्वार ट्रीपला निघालो.

सकाळची वेळ होती. दोन-तीन किलोमीटर पक्की सडक आणि पूढे चढ उतार असलेला, वळणावळणाचा कच्चा रस्ता होता. या कच्च्या रस्त्यावर सायकल चालवणे म्हणजे एक कसरतच होती. कधी कधी मध्येच सायकलवरून उतरावे लागे. कधी उतारावरून पॅडल न मारताच वेगाने जात असू. जाताना आमच्या गप्पा अखंड सुरू होत्या. अचानक समोरून एक दुधवाले काका येताना दिसले. त्यांच्या सायकलला मागे कॅरीअरच्या दोन्ही बाजूस दोन दुधाच्या किटल्या अडकवलेल्या होत्या. एक छोटी किटली पूढे हॅंडलला लावलेली होती. ते रतिबाचे दुध घालण्यासाठी गांवाकडे निघाले होते. आम्हाला ओलांडून ते थोडे पूढे गेले आणि आमचा एक मित्र अचानक म्हणाला, " दुधावालेकाका, दुध आहे काहो ? " तसे सायकलवर जाणारे दुधवाल्याकाकांनी आमच्याकडे बघत सायकलला ब्रेक मारला आणि दहा- पंधरा फूट पूढे जाऊन थांबले. आमच्या काही लक्षात येण्याच्या आतच त्या मित्राने सायकल वळवून काकांच्या दिशेने मागे जायला सुरूवात केल्यावर आम्हीही त्याच्या पाठोपाठ निघालो. दुधवाले काका मागील कॅरीअरला अडकवलेल्या किटल्यांकडे बघत म्हणाले," हे रतिबाचे दुध आहे, पण थोडे जास्तीचेही आहे तुम्हाला किती पाहिजे ? " त्यावर मित्र म्हणाला, "आम्हाला जास्त नको, द्या थोडे थोडे". असं म्हणताच काकांनी हॅंडलला अडकवलेली किटली काढत विचारलं, " पण तुम्ही घेणार कशात ?". मित्र म्हणाला, " तुमच्याकडे माप असेल ना ? मापानेच पिऊ घोट घोट, तोंड न लावता". काका अर्ध्या लिटरच्या मापाने दूध देत गेले, आम्ही सर्व जण मापाला तॊंड न लावता ते न तापवलेले ताजं ताजं दूध प्यायलो. सर्वांचे दूध पिवून झाल्यावर आम्ही पूढे निघालो तसे काका म्हणाले, " अरे, दूधाचे पैसे ?". तेवढ्यात तो मित्र म्हणाला, " काका, आम्ही विद्यार्थी आहोत आमच्याकडे कसले पैसे आणि आम्ही कुठे दूध विकत मागितले होते". बरीच हुज्जत घातल्यावर काकांच्याही लक्षात आले की, हे विद्यार्थी आहेत, यांच्याकडे काही पैसे नसणार, उगीच वाद वाढवूनही काही उपयोग होणार नव्हता. काका म्हणाले, " माझ्याही घरात दोन विद्यार्थी आहेत, समजेन की तेच दूध पिले, जाऊ द्या सोडून दिले पैसे. मजा करा." आणि पडत्या फळाची आद्द्न्या घेऊन आम्ही तेथून सुसाट वेगाने शंकराचे मंदीर गाठले. पूर्ण दिवसभर याच गप्पा रंगल्या. पूढेही आमचे सायकलींग सुरूच होते पण त्या दिशेला आम्ही परत गेलो नाही.

असेच एकदा आम्ही सर्व जण सायकलिंग करत चाललो होतो. एका चौकात गर्दी जमा झालेली बघून आम्ही सर्व जण तेथे थांबलो. दहा- बारा माणसे आजूबाजूला उभी होती. मध्यभागी एक माणूस रोडवर पडलेला होता. त्याची सायकल बाजूला पडली होती. सायकलला अडकवलेल्या दूधाच्या किटल्या लवंडून सर्वत्र दूध सांडलेले होते. ते बघून आम्ही सर्व मित्रांनी आपापल्या सायकली रस्त्याच्या एका बाजुला लावून तिकडे धाव घेतली. जवळ जाऊन बघतो तर त्यादिवशीचेच दुधवाले काका होते ते. आम्ही ताबडतोब त्यांना उठवून बसवले. फार लागले नव्हते, मोटारसायकलचा ओझरता धक्का लागला होता. पण किटल्यांच्या वजनाने काकांचा तोल गेला होता. त्यांना सावकाश रस्त्याच्या कडेला आणून बसवले. त्यांची सायकल व सर्व किटल्या वगैरे गोळा करून त्यांच्या सायकलवर अडकवून दिल्या आणि त्यांच्याकडे बघत राहिलो. जरा सावरल्यावर काका म्हणाले, " अरे, तुम्ही तेच विद्यार्थी ना? पण बाबांनो आज माझे सगळे दुध सांडून गेले नाहीतर आजही तुम्हा सगळ्यांना दूध दिले असते घोट घोट". आम्हाला काय बोलावे ते समजेना. मनांतल्या मनांत आमच्या त्यादिवशीच्या वागण्याची लाज वाटू लागली. आज पासून अशा प्रकारची गंमत आयुष्यात कधीही करणार नाही अशी शपथ आम्ही सर्व जणांनी घेतली आणि मी ती आजपर्यंत पाळली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users