सकाळची वेळ होती, तरीही हवेत किंचित उकाडा जाणवत होता. रामराव पाटील त्यांच्या 'पर्णकुटी' फार्म हाउस बाहेरच सावली धरून वाऱ्याला बसले होते.
आज उपास असल्यामुळे सकाळी नुसती उकडलेली रताळी खाऊन जरा सुस्ती आली होती. जरा डुलकी आल्यासारखे वाटले तोच एका धुक-धुक-धुक-धुक आवाजाने त्यांची तंद्री भंगली. हा कसला आवाज? रामराव तटकन उठले, मागच्या बाजूला आवाजाच्या रोखाने जात दूरवर नजर टाकली. भरत? होय, हा भरतच. काही क्षणात त्यांची खात्रीच पटली.
धूळ उडवत भरत आला आणि गाडी लावून त्यांच्या जवळ येऊन पाया पडला देखील. आशीर्वाद देता देताच रामरावांनी पृच्छा केली.
"तुला कितीदा सांगितलं, मी गावाकडं इतक्यात परतेन अशी आशा आणि माझा पिच्छा सोड. ऐक जरा." गावातल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी काही काळ इथेच घालवायचा विचार केला होता. त्याला बऱ्याच जणांनी विरोध केला होता. भरतने तर फारच. पण त्यांचा निर्णय ठाम होता.
"ते माहित हाय दादा. मी तेच्यासाटी नाय आलो. जरा दुसरं काम निगालं", लहान वयात गावाचा एरिया सांभाळायची जबाबदारी येऊन पडल्यानी भरतचं शिक्षण जेमतेम आणि त्यामुळे भाषा खास गावच्या मातीतली झाली होती.
"आता काम कसलं? आणि हे काय, या खेपेला बरोबर लवाजमा नाही? मागच्या वेळेला ती मोठी गाडी घेऊन आला होतास, हे काय आणलय?", रामराव.
"ती फोर्चुनर व्हय? ती नाय न परवडत आता दादा. डीजेल वहाडलय ५ रुपयांनी. हि पल्सरच घेऊन आलो. खर्च बी कमी आन पळती बी भारी जंगलातून", भरत.
"बरं, बरं. पण तरीही एकटाच?"
"शतऱ्या व्हता न मागं, त्याला वाटंमंदी सोडलं. जरा पार्टी येते मनली भेटायला"
"पार्टी? कसली पार्टी भरत? मला काही कळत नाहीये"
"तुमास्नी सांगायचं राहून गेलं दादा, आपण प्लॉटिंग चालू केलंय ना जंगल बॉरडर पासून आतल्या बाजूला"
"प्लॉटिंग? म्हणजे काय भरत? मला न विचारता काय करतोयस तू हे?"
"म्हंजे डायरेक प्लॉटिंग नाय दादा, गुंठेवारी करतो सध्या, फार्महौस हो, तुमचं पाहून लोकं लय मागं लागली. मग मनलं आपनच एन्ट्री मारावी, कसं?"
रामरावांनी निश्वास सोडला आणि मान हलवली. आता सगळ्यातून लक्ष काढलं म्हंटल्यावर बोलणार तरी किती आणि कुठल्या हक्कानं?
"बरं, ते जाऊदे दादा, टायलेत कुड्य? वाटत आमी दोगानी जरा मिसळ हानली जास्तच, जरा जाऊशी वाटतंय तिकडं."
"त्या तिकडे कदम्ब वृक्षामागेच जावं लागेल तुला. इथे फारशा सोयी नाहीत, तुला माहित आहे"
"बरं दादा, जरा पानी द्या नंतर वाईच, बरंका", भरत ढांगा टाकत झाडामागे गेलासुद्धा.
रामराव तसेच उलटपावली सोप्यातून आत येत घरात डोकावले. "सीते, काय करीत आहेस? भरत आलाय. बहुतेक जेउनच जाईल."
"अगबाई, आला का हा पुन्हा? आता काय काम काढलंय? आणि इथे रानात हो काय जेवायला वाढ्णार मी? आधीच आपली परिस्थिती पाहताय न तुम्ही?", सीताबाईने आतूनच वैतागून सरबत्ती सुरु केली.
"तुझं म्हणजे काहीतरीच असतं, जानकी", रामराव वैतागले कि माहेरच्या नावानं संबोधायचे, "कसाही असला तरी तो भाऊ आहे माझा, किती हट्ट धरून बसला होता माहिती आहे न माझ्यासाठी?"
"माहिती आहे. सगळं मेल नाटक. मामंजी गेले तेंव्हा कुणीही तुम्हाला सांगितलं नाही आणि सात-बाऱ्यावर सह्या पाहिजे होत्या तेंव्हामात्र आठवण आली सगळ्यांना"
"पुरे गं, तेच तेच ऐकून मला वीट आला आहे. तू जे असेल ते शिजवायला घे, तो येईलच आता, मला त्याला पाणी द्यायचं आहे, जरा पंप चालू कर"
"का पंपू मी?" तिचा अनपेक्षित प्रतिप्रश्न.
"लाईटबिल किती आलंय मागच्या महिन्यात आठवतंय? त्यातून तुम्ही नावाप्रमाणे स्वतःला आदर्श समजता. इथे आजूबाजूला सगळे तारेवर आकडे टाकतात आणि आपण भोगतोय लोड-शेडींगची फळं. आणि मी म्हणते, याला कळू नये का गावाकडून येताना एखादा ५ लिटरचा कॅन भरून आणावा ते? आता घेउदे एखादं कदंबवृक्षाचं पान रियर-स्वाईप करायला", सीताबाई करवादली आणि आत येऊन लक्शुमनाकडे मोर्चा वळवून म्हणाली,
"भाऊजी, जरा उठता का आता? सकाळपासून किती सारखं लोळत पडायचं ते? भावाच्या जीवावर किती निवांत मजा करायची याला काही मर्यादा असावी"
"वैनि, उगीच चिडू नकोस. आणि मी भावाच्या प्रेमापोटीच मालमत्तेवर पाणी सोडून आलोय इथे, मजा करायला नाही", लक्षा हातातल्या अंग्री-बर्ड वरून नजर न हटवता थंडपणे उत्तरला.
"हो, हो. समजला बरं त्याग मला. चुलत-सासूबाई नाहीतरी काही देणारच नव्हत्या. छान बायकोपासून सुटका मिळाली तुम्हाला या निमित्तानं, म्हणे मी पण वाईल्ड-लाईफ फोटोग्राफी करणार आहे, दादामागून फिरत.. आयत्या खायच्या सवयी मात्र चाईल्डला शोभेलशा"
"तुम्ही तरी कशाला सुखाचा जीव दुक्खात टाकला मग? बसायचं की तिकडच. लगनापुर्वी म्हणायचं मला माणसांनी भरलेलं घर आवडतं आणि माप ओलांडलं की सुरु स्पेस पायजे, स्पेस पायजे. दादा निघाले इकडे यायला तर 'पर्र्देशी, भर्र्दीशी जाना नही' गात त्यांना इमोशनल केलंत आणि लगबगीनं टांग्यात चढून बसलात. आधीच ब्यागा भरून ठेवलेल्या पहिल्या होत्या मी" लक्ष्मणान यशस्वीरित्या वहिनीचं मिसाईल स्टार-वार प्रमाणे तिच्याकडेच वळवलं.
"पुरे रे तुमचं भांडण आता, वैताग आलाय मला", रामरावांना आता असह्य झालं.
तिकडे भरत वाट बघून शेवटी कसंबसं आटपून इकडे यायला निघाला तोच आवाज आला, "माशाल्ला, माशाल्ला.. चेहरा है माशाल्ला.."
चटकन भरतने खिशात हात घातला, आणि फोन बाहेर काढून कान आणि मानेच्या मध्ये ठेवत एका हातानं चेन लावत बोलू लागला,
"हा, बोल"
"इतच होतो, जरा झाडामागं गेल्तो, बोल", वैतागून नीट न बसलेली चेन त्यानं पुन्हा खाली नेऊन वर ओढली.
"अग नई, इत्त जंगलात कोन्ती भानगड? ते टायलेट ला गेल्तो झाडामागं, बोल"
"काम? नाय झालं अजून. बोल्लो बी नाय. जरा दम खा की"
पुन्हा अडकलेल्या चेन ला रागानं हिसका दिला अन चिमटा बसणार याचा वेळेत अंदाज आल्यानं नकळत "ए मायो.." असा उद्गार त्याच्या तोंडातून निघाला.
"येवड प्रेमाणी नाव घेत जा की रं मदी-मदी, बर तुला तगादा करत नाय आता, मिस्स कॉल दे काम झाल्यावर" असं म्हणत मोठ्या काकीने फोन कट केला.
पुन्हा तिची कटकट नको म्हणून त्यानं लगेच सायलेंट वर टाकला अन क्षणभर विचार करून बदलुन व्हायब्रेट वर ठेवला.. हो, शतऱ्या ट्राय करायचा आणि उचलला नाही तर पार्टीला काहीपण हो मनून बसायचा. खालीपिली १०-१२ लाखाला बांबू. पल्सरची किल्ली बोटाभोवती फिरवत त्यानं वाकून आत प्रवेश केला.
"पैरी पहुणा, वैनी" रिकाम्या वेळात हिंदी सीरिअल बघत बसल्याचा परिणाम.
"पैरी पैरी, आपलं.., बरं बरं", अचानक झडलेल्या सलामीने सीताबाई गडबडून गेली आणि उठून उभी राहिली.
"काय म्हंता भाऊ? आयला आयफोन पाच नंबर?" खांद्यावर हात टाकत लक्ष्मणाजवळ खेटून बसत भरत वाकून त्याच्या हातातल्या फोन कडे मान वाकडी करून बघायला लागला.
"सरळ बस भरत्या, नाहीतर नाहीतर एका अमोघ बाणानि..." लक्ष्मणाला रामानंद सागरांची सीरिअल पाहून पुराणातली भाषा वापरायची सवय होती.
त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत भरत हसत जरा बाजूला सरकला. "भाऊ तुमाला काय पिरेमाची आलर्जी, ल्हान असल्यापास्न दादागिरी करताव, ते दादा कदी मला बोलत नाय अन तुमी उप-दादा असुन सारखं टाईट मारता मला. आईचं तोंड दिसतं पन तिचं न्हेमीच काय चुकत नाय असं वाटायलय मला"
अन तो काहीच बोलत नाही असं बघून जरा धीर येऊन "आन त्या बानाची काय भिती दावायलाय मला, हित्त नेमबाजीचा टाईमपास करायला निस्त चीपाडाला डांबर लावलंय मला म्हाईत नाय व्हय?"
"दादांनी मंत्रून दिलेले आहेत ते, त्यांच्या घडणीवर जाऊ नकोस भरत्या", लक्ष्मण 'रामायण' छाप सात्विक संतापाने डाफरला.
"मंत्र-गिन्त्र ठीक हाय भाऊ, पन आता यालाच भेतात लोकं" असं म्हणत भरतन पट्ट्यात खोचलेला गावठी कट्टा काढून खालच्या चटईवर अलगद ठेवला आणि तेवढ्यात रामरावांची चाहूल लागून परत पट्ट्यात खोचून वरून शर्ट सारखा केला.
"एखाद्या दिवशी गोत्यात याल हं, भरत-मुनी", रामरावांच्या नजरेतून त्याची हालचाल सुटली नव्हती. एकेकाळी ते पण फौजदार होते तालुक्याला.
"काय नाय दादा, अन काय झालं तर तुमी हाय की", भरत ओशाळून लाडी-गोडी लावायला लागला.
त्याकडे दुर्लक्ष करून रामरावांनी बांबूच्या स्टुलावर बसत सरळ मुद्द्यालाच हात घातला.
"ते सोड, तू नेमका कशासाठी आलायस ते सांगशील का जरा?"
"ते काय हाय दादा, आय म्हनत होती, तुमी सर्वे इकड आलात, इकड लाकूड-फाटा असतोय सैपाकाला, काय चिंता नाय"
"बरं मग?"
"तिकडं गावाकड घरी यनार जनार मानुस असतंय. च्या पानी कराव लागतंय"
"मग त्याचं काय? ती रीतच आहे पाटील घराण्याची"
"मनुनच मला पाटीवला आईनं, आता घराण्याची आबरू ठेवाया पाहिजे नव"
"अरे असं कोड्यात काय बोलतोयस? सरळ सांग की"
"वैनीच्या नावाचं सिलिंडर पाहिजे त्याला, मला विचारा ना", लक्ष्मण हातातला फोन ठेवत म्हणाला.
"भाऊ, तुमी लय हुशार, फक्त शिकून वाया गेली तुमची हुशारी", भरतनी टोला हाणला.
"माझ्यासंग आला असता तर तुमी पण १ किलो घालून फिरला असता", हातातल्या आणि गळ्यातल्या सोन्याकडे त्यानं सूचक नजर टाकली.
रामरावांना काहीच कळेना. "अरे, सिलिंडर तर तिथेच आहे आणि ही काय महत्वाची गोष्ट आहे इतक्या लांब येऊन सांगायला?"
"नाय दादा, एजन्सीचं कार्ड वैनी साडीत लपून आल्त्या येताना. माज्याकडं वीडीओ क्लिप हाय मोबाईल मदी. तवा म्या गप रायलो आपला कन्सर्ण नाय मनून. पन दादा, आता एका वर्षी सिलिंडर मिलणार त्याला लिमिट घातलीय नव्ह घोर्मेणन", भरतने स्पष्टीकरण दिलं.
"अजिबात देणार नाही मी माझं सिलिंडर. ते पप्पांनी दिलंय मला लग्नात. स्त्रीधन आहे माझं", सीताबाई स्पायडर-कन्येच्या वेगानं चुलीपासून उठत सूर मारून चर्चेत उतरली.
"सीते, एक सिलिंडर ते काय आणि कित्ती पझेसिव वागतीयेस तू आणि आपलीच लोकं आहेत ना वापरणारी आणि शिजवून खाणारी? त्यांची काहीच काळजी नाही तुला?", रामरावांनी आश्चर्य व्यक्त केले.
"हे अस्सच असतं तुमचं, शेवटी वळचणीच पाणी वळचणीलाच जातं", बोलता-बोलता तिने अश्रुंचे कॉक पूर्ण डावीकडे फिरवून खडक-वासल्याचे दोन्ही दरवाजे सताड उघडायची तयारी सुरु केली होती.
रामराव या पवित्र्याने गडबडून काहीतरी सारवा-सारवीचं बोलणार, तोच भरतने झेप घेऊन सरळ सीताबाईचे पाय पकडले आणि मान खालीच ठेवून नाट्यपूर्ण आवाजात ओरडला, "पाटीवर मारा पन पोटावर मारू नगा वैनी, आसं कवठासारकं काळीज कडक नका करू वैनी, माज्या लग्नात जेवडी सिलिंडर येतील तेवडी समदी तुमच्या नावानी करीन, दादा-शप्पत", त्याच्या अचानक आळवलेल्या 'मारू'बिहाग ने दचकून सीतेने परत चुलीपाशी रिवर्स जंप मारली आणि ती बावचळून आळीपाळीने सगळ्यांकडे बघत आवंढा गिळत बसली. भरतने त्याचा आजवर कधीही वाया न गेलेला शॉट मारला होता आणि सीताबाईला काय बोलावे हे सुचत नव्हते.
अपील करायला ती आपल्याकडे पाहणार याची जाणीव होताच जिंकायला १ रन बाकी आणि शेवटच्या बॉल वर सिक्स बसल्यासारखे रामराव आणि लक्षुमण तिथून निघाले आणि एकमेकाकडे 'सामना हातातून गेला' अशा नजरेने बघायला लागले.
बाहेर येऊन न आलेले अश्रू पुसत भरतने पुन्हा दादाला नमस्कार केला आणि गाडीवर मांड ठोकून बसला. हिरवा गॉगल खिशातून काढून डोळ्यावर लावता-लावता तो आपल्याकडे बघून एक डोळा बारीक करून गालातल्या गालात हसल्याचा लक्ष्मणाला भास झाला आणि त्याच्या अंगाचा शेनवार्नने तंबूत जाताना डीवचल्या सारखा तीळ-पापड झाला.
* * *
धूळ उडवत पल्सर गावाच्या वेशीवर दिसताच घराच्या गच्चीत बाकीची मंडळी लगबगीनं गोळा झाली आणि दूरवरून भरतच्या हातातलं फडकत असलेलं कार्ड पाहून मिशन-पॉसीबल झाल्याचं ओळखून समूह-स्वरात गाऊ लागली,
"सिलेंडर आले सीतेचे, सिलेंडर आले सीतेचे.."
दगडफूल , खडक-वासल्याचे दोन्ही
दगडफूल , खडक-वासल्याचे दोन्ही दरवाजे >>>
मस्त जमलंय.. ( सगळ्या
मस्त जमलंय..
( सगळ्या सिरियलमधे चारी भावांची लग्न एकदमच झालेली दाखवतात नेहमी, धाकट्या दोघींनी पुढे काय केले ( काय दिवे लावले ) ते इतिहासाला माहीत नाही वाटतं. )
(No subject)
जम्या नहीं. पण वाचायला मज्जा
जम्या नहीं.
पण वाचायला मज्जा आली.
<<"अजिबात देणार नाही मी माझं
<<"अजिबात देणार नाही मी माझं सिलिंडर. ते पप्पांनी दिलंय मला लग्नात. स्त्रीधन आहे माझं", सीताबाई स्पायडर-कन्येच्या वेगानं चुलीपासून उठत सूर मारून चर्चेत उतरली.<<
पर्र्देशी,भर्र्देशी... वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ,अश्रुंचे कॉक आणि खडकवासला...
मस्त मस्त... माबोला नविन लेखकाची गरजच होती.
देवा!
देवा!
मस्त, आवडलं
(No subject)
(No subject)
राम तुम्हांला याची शिक्षा
राम तुम्हांला याची शिक्षा देणार नाही असे वाटतेय का तुम्हांला??? मुंगेरीलालजी
ओके
ओके
खूपच खुमासदार शैली आहे तुमची
खूपच खुमासदार शैली आहे तुमची मुंगेरीलाल, बरेच दिवसात मायबोलीवर असं निर्मळ लेखन आणि प्रतिसाद वाचायला मिळाले नव्हते
अजून येऊ द्या.
मंजिरी सोमण +१
मंजिरी सोमण +१
(No subject)
नाही आवडलं .
नाही आवडलं .
मस्तच..............
मस्तच..............
(No subject)
छान!!!
छान!!!
लिवा लिवा .. मजा येतीया
लिवा लिवा .. मजा येतीया वाचाया..
अस एकाद इनोदी नाटाक लिवा आनी आमास्नी द्या बगु.
मस्त
मस्त
सिलेंडर आले सीतेचे.. अग नई,
सिलेंडर आले सीतेचे..

अग नई, इत्त जंगलात कोन्ती भानगड
धमाल आहे!
पर्र्देशी,भर्र्देशी... वाईल्ड
पर्र्देशी,भर्र्देशी... वाईल्ड लाईफ फोटोग्राफी
मस्त मस्त... माबोला नविन लेखकाची गरजच होती. > १००००००+
नुसत नविन नाही तर कथा/लेख पूर्ण करून वाचकान्ची कदर करणार्या लेखकाची गरज होती
धमाल आलि...मस्तच...
धमाल आलि...मस्तच...
काही पंचेस सोडता बाकी फारसं
काही पंचेस सोडता बाकी फारसं नाही आवडलं!
दगडफुल आणि अश्रुंचे कॉक <<
दगडफुल आणि अश्रुंचे कॉक <<
मला आवडलं. मजा आली.
मला आवडलं. मजा आली.
धन्य!
धन्य!
काही पंचेस सोडता विशेष नाही
काही पंचेस सोडता विशेष नाही आवडलं.
मस्त
मस्त
हा हा...सहीच...
हा हा...सहीच...
Pages