गॉड लविंग पीपल .. ??

Submitted by अंड्या on 1 November, 2012 - 13:11

खूप दिवसांनी एक विचार करायला भाग पाडणारा चित्रपट पाहिला. ओह माय गॉड ..!!

वादाने उत्सुकता वाढवली होतीच, तसेच मी देखील सतत सोयीनुसार आस्तिक नास्तिक असे पारडे बदलत असल्याने मला या चित्रपटात मांडलेले विचार माझ्या विचारांशी मेळ खातात का? किंवा माझे विचार चुकीचे आहेत आणि ते बदलायला हवेत का? हे जाणून घ्यायची उत्सुकता जरा जास्तच होती.

कोणताही चित्रपट असो वा कथा असो, लेखकाला/दिग्दर्शकाला जो मुद्दा मांडायचा असतो तोच प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यासाठी तो कथा अश्या काही वळणाने नेतो की आपल्याला तो त्याच्याच दृष्टीकोणातून विचार करण्यास भाग पाडतो. अर्थात हेच त्याचे खरे कसब असते आणि यावरच त्या कलाकृतीचे यश.. आणि म्हणूनच मी शक्यतो तटस्थपणे किंवा माझ्याच विचारांचा चष्मा चढवून त्याकडे बघायचा प्रयत्न करतो. त्या अनुषंगानेही तो चित्रपट बर्‍यापैकी पटला.. आवडला... पण खास आवडले आणि लक्षात राहिले ते त्यातील मिथुनदाच्या तोंडी असलेले शेवटचे वाक्य.. " दे आर नॉट गॉड लविंग पीपल.. दे आर गॉड फिअरींग पीपल..!!" ..

माझ्यासाठी चित्रपट या वाक्यावरच संपला... आणि त्यावरच डोक्यातले विचारचक्र सुरू झाले.

पहिलाच विचार मनात आला, मी स्वता कोण आहे?
आस्तिक की नास्तिक?
जर आस्तिक असेल तर गॉड लविंग आहे की गॉड फिअरींग?

आता ही नास्तिकत्वाची व्याख्या काय परीमाण लाऊन आपण बनवतो यावरच ते ठरवता येईल, पण एखाद्या देवभोळ्या माणसाला चिडवण्यासाठी किंवा खिजवण्यासाठी म्हणा, मी त्याच्यासमोर हटकून नास्तिक असल्याचा दावा करतो. अशी माणसे घरातच ढिगाने भरली असल्याने आमच्याकडे आस्तिक-नास्तिक हा वाद चालूच असतो.

वाडवडीलांचा पिढिजात व्यवसाय देवाच्या कृपेनेच चालू आहे यावर त्यांचा ठाम विश्वास. रोज न चुकता पूजा अर्चा केली जाते.. घरातही.. दुकानातही.. अगरबत्ती, धूप, सणासुदीला पेढे वगैरे, अगदी साग्रसंगीत... गॉड लविंग पीपल..!
पण त्याचवेळी यात काही चुकलेमाकले तर याचा फटका धंद्यापाण्याला बसणार ही चिंता असतेच.. आणि जेव्हा खरेच काही फटका बसतो तेव्हा देवाचेच काही करण्यात कमी तर नाही ना पडलो, त्याचाच तर कोप नाही ना झाला, हेच आधी बघितले जाते.. गॉड फिअरींग पीपल..!!

आई जेव्हा उत्साहात जेवण बनवून देवासमोर नैवेद्य ठेवते तेव्हा तिच्या कडे पाहून वाटते.. वाह.. गॉड लविंग पीपल..!
तेच नैवेद्यात एखादा मोदक कमी पडला वा तिला जे काही बनवायचे होते ते फिस्कटले तर तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकून ती घाबरीघुबरी होते.. नाह.. गॉड फिअरींग पीपल..!!

पण तीच आई जेव्हा मला भूक असह्य झालीय हे बघून देवाला नैवेद्य दाखवायच्या आधीच चार पुर्‍या देवासाठी बाजूला काढून चार पुर्‍या माझ्या पुढे करते तेव्हा मात्र मी कन्फ्यूज होतो की आता या आईला कोणत्या कॅटेगरीत टाकू..??

"आणि आता कसे ग तुझ्या देवाला हे चालते?" असे बोलून मी तिच्याशी वाद घालायला जातो, तेव्हा तुझ्या वाटणीचे पाप मलाच लागेल हा तिचा युक्तीवाद मला निरुत्तर करून जातो.. आणि मनात पुन्हा तोच प्रश्न सोडून जातो.. इज शी गॉड लविंग पीपल..? ऑर गॉड फीअरींग पीपल..?

स्वताचे नास्तिकत्व सिद्ध करायला जेव्हा मी मंदीराच्या बाहेर उभा राहतो तेव्हा माझ्यामते मी ना गॉड लविंग पीपल असतो ना गॉड फिअरींग पीपल...
पण रस्त्यात लिंबू मिरची दिसल्यास पायाने मुद्दाम ढकलून जाणारा असा मी जेव्हा त्या मंदीराच्या आवारातील एखाद्या फुलावर पाय पडल्यास ते पाया पडून बाजूला सरकावून ठेवतो... तेव्हा हे माझे असे वागणे कोणत्या कॅटेगरीत मोडते हे मी आजवर समजू शकलो नाही.

देवाकडे काहीतरी मागण्यासाठी नवस ठेवायचा हे मला कधीच पटले नाही,
पण त्यापेक्षाही हे जास्त पटले नाही की तो नवस फेडता आला नाही तर त्याचे काही विपरीत परीणाम होतात.

तरीही सत्यनारायणाची पूजा मला फार आवडते, कारण तिच्या प्रसादाचा शिरा मला जगात गोड लागतो.

थोड्याच वेळापूर्वी मी टीव्हीवर सैफ करीनाच्या लग्नासंदर्भातील बातमी पाहून म्हणालो, की यांचे वर्षभर टिकले तर मी सत्यनारायणाची पूजा घालेन.
झाले, आईची बडबड सुरू... असे काही गंमतीतही बोलायचे नसते रे.. तसे झाले आणि पूजा घालता नाही आली तर त्याचे परीणाम भोगायला लागतील.. चल शब्द मागे घेतो असे सांग देवाला...
आणि तिने माझ्या हातावर साखर ठेवली...

त्यांच्या लग्नाचे पेढे तर नाही पण साखर मात्र तोंडात पडली... शेवटी काय, तर आपण सारे "गोड" लविंग पीपल...!!

- आनंद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनस्मी मस्त बोध घेतलाय तुम्ही. त्या बोधकथा आहेत, पण हे ही खरे आहे की लोक दिलेला शब्द किती पाळतात ते पण एक कोडेच आहे. ( आपले राजकारणी एक उत्तम उदाहरण, आणी आपण दुसरे )

पैलवानहो,

अहो काय लिहिलेत ते? काही कळाले नाही.. लाटा येतात, वावट्ळ येते, हे देवाचे काम मानून त्याला घाबरावे, असे आपणास सुचवायचे आहे का?

घाबरलेला पैलवान पाहून स्तिमित झालेला
आंबा

सत्यनारायणपूजेच्या उगमाविषयी असे वाचले आहे की एकोणिसाव्या शतकात त्या काळच्या एकत्रित बंगालमध्ये ब्रह्मसमाजाचा वैचारिक दबदबा भद्र लोकांत खूप होता. ब्रह्म समाज ही एक रीफॉर्मिस्ट चळवळ होती. हिंदू धर्मातले यज्ञयागादि अनेक विधी त्यांना मान्य नव्हते.शिवाय हे विधी करण्यासाठी फक्त ब्राह्मणच पात्र असत. तेव्हा सर्वसामान्यांनाही करता येईल असे एक सोपे कर्मकांड सत्यनारायणपूजेच्या रूपात त्यांनी प्रचारात आणले. या पूजेला होमहवन नाही,षोडशोपचार नाहीत. मुहूर्तही लागत नाही. कोणीही पूजेला बसू शकतो. प्रसादही साधाच असतो .पोथी संस्कृतात नसून देशी भाषांमध्ये असते. या पूजेच्या सोपेपणामुळे प्रथम बंगाल-बिहारात ही पूजा झटकन लोकप्रिय झाली आणि नंतर दक्षिणेतही.

छान वाटले प्रतिसाद बघून, हुरूप आला, सर्वांचे आभार आणि धन्यवाद.

बिनू,
सिनेमा नक्की बघा, जमल्यास मूळ नाटक ही बघा, ते आता मलाही बघायची उत्सुकता आहे.

दिनेशदा,
विषयात चित्रपट ग्रुप हवा होता, म्हणजे पुढे नेमके संदर्भ सापडतील.
>>>>>>>>>>>>>>>>
म्हणजे काय? विचारपूसमध्ये सांगितले तरी चालेल.

आंबा १
बुतशिकन धर्मात सामील व्हा.. असा सरळ संदेश आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
हे काय आता नवीन?

गामा पैलवान,
देवाला पालकत्व दिले तर आपण म्हणता तसे धाक आणि प्रेमाचे उदाहरण पटते, पण तरीही प्रेमाचे पारडे जडच हवे नाही का.. Happy

धन्यवादम दादआत्या.. Happy

वत्सला,
लिहीत रहा रे मुला! Happy
>>>>>>>>>>>>>>>
नक्की मॉं साहेब.. Happy

माधव,
सिनेमा नाही पाहिला, बहुतेक पहाणारही नाही.
>>>>>>>>>>>>>>>
एक कलाकृती म्हणून बघायला काय हरकत आहे. मनोरंजन म्हणून देखील ठीक आहे सिनेमा. परेश रावल नाही तरी मिथुनदासाठी आवर्जून बघाच.

पुरंदरे शशांक,
वाद मुळात ना आस्तिकांनी नास्तिकांशी घालायचा असतो ना नास्तिकांनी आस्तिकांशी.
जसे आस्तिकत्व म्हणजे देव आहे अशी श्रद्धा झाली तसेच नास्तिकत्व म्हणजे देखील देव नाही अशी श्रद्धा झाली.
आणि आपली आपल्या श्रद्धेवर श्रद्धा असेल तर दुसर्‍याची श्रद्धा खोटी ठरवायची गरज भासत नाही.

कविन, माधवी ... लेख त्रोटक वाटणारे...
सहमत आहे.
दोन प्रामाणिक कारणे
१) मोठे लेख पाडायच्या आत्मविश्वासाची कमतरता म्हणा किंवा त्या प्रतिभेचाच अभाव म्हणा.
२) काहीही लिहिताना मी लेख म्हणून नाही तर त्याला चर्चेचा विषय म्हणून बघतो आणि त्यावर माझे मत मांडून सुरुवात करतो. त्यामुळे एक प्रतिसाद म्हणून या कडे पाहिले तर तो मोठा भासेल.
अवांतर - खाली मनीमाऊ यांनी "शॉर्ट एन स्वीट आहे." असा प्रतिसाद दिला त्यालाही मी मुकलो असतो ना. Happy
तसेच सॅमशीही सहमत. विस्तृत लिहायला घेतले तर पुस्तक तयार होईल आणि तरीही अजून काहीतरी गवसायचे राहिले ही असंतुष्टताही..

सॅम,
तुमचे धाकाचे दोन प्रकार पटले.
एक सहज सुचले,
जेव्हा आपण लहाणपणी क्रिकेट खेळताना शेजारच्या काकूंची कुंडी फोडतो तेव्हा काकूंची भिती असतेच पण आईचा भडकलेला चेहरा पहिला डोळ्यासमोर येते.
देवाची भिती ही अशी असावी, जशी आपल्या माणसांची भिती वाटते.

उदयन
देव कशासाठी निर्माण केलेला आहे????????????? मनुष्याला कशाची तरी भिती असावी या करिताच....
>>>>>>>>>>>>>>>
मनुष्य हा पुरेसा स्वार्थी असतो मित्रा, त्याची मूळ भिती स्वताकडचे काहीतरी गमावण्याची असते. देव असो वा दानव, हे निमित्तमात्र झाले.

मानसी, हिरा
सत्यनारायणाच्या पूजेबद्दल छान दृष्टीकोण मांडलात आपण.. आणि माहितीतही भर पडली..
तसेच या सार्‍याच्या विरुद्ध बोलणार्‍यांचेही मुद्दे पटतात मला.
स्वता मी याकडे एक छोटासा सण, उत्सव, फॅमिली गेटटूगेदर म्हणून बघतो.

गामा पैलवान,
जेव्हा २०० मीटर ऊंचीच्या लाटा उसळून सारेच मरतील तेव्हा कोणाची कसली भिती.
भिती ही स्वार्थातून येते... तो जगतोय, मी मरणार तर नाही.. Happy

आंबा १
बुतशिकन धर्मात सामील व्हा.. असा सरळ संदेश आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
हे काय आता नवीन?

यात नवीन काय आहे?

मेरो अल्ला मेहेरबान

आवडलं

लेखन खूपच आवडल.

माणस देवाला घाबरतात कारण देव ही चीज काय आहे हे समजून घेत नाहीत. ते एकदा उमगल की वाईट गोष्ट करण, बोलण सोडा..वाईट विचार ही मनात येत नाही. आणि मग घाबरायचा प्रश्नच येत नाही. देव हा माणसापेक्षा वेगळा असलेला बागुलबुवा नव्हे.
सध्या Proof of Heaven नावाचे Eben Alexander या neurosurgon च पुस्तक वाचत आहे. देवाला भेटल्याचा दावा हा माणूस करतोय. अजून वाचून संपवल नाही. असो. छान चर्चा.

Pages