देवमाणसे अशीच भेटतात !!!

Submitted by शरद on 4 November, 2012 - 03:39

शनिवार दिनांक ३ नोव्हेंबर २०१२! सकाळी पावणे सातची वेळ. ९१९८१८८११२४९ या अनोळखी नंबरवरून मोबाईल घणाणला. मी आणि माझी पत्नी - अनुराधा दोघेही व्यावसायिक असल्याने असा अवेळी फोन आला तर आम्ही अनिच्छेनेच उचलतो; आणि अ-महत्वाच्या कारणासाठी फोन असेल तर त्या व्यक्तीला जाम झापतो. तसाच तो उचलला. अनुराधा त्या व्यक्तीशी बोलू लागली. "आप कौन बोल रहे हैं? कहांसे?" त्या व्यक्तीने काय उत्तर दिले ते ठाऊक नाही, पण लगेच अनुराधा चित्कारली, "ओह माय गॉड!! मैं अभी उसको बताती हूँ!" त्या व्यक्तीने परत काही उत्तर दिले. "क्या? उसका फोन भी उधर ही है? मैं कुछ करती हूँ!!"

ती व्यक्ती - राजन - दिल्लीच्या इंटर स्टेट बस टर्मिनस (आय्.एस्.बी.टी.) वरून बोलत होती. माझा मुलगा केदार हिमाचल प्रदेशमधून सुटीवर येत होता. सोबत पुण्याचीच एक मुलगी - अंकिता आणि अंकिताची आई होती. तिघेही हिमाचल टूरिझम च्या बसने सकाळी सहा वाजता आय्.एस्.बी.टी. ला पोचले. तिघे अगोदर प्रीपेड ऑटोसाठी गेले. पण त्यांचे दर न पटल्याने त्यांनी दुसरीकडून टॅक्सी घेतली. त्यांना दिल्ली कॅन्टोनमेन्टमध्ये गेस्ट रूम वर जायचे होते. तिथे दिवसभर राहून संध्याकाळची पुण्याची फ्लाईट पकडायची होती. त्या गडबडीत केदारची लॅपटॉप असलेली बॅग प्री-पेड बूथ जवळच विसरली. त्यात सर्व पैसे, संध्याकाळच्या फ्लाइटची तिकीटे, परतीच्या प्रवासाची तिकिटे, आयडेंटिटी कार्ड वगैरे महत्वाच्या वस्तू होत्या. ते दिल्ली कॅन्टोनमेन्टमध्ये जवळ जवळ पोचले होते तेव्हा हा फोन आला.

माझ्या पत्नीने राजनचे शंभरवेळा (आणि मी एकदा) आभार मानले आणि त्यांना तिथेच थांबण्याची विनंती केली. अंकिताच्या आईला मोबाईल लावला. सर्व परिस्थिती समजावून सांगितली आणि ते लगेच टॅक्सी मागे वळवून आय.एस. बी.टी. ला गेले. सुदैवाने राजन त्यांना तिथेच भेटले. त्यांनी केदारला बॅग दिली, पैसे मोजून घ्यायला संगितले, सर्व वस्तू बरोबर आहेत हे पडताळून घ्यायला संगितले आणि बदल्यात थँक्यूशिवाय इतर काहीही न स्वीकारता जायला सांगितले.

इतर असंख्य अपराधांसह बॅगा चोरीबद्दल दिल्ली कुप्रसिद्ध आहे. अशा अनोळखी शहरात आजच्या तारखेला इतकी प्रामाणिक व्यक्ती भेटणे जवळ जवळ अशक्यच!!!

राजन हे दिल्ली ऑटो ड्रायव्हर्स वेलफेअर काँग्रेस यूनियनचे अध्यक्ष आहेत. त्या प्री-पेड बूथवर त्यांची रिक्षा पहिल्या क्रमांकावर होती (जी आमच्या मुलाने नाकारली होती) त्यांनी त्या तिघांना तिथे येताना पाहिले होते. त्यांचे सामान पाहिले होते. केदार जी लॅपटॉपची बॅग विसरला होता; ती बॅग त्यांनी दुसर्‍या एका व्यक्तीला उचलताना पाहिले. त्याला ती बॅग घेऊन जाण्यापासून रोखले. मग त्यांनी ती बॅग उघडली. आतील वस्तु पाहिल्या. सुदैवाने माझे व्हिजिटिंग कार्ड होल्डर केदारकडे होते. त्यात माझी व्हिजिटिंग कार्डे राजन यांना सापडली. मग त्यांनी मला फोन लावला. विशेष म्हणजे त्याचे भाडे नाकारले असताना त्याने हे सर्व निस्पृहपणे केले.

देवमाणसे अशीच भेटतात नाही का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच चांगला अनुभव. अतिशय भावला. अशी चांगली माणसेही जगात आहे आहेत तर. हा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्स.
राजन हे दिल्ली ऑटो ड्रायव्हर्स वेलफेअर काँग्रेस यूनियनचे अध्यक्ष आहेत. >>>> या श्री राजन यांचा जाहीर सत्कार केला पाहिजे. अतिशय दुर्मिळ मंडळी आहेत - पण आहेत हे फार महत्वाचे.

सॉलिड. अनुभव भावलाच.

फारा वर्षे प्रवास केल्याने माझेही असे तीन चार अनुभव आहेत. पुढेकाही प्रतिसादांनंतर टाकेन जमल्यास.

पुनरागमनासाठी धन्यवाद शरद!

-'बेफिकीर'!

जगात वाईट माणसे आहेत म्हणून चांगुलपणाला किमत आहे.
आहो पाप आहे म्हणून पुण्य पदरी बाळगावेसे वाटते.
हि अशी चांगली माणसे आपल्या आयुष्यात येतात आणि आपले आयुष्य उजळून निघून जातात.
तुम्ही हा अनुभव शेअर केलात तो खूपचं सुंदर आहे.

या गलिच्च्छ वातावरणात वार्‍याची आल्हाददायक झुळूक .
राजन खरे तर राजा माणूसच
शरद -पुनरागमनावर सुस्वागत