बसंती के शोले

Submitted by मुंगेरीलाल on 3 November, 2012 - 12:31

संध्याकाळी ७ ची वेळ. मी ऑफिसमधून येऊन बिल्डींगच्या गेटमधून गाडी आत घालणार, तेव्हढ्यात बी विंगच्या तळमजल्यावर राहणाऱ्या आमच्या एका कजाग, भांडकुदळ शेजारणीने तिच्या हातातली ‘पोर’गाडी जवळ-जवळ मध्येच घातली. कच्चकन ब्रेकडान्स करत मी कसाबसा थांबलो.

आता पुढचा अर्धा तास सभ्यतेचा बुरखा गाडीत ठेवून तिच्याशी मनसोक्त भांडण्याचा नैतिक अधिकार मला मिळालाच या समजुतीपोटी मी सात्विक संतापाच्या फैरी लोड करून खिडकीची काच उतरवली. ऑफिस मधला वैताग आणि आतापर्यंतची रस्त्यातली कचकच या स्फोटक मिश्रणानी आधीच डोक्यात दारुगोळा ठासून भरलेला होता. त्यात ठिणगी बायकोनी टाकायच्या ऐवजी या शेजारणीने आज गेटवरच ‘खेळ मांडला.. मांडला’ असं झालं. मन अगदी शास्त्रोक्त भांडायला उद्युक्त झालं होतं पण शरीर पार थकलं होतं.

“आज गाडीनी ऑफिसला?”, तिच्या चेहेऱ्यावर काहीतरी लकाकत होतं. आता मी हिंजवडीला धनगरा सारखं “काठीला लॅपटॉप लावू द्या कीरं, मलाबी ऑफिसला येऊद्या की” असं सहकाऱ्यानमागे धावत गात, इतकं अंतर आणि तेही या वयात जाणं शक्य नाही हे या ढकल-माउलीला (हातात पोरगाडी ना) काय माहित नाही?

“हो, आजपण गाडीला, सॉरी ऑफिसला ढकललो... आपलं गेलो”, एसीवाल्यांचा राग खिडकी उतरताच वितळून पायापाशीच ओशाळत सांडतो नेहेमी. घरस्त्री वर पाहिजे तसा बरसू शकत नाही तर परस्त्रीवर कशी हिम्मत होणार. आणि कुठल्याही बाईनी आपली जागा दाखवून द्यावी हे मी जागेपणी सहन करू शकत नाही (आपल्या हक्काच्या बायकोची गोष्ट वेगळी).

“हे काय, आज बसडे होता”, असेल, पण हिच्या बोलण्यावरून मला हिचा तूस’डे’ असावा असं क्षणभर वाटलं.

“हो, हो. लक्षात होतं माझ्या... कसा झाला बसडे? तुम्ही गेला होता का बसनी ऑफिसला?”, आता हिचा रोख माझ्या लक्षात आला आणि ही मी कसा बेजबाबदार नागरिक आहे हे अगदी अंगावर वसवसून ठसवणार हे जाणवून माझी छातीची धडधड इतकी वाढली की मला डाव्या कानात चक्क ‘ठोक-ठोक’ आवाज यायला लागले.

“अहो तो दांडक्यानं ठोकतोय तुमच्या त्या काचेवर, गाडी बाजूला घ्या”, एक सेकंद गेला आणि मला उमजलं की आमच्या बिल्डींगची ‘शेकुरटी’ माझ्या डाव्या कानाला ठोक-ठोक करत होती. झालं, मला अनायासे गरीब आणि पुरुष व्यक्ती टार्गेट मिळाली आणि मी गाडी बाजूला घेऊन माझं मध्यमवर्गीय शौर्य गाजवत ‘पेठी’ हिंदीत त्याला ‘बिल्डींगवालोंको पेचान्ते नै क्या, हम क्या मुद्दाम थांबते क्या वाटेत, बोलनेको नही आता क्या, काच फुटेन्गी तो कौन भरींगा’ वगैरे चार शिव्या घातल्या.

त्याच्यावर अर्थातच विशेष परिणाम झाला नाही कारण एकतर त्याला विशेष ऐकू येत नाही आणि दुसरं हे साहेब लोक असेच (विशेषतः संध्याकाळी), ‘सटक’ मूड मध्ये असतात हे सवयीचं झालं असावं.

इकडे माझ्या या सोकोल्ड रुद्रवाताराचा परिणाम लेकी बोले, सुने लागे असा होऊन शेजारीण पण दबेल आणि माझी सुटका होईल अशा अंदाजानं मी तिच्याकडे एक तिरपा कटाक्ष टाकत लॅपटॉप, डब्बा वगैरे सांभाळत खाली उतरलो आणि नेहेमीप्रमाणे “मौन” होऊन लिफ्ट कडे निघालो. (मनात: तोच त्या लॅपटॉपमध्ये बसलेली वेताळीण मला म्हणाली, “राजा, तुला ठाऊक असूनही जर तू माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीस तर परिणाम तुला माहित आहे” )

“हो तर, मी आज ठरवून बसनी गेले ऑफिसला”, बसडे वर स्वार झालेली ‘बसं’ती इतक्यात पिच्छा सोडणार नव्हती तर. हिचं ऑफिस फार लांब नव्हतं आणि बसरूट वर होतं, त्यामुळे तिला विनासायास बस मिळाली असणार. पण केवळ ही जाऊ शकली म्हणून सगळ्या जगाला कॉम्प्लेक्स देण्याची एकही संधी सोडणार नाही. मनात आलं कालपासून मित्रांशी जे बोलत होतो की हे बसडे वगैरे सगळं भंपकगिरी आहे ते मुद्देसूद मांडत वाद घालून लोळवावं हिला. पण कशी कोण जाणे, मला सुबुद्धी सुचली.

“वा, वा. हे फार छान केलंत तुम्ही, खरं तर आपण सगळ्यांनी जायला पाहिजे होतं बसनं आज”, मी बोलून गेलो.

आणि त्याचा अपेक्षित परिणाम झालाच. बसंती सेकंदभर गोंधळून गेली. हातातला चाबूक वरच्यावरच राहिला. एकीकडे आपलं कौतुक झाल्याचा पावशेर आनंद तर दुसरीकडे झोडपायच्या आतच समोरचा माणूस शरण आल्यानं झालेला खेद याचं मिश्रण तिच्या चेहेऱ्यावर होतं.

“आणि खूपच छान उपक्रम आहे हा, खरंच मी खूप ठरवलं होतं भाग घ्यायचं पण सकाळी जागच उशिरा आली आणि मोक्याची बस चुकली”, हळूहळू मी निरुपद्रवी कारण पुढे केलं.

“अरेरे, पण तुम्ही मेनरोडला का नाही आलात? तिथून खू.....प बसेस सोडल्या होत्या त्यांनी”, आवाजात धार कमी होती, पण मी जरा भीड चेपून बस डे ला क्रीटीसाईझ करावं (आणि मग तिनं चोपावं) असं आमिष पण होतं. पण मी अजिबात बधलो नाही. उलट प्रॉमिस केलं, उद्या येईन मी बसनी. ठरलंच आता.

“पण उद्या ते जास्तीच्या बसेस सोडणार नाहीत ना, आजच ते सहज शक्य होतं”, बसंती निर्वाणीचं बोलली.

“असू दे, कितीही त्रास झाल तरी मी जाणारच उद्या बसनी”, मी शहाण्या मुलासारखा उत्तरलो, तोच गेटमधून नाडकर्णी गाडी आत घालताना दिसले. लांबूनच मला पाहून हसत ओरडले “काय साहेब, तुम्ही नाही ना त्या बस डे, फिस डे ला बळी पडलात?”

त्यांचं वाक्य पूर्ण होतं ना होतं तोच बसंतीनं वाऱ्याच्या वेगात त्यांना गाठलं आणि सावज टप्प्यात येताच टांगा सिंघम-स्टाईल गर्रकन फिरवत लढाऊ पवित्रा घेतला. नाडकर्णी बावचळून पहात राहिले आणि मी हीच संधी आहे हे ओळखून लिफ्टच्या दिशेने धूम ठोकली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विनोदी लेखन .... पण तुमचं नशीब बर कि एखादा गब्बर नाही आला "अरे ओ शेकुरती, कितने आदमी थे (कार लेके जानेवाले.)"

>>“हे काय, आज बसडे होता”, असेल, पण हिच्या बोलण्यावरून मला हिचा तूस’डे’ असावा असं क्षणभर वाटलं.
>>बसं ती
Lol

सही!!