प्राण माझा जायचीही वाट नाही पाहिली!

Submitted by सतीश देवपूरकर on 30 October, 2012 - 22:26

“स्मशानी अस्थि माझ्या घ्यावया येवू नका कोणी;
इथे दिसतील माझी फक्त स्वप्ने राख झालेली.........”
....................प्रा. सतीश देवपूरकर
गझल
प्राण माझा जायचीही वाट नाही पाहिली!
केवढ्या घाईत माझी प्रेतयात्रा चालली!!

मी किती चुपचाप होता प्राण माझा सोडला;
हातचे टाकून सारी माणसे का धावली?

आपले ज्यांना म्हणालो कापले त्यांनी खिसे;
कापला ज्यांनी गळा ती माणसेही आपली!

लाज झाकायासही ना लाभला कपडा कधी;
माझिया प्रेतावरी ही शाल कोणी टाकली?

वस्त्रही त्यांनीच माझ्या जिंदगीचे फेडले;
प्रेत माझे नागवे अन् लाज त्यांना वाटली!

मी जसा दिसतो तुम्हाला मी असे अगदी तसा;
कोणती सांगा कधी मी गोष्ट माझी झाकली?

हाक ज्यांना देत होतो, हीच का ती माणसे?
मी निघालो जायला अन् ती पुकारू लागली!

जीवनाच्या सांजवेळी एकटा मी एकटा!
सूर्य ढळला की न थांबे सावलीही आपली!!

पेटली माझी चिता अन् परतलो मीही घरी;
आसवे माझीच होती जागजागी सांडली!

मी किती लक्षात होतो, केवढ्या माझ्या स्मृती?
केवढी श्रद्धांजलीची भाषणेही रंगली!

माझिया श्राद्धास पहिल्या काय गर्दी लोटली!
एकटी तसबीर माझी कोप-याला थांबली!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुसल्सल
अनेक शेर एक-एक कविता या नात्याने अतीशय सुरेख अभिनन्दन व धन्यवाद
काही जागी वर दिलेला शेर अन् त्या खलोखालचा शेर विरोधाबास दाखवत असल्यासारखे वाटते
काही जागी ते तसे एकाखालोखलचे शेर दोघे मिळून तेच्ते सान्गत आहेत असे वाटले

तात्पर्य एक गझल करण्या ऐवजी एकसारख्या /अगदी मुसल्सल शेरान्चे एकत्रीकरण किमान २ गझल कराव्यात

न पटल्यास क्षमस्व!!!

-वैवकु

मतल्याचा शेर असाच्या असा अनेकदा वाचल्यासारखा वाटतो आहे. अगदी लिहून-लिहून बबुळबुळीत झालेला खयाल आहे.

त्यानंतरचेही काही शेर त्याच त्या पठडीतले वाटले.

'एकटी तसबीर माझी कोप-याला थांबली'

चालणारी/ धावणारी/ कुठल्याही प्रकारे हलणारी तसवीर कशी असते? 'थांबली' ऐवजी 'टांगली' असतीत तर बरी दिसली असती.

'पेटली माझी चिता अन् परतलो मीही घरी'

म्हणजे? भूत की काय?
आज बर्‍याच दिवसांनी आलो, पण जेव्हा यावं तेव्हा काही तरी चमत्कारिक वाचायला मिळावं अशी उत्तम सोय असते आजकाल! असो. गझला 'पाडत' राहण्यासाठी शुभेच्छा!

के.गो.
अभिनव व साहित्यिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

मतल्याचा शेर कुठे कुठे वाचलात ते सांगावे, म्हणजे आम्हासही शेराचा बुळबुळीतपणा समजेल!
मानवी अनुभव हे जवळपास सारखेच असतात. अभिव्यक्ती वा पहाण्याचा दृष्टीकोन व्यक्तित्वावर अवलंबून असतात. खयालांची पुनरावृत्ती कुणाच्या काव्यात दिसत नाही?

कुणाच्याही, कुठल्याही खयालाला बुळबुळीत, गुळमुळीत, गुळगुळीत, मुळमुळीत वगैरे लेबले लावणे यात लेबले लावणा-याचे व्यक्तीमत्व व एकंदर अभिरुची वा सौंदर्यबोध निदर्शनास येतात,कारण अशी लेबले डकवणे हे व्यक्तिसापेक्ष आहे! याच निकषांवर लेबले लावायचीच म्हटले तर बहुतेकांच्या गझलांच्या/कवितांच्या चिंधड्या उडतील!

प्रत्यय/अनुभूती मूळत: सर्वांच्या कमीअधिक फरकाने सारख्याच असतात. त्यांची अभिव्यक्ती ही तुमच्या कल्पनाविलासावर, प्रतिभेवर व प्रज्ञेवर अवलंबून असते.
ज्याला आपण पठडी म्हणता त्याला आम्ही शैली संबोधतो. स्वत:ची एक शैली/पठडी असणे यात गैर काय आहे? की, कुणाचे तरी अनुकरण करणे यास आपण चमकदार साहित्य म्हणता?

एकटी तसबीर माझी कोप-याला थांबली!<<<<
आपण या मिस-यावर उपस्थित केलेले प्रश्न तर फारच बाळबोध, अकाव्यात्मक व अरसिकत्वच दाखवतात.
का ते सांगतो............

इथे माझ्या तसबीरेचे personification केले आहे.
पहिली ओळ म्हणते......
माझिया श्राद्धास पहिल्या काय गर्दी लोटली<<<<<<
इथे असे सूचीत होते की, माझ्या श्राद्धाच्या निमित्ताने लोकांची गर्दी जमली. आपण कशासाठी जमलो आहोत, याचाच त्यांना विसर पडलेला असतो. ज्या व्यक्तीच्या श्रद्धासाठी जमलो आहोत, त्याच्या आठवणींना कुणी उजाळा देत नाहीत. लोक आपल्याच खयालात/गप्पांत दंग आहेत. ज्याचे श्राद्ध आहे त्याची तसबीर जणू कोप-याला थांबली आहे. म्हणजे तिला त्यांच्या लेखी कोप-याचीच किंमत आहे. लोकांच्या विचारांत स्मृतीत, बोलण्यात आजच्या दिवशीही स्थान नाही. थांबणे या शब्दात रखडण्याची/खोळंबण्याची छटाही व्यक्त होते.
इथे टांगणे/अडकवणे/लटकवणे/लटकणे या शारिरीक क्रियेला
महत्व नाहीच मुळी!
मिस-याचा फारच निम्नस्तरीय/वरवरचा अर्थ आपण घेता आहात, असे जाणवले!
लाक्षणीक व ध्वन्यार्थांचे काय? शिवाय समग्र शेराचा अर्थ पाहणे जरूरी असते.
आपली पठडी पाहण्याचे भाग्य आम्हास अजून लाभले नाही, कारण हो, आपण लिहीत असाल, काही पाडत नसाल बहुतेक!
पेटली माझी चिता अन् परतलो मीही घरी<<<<<<<<
या ओळीबाबत आपले तर्कशास्त्रही तितकेच विनोदी व हास्यास्पद वाटले.
अखेरीस आपण दिलेल्या अनाहूत, छद्मी शुभेच्छा आपणांस लखलाभ!

टीप: बिनबुडाची लेबले लावणे/शेरे मारणे सोपे असते, पण नेमके कसे हवे होते ते सांगणे/लिहिणे/पाडणे हे अवघड असते.
बाकी आपल्या गझलबोधाचे/काव्यबोधाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!
थांबतो,

...........प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................

जीवनाच्या सांजवेळी एकटा मी एकटा!
सूर्य ढळला की न थांबे सावलीही आपली!!

लाज झाकायासही ना लाभला कपडा कधी;
माझिया प्रेतावरी ही शाल कोणी टाकली?

<< क्या बात !