फळे चाखली तेव्हा मजला अर्थ कळाला फुलण्याचा!

Submitted by सतीश देवपूरकर on 5 November, 2012 - 06:44

गझल
फळे चाखली तेव्हा मजला अर्थ कळाला फुलण्याचा!
घोट घोट मी अश्रू प्यालो, स्वाद समजला जगण्याचा!!

विरंगुळ्याला तुला नेमका हवाच होता कुणी तरी;
सोस तुलाही हसण्याचा अन् सोस मलाही फसण्याचा!

पंख मिळाले सोनेरी; पण...हाय, गगन मी गमावले!
वरदानाच्या वेषामध्ये शाप मिळाला झुरण्याचा!!

सांग पाखडू कसे सुखाला? सुखासारखे दु:ख दिसे;
पाखडताना पाठ वाकली, बेत बिनसला दळण्याचा!

वाचवणारा थिटाच पडला, बलाढ्य ठरला बुडणारा!
बुडणा-याने मनात होता चंग बांधला बुडण्याचा!!

एक चेहरा, रंग परंतू किती त-हेने पालटतो!
घोर लागला त्यास केवढा, असण्यापेक्षा दिसण्याचा!!

कोसळणा-या उंच कड्याची विरते जेथे किंकाळी.....
कुणी ऐकला असेल टाहो तिथे फुलांच्या कुढण्याचा?

.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुडण्याचा!!>>> हा शेर व त्यावरून बरीच पूर्वी झालेली चर्चा(वादंग) स्मरते आहे .
मी सुचवलेला बदलही आठवतोय

अडात पडला वाचवणारा बुडात बुडला बुडणारा
बुडणा-याने मनात होता चंग बांधला बुडण्याचा
!! Happy

वैभवा,
अडात पडला वाचवणारा बुडात बुडला बुडणारा
बुडणा-याने मनात होता चंग बांधला बुडण्याचा!!<<<<<<

वाचवणारा अडात कसा पडेल? की, वाचवणारा अडात उडी मारेल?
बुडणारा बुडात कसा बुडेल? बुडल्यावर तो पाण्याच्या तळाशी जाईल, होय ना?
टीप:
आमच्या वरील शेरात वाचवणा-याचे थिटेपणबुडणा-याचे बलाढ्यपण असा विरोधाभास दिसतो आहे. म्हणजे परमेश्वराने वाचविण्यासाठी कितीही हात द्यायचे म्हटले तरी जर बुडणा-या माणसाची स्वत:चीच तीव्र इच्छा बुडण्याचीच असेल, तर बलाढ्य परमेश्वरही थिटा पडू शकतो, अशा माणसाला वाचवताना!
इथे नकारात्मकतेचा सकारात्मकतेवर कसा विजय होवू शकतो हे बुडणारा व वाचवणारा या प्रतिकांमधून व्यक्त होते!
ही प्रतिमांची भाषा व हा शेराचा अर्थ आम्हास तू दिलेल्या शेरात दिसत नाही.

..........प्रा.सतीश देवपूरकर

थिटेपण, बलाढ्यपण ही विषेषणे वाचवणारा व बुडणारा याना गैरलागू व अनावश्यक वाटली मला व्यक्तिशः

वाचवणारा अडात कसा पडेल?>>>> स्वतःहून !! जसा बुडणारा स्वतःहून बुडतो आहे

बुडणारा बुडात कसा बुडेल? बुडल्यावर तो पाण्याच्या तळाशी जाईल, होय ना?>>>>> हा प्रश्न आहे की उत्तर आहे की अजून काही ? या वाक्याचा पुन्हा एकदा शान्त बसून विचार करावा ही विनन्ती

प्रतिकांमधून व्यक्त होते आहेच तर विशेषणे का लावायची उगाच ?

ही प्रतिमांची भाषा व हा शेराचा अर्थ आम्हास तू दिलेल्या शेरात दिसत नाही.>>>>याचा अर्थ तुमचा हाच शेर तुम्हालाच याच ठि़कणी लागू होतो असा काहीजण काढू शकतात हे मी नम्र पण आधीच नमूद करू इच्छितो

असो

धन्यवाद !!