बबन मन बदल

Submitted by बेफ़िकीर on 5 November, 2012 - 01:47

"बोला?"

काऊंटरवरच्या माणसाने भुवया उंचावून पाहात विचारले. बबनने हातातील वस्तू पुढे केली. त्या माणसाने ती त्याच्या हातात घेतली. काही क्षण निरखून नकारार्थी व निराशावादी मान हालवत त्याने वर न बघताच बबनला विचारले.

"काय करायचंय?"

"सर्व्हिसिंग"

"रिनोव्हेशनला आलंय खरं तर"

"हो पण आत्ता नवीन करायचं म्हणजे आयुष्यात तसं काहीतरी व्हायला तर पाहिजे ना? तेच तेच सगळे, त्याच त्याच प्रायॉरिटीज, छत्र्या, टोप्या, वाहनं, स्वेटर्स, बंड्या, मफलर, शॉर्ट्स, सगळं तेच"

"विमान प्रवास वगैरे केलात का?"

"सगळं झालं"

"मग बोटीतून जाऊन या गोव्याला, रस्त्याने नाही जायचं"

"बोटीतून? चालतसुद्धा जाऊन आलो"

"नाहीतर एखाद्या चिकण्या मुलीच्या डोळ्यात डोळे मिसळून बघा"

"मारही खाऊन झाला काहीवेळा"

"सरळ पावसात राजगढ चढा"

"आठवेळा चढलो"

"कर्जबिर्ज काढा एखादं मोठं..."

"झालं काढून तेही. फिटलं पण"

"मग?"

"काय मग? सात वर्षं नवनवीन प्रकार झाले. हप्त्यांची भीती वाटून झाली, घरी हप्ता न्यायला आलेल्या बँकेच्या माणसाचे चहापाणी करून झाले, दडी मारून झाली. सगळं झालं"

"मिसेस काय करतात?"

"त्या माझ्याहून जास्त वैतागल्या आहेत."

"एक काम करा. हे घ्या. हा पत्ता घ्या. हा कागद नीट जपून ठेवा. या पत्त्यावर पत्र पाठवा. म्हणाव असं असं झालेलं आहे. हा पत्ता आहे यार्दींचा. यार्दी बरोबर उपाय काढतात. यार्दी म्हणजे सलाम ठोकावा असा माणूस. त्याच्या दारी गेलेला विन्मुख परतलेला नाही. याचे कारण हे नाही की त्याला पत्रानेच भेटावे लागते म्हंटल्यावर दारी कोण जातंय! ह्याचे कारण हे आहे की यार्दीचा जबाब दुसर्‍या दिवशी येतो आणि असला जबाब असतो की तुम्हाला सांगतो तुम्ही बसल्या जागी टुणकन उडी माराल. एकदम ताजेतवाने. यार्दीचा एक एक उपाय म्हणजे असला असतो, की यार्दीला पत्ररुपाने भेटलेला माणूस हताश झाल्याचे एकही उदाहरण ऐकिवात नाही. घ्या, तुमचे मन परत घ्या"

बबनने सांभाळून आपले मन आपल्या उजव्या तळहातावर घेतले. कीव आली त्याला आपल्या मनाची. बिचार्‍याला काही वावच उरलेला नव्हता आता. काय म्हणाल ते करून झालेले होते. नवीन काय करायचे आता? काय वाटेल ते प्रकार करून पाहिलेले होते. सगळ्यातील नावीन्य संपलेले होते. यार्दी या मनाचे काय करणार काही कळत नव्हते. बबनने काउंटरवाल्याला एकदा शेवटचे विचारले.

"तुम्ही कधी यार्दींना पत्र पाठवले आहेत का?"

"मला गरज नाही. काउंटरवर रोज तर्‍हेतर्‍हेची मने येत असतात. ती बघणे हेच नावीन्य, हाच माझ्या मनाचा विरंगुळा. कॉन्स्टंटपणे बदलणारा असा विरंगुळा मिळाला आहे मला"

"डझ यार्दी रिअली एक्झिस्ट?"

"नो आयडिया. बट हिज लेटर्स डू एक्झिस्ट. द पीपल हू हॅव बीन हॅपी रीडिंग अ‍ॅन्ड फॉलोईंग दोज लेटर्स डू एक्झिस्ट"

एका हातावर मन आणि एका हाताच्या चिमटीत यार्दीचा पत्ता घेऊन बबन घराकडे वळाला, पण घरी गेला नाही. यार्दीची उपयुक्तता जाणवल्याशिवाय तो पत्नीला यार्दी हा उपाय सांगणा नव्हता.

रात्री पत्नी झोपल्यानंतर त्याने चोरट्या हालचाली करत एका कागदावर यार्दीला पत्र लिहायला घेतले.

========================

तारीख - .....

श्री यार्दी,

सादर नमस्कार!

काऊंटरवर आपला पत्ता मिळाला. पत्र पाठवण्याचे धाडस करत आहे. मी एक तीस वर्षाचा तरुण आहे. माझ्या मनाने जगातील शक्य ते सर्व प्रकार अनुभवलेले आहेत. दु:ख, सुख, भीती, नैराश्य, मत्सर, प्रेम, लोभ, क्रोध हे सर्व अनुभवून झालेले आहे. एकही भावना नाही अशी अवस्थाही मेडिटेशनमधून काही क्षण प्राप्त झालेली आहे. आता हे मन मला एक बोज, एक अनावश्यक भार वाटत आहे. या अवस्थेतून मनाला बाहेर काढण्यासाठीचा काही उपाय असल्यास कृपया खालील पत्त्यावर कळवावात अशी विनंती.

आपला स्नेहाभिलाषी

बबन

============================

बबनने सकाळी पत्र पोस्ट केले आणि दिवसभरात ते विसरून तो रात्री झोपला. झोपताना अंधुक आठवले की आपण एक पत्र पाठवले होते. पण झोप अनावर झाल्याने त्याचा विचार त्याने झटकला.

बबन सकाळी उठला आणि बायकोच्या आधी आपण उठल्याचे त्याला बरे वाटले. कारण यार्दीने पत्रोत्तर धाडायला पोस्टाच्या यंत्रणेचा वापर केलेला नव्हता. चक्क एक एन्व्हलप दाराखालून आत आलेले दिसत होते.

बबनने धडधडत्या अंतःकरणाने पाकीट उघडले. आत चिठ्ठी होती.

====================

तारीख - .....

श्री बबन,

आपले पत्र मिळाले व तक्रार कळाली. अडचण क्रॉनिक आहे, साध्या उपायांचा उपयोग नाही. माझ्याकडे काही मने रिकंडिशनिंगला आलेली आहेत. त्यातील डेमो बेसिसवर एक दोन आपल्याला देऊ शकतो. त्यातून नावीन्य मिळेल हे हमखास. पण तीन तासात ते मन परत करावे लागेल. असे एक आठवडाभर मी करेन. त्या आठवडाभरात जी काय सात आठ मने तुम्ही वापराल त्यांच्या आठवणीतून पुढे तुम्ही दोन अडिच वर्षे नावीन्यपूर्ण कल्पना करत राहू शकाल व या उपायाची फी म्हणून पुढील पत्राबरोबर रुपये पन्नास पाठवावेत. पैसे पाठवायचे असल्याने अर्थातच पत्र पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवता येणार नाही. एका पाकीटात पैसे ठेवून ते पाकीट तुम्ही काल गेला होतात त्या काऊंटरला देऊन टाका. ते मला मिळेल. दुसर्‍या दिवशी मी दोन मने पाठवीन. त्यातील एक एक वापरावेत.

आपला / आपली / आपले

श्री / सौ / कु / कै. यार्दी

तळटीप - कोणतेही मन इन्स्टॉल करायच्या आधी कुटुंबियांना त्याची कल्पना द्यावी.

===============================

यार्दीने आयडेंटिटी फारच लपवलेली होती. 'कै. यार्दी' वाचून हादरलेला असूनही बबनने पन्नास रुपये मात्र भरले आणि रात्रभर जागाच राहिला. पहाटे दार वाजले आणि दार उघडले तर माणूस कोणीच नव्हता. खाली एका पिशवीत थोडी खुसफुस झाली म्हणून दचकतच बबनने पिशवी उघडली तर आतून टुण्णकन दोन मने बाहेर पडली. एकावर लेबल होते वेद शहा, वय वर्षे दिड, लिंग पुरुष व रडण्याचा उबग आल्याने रिकंडिशनिंगला देण्यात आलेले मन! दुसर्‍या मनावर लेबल होते मंगलाबाई अत्रे, वय वर्षे ७२, लिंग स्त्री व वार्धक्याचा उबग आल्याने रिकंडिशनिंगला देण्यात आलेले मन!

एकेका हातात एकेक मन घेऊन डोळे फाडून पाहात बबन आत आला. दोन मनांमध्ये इतका प्रचंड फरक होता की कुठलेच इन्स्टॉल करावेसे वाटत नव्हते. त्यामुळे बबनने बायकोला न सांगताच वेद शहा हे मन स्वतःमध्ये बसवले व स्वतःचे जळमटलेले मन आणि त्या म्हातारीचे मन असे एका कागदात घट्ट बांधून आपल्या कप्प्यात ठेवून दिले.

झाले! सगळे बोंबललेच.

बायको उठली आणि बबनकडे पाहात रोजच्या सवयीने मादक हासली. तर बबन जमीनीवर बसून हातपाय हालवत भोकाड पसरू लागला. आपल्या अश्या तिरक्या कटाक्षाने पाहण्यावर अशी रिअ‍ॅक्शन तिला बबनकडून आजवर कधीच आलेली नव्हती. काहीतरी थट्टेचा प्रकार असावा असे वाटून क्षण दोन क्षण बिथरून बबनचे निरिक्षण करून तिने विचारले.

"चहा ठेवू का?"

यावर रोज 'चहा नंतर करू, आधी इकडे ये ना' असे काहीतरी उत्तर अपेक्षित असायचे. आज बबनने उत्तर दिले.

"न्ना.... दुदु"

"अहो? असं काय करताय?"

बबनच्या बायकोला यापेक्षा अधिक थेट प्रश्न सुचत नव्हता.

आपल्या नवर्‍याचा लग्नाआधीपासून लपवलेला एखादा रोग आज अचानक बळावला असावा यावर ती ठाम होऊ लागली. जमीनीवर सैरावैरा धावणारी पाल पाहताना एखादी गृहिणी पलंगावर चढून थिजून उभी राहावी तशी जमीनीवर उभी राहून बबनची बायको थिजून खाली बसून भोकाड पसरणार्‍या बबनकडे पाहात होती.

इकडे बबनला मजा वाटू लागली. कसली जबाबदारीच नाही. पडलो तर बायको स्वतःच उचलून जवळ घेणार, त्यासाठी कसलेच प्रयत्न पडणार नाहीत आणि वर गोळ्या, खाऊ देणार वगैरे! या आनंदात बबन रांगू लागला.

बबनचे रांगणे इतके नैसर्गीक होते की रांगताना त्याची लाळ गळत होती, हात घसरत होते, घशातून चित्रविचित्र निरर्थक आवाज येत होते. बबनची बायको घाबरून मागे मागे सरकत होती. बबन मध्येच तिच्याकडे मागे वळून बघत लहान मुल हसावे तसा हासत होता आणि पुन्हा पुढे जात होता.

धीर धरून बबनची बायको पुढे झाली. तिने बबनच्या पाठीवर दोन्ही हात ठेवून त्याला गदागदा हालवले. त्या राकट स्पर्शांनी नुकताच नाजूक बनलेला बबन रडू लागला. हे न जाणवल्यामुळे बायको कपाळाला हात लावून तिथेच बसली.

मात्र बबनला आत्ता कुठे संकट जाणवले. ते म्हणजे आपल्याला आपल्याच बायकोच्या नाजूक स्पर्शांनीही जीवघेण्या वेदना होत आहेत. हे असेच चालू राहिले तर ती उद्या आपल्याला काय वाटेल ते करेल. त्यामुळे त्याने मनातच ठरवले की आता आपण पुन्हा आपले मन बसवायचे. पण आता ते मन त्याने जिथे ठेवले होते तिथे हात पोचण्यासाठी त्याला खुर्चीवर उभे राहावे लागले असते कारण आत्ता तो बबन नसून वेद शहा होता. त्यामुळे तो नुसताच कपाटाकडे बघून हातवारे करत बोबड्या उच्चारात म्हणत राहिला:

"मन्न्न्न्न... मन्न्न्न्न... ब... बन... मन... बबन... मन... आज्जी मन...बबन मन..."

आपल्या बबनचे आणि एका असंबद्ध म्हातारीचे मन बबननेच एकत्र बांधून कपाटात ठेवले आहे हे काही केल्या बायकोला कळेना! तिला ते कळेना या दु:खात वेद शहा रडू लागला. ते रडणे इतके खरे होते की बायको आणखीन धाय मोकलून रडू लागली. सकाळच्या शुभ प्रहरी बबनच्या बेडरूममध्ये अश्रूंचा महापूर आला.

शेवटी एकदा बबनच्या खाणाखुणांनुसार कपाटातला तो नवीनच कागद बायकोने हातात घेतला आणि उघडला तो काय चमत्कार? टुण्णकन काहीतरी उडाले आणि बबनकडे गेले. अचानक रांगणारा बबन उठून ताठ उभा राहिला आणि म्हणाला.

"हे काय? गाऊन घाल! नऊवारी काय नेसतेस?"

बायकोने स्वतःच्या शरीराकडे पाहिले. चांगला झुळझुळीत गाऊन घातलेला होता तिने. चक्रावून ती बबनला विचारणार की 'अहो गाऊनला नऊवारी काय म्हणताय' तर बबनच ओरिजिनल बायकी आवाजात स्वतःलाच म्हणाला

"इश्श्य! अजून धीर नाही होत गाऊन घालायचा"

बायको बबनचे ते वाक्य ऐकून मटकन खालीच बसली. या माणसाला भल्या पहाटे बाधा झाल्याचे तिने नक्की केले.

वेद शहाचे मन घरंगळत इकडे तिकडे जात होते. बबन आणि म्हातारीचे मन यांचे कलम झाल्याने एकाच शरीरात आता दोन मने होती. मटकन खाली बसलेली बायको तशीच बसून हादरून बबनकडे पाहात होती.

"अहो... यार्दींसारख्या मिश्या वाढवा ना?"

बबन स्वतःलाच हे वाक्य बायकी आवाजात म्हणाला. त्यावर बबननेच खमक्या पुरुषी आवाजात बबनलाच उत्तर दिले.

"टोचतात म्हणून तुम्हीच बोंब मारता ऐनवेळी... सकाळी एक रात्री एक????"

हॉरर पिक्चर पाहावा तशी बसल्या जागेहून बायको वर थिजून बबनकडे पाहात होती. मधेच बबनचे लक्ष आपल्या बायकोकडे गेले. ती जमीनीवर 'जमावाचा सपाटून मार खाल्लेल्या' वेडीसारखी अस्ताव्यस्त बसलेली होती.

बबन पुरुषी आवाजात चकीत होऊन स्वतःलाच म्हणाला.

"अहो? ही माझी बायको अशी का बसलीय?"

"अगंबाई? काय गं? काय ही तुझी अवस्था? बबनने मारलेबिरले क्काय?" - बबनच बायकी आवाजात उद्गारला.

बायको आता मात्र हमसून हमसून रडू लागली.

दोन मनांमधील एक शुद्ध बबन असल्याने त्या शुद्ध बबनला ह्याची जाणीवच नव्हती की म्हातारीही त्याच्याबरोबर नांदत आहे. आपण परीपूर्ण व एकटेच आहोत या थाटात तो होता.

हा विचित्र प्रकार पाहून बायको तिची बॅग भरून पळून गेली. बबनचे झाड उतरल्याशिवाय घरात पाऊल टाकायचे नाही असे ठरवून ती सख्ख्या भावाकडे जाऊन रडू लागली.

इकडे बबन 'ही आत्ता कुठे गेली' असे स्वतःलाच विचारत त्याची स्वतःच उत्तरे देत बसला. वेद शहाचे मन घरंगळत पलंगाखाली कुठेतरी जाऊन बसलेले होते.

एक तासभर बबन स्वतःशीच बडबडत स्वयंपाकघरात कामे करत होता. चहा, पोळ्या लाटणे, भात लावणे, वरण फोडणीला टाकणे, काकडीची कोशिंबीर ही एरवी त्याच्या बौद्धिक क्षमतेत अजिबात न बसणारी कामे त्याने लीलया करून टाकली. त्यातच दार वाजले. उघडले तर मेहुणा दारात उभा. डोळ्यात अंगार आणि सखोल जिज्ञासा. समोर काय दिसेल याचे तुडुंब कुतुहल.

"ये रे"

बबन हासत हासत मेहुण्याला म्हणाला. मेहुण्याने दचकत बिचकत एक पाऊल आत टाकले तर पुन्हा बबनच मागे वळत बायकी आवाजात मेहुण्याकडे बघत म्हणाला.

"अहो बघितलंत का? तुमचे मेहुणे आलेत. या ना? बसा?"

बबनचा तो अस्खलीत बायकी आवाज आणि बायकी हावभाव पाहून जेमतेम आत आलेला मेहुणा परत दाराबाहेर उभा राहिला.

"अरे ये ना आत?"

पुन्हा बबनचा आवाज ऐकून मेहुणा भडकला. दाजी आपली थट्टा करत आहेत हे त्याने मनाशी ठरवले.

"बबनराव, हे आम्ही काय समजायचं?"

हा प्रश्न मेहुण्याने बबनकडेच हात दाखवत केलेला होता. परिणामतः बबनमधील म्हातारीला वाटले की हा आपल्याला असा काय बघतोय. ती भडकली.

"काय समजायचं म्हणजे? तुझ्या आईच्या वयाची असेन मी आता. द्वाड कुठला. दिसत नाही मी मंगला आहे?"

हे वाक्य ऐकून बबनमधील बबन त्याच्यामधील म्हातारीला चुचकारत म्हणाला.

"थांब... थांब तू... चिडू नकोस... तू केर काढत होतीस ना? तू तुझे काम कर. मी याच्याशी बोलतो. ये रे? आत ये! दारात किती वेळ उभा राहणार? आणि ही कुठे गेली रे? तुझ्याकडे आली आहे का?"

"बबनराव... तुमची पत्नी आणि माझी बहिण रामप्रहरी बॅग भरून घरातून निघते आणि तुमची ही थेरं चालू आहेत? हा काय प्रकार आहे?"

ते ऐकून बबन आर्त स्वरात गाऊ लागला.

"जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा"

ते ऐकून मेहुण्याने दाणकन आपला पाय आपटत तारस्वरात एक लहानशी पण स्फोटक माहिती पुरवली.

"अहो तिला या घरी दिली आहे.. इथून ती परत माहेरी आली आहे सरळ आपली उठून... "

"आँ?" - बबनमधील म्हातारी केर काढण्याची अ‍ॅक्शन थांबवत नवलातिरेकाने उद्गारली. आता बबन तिच्याकडे म्हणजे स्वतःकडेच हबकून बघत म्हणाला..

"अगं हा काहीही बोलतोय... तू थांब... ए... माझी बायको माहेरी गेली आहे हे ठीक आहे... पण ती ही का माहेरी गेली आहे हे मी कसे सांगणार?"

आता मेहुणा हतबुद्ध झाला. एकंदर प्रकारात हिंसेला तरी निदान स्थान नाही हे पाहून तो आत येऊन पलंगावर बसला. तो बसलेला पाहून बबन केर काढू लागला. काही क्षण शांतता पसरली. मेहुणा बबनला निरखत राहिला.

अचानक केर काढताना वेद शहाचे चिमुकले मन उडून पलंगाखालून बाहेर आले. हे काय असावे हे न कळल्याने मेहुण्याने ते उचलून हातात घेतले. मेहुण्याच्या हातातील ते मन पाहून बबनला सारे काही आठवले. आपण कोण आहोत, वेद शहा कोण आहे आणि वेद शहाचा उपयोग कसा करता येईल हे आठवले. पण आपल्यात म्हातारी मिसळली आहे हे जाम आठवेना. बबनने गंमत म्हणून वेद शहाचे मन मेहुण्याच्या हातातून खेचून घेऊन मेहुण्याला काहीही कल्पना नसताना त्याच्या छाताडावर ते दाबले. प्रथम थोडासा विरोध दर्शवणारा मेहुणा काही सेकंदातच पलंगावर उड्या मारू लागला.

त्यातच न राहवून बबनची बायको आपल्या भावजयीला घेऊन प्रवेशली. बघतात तर मेहुणा बबनच्या कडेवर बसून दंगा करत आहे. आपले घर म्हणजे वेड्याचा बाजार झालेला आहे हे बबनच्या बायकोला समजले. बबनला मेहुणा पेलवेना. त्यातच बबनसकट त्याच्यातील ती म्हातारीही वजनामुळे वेदना असह्य होऊन ओरडू लागली. बबनच्या घशातून आळीपाळीने पुरुषी व बायकी किंकाळ्या येत होत्या. वेद शहा खदखदून हासत होता.

ते भयाण दृष्य पाहून दोघी उंबर्‍यात बसून सर्वस्व लुटले गेल्याप्रमाणे आक्रोशू लागल्या. ते पाहून बबनमधील म्हातारीही त्यांना साथ देऊ लागली. बबनमधील बबन स्वतःच्याच पाठीवर थोपटत स्वतःचेच सांत्वनही करत राहिला.

बबनचे स्वसांत्वन पाहून त्या दोघी दचकून उठल्या आणि दाराबाहेर उभ्या राहिल्या. बबनची बायको भावाला आर्त हाका मारू लागली.

"दादा... दादा बाहेर ये... ते घर पछाडलेले आहे... बाहेर ये"

पछाडलेले हा शब्द ऐकून बबनमधील म्हातारी बबनच्या बायकोला मारायला धावली. आतमध्ये मेहुणा रांगत रांगत एका कोपर्‍यात जाऊन शू करत खिदळत बसला.

"अचं नाई कलायचं... शू लागली की शांगायचं" असं त्या दोघींना मारतानाच दाराबाहेरची बबनमधील म्हातारी आत बबनच्या मेहुण्याकडे पाहून उद्गारली.

तेवढ्यात यार्दी प्रवेशला. यार्दीला पाहून बबनमधील म्हातारी मुरकत म्हणाली.

"अय्या काय मिश्या आहेत. या ना? मी ह्यांना केव्हापासून म्हणतीय तुमच्यासारख्या मिश्या ठेवा म्हणून. पण येतंच नाहीत यांना तेवढ्या मिश्या!"

यार्दीने चेहर्‍यावरची सुरकुतीही न हालवता बबनमधील एक मन डिसमॅन्टल करून खिशात टाकले. आता यार्दी मेहुण्याकडे जाऊ लागला नाक दाबत. ते पाहून शुद्ध बबन उरलेला बबन बाहेर मार खाऊन हादरून उभ्या असलेल्या बायकोला ओरडून म्हणाला...

"तुझ्या भावाला बाथरूमला जायचे हे कळत नाही का? ही काय जागाय लघ्वी करायची?"

यार्दीने जपून पावले उचलत आणि टाकत वेद शहाचे मनही कसेबसे हस्तगत केले आणि एक अक्षरही न बोलता घरातून निघून गेला. मात्र बाहेर गेल्यावर मागे वळून बबनकडे पाहात निर्विकारपणे म्हणाला.

"उद्या सकाळी एका आचार्‍याचे आणि एका मनोरुग्णाचे मन पाठवेन, त्याचे पन्नास रुपये आजच भरून ठेवा काऊंटरवर"

=========================================

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मला '' भदे'' आठवला.
अगदी मी हेच लिहिणार होतो. "भदे" या प्रकारात जालिम मालमसाला मिसळल्यावर जसे होईल तसे वाटले.

याला म्हणतात थेट आतून आलेलं लिखाण. अनुभूती अविष्कार !!
विनोदी लेखन केल परंतु ललितलेखनात पोस्ट केलय असं वाटलं.

बेफिकीरसाहेब,

उत्तम फॅन्टसी कथा आहे. अश्या कल्पना सुचायला प्रचंड कल्पनाशक्ती लागते जी आपल्यापाशी आहे.

>>मला '' भदे'' आठवला.
एक असाच काहीसा चित्रपट पण आहे ज्यात भरत जाधवच्या अंगात तिन चार भुते शिरतात.