'साहिर'

Submitted by रसप on 31 October, 2012 - 00:37

उघड्या छातीवर वेदनेच्या झळयांना
मुद्दाम, जाणीवपूर्वक झेलून
मी हृदयाला पोळले
आणि स्वत:च चालवल्या त्यावर कट्यारी
उभ्या, आडव्या, तिरक्या.... आरपारही
थबथबलेल्या हृदयातून ओघळणाऱ्या
प्रत्येक थेंबाला
कागदावर पसरवलं
आणि माझ्या उधार वेदनेचं
कृत्रिम भावविश्व मोठ्या आर्ततेने चितारलं
लालेलाल शब्दांनी
पानभर चितारूनही समाधान झालं नाही..
बोळा करून अजून पान कोपऱ्यात जमलेल्या ढिगाऱ्यात भिरकावलं..
वहीचं शेवटचं पान उरलं होतं..
माझ्याच नकळत, माझ्याच हातांनी लिहिलं -
'साहिर' !
त्या वेळी डोळ्यांना झालेली जखम खरी होती..
आता रक्ताला डोळ्यांतून टिपून..
कागदावर वेदनेला सजवायचं ठरवलं आहे..
'साम्यवादाने' !!

....रसप....
३१ ऑक्टोबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/10/blog-post_31.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users