शाळकरी वयातली आठवण. ठिकाण कुठलंही तालुका पातळीचं. आई-वडील, मी आणि दोन बहिणी असा लवाजमा रस्त्यातून जायला लागला की आजूबाजूचे लोक मिरवणूक पाहिल्यासारखे पहायचे. लहान गावातली ती पद्धतच. विशेषतः बायका-मुलींकडे तर इतकं रोखून आणि सतत पहायचं की त्यांनाच नव्हे, तर बरोबरच्या पुरुष मंडळींनाही ते नकोसं होऊन अंगाचा तिळपापड व्हावा. याचा परिणाम माझ्यावर असा झाला की रस्त्यातून जाताना मुलींकडे पाहणं ही चांगली गोष्ट नव्हे हे घट्ट डोक्यात बसलं. विशेषतः हे पाहणं मुलींना अजिबात आवडत नसणार ही पक्की समजूत झाली.
काळ उलटला. जरा बऱ्या शहरात बस्तान बसलं. कॉलेज सुरु झालं. आता या वयात गम्मत अशी झाली की, मुलींनी आपल्याकडे पहावं अशी तारुण्यसुलभ इच्छा तर असायची (आणि मलाही त्यांच्याकडे पाहावंसं वाटायचं), पण हे सभ्यतेचं भूत इतकं जबरदस्त मानगुटीवर बसलेलं होतं की आपण त्यांच्याकडे न पाहूनच त्यांना ‘चांगलेपणानं‘ इम्प्रेस करू अशी समजूत झाली. या वेडगळ समजुतीपायी आयुष्यातला सोनेरी काळ अक्षरशः भाकड गेला. ‘पाहण्या’ची कला डेव्हलपच झाली नाही. त्यात माझ्या लहानपणी आणि आम्ही ज्या गावात वाढलो तिथे एकत्र शिक्षण पद्धत नव्हती त्यामुळे मुलींशी मैत्री प्रकार जवळपास नसायचाच. कुणी वर्गमैत्रिणीशी बोललं तर त्याला ‘याचं काहीतरी आहे’ असं म्हणायचे. त्यामुळे मग ‘चांगला मुलगा’ असण्याचं पथ्य ऐन उमेदीभर पाळलं. आईही कौतुकानं, आमचा राजूला मैत्रिणी नाहीत हे दारू, सिगारेट अथवा तंबाखूचं व्यसन नसल्यासारखं सांगायची आणि त्यानं मला आणखीनच मोटिव्हेट झाल्यासारखं व्हायचं.
आणि मग तो दिवस आला. लग्नासाठी मुली पाहणे. आता मात्र माझी पंचाईत झाली. कारण या प्रकारात नुसतं पाहायचं नव्हतं, तर पाहून निवडायचं होतं. आता तिला न पाहिल्याचं इम्प्रेशन पाडता येण्याचा संबंधच नव्हता. पुढे बोलणे, आवड-निवड वगैरे विचारणे तर दूरचीच गोष्ट. मला सॉलिड पश्चात्ताप व्हायला लागला, आजपर्यंत दृष्टी-सोवळं पाळल्याचा. दाखवणे प्रकार मुलींना अपमानकारक आणि कृत्रिम वाटतो, पण मुलांनाही यातून जाताना काय वाटत असेल याचा विचार कोण करणार? तिथे त्याला ‘हा कसा पाहतो’ हे मुलाकडचे आणि मुलीकडचे मिळून पहात असतात आणि त्याच्या हालचालीवरून आपापसात ‘घंटी वाजली’ वगैरे इशारे करून परस्पर खुश होत असतात. या प्रकाराचा वैताग येऊन मग मी फोटो-पत्रिका पाहण्याच्या टप्प्यावरच सांगून आलेल्या मुलीचा निकाल लावायला लागलो. म्हणजे पाकीट उघडून फोटो माझ्या हातात दिला की तो ऑप्टिकल स्कॅन केल्यासारखा फक्त ३ सेकंद नजरेखालून घालायचा आणि तेव्हढ्यात निर्णय घेऊन ‘नाही’ असं सांगून मोकळं व्हायचं, म्हणजे पुढचं सगळंच टळायचं (त्यातही आपण त्या बिचाऱ्या मुलीला ‘पाहण्यापासून’ वाचवल्याचं पुण्यकर्मच केलं असं स्वतःच्या मनाला पटवायचं)
या प्री-पाह्य-फोटो-स्कॅनिंग मुळे प्रत्यक्ष फक्त ३ मुली पहिल्या. पहिलीला मी रिजेक्ट केलं, दुसरीनं मला रिजेक्ट केलं आणि शेवटी तिसरी आणि मी यांनी मिळून लग्नाचं प्रोजेक्ट केलं. गेली बारा वर्षं तरी ती मला रोज पाहायला आवडते (नाही, माझ्या पाठीला पिस्तुलाची गार नळी टेकवलेली नाही, पण माझ्या प्रत्येक लेखाची ती प्रसिद्धीपूर्व वाचक आहे आणि मला हे जग कितीही भ्रष्टाचार आणि प्रदूषण यांनी बरबटलेलं असलं तरी अद्याप त्यात रस आहे). पण तरीही मी आजकालच्या लग्नेच्छू तरुणांना हे सुचवू पाहीन की तुम्ही आतापर्यंत स्वतः जमवले नसेल तर केवळ फोटोवरून निर्णय न घेता जमेल तितके पाहण्याचे कार्यक्रम करत जा, समोरच्या व्यक्तीला आणि स्वतःलाही संधी द्या. कारण पुन्हा असे कायदेशीररित्या पाहायला मिळत नाही, शिवाय व्यासंग जितका वाढेल तितकी आपली खरी लायकी आणि आवड याची कल्पना येईल. अर्थात घंटी वाजल्यावर उगीचच रिजेक्ट करून अधाशीपणा करणे सर्वथैव चूक याबाबतीत दुमत नाही.
आता उरतो रस्त्यानी बायकोबरोबर चालत जाताना पाहणे हा प्रकार. यापूर्वी एकट्यानी हिम्मत होवो न होवो, मित्रांच्या घोळक्यातून खंदकाआडून गोळीबार करावा तसा सुरक्षितपणे याचा आस्वाद घेतलेला असतो. मग आता केवळ लग्न झाले म्हणून हा छंद थांबत नाही, किंबहुना विंडो-शॉपिंग सारखे ते वाढतच जाते. म्हणजे समोरून येताना एक स्थळ लांबूनच पाहण्यायोग्य वाटलं की आपण ताठ होतो, केस सारखे करतो. मग साधारण नजरेच्या टप्प्यात आलं की आपण माझ्यासारखे बालपणीचे सभ्य, चांगले असाल तर आपण काही पाहिलंच नाही असं दाखवून सरळ पाहतो आणि तिला आपल्याला बघू देतो (प्रत्यक्षात आपण तिच्या खिजगणतीतही नसतो). मग स्थळ अगदी पास होणार त्या वेळी पाहणे (कारण सभ्य स्त्रिया इतक्या जवळून पहात नसतात, त्यामुळे निर्वेधपणे त्यांच्याकडे पाहता येते ही समजूत). तुम्ही ‘चांगले’ नसाल तर तुम्ही अथ-पासून इति पर्यंत फलाटावरून ट्रेन कडे पहावं तसे तिच्याकडे भान विसरून आशाळभूतपाने पहात राहता.
यात कोडं हे आहे की तुम्ही पहाता आहात ते बाजूनी चाललेल्या बायकोला कळतं कसं? तर ते समोरच्या बाईच्या डोळ्यात दिसतं. तिला तुमची आवड आणि समोरून आलेला नमुना याचा तुमच्यापेक्षा तंतोतंत अंदाज असतो. अशावेळी अचानक दंडाला धरून बाजूच्या दुकानात ओढले गेलात तर समजून घ्यायचं की आपलं पक्षीनिरीक्षण डिटेक्ट झालं आहे आणि दुर्बीण फोल्ड करायची वेळ आलेली आहे. यात फक्त समोरून येणाऱ्या स्थळांचा उल्लेख आहे. काही जण पाठीमागून पाहून एक अंदाज बांधतात आणि मग ओव्हरटेक केल्यावर बायकोचं लक्ष नाही हे पाहून गरकन मान वळवून पाहून घेतात, पण हे धोकादायक तर आहेच शिवाय यात सक्सेस रेट फार कमी आणि अपेक्षाभंगाची शक्यताच जास्त असते.
यात जोडप्यांचे प्रकार असतात. काही बायकांची ही ठाम समजूत असते की आमचे हे सरळ-साधे आहेत, ते आजूबाजूला ढुंकूनही पहात नाहीत. पाहिलं तरी ते निष्कपट, निरुपद्रवी आणि सात्विक (थोडक्यात बुळेपणानं) पाहतात. याउलट काही बायकांची खात्रीच असते की आपले पतिराज रस्त्यानी जाणारं एकही स्थळ आस्वाद घेतल्याशिवाय सोडत नाहीत, इतकंच नव्हे तर योग्य वेळी कोपराचा कमरेत खुपसवार केला नाही तर आपला उपग्रह कक्षेच्या बाहेर जाऊन दुसऱ्या ग्रहाबरोबर तिच्या गृहीही जायला कमी करणार नाही. तिसरा संप्रदाय म्हणजे पराकोटीच्या पतीव्रता. या आवर्जून तुम्हाला दाखवणार की ते पहा, तुम्हाला ती अमुक-अमुक नटी आवडते ना, तशीच ती हिरव्या ड्रेसवाली आहे की नाही. काय म्हणता? हे असलं प्रकरण अस्तित्वात असणं शक्यच नाही? असतं महानुभाव, जगात काहीही असतं. पण अशांचा हेवा करू नये कारण त्यात गम्मत अजिबात नाही, मुळात चोरून पाहण्याचं थ्रीलच हिरावून घेतलेलं असतं. अशा पतिव्रता स्त्रियांचे पती खरोखर दुर्दैवी.
मित्रहो, चौथा गट फार दुर्मिळ आहे. त्यात कधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष, कधी खट्याळ पकडणं आणि त्याची मस्करी करणं हे चालतं. पण ती चेष्टाही बोचरी, चिमटे काढणारी नसते. मुख्य म्हणजे चेष्टेच्या नावाखाली लपवलेली असुरक्षितता आणि टोमणे नसतात. त्यात निखळ आनंद, विश्वास आणि परस्परांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून दिलेली मोकळीक असते. ज्यांच्या नशिबी हा प्रकार आहे ते सुदैवी. या टप्प्याला जर आपण पोहोचलो तर त्या पाहण्यात ना कसली विकृती असते, ना कसला लोभ आणि ना ही कसला ‘मी पहात नसतो’ असला दांभिकपणा. मग ते टाळणं, ‘पाहून’ घेणं किंवा लघळपणे ‘पहात बसणं’ न राहून समोरून येणाऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाची दखल घेणं आणि मोकळेपणानं (निर्लज्ज नव्हे) योग्य वेळी, योग्य प्रमाणात नजरेनंच तिला अॅप्रिशियेट करणं इतकंच उरतं. त्यासाठी मग ती व्यक्ती सुंदर असायचीही गरज रहात नाही, स्त्रीही असायची गरज रहात नाही आणि तरुणही असायची गरज रहात नाही. मग एखाद्या वाकलेल्या पण नेटानं स्कूटर चालवणाऱ्या आजींकडे किंवा एखाद्या पोतं पसरून पेरू विकणाऱ्या तरतरीत छोट्या पोराकडे पण नजर खिळून राहते आणि जाणवतं की खूप काही आहे आजूबाजूला, न चोरता पाहण्यासारखं. अर्थात आपल्याला तेव्हढा वेळ असला तर. पण इतका वेळ तर काढायलाच हवा, नाहीतर आपण स्वतःकडे कधी आणि कसं पाहायला शिकणार? हाच त्याचा व्यासंग.
(No subject)
खूपच आवडलं.
खूपच आवडलं.
वा!
वा!
मस्त!!
मस्त!!
आवडलं
आवडलं
लेखन आवडलं.
लेखन आवडलं.
छान! आवडल
छान! आवडल
मस्त!
मस्त!
छान लिहीलं आहे, आवडलं ..
छान लिहीलं आहे, आवडलं ..
छान ललित, आवडलं
छान ललित, आवडलं
मस्त
मस्त
आवडलं
आवडलं
आवडलं! शेवटचा परिच्छेद छान!
आवडलं! शेवटचा परिच्छेद छान!
सहिच.. शेवतचा पॅरा खासच..
सहिच..

शेवतचा पॅरा खासच..
!!! वेगळा लेख...आम्ही तर बाबा
!!! वेगळा लेख...आम्ही तर बाबा 'सुन्दर' स्थळे आपणहून दाखविणार्यान्पैकी.....
मस्त.. आवडलं..
मस्त.. आवडलं..:)
रेड मुंगेरी, उत्तम लिखाण.....
रेड मुंगेरी, उत्तम लिखाण.....
सुंदर लिहिलेय...
सुंदर लिहिलेय...
शेवटचा पॅरा मस्तच...
शेवटचा पॅरा मस्तच...
चांगलं लिहीलंय.
चांगलं लिहीलंय.
पण हे सभ्यतेचं भूत इतकं
पण हे सभ्यतेचं भूत इतकं जबरदस्त मानगुटीवर बसलेलं होतं की आपण त्यांच्याकडे न पाहूनच त्यांना ‘चांगलेपणानं‘ इम्प्रेस करू अशी समजूत झाली. या वेडगळ समजुतीपायी आयुष्यातला सोनेरी काळ अक्षरशः भाकड गेला.
>>>>>>>>>>>>
अगदी अगदी ...
वाह! मस्तच! अंड्या ,
वाह! मस्तच!
अंड्या ,
शेवटचा पॅरा खासच
शेवटचा पॅरा खासच
छान
छान
छान!!
छान!!
भारी शेपॅआ!
भारी
शेपॅआ!
आवडलं आवडलं..
आवडलं आवडलं..
व्वा !
व्वा !
सुंदर लिहीले आहे
सुंदर लिहीले आहे
छान. आवडलं.. एक पी.जे.. खास
छान. आवडलं..
एक पी.जे.. खास इथे...
बायकोने विचारलेल्या " आता ती मुलगी आपल्या शेजारून गेली, तिचा ड्रेस किती छान होता नाही ? "
या प्रश्नाचे, योग्य उत्तर कुठले....
=
=
=
=
=
कुठली मुलगी ? माझं लक्ष नव्हतं !!!
Pages