सहस्त्र चंद्र दर्शनाचा सोहळा

Submitted by किंकर on 29 October, 2012 - 07:50

आज कोजागिरी पोर्णिमा.त्या निमित्ताने आठवणी जाग्या झाल्या एका सहस्त्र चंद्र दर्शनाच्या. आणि हे सहस्त्र चंद्र दर्शन होते महान गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे. त्यावेळी टोरोंटो कॅनडा येथे आम्ही एक सी.डी. प्रकाशित करून साजरा केलेला सहस्त्र चंद्र दर्शनाचा हा सोहळा मायबोलीच्या रसिकांसाठी सादर ...

अश्विन पोर्णिमा जी आपण कोजागिरी पोर्णिमा म्हणून साजरी करतो. ह्या निमित्ताने हा खास कार्यक्रम "कोजागिरी पोर्णिमेचा"

या नितांत सुंदर रात्री कोण जागे आहे? "को जागर्ति?" असे विचारणा-या देवीस,आम्ही रसिक जागे आहोत आणि तेही एका वेगळ्या सुरावटींचा आनंद घेण्यासाठी असे अभिमानाने सांगत आहोत.कोजागिरी पौर्णिमेच्या शीतल क्षणी श्री गणेश याग परिवार कॅनडा मधील टोरोंटो येथे साजरा करीत आहे एक आगळा वेगळा सहस्त्र चंद्र दर्शनाचा सोहळा.या कोजागीरीस सहस्त्र चन्द्रांचे भाग्य उजळले आहे. त्यांनी सहस्त्र वेळा एक असा सूर ऐकला आहे, कि जो कधी ऐकायचे थांबूच नये असे वाटते. तो सूर आहे सुप्रसिद्ध गायिका लता दीदी यांचा.

दिनांक २९ सप्टेंबर दीदींचा वाढदिवस. मराठी सुरांनी ताल धरला त्यास येत्या पौर्णिमेस ८१ वर्षे पूर्ण झाली.मराठी रसिकांनी दिदींच्या गळ्यातून सहस्त्र चंद्रांची शीतलता अनुभवली. जणू काही लतादीदींच्या गळ्यातील गंधारच! दिदींचे सहस्त्र चंद्र दर्शन जेंव्हा येत्या पौर्णिमेस होईल ती पोर्णिमा देखील अश्विन पौर्णिमा - ज्या दिवशी चंद्र आणि चांदणे सर्वाधिक शीतल व नितांत सुंदर,स्वच्छ असते

जन्मभूमी, आपली माती याची ओढ प्रत्येकास असते. मातृभाषा भावनांचे पदर हळुवार आणि सहजतेने उलगडते. त्यामुळे संगीत क्षेत्रातील आलापी, ताना,सूर यांना भाषेचे बंधन नसले तरी लताजींची मराठी गाणी मनास भिडतात. लताजींच्या सुरांवर प्रेम करणारा प्रत्येकजण हा प्रथम संगीतप्रेमी आहे . तरीही प्रत्येक संगीत प्रेमीचे मन ज्या सुरांना मनोमनी त्रिवार वंदन करते ते सूर म्हणजे लता दिदींचे सूर.

आज या महान गायिकेच्या सुरांचा शब्दवेध घेणे म्हणजे हिमालयाची उंची, सागराची खोली गाठण्याचा वेडा प्रयत्न आहे. या गायिकेने आम्हाला काय दिले नाही? खरेतर परीस स्पर्शाच्या गोष्टी सारखे,त्यांच्या गळ्यातील अनमोल सुरातील आम्ही काय घेतले हाच खरा प्रश्न पडतो. आणि म्हणूनच त्यांनी गायलेल्या विविध गाण्यातील भाव टिपत टिपत या महान गायिकेच्या सूर तालाबाबत आम्हाला काय वाटते ते सांगण्याचा प्रयास करणार आहोत.

सर्व प्रथम आम्हा रसिकांच्या वतीने, सहस्त्र चंद्र दर्शनाचा योग दीदींना लाभला, म्हणून जीवेत शरद शतम! असे आशीर्वाद परमेश्वराकडे मागून दीदींचा सहस्त्र चंद्र दर्शनाचा हा सोहळा आपण त्यांच्या संगीतमय जीवन प्रवासाचा अल्पसा आढावा घेत साजरा करूयात.

कोणत्याही कार्याचा श्री गणेशा करताना आपोआपच कानात गुणगुणू लागतात…. ओम नमोजी आद्या !....

संत ज्ञानेश्वरांची ही रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली असून, दिदींच्या या सुरांनी आपण कार्यक्रम सुरु करूया.

1. ओम नमोजी आद्या! वेद प्रतिपाद्या! जय जय स्वयंवेद्या ! आत्मरुपा !

दिदींच्या सुरांनी प्रत्येक रचनेतील शब्दांना सजीव केले. तुमच्या मनी जो भाव असेल त्याचे शब्द कितीही अवघड असोत, दिदींच्या गळ्यातून उतरताना त्यांचे सोने झालेच म्हणून समजावे. प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरांच्या या काव्याला श्रीनिवास खळे यांच्या संगीताबरोबर सुरेल साथ देणारे लतादीदींचे भक्तीपूर्ण स्वर,यातून साकार झालेली ही भावपूर्ण रचना तुम्हाला काय सांगते....

2. भावभोळ्या भक्तीची हि एकतारी, भावनांचा तू भुकेला रे मुरारी ......

अनेक संत आणि त्यांच्या भक्ती रचना सर्वश्रुत आहेतच. दिदींच्या स्वरात समर्थ रामदास , संत ज्ञानेश्वर यासारख्या संतांच्या रचना जशा शोभून दिसतात, तशाच इतर अनेक कवी, रचनाकार यांच्या सहज सोप्या भक्ती रचना देखील इतक्या चपलख बसतात. जणू असे वाटते की, या रचना दिदींनी गाण्यासाठीच रचल्या आहेत. या भक्तीची देखील रूपे अनेक आहेत. उभ्या महाराष्ट्राचे दैवत असणारा पंढरीचा विठुराया मग कोणाला कोणत्या रुपात भेटेल हेही सांगता येणे कठीण! पण अनेक रचना या विठ्ठलास माउली रूप देणाऱ्या आहेत. आणि मातेची ओढ जगात कोणाला नसते ? या ओढीत माया, आतुरता असते, हुरहूर असते. पण जर भक्तीतील आर्तता सुरात शोधायची असेल तर, संत तुकारामांची ही पुढील रचना जेंव्हा दिदींच्या गळ्यातून उतरते तेंव्हा ती थेट काळजाला भिडते, आणि हि आर्तता स्वरबद्ध करताना श्रीनिवास खळे यांनी टिपलेला पराकोटीचा भक्तीरस केवळ शब्दातीत आहे ....

3. भेटीलागी जीवा लागलीसे आस...

लताजींनी सुराबरोबर संगीत क्षेत्रात देखील सहज भरारी मारली आहे. 'आनंदघन' या सुरेल नावाने त्यांनी संगीत क्षेत्रात वावर केला आहे. त्यांच्या संगीतातील खास वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सहजसुलभ सूर ताल! आजूबाजूच्या परिसरातील वातावरणाचा, त्यातील आवाजांचा, उपयोग करीत त्यांनी अनेक सुंदर रचना दिल्या. लोहाराच्या भात्याबरोबर, घणाचे घाव देखील टिपत त्यांनी ठेका धरला आहे. ‘साधी माणसे’ या १९६३ सालच्या चित्रपटात गीतकार श्री. जगदीश खेबुडकर यांच्या या रचनेत तुम्हाला याची साक्ष पटते का पहा बरे?

4. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे..

बालपणी नाटकात काम करावे अशी दीदींची तीव्र इच्छा होती. पण वडिलांची इच्छा होती कि मुलीनी या क्षेत्र पासून दूर राहणेच बरे. दिदींचे पितृ छत्र वयाच्या तेराव्या वर्षी हरवले, वज्राघात झाला . संकटाने परिस्थिती अशी बदलली की घर उभे करण्यासाठी ज्या मोहमयी जगापासून वडिलांनी त्यांना दूर राहण्याचा आग्रह धरला, त्याच चित्रपट सृष्टीत त्यांनी प्रवेश केला. अभिनयाबरोबरच पार्श्व गायन सुरु झाले. पुढे अभिनय पूर्णता थांबला, पण पार्श्व गायन हेच ध्येय मानून स्वरसाधना मात्र जोपासली गेली. ‘तांबडी माती’ या १९६९ सालच्या चित्रपटासाठी कवियत्री शांता शेळके यांची ही रचना जणू दिदींच्या त्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन करते -

5. मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते ....

लता दीदींचे गीत म्हणजे कोणत्याही स्त्रीची भावना बोलके करणारे स्वर. मग पडद्यावरची स्त्री ही आई, मुलगी, वा युवती असो, शहरी असो वा ग्रामीण, तिच्या भावना थेट तुमच्या मनाला भिडणार. त्यांचे कोणतेही गीत ऐकताना डोळ्यासमोर उभी राहते ते चित्रपटातील व्यक्तिरेखा. ख्यातनाम अभिनेत्री नर्गीस दिदींच्या गाण्याबद्दल बोलताना एकदा म्हणाल्या – लताजी गातात तेव्हा मला अभिनय करताना ग्लिसरीनचा वापर करावा लागत नाही. अशा अनेक मान्यवरांनी असंख्य वेळा दिदींच्या गाण्याचा यथोचित गौरव सार्थ शब्दात केला आहे.

अशाच एका सुंदर भावगीतात श्रेष्ठ कवी भा.रा. तांबेंनी एका नव्या नवरीची मनाची आंदोलने, मोहक हालचाल सलज्जता अचूक टिपली आहे. स्वरसाज वसंत प्रभू यांचा असून, नवपरिणीत वधूच्या भावनांना, खरा न्याय मिळवून दिला आहे तो दिदींच्या उत्कट भावपूर्ण सुरांनी.

6. नव वधू प्रिया मी बावरते...

नववधू ते वात्सल्य मूर्ती माता असा जरी स्त्रीचा प्रवास असला तरी प्रत्येक स्त्रीत एक अल्लड रूप दडलेले असतेच. प्रेयसी हि स्त्रीची आयुष्यभर राहणारी अंतर्मनातील प्रतिमा शब्दात पकडणारे कवी,गीतकार असंख्य आहेत. आपल्या संस्कृती नुसार शृंगाराची भागीदारी फक्त आपल्या प्रिय सख्या बरोबरच आणि तीही एकांतात अनुभवणे हे प्रत्येक स्त्रीचे जपलेले स्वप्न असते. असे स्वप्न आपल्या प्रियकरासमोर उलगडताना प्रेयसी गुणगुणली नाही तरच नवल. या प्रेयसीची ओढ कवी सुरेश भट यांच्या सिद्धहस्त लेखणीने अचूक टिपली तर त्यास संगीत दिले आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. पण या शृंगार रसातील मोहकता दिदींनी अचूकतेने सुरात गुंफून प्रेयसीचे मनोगत अलगदपणे या गाण्यातून पोहचवली आहे.

7. मालवून टाक दीप चेतवून अंग अंग, राजसा किती दिसांत लाभला निवांत संग

ज्या गाण्यातून लावण्य खुलते ती लावणी. शृंगाररस सहजतेने फुलविणे हे लावणीचे मर्मस्थान. ते जपत तिला अजरामर करणाऱ्या गायिकांमध्ये सुलोचना चव्हाण, रोशन सातारकर, यांच्याबरोबरच आशा आणि उषा या दिदींच्या दोन भगिनी देखील लोकप्रिय ठरल्या आहेत. परंतु दीदी स्वतः मात्र या प्रकारामध्ये फारश्या रमल्या नाहीत. पण याला अपवाद म्हणजे ही ना.धो. महानोर यांची अस्सल ग्रामीण ढंगाची लावणी! त्यातील ऐकणाऱ्याचा कलेजा खल्लास होईल असा ठसका उतरला आहे हृदयनाथजींच्या संगीतातून. पहा बरे तुम्हाला हा ठसका जाणवतो का....

8. राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हाविण बाई.....

महानगरातील घड्याळाच्या काट्यास बांधलेली स्त्री असो किंवा दूर शेतात राबणारी खेड्यातील कामकरी स्त्री असो. त्यांच्या भावनां उलगडणारा स्वर मात्र दिदींचा असतो. खेडेगावातील स्त्री जेंव्हा रोजच्या रहाट गाडग्यात गुंतून जाते तेंव्हा, माहेरची आठवण तिला क्षणात अंतर्मुख करते. मग आजूबाजूच्या परिसरातील निसर्गाचाच तिला आधार वाटतो आणि माहेरी निरोप देण्यासाठी, नव्हे सांगावा धाडण्यासाठी ती रान पाखराला चुचाकारते. कवियत्री शांता शेळके यांनी ही माहेरची आस या रचनेत सुरेख गुंफलेली आहे. आणि दिदींनी अतिशय तन्मयतेने ती व्यक्त करताना आपल्याच आवाजाला 'आनंदघन' होऊन संगीत दिले आहे ‘तांबडी माती’ या चित्रपटासाठी.

9. जा जा रानीच्या पाखरा तू जा रं भरारा ......

तब्बल सहा दशकांची प्रदीर्घ कारकीर्द गाजवणाऱ्या दिदींना अनेक पुरस्कार मिळाले. भारतीय नागरिकाचा सर्वोच्च असा ‘भारतरत्न’ पुरस्कार आणि चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च असा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार लाभलेय त्या एकमेव स्त्री कलाकार आहेत. त्याशिवाय चित्रपट क्षेत्रातील बहुमानाचा फिल्मफेअर पुरस्कार चार वेळा स्वीकारल्यानंतर नवोदित कलाकारांना संधी मिळावी म्हणून आपले नामांकन करू नये अशी त्यांनी नम्र सूचना केली. गायन क्षेत्रातील अनुभवांची समृद्धता जरी वर्तणुकीत दिसत असली, तरी आवाजातील तारुण्य आणि गोडवा मात्र कधीच कमी झाला नाही. सन १९५१ मधील ‘अमरभूपाळी’ या गाजलेल्या चित्रपटातील होनाजी बाळा यांची संगीतकार वसंत देसाई यांची ही रचना आज ६० वर्षांनंतरही ऐकताना रसिकांच्या अंगावर रोमांच उभे राहतात.....

10. तुझ्या प्रीतीचे दुखः मला दावू नको रे ....

प्रत्येक संगीतकार गीताची संगीतरचना करताना वेगवेगळ्या ध्वनींचा वापर करून गीत खुलवतात. पण प्रतिध्वनींचा वापर करीत एखादे गाणे अंतरात उतरवणे ह्यात संगीतकाराचे वेगळे कसब दिसते. संगीतकाराच्या भूमिकेतून हे कसब

दाखवताना आणि आपल्या सुरांना आपल्याच भगिनींचे सूर प्रतिध्वनी म्हणून वापरून केलेली ही रचना दिदींच्या आवाजाचा एक वेगळाच पैलू आपणासमोर उलगडते. कवी योगेश यांची ही रचना ‘मराठा तितुका मेळवावा’ या १९६४ सालच्या चित्रपटात गाताना प्रतिध्वनी म्हणून वापरलेले स्वर होते उषा आणि मीना या भगिनींचे पहा बरे कसा वाटतो हा ध्वनी आणि प्रतिध्वनींचा खेळ ...

11. अखेरचा हा तुला दंडवत तुला दंडवत.......

अनेक अजरामर रचना पहिल्या कि त्या अजरामर होण्यात रचना, स्वर का संगीत कुणाचा वाटा महत्वाचा हा प्रश्न नेहमी पडतो. पण अप्रतिम रचनेस अचूक संगीत वा सूर देत दिदींनी ते गाणे घराघरातच नव्हे तर साता समुद्रापार पोचवले. रॉयल आल्बर्ट हॉल या जगप्रसिद्ध प्रेक्षागृहात कार्यक्रम सादर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या. रॉयल आल्बर्ट हॉलने दिदींच्या आवाजाचा संगणकाच्या द्वारे आलेख काढून तो आवाज त्यांनी नोंदवलेला सर्वात शुद्ध स्वर (the most perfect voice) आहे असे सांगितले. संगणकाचे निष्कर्ष काही असोत, त्या स्वरावरील रसिकांच्या प्रेमाचा आलेख सतत चढताच राहिला. ‘मोहित्यांची मंजुळा’ या १९६० सालातील चित्रपटात स्वतःचाच स्वरसाज असलेली कवियत्री शांता शेळके यांची रचना दिदींनी किती मंजुळ स्वरात गायली आहे ते ऐकूया.

12. निळ्या अभाळी कातरवेळी, चांदचांदणे हसती, मी हुरहुरते, मनात झुरते, दूर गेले पती ....

युगल गीते हा कोणत्याही गायकासाठी एक आव्हानात्मक प्रकार. कारण सुरांना साथ लागते ती संगतीची, एक गायक जरी बिचकला तरी साथीदाराचे सूर बिघडण्याची भीती, तशात मर्यादित तंत्रज्ञानाची मदत. अशा काळात सर्वाधिक युगलगीते दिदींनी गायली, प्रत्येक साथीदारास बरोबर घेवून, त्याला सांभाळत, त्यांचेही सूर आणि स्वर खुलवत! त्यामुळे दिदींचे युगलगीत म्हणजे श्रोत्यांच्या मनातली तार छेडणारे असे गीत होते. दिदींनी गायलेल्या असंख्य युगल गीतांपैकी श्री अरुण दाते यांच्यासह गायलेले हे एक अविस्मरणीय गीत - कवी गंगाधर महांबरे यांच्या रचनेला स्वरसाज दिला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

13. संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा....

गाण्यातून संस्कार,हे तत्व जपत अनेक रचना झाल्या आहेत. आपल्या संस्कृतीचा, संत साहित्याचा, तसेच समरगीत व स्फुर्तीगीतांचा प्रसार करण्यासाठी अनेक कार्यक्रम व ध्वनिमुद्रिका दिदींनी स्वरबद्ध केल्या. तसे पाहिले तर लहानपणापासून आपण सायंकालीन प्रार्थनेतील 'शुभंकरोती कल्याणंम' ऐकत आलो. पण याच सुरेख रचनेस अनुसरून जगदीश खेबुडकर यांनी केलेली नवरचना ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ या १९६७ सालातील चित्रपटासाठी संगीतकार प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केली. ती गाताना दिदींनी ही रोजची प्रार्थना इतकी प्रसन्न आणि मोहक केली आहे की ऐकताना आपोआप डोळे अलगद मिटतात.....

14. दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना, शुभंकरोती म्हणा मुलांनो शुभंकरोती म्हणा....

जे जे उदात्त तिथे नम्र होणे ही दीदींची वृत्ती आहे. या त्यांच्या वृत्तीचा गौरव करताना मध्यप्रदेश सरकारने संगीत क्षेत्रातील योगदानासाठीचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ सुरु करून जणू हा पुरस्कारच सन्मानित केला आहे. या सर्व प्रसिद्धी, लोकप्रियतेने हुरळून न जाता जीवन हेच गीत, आणि संगीत हाच परमेश्वर मानून त्यापुढे दीदी सदैव लीन असतात. ही कला म्हणजे फक्त तुझे वरदान, आशिर्वाद आहेत असे माय भवानी मातेस सांगण्याची संधी दीदींना गाण्यातून लाभली. ‘शाब्बास सुनबाई’ या १९८६ सालातील चित्रपटात कवी सुधीर मोघे यांच्या रचनेला स्वरसाज दिला आहे दीदींची बहिण मीना खडीकर यांनी. माय भवानीस साकडे घालताना दिदींच्या स्वरातील लीनता मनाला भावली नाही तरच नवल…..

15. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई, सेवा मानून घे आई .....

या बहुश्रुत, सर्वगुणसंपन्न, करारी, हिकमती, सोज्वळ मराठी कन्येने इतके मोठे झाल्यावर देखील आपल्या जन्म दात्याचे ऋण कधीही नाकारले नाही. सुप्रसिद्ध कवी पी. सावळाराम यांनी ही काव्य रचना बहुदा दीदी आणि दिनानाथजी यांच्या पवित्र नात्यासाठीच लिहिली असावी. वसंत प्रभूंच्या समर्थ संगीतासह जेंव्हा ती दिदींनी गायली तेंव्हा ती रचना पित्याचे छत्र हरवलेल्या प्रत्येक मुलीची आपल्या वडिलांविषयी भावना सांगणारी ठरली.

16. कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला, वैभवाने बहरून आला, याल का हो बघायला

दीदींना ८१ वर्षे पूर्ण झाली. सहस्त्र सूर्यांचे तेज ज्यांच्या सुरात आहे त्या गायिकेला आम्ही मनापासून दंडवत घालतो. आज दीदींच्या वाढदिवसाचे निमित्ताने मनात विचार येतात कि,खरेतर सहस्त्र चंद्रांचे भाग्य कि त्यांनी दिदींचे स्वर सहस्त्र वेळा ऐकले. दीदीच्या गाण्याबाबत बोलताना काय आणि किती बोलायचे? असा प्रश्न पडतो. गीत सुरांच्या या सागरात नाहताना मन चिंब ओले होते, जीव तृप्त होतो आणि पुन्हा एकदा या अनुभूतीचे वर्णन करण्यासाठी दिदींच्याच गीतांचा आधार घ्यावा लागतो, आणि आठवते दिदींनी गायलेले श्रेष्ठ कवी-संगीतकार श्री. यशवंत देव यांचे ‘कामापुरता मामा’ या १९६५ सालातील चित्रपटात एक सुरेल गीत...

17. जीवनात हि घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे.

आपण आज आमचा हा प्रयत्न, गोड मानून हा कार्यक्रम ऐकलात त्यासाठी तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे आभार मानतो. श्री गणेशयाग परिवाराचे अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या यशस्वी पूर्ततेसाठी सहभागी झाले आहेत. तरी सर्वश्री रवी आणि सौ.स्वाती किंकर यांची संकल्पना, श्याम व सौ.राधिका मठकर, आमिष आणि सौ.सिद्धी मुन्शी यांचे तांत्रिक सहकार्य, आणि मिलिंद आणि सौ.अर्चना गोठोसकर यांचे निवेदन यातून आज हा कार्यक्रम आपणा समोर सादर झाला आहे.

कार्यक्रमाची सांगता करताना, दीदींच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा आढावा घेताना जरी आम्ही मराठी गीतेच सदर केली असली, तरी दिदींनी हिंदी चित्रपटातून, आणि पर्यायाने पार्श्वगायिका म्हणून सर्व चित्रपट रसिकांच्या हृदयाची ‘अनभिषिक्त सम्राज्ञी’ होण्याच्या दिशेने आपली कारकीर्द त्यांनी सुरु केली, त्या चित्रपटाचे नाव होते 'आप कि सेवा मे'. खरेतर दिनानाथजींपासूनच मंगेशकर परिवारातील प्रत्येक सदस्याने रसिकांना भरभरून संगीताचा आनंद दिला आहे. पुढे दिदींनी तब्बल ३६ प्रांतिक भाषांमधून ३०,००० हून अधिक गीतांना स्वरसाज दिला. रसिकांना भरभरून देताना या गायिकेची समर्पणवृत्ती मात्र तशीच राहिली. म्हणूनच की काय, दिदींच्या गाण्याचेच सर्वांगसुंदर वर्णन करणारे काव्य करण्याचा मोह महाकवी पंडित नरेंद्र शर्मा यांना आवरला नाही. तिला अतिशय सुरेल आणि पवित्र, प्रसन्न असा स्वरसाज दिला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. सदर रचना हिंदी असूनही आज इथे घेण्याचा मोह होत आहे. मला वाटते तुम्हालाही आमचे म्हणणे पटेल!

18. मै केवल तुम्हारे लिये गा रही हू....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्ण लेख अजून नाही वाचला.. गाणी वाचली.. जी ओळखीची वाटली ती पटकन गुणगुणून घेतली.. बरे वाटले.. धन्यवाद.. Happy

पुर्ण लेख अजून नाही वाचला.. गाणी वाचली.. जी ओळखीची वाटली ती पटकन गुणगुणून घेतली.. >>>
अरे, अगदी अगदी.

लेख वाचतेय सावकाशीने. Happy

कोजागर ती? >>> "को जागर्ति?" असे असायला हवेय ते! दुरुस्ती करता का प्लीज?

अश्विनीमामी - खरच 'क्षण सुगंधित ' हि संकल्पना आवडली.
दिनेशदा - आपल्या निशब्द प्रतिक्रियेसाठी सलाम.
अंड्या- मनपूर्वक धन्यवाद.
निंबुडा - आपल्या सूचनेप्रमाणे दुरुस्ती केली आहे. धन्यवाद.

प्रत्येक संगीत प्रेमीचे मन ज्या सुरांना मनोमनी त्रिवार वंदन करते ते सूर म्हणजे लता दिदींचे सूर.>>> त्रिवार नव्हे १०००००००००० वार.

छान लेख... प्रचि, हवी होती.

लोकप्रभातल्या एका लेखात,

पहा टाकले पुसूनी डोळे, गिळला मी हुंदका
रणांगणी जा सुखे राजसा, परतून पाहू नका

झडे दुंदूभी, झडे चौघडा, रण रंगाचा हर्ष केवढा
एकदाच जन्मात लाभते ही असली घटीका

शकुनगांठ पदरास बांधुनी, निरोप देते तुम्हा हसुनी
आणि लावते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका

या देशाची पवित्र माती, इथे वीरवर जन्मां येती
तोच वारसा तुम्ही पोचवा, येणार्‍या शतका

या गाण्याच्या उल्लेख होता. लता / हृदयनाथ / शांता शेळके असे हे गीत, मला ऐकल्याचे आठवत नाही, किंवा
कदाचित ऐकले असेल, आणि चाल विसरलो असेन. नेहमीच्या ऐकण्यातले नक्कीच नाही.. कुणाला
आठवतय का ?

नव वधू प्रिया मी बावरते... >>>>> माफ करा पण मी वाचल्याप्रमाणे हे गाणे मृत्युशी संबंधित आहे ना..

<<<<पहा टाकले पुसूनी डोळे, गिळला मी हुंदका
रणांगणी जा सुखे राजसा, परतून पाहू नका>>>> दिनेशदा, मी ऐकलेय हे गाणे. रणांगणावर निघालेल्या नवर्‍याला उद्देश्शून बायको हे गाणे म्हणतेय. मस्त अर्थपूर्ण गाणे आहे.

प्रज्ञा, कुठे ऑनलाईन मिळाले तर मला अवश्य लिंक, हवीय.

लताचे जे नवे नवे संकलनाचे संच येताहेत, त्यात कधी कधी अगदी अनोळखी गाणी मिळतात. आता भारतात
आलो कि, परत शोधणार आहे.

दिनेशदा, इथे हे गाणं ऐकायला मिळेल. ओरीजिनल मिळालं तर शोधते.
http://www.youtube.com/watch?v=guNN6spEuFk

मला सिनेमाचं नाव आठवत नाहीये पण सीमा देव आणि रमेश देव आहेत यात. तो युद्धावर लढायला जात असताना तिने म्हटलंय हे गाणं. असं काहीसं कथानक अंधुक आठवतंय. अतिशय सुंदर गाणं. याच सिनेमात बहुतेक 'भारतीय नागरीकांचा घास रोज अडतो ओठी' हे दुसरं एक सुरेख गाणं आहे.

लताच्या आवाजातलं गाणं इथे मिळेल (ऑडियो) :

http://mio.to/album/71-Marathi_Bhava_Geete/10890-Bhav_Maneeche/#/album/7...

सीमा देव आणि रमेश देव आहेत यात. तो युद्धावर लढायला जात असताना तिने म्हटलंय हे गाणं. >> सुवासिनी का?

आभार मामी.... सुवासिनी मधले नसावे, कारण त्यात लताचे गाणे नाही बहुदा.. ते भारतीय नागरिकांचा.. पण आशाचे आहे.

अशीच एका वेगळ्या गाण्याची आठवण आली...

बोल बोल ना, का अबोला.... उषा मंगेशकरचे संगीत आणि लताचा आवाज, चित्रपट, आई मी कुठे जाऊ ?

यातच, आशाची, हिरव्या रंगाची हौस माझी पुरवा, मला हिरव्या पालखीत मिरवा... अशी मस्त लावणी आहे.

नागरीकांचा घास रोज अडतो ओठी>>>
'सैनिक हो तुमच्यासाठी' हे गाणे 'पाहू रे किती वाट' या सिनेमामधले आहे. गायिका 'आशा भोसले' असाव्यात बहुतेक.