घुंगूरवाळ्या पागोळ्यांना थेंबांची नक्षी

Submitted by प्राजु on 1 November, 2012 - 01:51

मेघमल्हाराची धून

घुंगूरवाळ्या पागोळ्यांना थेंबांची नक्षी
कौलारांच्या वळचणीला भिजलेला पक्षी
गुंता सुटला, भेगा विरल्या ढेकुळ सैलावून
मातीमधुनी घुमली मेघ मल्हाराची धून

भिंताडावर अंकुरणारा पिंपळ इवला इवला
रखरखणार्‍या फ़त्तरावर हिरवट थर जमला
हिरवा शिरवा ठिबकत राही पानापानातून
हिरव्या अंगी सजली मेघ मल्हाराची धून

सुरसुर सरपण जाळत आता चुलीही भगभगल्या
मुसमुसणारा धूर निघाला प्रवासास ओल्या
माजघराच्या भिंतींमध्ये ऊब पसरवून
धुरकट गंधित झाली मेघ मल्हाराची धून

सभोवताली दगडी कुंपण ओले लाल चिर्‍याचे
कडू कारले, भव्य भोपळा, फ़िरले वेल मिर्‍याचे
परसू सजला जुई मोगरा, कांचन फ़ुलवून
मळा भरून गेली मेघ मल्हाराची धून

खोल दाटला पाऊस उघडी आठवणींचा साठा
लाल मातीने बरबटलेल्या हिरव्या पाऊलवाटा
पुन्हा पुन्हा मी फ़िरून येते वर्तमान लंघून
पाऊस छळतो होऊन मेघ मल्हारची धून

-प्राजु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह ! लाजवाब ! ऑफिसमधे एसीमधे बसुनही पावसाळी दिवस अनुभवला. फारच सुरेख !

मी बहुतेक वेळा शिर्षक बघुनच कविता वाचायची की नाही ठरवते. इथे शिर्षकाला १० पैकी १० मार्क्स. काय सुरेख नादमय शिर्षक आहे.

काय म्हणू... किती लयदार... प्राजू, जियो...
ही ओळ कितींदा वाचली... <<मुसमुसणारा धूर निघाला प्रवासास ओल्या>>

शामच्या कवितेपाठोपाठ आणखी एक सुंदर कविता. कसले सुंदर शब्द आणि कुठेही उपरेपण नाही. पाच कडव्यातून पाच शब्दचित्रं रेखाटली जाऊन पाऊस अनुभवता आला. अतिशय सुंदर निरीक्षण आणि शब्दबद्धता, नादमयता कमाल !! मेघमल्हार जागवला अक्षरशः ... अफलातून कविता !

आजचा दिवस काही वेगळाच दिसतोय..... शामच्या सुंदर कवितेपाठोपाठ एक अजून नादमय, चित्रमय पाऊस कविता.....

जियो, जियो....... पुन्हा पुन्हा वाचायला भाग पाडणारी अप्रतिम रचना....

चित्रदर्शी कविता, अतिशय आवडली.

मेघमल्हार ह्या शब्दाचा अर्थानुरूप समर्पक वापर.

अभिनंदन प्राजु.

सभोवताली दगडी कुंपण ओले लाल चिर्‍याचे
कडू कारले, भव्य भोपळा, फ़िरले वेल मिर्‍याचे
परसू सजला जुई मोगरा, कांचन फ़ुलवून
मळा भरून गेली मेघ मल्हाराची धून<<<

वा वा वा, आणखी एक उत्तम गायनानुकुल व शब्दश्रीमंत कविता

अभिनंदन प्राजु

प्राजू, प्राजू.... काय निखळ आनंद दिलास गो!!
वाह... हा एकच उद्गार!

प्रत्येक ओळीअखेर चित्र उभे करण्याची ताकद आहे... सुंदर...!
अभिनंदन आणि मनापासून खूप खूप शुभेच्छा तुला...
लिहीती रहा, शब्दचित्र रेखाटती रहा..! जियो Happy

शिवाय
लाल मातीने बरबटलेल्या हिरव्या पाऊलवाटा>> ही आणि अशा अनेक ओळी वाचन-आनंद द्विगुणीत करत गेल्या...

आहा!!! खूप सुंदर! भर हिवाळ्याच्या सुरूवातीला श्रावणाची अनुभूती कशी काय? छान शब्दरचना Happy

सगळ्यांनी आधीच इतके छान प्रतिसाद दिलेत. त्या उप्पर मी काय म्हणू! सुरेख इतकेच म्हणते. तसा मोसम नसतानाही तो फील करून दिल्याबद्दल धन्यवाद!

खूपदा वाचली... सुंदरच

कविते बद्दल अजून काय बोलू?

आल्या बरसाती घेऊन मेघ मल्हाराची धून" हे ही आठवलं

माझ्याही ओळी आठवल्या...

काळ्या खडकास आज
नव्या निळाईचा साज
जुन्या शेवाळास आला
हिरवा बहर..............

या डोंगर माथ्यावर
नभ दाटलं सुदूर.........||.............. शाम

माझ्याकडे आत्ता तसंही पाऊस आहे त्यापार्श्वभूमीवर हे शब्द उगाच तो पाऊस मला आवडून गेला (नाहीतर थंडीत पडणारा पाऊस मला अजीबात आवडत नाही...)
मस्त आहे याला कुणी छानशी धून सुचवली तर हे गाणं म्हणून छान सजेल...

मस्तच कविता.... नादमय ...

मनिमाऊच्या पोस्टला शंभर टक्के अनुमोदन..शीर्षक पाहूनच वाचली...:)

ग्रेट !!

अख्खी कविता ग्रेटच ; पण ही ओळ ग्रेट पेक्षाही ग्रेट..>>>>मुसमुसणारा धूर निघाला प्रवासास ओल्या<<<<

धन्यवाद

क्या बात है! खूप आवडली कविता..

सुरेख आणि चित्रदर्शी..

गुंता सुटला, भेगा विरल्या ढेकुळ सैलावून>>

मुसमुसणारा धूर निघाला प्रवासास ओल्या>>

अगदी डोळ्यासमोर आलं..!
मस्त! Happy

कविता वाचुन मला आरती प्रभुच्या कवितांची आठवण झाली.......
ग्रामीण वातावरण अचुक टिपलय.....

खुप खुप सुंदर!!! ऑफिसमधे बसल्या बसल्या आमच्या गोव्यात ऐन पावसात पोचल्याचा भास झाला मला. धन्यवाद. अतिशय सुंदर.

प्राजु ,

किती छान लिहलेस ,क से ग इतके छान शब्द सुचतात खर सांगायचे तर या कवितेचे कौतुक करायला
शब्दच नाहीत ,काय पावसाळी वातावरणचे वर्णन केले आहेस
सुरसुर सरपण जाळत आता चुलीही भगभगल्या
मुसमुसणारा धूर निघाला प्रवासास ओल्या
माजघराच्या भिंतींमध्ये ऊब पसरवून
धुरकट गंधित झाली मेघ मल्हाराची धून
या चार ओळी फार आवड्ल्या.

अप्रतिम कविता!!!! काय सुंदर शब्द आहेत, संपुर्ण कविताच खुप आवडली.... दोनदा वाचली तरी पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतेय...खरच नादमय शब्द आहेत.. Happy

सुपर्ब!!! वेगळ्याच विश्वात नेणारा अनुभव!!! मनातलं गाणं ओठांवर यावं तितक्या सहजतेनं वाचतानाच गायला सुरुवात झाली. सा. दंडवत तुमच्या प्रतिभेला.

अहाहा.........अतिशय लयबद्ध आणि शब्द श्रीमंत कविता..... !!
जियो यार प्राजु Happy

Pages