अशोक नायगांवकरांची 'वाटेवरची कविता '

Submitted by भारती.. on 8 November, 2012 - 05:34

अशोक नायगांवकरांची 'वाटेवरची कविता '

अशोक नायगांवकर मुख्यत्वे आपल्या मंचीय कवितेमुळे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत.अलिकडे झी मराठीच्या हास्यसम्राटसारख्या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून त्यांचा परिचय अधिक कानाकोपर्‍यापर्यंत झाला. कदाचित या गदारोळात त्यांची मूळ कवी-ओळख झाकोळली गेली..

दापोली येथे होणार्‍या कोमसापच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आपल्या काळातील या विनम्र, प्रतिभाशाली पण ते प्रतिभेचे देणे underplay करणार्‍या या कवीला सलाम. त्यांचा एकच कवितासंग्रह म्हणजे 'वाटेवरच्या कविता .' (अजून एक 'कवितांच्या गावा जावे' हा इतर काही कवींना बरोबर घेऊन प्रकाशित झालेला प्रातिनिधीक कवितासंग्रह.)

येथे 'वाटेवरच्या कवितां' (ग्रंथाली प्रकाशन )मधील कवितांबद्दल मी लिहिणार आहे..

ही वाट आहे शहर आणि खेड्याला जोडणारी.महानगरातील कित्येकांच्या प्राक्तनाची वाट.जिची वास्तव दिशा आहे खेड्यातून शहराकडे. जिच्या मनाची ओढ आहे शहरातून खेड्याकडे.
पण ते मनातलं खेडं आहे तरी कुठे शिल्लक ?? तिथंही एक विपर्यस्त शहरच उभं आहे आता.

ही वाट म्हणूनच स्वप्नामधील गावाला पारखी आहे.

तसा बराच वेळ घेऊन प्रकाशात आलेला हा एकमात्र कवितासंग्रह नायगांवकरांच्या कवितेवरील निष्ठेची खूण आहे. जी समग्रता त्यांना आपल्या शब्दात उतरवायची आहे ती मोठी अ-काव्यात्म आहे.समकालीन विज्ञानापासून ते व्यापार व्यवहारापर्यंत जे काही घडते आहे ते नायगांवकरांना कवितेच्या घरात आणायचे आहे. त्यांच्याच शब्दात,

'अगदी मनापासून आम्ही आमच्या अक्षरांना
घरात आणले आणि
दु:खाच्या चढणी-उतरणीवर सर्वस्व बहाल केले.'

हे 'घरात आणणं' आठवण करून देतं ते 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने' असे सांगणार्‍या त्या कुणाएकाची. त्याचं देणं अजूनही मराठी रक्तामधून वाहतं आहे, मराठी कवितेतून असं उमटतं आहे.

एकूणच अस्सल मराठमोळ्या अशा या कवितेला महानगरात परकं-पोरकं वाटतं आहे.जगण्यासाठी जवळ केलेलं हे शहर तिच्या आत्म्याभोवती अदृष्य साखळदंडांसारखं खळखळतं आहे.
'नंतर नंतर व्हावचरं बनवणारे
कॉरस्पाँडन्स करणारे लोक
शहारात राहू लागले
आणि कुळीथ,तूर,उडीद,बाजरी
पिकवणारे येडे खेड्यातच राहिले..'

ग्रामीण शेतकीप्रधान महाराष्ट्राची ही व्यथा,ही पीडा अशोक नायगांवकरांच्या कवितेचा स्थायीभाव आहे.शहर आणि खेडे हा संघर्ष अनेक द्वैतात्मक रूपांनी त्यांच्या कवितेत प्रकटतो.(पण या विराट महानगरांमध्ये झालेली नवकल्पनांची घुसळण, जुन्या सरंजामशाहीचा अस्त, त्यातून अनेकांसाठी निर्माण झालेले नवे आशासूक्त मात्र या मांडणीत येत नाही, हा कालखंड काहीसा सोपा करून मांडला जातो.) हा संघर्ष कसा ? तर -

एतद्देशीय विरुद्ध परकीय संस्कृती.
प्रत्यक्ष निर्मिती विरुद्ध दलालांची चलती.
या व्यवस्थेत फोफावलेलं शासनाचं भयाकारी विश्वरूप आणि भयाकूल,शरण ,नाकर्ते झालेले व्यक्तीमन.

'अयोनिसंभव असतं सरकार
युगानुयुगे स्थिर
दैवताच्या धाकासारखं
मध्यरात्री शस्त्रबेड्या घेऊन येणार्‍या
घोड्याच्या टापांसारखं.'

हा संघर्ष कालरूपही आहे.भूतकालीन श्रद्धास्थानांच्या अवशेषांभोवती समकालीन चंगळवाद एखाद्या रोगसंसर्गासारखा बळावतो आहे..

'टिळक,तुम्ही चौपाटीवर इथे
कशासाठी उभे आहात ?
अहो, पाणीपुरी भेळपुरी खाणं
हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे
आणि आम्ही तो रोज मिळवणारच ''
य कवितेला उपरोधाची अशी लखलखती धार आहे जी बोथट संवेदनांनाही रक्तबंबाळ करेल.
'तुमचे डोके ठिकाणावर आहे काय टिळक ?
तुम्ही डॉलर मिळवा
लोक बघा किती आनंदात
बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत
तुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा ..''
असे टिळकांना सांगताना कवी स्वतःवर , आसमंतावर आसूड ओढत आहे.

या परिस्थितीत प्रतिभावंताची जागा कोणती ? हे वास्तव प्रभावीपणे शब्दात आणणं,बस्स इतकीच ? नायगांवकरांचं संवेदनाक्षम कवीमन त्यासाठी असमाधानी, स्वतःवर रुष्ट आहे.

'गावावर दिसती ओघळ हे रक्ताचे
मी दार लोटले आतून आयुष्याचे
मी परिस्थितीच्या बेंबीमध्ये बोट घातले नाही | मी लढलो नाही || '
असे म्हणणार्‍या कवीला समकालीन जागतिक संदर्भांचे भान असल्यामुळे अन्यत्र प्रतिभावंतांनी निरनिराळ्या आंदोलनांत, युद्धात सर्वस्व झोकल्याचे तो जाणून आहे.

'भडभडा रस्त्यावर येणारे पूर्व युरोपातले
कवी-लेखक-नाटककार
आपण मनातून नुस्ते पहातो. तेव्हा एखाद्या एपिसोडचं शूटींग तर नाही ना
असं म्हणत पुढे सरकतो
कदाचित आपण खूप आध्यात्मिक असतो..'
असाही एक टोला ते स्वत;लाच मारतात !

नायगांवकरांच्या संवेदनांना, काव्यशैलीला ग्रासणारे वास्तव हे असे उग्र आहे की ते त्यांना जराही मोकळे सोडत नाही, त्यांच्यातल्या कवीला जराही सौंदर्यविलास करू देत नाही ! कुणी याला बांधिलकी म्हणेल. ती त्यांच्यातल्या कवीवर सदैव मात करते.किंवा असे म्हणावे लागेल की नायगांवकर अनुभवांच्या दाहाकरता शब्दांचाही मोह धरत नाहीत..कवितेमधली ज्योत क्षीण आहे..शहरामधली तिची जागा केविलवाणी आहे. नकळत टी.एस.इलियटच्या ''In the room the women come and go,Talking of Michilangelo.' या कवितेची आठवण करून देणारे हे शब्द..

बुकेत फुटतो फुलांस घाम
हवेत विरती शब्द नी हात
कोपर्‍यातला थवा सांस्कृतिक
इवलीशी बघ चर्चा करतो'

..अशा जीवन-पराङमुख गटांची पर्वा करण्यापेक्षा कवी 'तबकाच्या तळाशी काजळीचा थर ' होणे पसंत करतो.
मी न केली आरती वा मी न केला उत्सव
मात्र तबकाच्या तळाशी काजळीचा थर झालो

-या वृत्तीमुळे नकळत कवितेवरही अन्याय झाला आहे. कवीने क्षमता असूनही तिला कधी सजविली, शृंगारली तर नाहीच्,पण तिचे कैक कोवळे उन्मेष जाळून राख केले आहेत..काजळीच्या त्या थरात मिसळले आहेत. मात्र दूरवर मृदंगाचा ताल घुमावा तशी ती दडपलेली सुंदरता कवितेच्या आतली लय होऊन जागते. मानवी क्रौर्यपीडित व्यवहारांच्या आक्रोशातूनही कवी ती लय ऐकतो, कवितेत उतरवतो.

'कल्याणकारी द्वारपालांच्या मनात फुलतात स्वप्नांचे करुणासागर
तशी मंदचपल वेगाने उभी रहातात प्रत्यक्ष संस्थांची
सनातन आणि अपरिहार्य अस्तित्वे
संस्था असीम त्यागाच्या अनावर ओढीतून
दरवळणाऱ्या वासासारख्या धुंद करतात आसमंत
संस्था टाळता येत नाहीत कितीही टाळू म्हटले तरी
एकलेपणाच्या व्यसनाला भुरळ घालतात संस्था
मृदंगासारख्या तालावर घुमतात ..'
संस्थांची वाढ आणि र्‍हास दोन्हींचा शोध घेणार्‍या या सुंदर कवितेत वास्तवातलेच अदृष्य काव्य समर्थपणे उमटते,म्हणून शाश्वताचा स्पर्श तिला लाभतो.

सौंदर्यासक्तीबरोबरच स्वतःमधली तरल आध्यात्मिकताही रुढार्थाने छाटून टाकणारा हा कवी एक सवलत मात्र स्वतःला देतो..व्यथेला उ:शाप आहे तो फक्त विनोदबुद्धीचा. ही तीच विनोदबुद्धी जी टिळकांवरील कवितेत तिखट उपरोधाचे हत्यार घेऊन आली होती.

'पंढरीच्या विठ्ठलाचे मीच केले सांत्वन
मी विटेने अंग त्याचे शेकले कित्येकदा
लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्राला दिला-
-'वेळ पडली लोकहो, झोपेतुनी उठवा मला !'

'ते व तू' या कवितेत धनदांडगे व सामान्य यांच्यातला फरक असाच वक्रोक्तीच्या सहाय्याने व्यक्त झालाय -
'ते क्रेडिट कार्ड
त्रिभुवन दास
तू ठेव गहाण हंडा -कळशी
फिर बोंबलत '

या कवितेतली कालची प्रेयसी आजची पत्नी आणि अनंतकाळाची माता असणे नायगांवकरांच्या स्वभावाशी अगदी सुसंगत आहे.
मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू
ती म्हणाली, यापुढे चोरून भेटू ''
असा गोडवा असलेलं पतीपत्नीचं नातं रेखाटायला नायगांवकरांना खूप आवडतं.

स्त्रीचे हृद्य असे हे सांसारिक रूप कवी रेखाटतो. ती पत्नी असते किंवा काटक्यांच्या शिशिरात चुलीशी खोकणारी माय.
'नाही रानाचा आधार
नाही पायाखाली जोते
काटक्यांच्या शिशिरात
माय चुलीशी खोकते ..'

पण ज्योतीबांच्या महाराष्ट्रातली साक्षर स्त्री स्वत;च लिहिते ' मी स्वखुशीने जाळून घेतेय' यातला विपर्यास, दुर्दैव, कवीला छळत रहाते..
आता तिला
सही निशाणी
डाव्या आंगठ्यासाठी
शाई फासावी लागत नाही
आता ती स्वत:च लिहू शकते
घासलेट ओतून घेण्याआधी
'मी स्वखुशीने
जाळून घेतेय ' ..

नायगांकरांच्या कवितेचे रूप या स्त्रीसारखेच आहे. अनलंकृत, परम दयामय पण स्वतःच्या शक्तीला कमी लेखणारे.

समकालीन समर्थ कवी म्हणून आम्हा वाचकांच्या मात्र त्यांच्याकडून अजून अपेक्षा आहेत. त्यांच्या कवितेच्या वाटेचा परतीचा प्रवास पुन; त्या 'स्व'ला ओळखणार्‍या उगमाकडे व्हावा अशी उत्तरोत्तर लेखन शुभेच्छा..आणि अभिनंदन.

भारती बिर्जे डिग्गीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छान ओळख.. अगदी वेगळ्याच असतात त्यांच्या कविता. ( मला त्यांची ती स्वयंपाकघरातील क्रूरतेबद्दलची अजून आठवतेय. ) त्यांचे गद्यलेखनही आवडते.

मस्तच मला पुस्तकं फारशी मिळत नाहीत आणि नवी परवडत नाहीत या पार्श्वभुमीवर तुमचा हा लेख नायगावकरांच्या काव्यातील विविध पैलूंचा परिचय देणारा ठरला अन्यथा स्टेजवरचा त्यांचा विनोद त्यांचं काव्य गुंडाळून घेतो.

धन्यवाद भारती या सुंदर लेखाबद्दल आणि नायगावकरांच्या अतिशय भिन्न काव्याच्या परिचयाबद्दल.

सुंदर लेख, अतिशय प्रभावी ओळींच्या कविता.

धन्यवाद भारती या सुंदर लेखाबद्दल आणि नायगावकरांच्या अतिशय भिन्न काव्याच्या परिचयाबद्दल.

सुंदर लेख, अतिशय प्रभावी ओळींच्या कविता. >>>> +१००...

आम्हाला नायगावकर एक विनोदी आणि मिस्किल कवी म्हनूनच माहीत होते. त्यांचा खरा परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

भारतीजी,

मला निदान त्यांची एक कविता तरी पूर्ण द्या...
कारण त्यांची लिखाणाची शैली मला तशी भावली नाही. जे तुम्ही लिहिले आहेत ते वाचून..
काही काही ओळी चांगल्या आहेत. पण तरी....

खूप सुन्दर
महत्त्वाचे म्हणजे ज्या कवियत्रीच्या काव्याबद्दल भरभरून लिहिले तरी कमी पडेल अशा एका अद्वितीय कवियत्रीने दुसर्‍या कवीबद्दल भरभरून लिहिलेला लेख आहे हा !!....दॅट इस् मोस्ट ब्यूटीफुल पार्ट ; आय से!!!

धन्यवाद भारतीताई !!

कवीची ओळख आणि कवितेचं रसग्रहण हे उत्तम आलंय या लेखात. त्या दृष्टीने अतिशय सुंदर लेख आहे. मात्र अन्यत्र असलेल्या माझ्या प्रतिसादाला अनुसरून आलेला हा लेख असावा असे वाटते. तसे असल्यास, त्या बीबीवर मुक्तछंदाबाबत व्यक्त झालेली तिथली मते (कवयित्रीसहीत) पाहता अशोक नायगावकर यांच्या मुक्तछंदविरहीत कविता आहेत किंवा कसं ही शंका मी विचारली होती. ते एक उत्तम कवी आहेत यात शंका नाहीच. पण रंगमंचावर ते जे काही सादर करतात ते मुक्तछंदाच्याही पलिकडे निबंधात्मक असं काहीतरी असतं. मात्र त्यात कुठेतरी काव्य असल्याने ते सादरीकरण मनाला भिडतं. मात्र तरीही, मुक्तछंदात लिहीणा-यांबद्दल प्रतिकूल मतं व्यक्त केली जात असताना नायगावकर मुक्तछंदातच लिहीतात कि त्यांच्या छंदबद्ध कविताही प्रसिद्ध आहेत हे स्पष्ट झालेले नाही.

सर्वच आत्मीयांचे मनःपूर्वक आभार. नेटच्या समस्येमुळे लिहू शकले नव्हते.
संमेलनाध्यक्ष झालेल्या नायगांवकरांच्या कवितेचा परिचय करून देणे हा हेतू होता.
स्वतः नायगांवकर performing artist जास्त असल्याने अलिकडच्या काळात ते कविताबाह्य कारणांसाठीच प्रकाशात आले आहेत! एका चांगल्या कवीने स्वतःच्या कवितेची काहीशी परवड केलीय असे मला वाटते.
दुर्दैवाने त्यांचे माझ्याकडे असलेले दोन्ही संग्रह स्थलांतरात गहाळ झाल्याने (टिपणे तेवढी आहेत) मी एकही पूर्ण कविता आता देऊ शकत नाही, .. पुस्तक पुनः मिळवण्याच्या प्रयत्नात आहे,तेव्हा लेख संपादित करेन.

इब्लिस, कदाचित पूर्ण कविता वाचल्यावर तुम्हाला कळतील.. जवळजवळ दुर्बोधता नाहीच.

चक्रमचाचा, माझ्या मताचा थोडासा विपर्यास होतोय, हो, मी 'चांगल्या कवीला चांगलं छंदोबद्ध लिहिता आलंच पाहिजे 'असं एका प्रतिसादात माझं वैयक्तिक मत दिलं होतं..माझ्यापुरती, ती कवीला ओळखण्याची एक लिटमस टेस्ट आहे, अन्यथा काव्यमय गद्य लिहिणारं कुणीही कवी ठरेल.
या वाक्याचा उरलेला अर्धा भाग आता पुरा करते, 'चांगल्या कवीला चांगला मुक्तःछंदही लिहिता आला पाहिजे.. '
आशयाला अति तंत्रवादाच्या बंधनातून मुक्त करणारा मुक्त्:छंद हे कवितेचं अभिन्न अंग आहे, पण ती अभिव्यक्ती मुळात कविता असावी लागते, ओळी तोडून लिहिलेलं गद्य नव्हे..जसं की ट लाट जोडणे म्हणजे छंदोबद्ध लिहिणे नव्हे.

असो, या विधानांना कृपया हृदयातून समजून घ्यावे, वाद मला नीटसा घालता येत नाही.

नायगांवकर दोन्ही प्रकारे उत्तम लिहू शकतात.ते मुक्त;छंदाचा अवलंब जास्त करतात कारण त्यांना आखीवरेखीव असं लिहायचंच नाहीय, तो त्यांच्या शैलीचा भाग आहे.

वाद मला नीटसा घालता येत नाही. . >>

भारतीतै,
आपल्यासारख्यांच्या मताला इथे किंमत आहे याचे कारण हेच आहे. आपण उत्तम कवयित्री आहात. आपल्यालासारख्यांना मत देताना काळजी घ्यावी लागते. ज्यांची बाष्कळ मते वाचून कुणी गंभीरपणे घेत नाही त्यांना हे लागू पडत नाही. आपणास मर्म समजले असावे. येत रहा. आपणास शुभेच्छा !

(ता.क. : चांगल्या कवीला चांगला मुक्तःछंदही लिहिता आला पाहिजे.. '>>> या मताशी फारसा सहमत नाही. अर्थात इथे जास्त काही लिहीत नाही. )

सामाजिक विषमतेची खोलवर जाणीव असलेल्या एका जातिवंत कवीच्या लेखन प्रवासाचा मागोवा घेताना नक्कीच जाणवते की श्री.अशोक नायगावकर यांची सांप्रत महाराष्ट्र देशात शब्दांना 'माध्यमा'ची ताकद देणारा विलक्षण क्षमतेचा कवी अशी ओळख आहे. कविता कधीही केवळ कन्सेप्ट्समधून तयार न होता तिला आवश्यक असते ती प्रखर प्रभावी शब्दांची आणि असे शब्द केवळ चार भिंतीच्या आत बसून ग्रंथालयाच्या रॅक्समधील संदर्भ ग्रंथांच्या अवलोकनामुळे हाती येत नसून ते मिळतात प्रत्यक्ष फील्ड वर्क करूनच....ही क्षमता नायगावकरांच्याकडे अगदी ओतप्रोत म्हणावी अशी भरली आहे.

"तळे ओसंडुन वाहतेय कोठे
गाळ गुदमरतो दबुन खोल आत....
कावळ्यांची काळजी कशासाठी ?
फेकलेले हे फुकट सर्व त्यांचे....?"

~ अशा रोखठोक शब्दांतून नायगावकर जे विश्व समोर आणतात ते किती दाहक आहे याचा अनुभव घेणे फार गरजेचे आहे, तरच त्या 'वाटेवरच्या कविता' च्या मार्गावर जाणे रसिकाला जमू शकेल.

अशा गुणी कवीचा 'रंगमंचीय' अवतार मात्र का कोण जाणे मला [फारसा] रुचलेला नाही {अन् त्यांच्या कवितांचे जे प्रेमी आहेत त्यानी प्रत्यक्ष तोंडावर त्याना सुनावलेही आहे}. सांगलीतील एका कार्यक्रमात श्री.अशोक नायगावकर प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहाणार असल्याची बातमी देताना संयोजकांनी केलेली जाहिरात मन विषण्ण करणारी होती....."या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध विनोदी कवी अशोक नायगावकर.....". हा प्रवास क्लेशदायक वाटतो. नायगावकरांच्या रंगमंचीय अभिव्यक्तीचे जे रूप आहे त्याचा त्यानी त्यांच्या 'कवी' असण्याचा मूलभूत काव्यवृत्तीशी फारकत घेतल्याचे त्रयस्थ नजरेने पाहिल्यास नक्की दिसून येईल.....[या मताशी भारती बिर्जे डिग्गीकर सहमत होतील याची मला खात्री आहे.]

रेगे आणि जी.ए. याना आपल्याला भेटायचं झाल्यास त्यांच्या कविता आणि कथातूनच ते तुम्हाआम्हाला भेटणे गरजेचे आहे. रेगे 'दुसरा पक्षी' आणि जी.ए. 'विदूषक' रंगमंचावर सादर करीत आहे हे चित्रही नजरेसमोर नको वाटते. नेमकी हीच भावना माझ्या मनी अशोक नायगावकर यांच्या दर्जेदार कवितांविषयी वसली आहे. पण 'माध्यमा'ची नशा विलक्षण असते. एकदा का तेथील 'वाहवा...बहुत खूब... क्या बात है !" याचा हवी डोक्यात शिरली की मग चक्रव्यूहात शिरलेल्या अभिमन्यूची स्थिती आत शिरलेल्याला प्राप्त होते.....आत तर जाता येते पण बाहेर पडण्याचा मार्ग नाही.

असो....श्री.नायगावकर यांच्याविषयी मनी असलेल्या आदरापोटी हा प्रतिसाद आहे आणि तो इथे उतरण्याचे कारण म्हणजे भारती बिर्जे-डिग्गीकर यानी 'वाटेवरची कविता' ला दिलेला शब्दसाज. कवी आणि कविता यांच्याविषयी त्यांच्या मनी असलेली आत्मियता शब्दाशब्दातून प्रतीत होते. 'कविता मला आवडते....' असे छापील एकटाकी मत व्यक्त करणे आणि त्यावर सखोल विवेचन करणे म्हणजे काय याकडे एखाद्या नव्या अभ्यासकाने पाह्यचे झाल्यास त्याला हा लेख वाचायला द्यावा इतका सुरेख तो उतरला आहे.

भारती बिर्जे यानी या कवितेच्या प्रेमाला आंधळेपणाचे रूप येऊ दिलेले नाही हेही एक विशेष. 'कॉलिंग स्पेड अ स्पेड' अशी त्यांची जी धारणा आहे ती काही वाक्यातून स्पष्ट दिसते....उदा. "या गदारोळात त्यांची मूळ कवी-ओळख झाकोळली गेली.....", तसेच "एका चांगल्या कवीने स्वतःच्या कवितेची काहीशी परवड केलीय असे मला वाटते....." ~ अशी परखड मते ही श्री.नायगावकर यांच्या प्रतिभेवर अन्याय करणारी नसून त्यांच्याविषयी वाटणार्‍या आपुलकी दर्शविणारी आहेत.

कवी आणि त्याच्या कविता यांचं मूल्यांकन होणे हे खुद्द कविलाही अभिप्रेत असतेच असते. कवीने स्वत:च्या आत्मियतेचा पिंड कोणता हे ओळखणे आणि त्याची जोपासना करणे म्हणजे 'मंचीय टाळ्या' मिळविणे इतकाच मर्यादित हेतू मनी राखला नसला म्हणजे खूप काही मिळविले असे मी म्हणेन.

[या निमित्ताने सर्वश्री दिनेशदा, बेफिकीर, चक्रमचाचा, इब्लिस, वैभव कुलकर्णी, जोशी आदी प्रतिसादकांनी 'कविता' संदर्भात जी मते इथे मांडली आहेत, ती वाचनीय तर आहेतच, शिवाय साहित्यवृद्धी प्रेमासाठीही उपयुक्त ठरावीत.]

अशोक पाटील

>>असे शब्द केवळ चार भिंतीच्या आत बसून ग्रंथालयाच्या रॅक्समधील संदर्भ ग्रंथांच्या अवलोकनामुळे हाती येत नसून ते मिळतात प्रत्यक्ष फील्ड वर्क करूनच..>>
>>रेगे आणि जी.ए. याना आपल्याला भेटायचं झाल्यास त्यांच्या कविता आणि कथातूनच ते तुम्हाआम्हाला भेटणे गरजेचे आहे. रेगे 'दुसरा पक्षी' आणि जी.ए. 'विदूषक' रंगमंचावर सादर करीत आहे हे चित्रही नजरेसमोर नको वाटत>>>>

अशोकजी, तुम्हीही साक्षेपी असे विश्लेषण केले आहे, या विश्लेषणातच नायगांवकरांच्याच काय, आजच्या कोणाही खर्‍या कलावंताची शोकांतिका आहे. ही शोकांतिका प्रसिद्धी माध्यमांनी केलेली आहे अन कलावंतांनी करून घेतलेली आहे. खर्‍या रसिकाला याचे क्लेश होणारच.

अनुभव मिळवण्यासाठी, वाढवण्यासाठी ग्रंथालयाच्या चार भिंती सोडून बाहेर पडायचे, विविध लोकांमध्ये मिसळताना अलगद प्रसिद्धीमाध्यमांच्या तावडीत स्वतःला सापडू द्यायचे,मग स्वतःची अतिपरिचयात अवज्ञा होताना पहायचे असे हे दुष्टचक्र आहे. ही नवी अग्निपरीक्षा जुन्या कलावंतांच्या, प्रतिभावंतांच्या वाट्याला आली नव्हती हे त्यांचे सुदैवच होते.त्यांच्या निर्मितीप्रक्रिया त्यामुळे निखळ राहिल्या.

सर्वच प्रतिसादकांची कविताविषयक आस्था अस्सल आहे, ज्या हेतूने लिहिले, तो साध्य झाला...