तेरे मस्त मस्त दो नैन

Submitted by मुंगेरीलाल on 2 November, 2012 - 11:58

सकाळची वेळ. नुकतंच ऊन वर यायला लागलेलं असतं. गावातून बाहेर पडून गाडी हायवेला लागते.

दृश्य-१

काटा ६० वर जाताच टॉप गियर टाकत मी विचारतो “मस्त हवा आहे नं?”

“हं....”, तिच्या डोक्यात बहुतेक दुसरंच काहीतरी.

“काय झालं?” माझी एक खोड आहे. बिनसणार असेल तर कारण हवं आणि ते वेळीच कळायला हवं.

“आता खिडक्या लावू या का... धूळ येतेय गाडीत”, एटीयम मधून स्लीप यावी तसं कारण बाहेर येतंच.

“असू दे की थोडा वेळ, सकाळी सकाळी फ्रेश हवा छान वाटते”

“माझे केस खराब होतायत, पुन्हा न्हावं लागेल गेल्यावर”, मग न्हा की, घरात वेगळा लॉफ्ट-टँक आहे.

“वरून फक्त १ इंच उघडी ठेव मग”, मी मागच्याच आठवड्यात निगोशियेशनचं सेशन अटेंड केलेलं असतं.

“नको, मग तर जास्तच आवाज येतो वाऱ्याचा”

“आत्ता धुळीचा विषय चालू होता”, चूक दाखवून देण्याची चूक करायला मी कधीच चुकत नाही.

“विषय धुळीचा नाही, खिडकीचा होता... आवाजाचा पण किती त्रास होतो, कितीही मोठा केला तरी रेडिओ ऐकू येत नाही”

“रेडिओ लावलाय कुठे पण?”

“खिडकी लावल्याशिवाय लावून काही उपयोग आहे का?”, हिला अभ्यासात प्रमेयं सोडवण्याची आवड असावी. सुरवातीला ‘समजा की क्ष=शून्य आहे’ असं म्हणून पायऱ्या-पायऱ्यांनी शेवटी ते शून्य असणं कसं चुकीचं हे पटवायचं.

“ठीक आहे, तुझ्या बाजूची लाव”, तहांनी इतिहासातले मोठ-मोठे प्रश्न सुटलेले आहेत.

“का ऐकत नाहीस रे? घरातनं निघालं की वाद घातलाच पाहिजे का?”

“आप्पण नै गं, ही गा...डीच भांडकुदळ. तिचं गॅरेज उन्हात बांधू बरं का”, माघार तर घ्यावीच लागणार, उगीच आपल्या ‘इगो’ला चेष्टेचं वंगण. सुसह्य होतं जरा.

“मी लहान मुलगी नाही”

“सॉरी, नेहेमी विसरतो मी”

“काय?”

“खिडक्या लावायला विसरतो मी”, वेळेत ‘घटना’-दुरुस्ती. फायनली खिडक्या बंद. आता समजलं यांना पॉवर-विंडोज का म्हणतात ते.

“आ...हा. किती शांत झालं एकदम”

“एसी लावावा लागला इतक्या मस्त हवेत... फ्फुकट”, तहाच्या अटी जाचक असतात आणि मला चरफडल्याशिवाय राहवत नाही.

“इतकं काही पेट्रोल जळत नाही, एवढी एसी गाडी घ्यायची कशाला?”

“पेट्रोलचं सोड, पिकप मार खातो... साली नॅनो पण ओव्हरटेक करते”

“कुठे घाई आहे आपल्याला? रमत गमत जाऊया नं मस्त”

“प्रश्न रमत-गमत चा नाही, एका विशिष्ट वेळात ओव्हरटेक करता आलं नाही तर रिस्की असतं” हरलेला कप्तान चेहेरा पाडून माईक वर कारणे देतो तसं माझं सात्विक पांडित्य काही काळ चालू राहतं.

दृश्य-२

“शी, श्शी..... नेहेमी असंच होतं“, एक अकल्पित, अनावश्यक चित्कार.

“काय झालं?”, मनात माझा मीच ‘बाळ रडत होतं, वूडवर्डस दे त्याला’ हे हमखास विनाकारण आठवणारं वाक्य पूर्ण करतो.

“सँडविचेसची पिशवी घरीच राहिली”

“मग इतकं ओरडायला काय झालं? किती दचकलो मी”, मला दचकायला मुळीच आवडत नाही, तेही बायकोमुळे (आणि तिच्याच समोर).

“.....तुला काही कळतं की नाही गं? हायवे वर चालवतोय मी गाडी”, दचकण्याचं पर्यवसान संतापात.
“मुद्दाम रात्री ब्रेड, चीझ आणून ठेवलं होतं सकाळी घाई नको म्हणून”

“अगं काय म्हणतोय मी... मागचे बघायला लागलेत माझ्याकडे विचित्र नजरेनं”
हिचं फोनवर “हां आई, मी बोलतीये, अहो सँडविचेस विसरली”, दुसऱ्या बाजूच्या कानाचा पडदा ओढूनच घेतलेला.

“आता तिला सांगायची काही गरज आहे का? खाल्ली सासूनं तर काय बिघडतं?”

“खायचं तेंव्हा खातील, बेडरूम मधनं उचलून फ्रीज मध्ये टाकायला नको?”

“शंभर रुपये काढ...”

“फाईन करतोयेस की काय मला?”

“टोलनाका आलाय, माझं पाकीट मागच्या खिशात आहे”

टोलनाका मागे पडतो. तिथे ‘सुट्ट्यांच्या बदल्यात चॉकलेटस घ्यायची नाहीत आणि मिळालेल्या कळकट नोटा खिशात न कोंबता वेगळ्या ठेवून पुन्हा पुढच्या टोलला परत द्यायच्या सूचनांची उजळणी.

दृश्य-३

“दमलास तू?”

“का?”

“नाही दमलास का, असं विचारलं”

“मी दमत नसतो गाडी चालवताना”, जन्मतःच गाडीकडू मिळालंय नं मला.

“मग मी कधी चालवायची?”

“आधी प्रॅक्टिस पाहिजे”

“त्यासाठी आधी चालवायला मिळायला नको?”

“इथे नको, रिस्क असते. माहिती आहे ना बाकीचे कसे चालवतात ते? आणि बायकांना बघून जास्त करतात”

“तू आहेस ना बरोबर”

“म्हणूनच मला त्रास होतो ना”

“म्हणजे मी एकटीने जात असले आणि लोकांनी त्रास दिला तर तुला काही प्रॉब्लेम नाही असं का?”

माझं समोर लक्ष जातं आणि मला अचानक जाणवतं की गाडी बाजूला घ्यायला पाहिजे. मी स्लो करत हळूहळू लेफ्टला घेतो.

“इतक्यात शरण येशील असं वाटलं नव्हतं”, तिच्या चेहेऱ्यावरचा आनंद आणि हसू लपत नव्हतं.

“खाली उतर”

“रागावलायेस? असं नको बाबा नाराज होऊन”

“खा.....ली उतर”, मी दबक्या आवाजात पुन्हा सांगतो.

“हे पहा, मी जरी.....”

“डिक्कीत झाडू आहे?”

“झाडू? अरे आपण सुशिक्षित आहोत... मतभेद असले तरी तू या थराला..”

“एसीच्या बटणाकडे पहा”

“इतकंच ना, नको मला, उघड खिडक्या बंद कर एसी.....”

“ए...सी...च्या बटणाकडे प....हा”

“ई... याई, ई....श्शी.....”, दोन्ही हात कानांवर आणि डोळे गच्च मिटलेले. ब्लोअर मधून येऊन एसीच्या बटणावर बसलेली हिरवीगार मऊसूत पाल आम्हा दोघांकडे एसी पेक्षा थंड नजरेने पाहत असते. आणि एका क्षणात हिची किंकाळी ‘ऐकून’ आमचा हलकेच बाहेर काढण्याचा बेत धुळीस मिळून पुन्हा ब्लोअरच्या आत जाऊन लुप्त होते.

“चालवायची आहे ‘पाली’ओ?”

लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच मी तिला इतक्या धर्मसंकटात पाहिलेलं असतं. एरवी मी हे एन्जॉय केलं असतं, पण मीही त्याच संकटात सापडलेलो असल्यामुळे मला तसं करता येत नाही. भर हायवेवर न कार-का न घाट-का अशी अवस्था.

“तुझको चलना होगा.... तुझको चलना होगा....“ रेडिओवर गायक आळवत असतो. निघावं तर लागणारच. मग पुढच्या प्रवासात ही मागच्या सीटवर आणि मी एक नजर ब्लोअर कडे टाकत गाडी चालवत असतो.

पण त्या कार-‘पालि’केची भेदक नजर काही केल्या डोळ्यांपुढून हलत नाही, त्यात विविधभारतीवाल्यांनी आता बदलून लावलेलं गाणं माझ्या अस्वस्थतेत भरच टाकतं,

“तेरे मस्त मस्त दो नैन, मेरे दिल का ले गये चैन.... मेरे दिल का ले गये चैन.. तेरे मस्त मस्त दो नैन”

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट जमलय हे.
पहिल्या दृष्यातला तर अनुभव घेतलेला आहे कित्येक वेळा. फक्त गाडी नवर्‍या ऐवजी (माझे) बाबा चालवत असतील तर ते फक्त चेहेर्‍याकडे पाहून कारण ओळखतात आणि खिडकी बंद करतात Rofl

नवरा असेल तर मग असा सगळा संवाद घडतो Happy

खतरनाक आहे हे!!! ऑफिसमधे वाचायची सोय नाही. Rofl

मला माहितीये खूप वेळा तुम्ही हे ऐकलं असेल पण खरंच भन्नाट लिहिता तुम्ही. असेच हसवत राहा. Happy

ये कुछ जमा नही असं वाटलं. काही पंचेस मस्तच. पण ते तुमच्याकडनं अपेक्षितच आहे. You can do better. (appraisal side effect Wink )

पालीचा प्रसंग थोडा आणल्यासारखा वाटतोय पण अदरवाइज आवडलं..

सकाळीच मागच्या पावर विंडोजचा वापर झालाय त्यामुळे "आता मला पावर हाय" Happy

मजा आली...

धन्यवाद मंडळी. सगळ्यांच्या प्रतिक्रिया नेहेमीप्रमाणेच उत्साहवर्धक आहेत.

धनश्री, तरीही पुन्हा ऐकून छान वाटतं. Happy

नताशा, नोंद घेतलेली आहे. बाकी सरस्वतीकृपेवर अवलंबून. Happy

वेका, पालीचा प्रसंग खरोखर ओढवलेला आहे, भूगाव-पिरंगुट च्या आसपास. सत्य कल्पिताहून अदभूत असते म्हणतात हे खरंच. Happy

पहिलं दृष्य सेम टू सेम.. काचा खाली करून गाडी चालवणं व हुज्जत घालणं हा हक्क असतो वाटतो 'त्या' कॅटागरीचा. Proud

>>मिळालेल्या कळकट नोटा खिशात न कोंबता वेगळ्या ठेवून पुन्हा पुढच्या टोलला परत द्यायच्या सूचनांची उजळणी.>><< Proud

-(ऑफीसात यायला इतका उत्साह कधीच न्हव्ता... सर्व कृपा सँडीची)

ईई!

Biggrin

छान Happy

Pages