घनगड आणि तेलबैला

Submitted by सौमित्र साळुंके on 25 October, 2012 - 09:22

घनगड आणि तेलबैला

भेट दिलेले दुर्ग: घनगड आणि तेलबैला

दिनांक: २० व २१ ऑक्टोबर २०१२

दुर्गयात्री: १. आतिश नाईक, २. किशोर सावंत, ३. सौमित्र साळुंके

------------------

लोणावळ्याच्या साधारण दक्षिणेला ३५ किलोमीटरवर घनगड स्थित आहे. गडाची उंची समुद्र सपाटीपासून ७९४ मीटर असून गड पायथ्यापासून २०० मीटर उठावला आहे.

१९ तारखेच्या रात्री साडे अकराच्या मुंबई (बोरीवली डेपो) – स्वारगेट एशियाडने मध्यरात्री अडीच वाजता लोणावळा डेपोत पायउतार झालो. भाम्बर्डे (बऱ्याच ब्लॉग्जमध्ये या गावाचा उल्लेख भाम्बुर्डे असा आढळला आहे) गावी जाणारी एस.टी नऊ वाजताची असल्याने सकाळी सात वाजेपर्यंत थोडी विश्रांती घेतली. डेपोकडे तोंड करून उभे असल्यास आपल्या डाव्या हाताला सगळ्यात शेवटी पाण्याची व्यवस्था आहे. इथे दंतमंजन इत्यादी उरकावे. अलीकडच्या ‘सुलभ’ मध्ये पाणीसुद्धा सुलभ किंबहुना मुबलक आहे तेव्हा चिंता नसावी. हे विस्ताराने लिहिलं कारण घनगड, कोरीगड, तेलबैला असे गिरीदुर्ग तसेच निसर्ग भटकंतीची काही ठिकाणे गाठण्यासाठी आधी लोणावळा डेपो गाठावा लागतो. बेस विलेज असतं तसा हा बेस डेपो.

लोणावळ्याहून भाम्बर्डेला जाणारी हि महामंडळाची लाल डबा बस हे एक जागतिक आश्चर्य होऊ शकतं. साल्तर खिंडीच्या अलीकडेच डाव्या बाजूचा रस्ता पकडून मौजे तिस्करी मार्गे, मुळशी जलाशयाची एक जीभ डावीकडे ठेऊन संपूर्ण डोंगर रांगेला वळसा घालून भाम्बर्डेला पोहोचते. हा गाडीमार्ग इतका अरुंद आणि उंच सखल आहे कि या मार्गावर सार्वजनिक वाहन चालवणे निव्वळ मास्टरीचं काम आहे. आतिशची प्रतिक्रिया मार्मिक होती. म्हटला इथे एस. टी.ला सुद्धा ट्रेक करत यावं लागतं. असो, मार्गे तिस्करी, रस्त्याची मस्करी बघत आम्ही सव्वा अकराच्या सुमारास भाम्बर्डेत दाखल झालो. (लोणावळा ते भाम्बर्डे गाडी भाडे – रू. ११४ तिघांचे)
IMG_1903.JPG
इथून एक गाडीवाट वळसा घेऊन थेट एकोले या घनगडाच्या पायथ्याच्या गावी जाते. डावीकडे नवरा-नवरी-भटोबाचे सुळके आपलं लक्ष हमखास वेधून घेतात. उजवीकडे शेतभर नाचणी आणि भात झुलत असतो. एकोले गावात शिरण्याआधीच डावीकडे एक ठळक पायवाट गडावर जाते. भाम्बर्डे ते एकोले अंतर पंधरा वीस मिनिटांचे आहे. तर या पायवाटेने आपण दहा-पंधरा मिनिटांत गारजाईच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो. मंदिरासमोर दीपमाळ आणि दगडात कोरलेले मारुतीराय आहेत. घनगडावर मुक्काम करावयाचा झाल्यास हे मंदिर उत्तम आहे.
IMG_1908.JPG
पुढे गेल्यावर एक लोखंडी शिडी दिसते. इथून घनगडाचा कडा डावीकडे ठेवून सरळ गेल्यास एक शिलाखंड जमिनीत तिरपा रुतून बसलेला दिसतो. IMG_1934.JPGगडाचा कडा व हि शिळा यामध्ये एका लहानश्या गुहेत वाघजाई देवीची दगडी मूर्ती आहे. त्याच्याच पुढे कड्याला बिलगून जाणाऱ्या अतिशय अरुंद वाटेने काळजीपूर्वक गेल्यास सुमधुर पाण्याचं टाकं लागतं. या इथून पुन्हा आपण शिडीपाशी यायचं. IMG_1949.JPGया लोखंडी शिडीवर काळजीपूर्वक चढल्यानंतर आपण गडाच्या माथ्याजवळ पोहोचतो. IMG_1952.JPGमाथ्यावर जाणाऱ्या मुख्य दरवाज्यात प्रवेशताच वाऱ्याचे वेगवान झोत आपलं स्वागत करतात. निवांत गेल्यास एक तास आणि सरळ सरळ गेल्यास अर्धा तास एव्हढा वेळ माथ्यावर पोहोचण्यास आपल्याला लागतो. शक्यतो गडभेटी निवांत करावी. निरीक्षण, टिपण करत गड दर्शन करावे. शर्यत लावू नये.

गडाच्या माथ्यावर आज प्रचंड गवत मजले असून बरेचसे अवशेष या गवतरानामुळे गुडूप झाले आहेत. माथ्यावरून आजूबाजूचा अतिशय विस्तीर्ण प्रदेश दिसतो. घाटमाथा आणि कोकण दोहोंचे दर्शन होते. IMG_1963.JPGइथून तेलबैलाचे सुळके अत्यंत मनोहारी दिसतात. IMG_1966.JPGसुधागड हाकेच्या अंतरावर असल्यासारखा भासतो.

सदाशिवरावभाऊंच्या तोतयास या किल्ल्यावर कैद करण्यात आले होते. या हि किल्ल्याने निजामशाही, आदिलशाही आणि शिवशाही पाहिली आहे.

आपण आल्या वाटेने आपण पुन्हा एकोले गावात यायचे. इथल्या विहिरीतून भरपूर पाणी घेऊन आता खरोखर भरपूर चालण्याची तयारी करायची. IMG_2052.JPGजवळजवळ दहा किलोमीटर आणि तेही उंच सखल गाडी रस्ता.IMG_2060.JPG आम्ही जवळ जवळ पाऊणे दोन तास चालल्यानंतर तेलबैला गावाच्या किलोमीटर भर अंतरावर असताना आम्हाला वडूस्ते-लोणावळा गाडी मिळाली. लांब डावीकडे तेलबैलाच्या मागच्या बाजूला सायंकाळच्या किरणांचा कॅनव्हास आणि मित्रांची सोबत असताना दुरवर जाणारी हि वाट फुलांसारखी टवटवीत वाटू लागते.

संध्याकाळी बरोबर ६ वाजता तेलबैला गावात आम्ही पोहोचलो होतो तेव्हा आमच्या समोर सुर्यनारायण क्षितिजाहून दिसेनासे झाले मात्र त्यांची आसमंतात पसरलेली रक्तवर्णी प्रभा आम्हाला खिंडीपर्यंत पोहोचायला पुरेशी होती. IMG_2094.JPGसाधारण पस्तीस मिनिटांत दोन्ही सुळक्यांच्या मधल्या खिंडीतल्या बहिरोबाच्या मंदिरात आम्ही पोहोचलो. IMG_2111.JPGया खिंडीपर्यंतची तेलबैलाची उंची ७३० मीटर असावी. वरचे सुळके तीनेकशे मीटर असावेत. बहिरोबाच्या शेजारीच पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. हे मंदिर ज्या गुहेच्या आधारे बांधलं आहे, त्या गुहेचा सुळका/ भिंत म्हणजे तेलबैला गड.IMG_2185_0.JPG या भिंतीवर तसेच समोरच्या सुळक्यावरसुद्धा आरोहण करता येतं मात्र ते सुनियोजित तांत्रिक प्रस्तरारोहणाचा विषय होत. IMG_2183.JPGप्रस्तरारोहण श्रेणी: अवघड

ऑक्टोबरच्या त्या रात्रीचा त्या खिंडीतला वारा मी तुम्हाला कसा ऐकवू? वाट सोपी आहे. एकदा तुमची वाट वाकडी करा.

किसान मेने नामक गावकरी आणि इतर दोन गावकरी सुद्धा इथे रात्री मुक्कामी होते. त्यांनी दिलेली नाचणीची भाकरी खाऊन त्यांच्याकडून खालच्या गावांमध्ये चमचमणाऱ्या प्रकाशदिव्यांच्या आधारे परिसराची माहिती घेतली. या वेळी वारा अक्षरशः धिंगाणा घालत होता.

दिवसभर असं उंडारल्यानंतर रात्री त्या मंदिरात मुक्काम केला.IMG_2168.JPG शर्ट, विंडचिटर, माकडटोपी आणि पांघरून असूनसुद्धा थंडी वाजत होती. वाऱ्याच्या उनाडक्या रात्रभर चालू होत्या.

पहाटे सहा वाजता मला जाग आली. आतिश आणि किशोर दोघेही अंथरुणातून बाहेर पडेनात तेव्हा मी बाहेर येऊन समोरच्या सुळक्याच्या पायाशी असलेल्या खोबणीत जाऊन बसलो. अंधुक उजेड, चोहोबाजुच्या डोंगरांची लाइनिंग आणि अवखळ वाऱ्याचा अथक आवेश बघत बसून होतो. थोड्या वेळाने दोघेसुद्धा बाहेर आले आणि आम्ही तिघे निसर्गाचं ते जागं होण्याचं दृश्य डोळ्यांत साठवत निशब्द उभे होतो.

उजवीकडच्या भिंतीखाली एक चूल असून प्रचंड वाऱ्यामुळे आम्ही चहा करण्याचा बेत रद्द केला आणि लोणावळ्यात न्याहारी करायची ठरवलं. पाऊणे आठ वाजता आम्ही झपझप उतरत वीस एक मिनिटांत पायथ्याशी पोहोचलो. लोणावळ्याला जाणारी वडूस्ते-लोणावळा एस. टी तेलबैला गावात सकाळी बरोबर साडे आठला पोहोचते. याच एस. टी.ने सालतर खिंड मार्गे, कोरीगडाच्या पायथ्याशेजारून, ऍम्बी व्हॆली मार्गे लोणावळ्यात पावणे दोन तासात पोहोचलो. इथून मुंबईत यायला महामंडळाच्या चिक्कार गाड्या आहेत.
IMG_2192.JPG

टिपणे:

१. या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे प्रवास केल्यास संपूर्ण खर्च (सोबत आणलेल्या विकतच्या खाद्यपदार्थांची किंमत वगळून) रुपये तीनशेपेक्षा जास्त येणार नाही.

२. घनगडावर चूल पेटवण्यास योग्य जागा व पुरेसे सरपण मिळू शकते.

३. तेलबैलावर चूल न पेटविल्यास बरे असे माझे वैयक्तिक निश्चित मत आहे

४. सोबत दुर्बिण असल्यास या ट्रेक चा आनंद खचितच द्विगुणीत होऊ शकेल.

५. लोणावळा परिसराचा नकाशा (http://deepabhi.tripod.com/images/lonavala.jpg) आणि कंपास असल्याशिवाय घर सोडू नका IMG_2020.JPG

पुन्हा भेटू...

सौमित्र साळुंके

२४.१०.२०१२

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौमित्र पिकासावर फोटो अपलोड करून त्याचे एम्बेडड लिंक देणे हा एक चांगला पर्याय आहे...त्यामुळे मोठ्या आकाराचे फोटो टाकणेही शक्य होते...

खुप उपयुक्त माहिती आहे. मदतपुस्तिकेत फोटो कसे अपलोड करायचे, त्याची सविस्तर माहिती आहे.

सुंदर लिहिल आहे. Happy
फोटो मात्र अजुन हवेत.

खालील लिन्क वर तुम्हाला फोटो अपलोडिन्ग साठी मदत आहे. त्यातले प्रतिसाद देखील वाचा.
पिकासावरुन फोटो देण्याची पद्धत छान समजाउन दिली आहे.

http://www.maayboli.com/node/1556

लोणावळ्याहून भाम्बर्डेला जाणारी हि महामंडळाची लाल डबा बस हे एक जागतिक आश्चर्य होऊ शकतं. साल्तर खिंडीच्या अलीकडेच डाव्या बाजूचा रस्ता पकडून मौजे तिस्करी मार्गे, मुळशी जलाशयाची एक जीभ डावीकडे ठेऊन संपूर्ण डोंगर रांगेला वळसा घालून भाम्बर्डेला पोहोचते>>> डावीकडे कोरीगड, समोर पुढे गेलो तर अ‍ॅम्बीव्हॅलीचे प्रवेह्सद्वार आणि उजवीकडे हा रस्ता हे वर्णन बरोबर आहे का? मी एकटाच गेलो होतो तेव्हा घनगडच्या पायथ्यापर्यंत जाउ बाइकने असा विचार होता. त्या रस्त्याने थोडं पुढे गेलो. पुर्ण निर्जन रस्ता, रस्ता का म्हणावा असा प्रश्न पाडणारा रस्ता आणि पुढे हळुहळु घनदाट होत गेलेलं जंगल बघुन गुपचुप मागे फिरलो होतो.

मस्त लिखाण Happy
फोटो अजुन पाहिजेतच Happy

सौमित्र मला संपर्कातुन तुझा ईमेल आयडी पाठव. मी डॉक फाईल पाठवतो "मायबोलीवर फोटो कसे अपलोड" करायचे त्याची.

लांब डावीकडे तेलबैलाच्या मागच्या बाजूला सायंकाळच्या किरणांचा कॅनव्हास आणि मित्रांची सोबत असताना दुरवर जाणारी हि वाट फुलांसारखी टवटवीत वाटू लागते. >>>>> अगदी अगदी

छान लिहीले आहे. पु.ले.शु. Happy

सौमित्र मस्तच रे....लिखाण आणी फोटो मस्त
माझ्या सह्याद्रीतल्या अत्यंत आवडीच्या एका एरीयात भटकंती केलीस..

ह्या एरीयात २००४ पासून अतापर्यंत अनेक वेळा गेलोय.. लोणावळा ते भांबर्डे (गावकरी भांबर्डा असा उल्लेख करतात) ही गाडी तर खुप ओळखीची झालीय.. खूप आधी ही गाडी लोणावळा ते आंबवणे अशी होती आणी त्या वेळेला भांबर्डॅला जायला दुपारी १२.३० ला गाडी होती आणी ती ही तिस्करी, बार्पे असे न करता साल्टर खिंडीतून डायरेक्ट जायची..

ह्या एरीयाची खरी ओळख घनगड ते तेलबैला यादरम्यान असलेल्या अनेक घाटवाटांमधूनच होते.. तेव्हा पुन्हा जाल तेव्हा एखाद्या तरी घाटवाटेने कोकणात उतरा...

असो हा एरिया, ह्या एरियात असलेले किल्ले, घाटवाटा, लोकजिवन, त्यांचे प्रश्ण यावर किती लिहावे... स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.... सध्या मी आम्ही गेल्या वर्षी केलेल्या घनगड - केवणी - नाळेची वाट - खडसांबळे लेणी अश्या ट्रेकवर लिहितोय.. लिहून पुर्ण झाले की धागा टाकेनच...

बादवे: तुम्ही फारच रस्त्याने चाललात... भांबर्डॅ ते एकोले अंतर मधल्या वाटेने (शेतातल्या) १५-२० मिनिटाचे आहे..तसेच एकोल्यावरून तेलबैलाला जाताना दरीच्या कडेने एका तासात जाता येते..

पुढील ट्रेकला शुभेच्छा...

स्वच्छंदी, दरीच्या कडेने जाणारी वाट आणि तो मधला ओढाही भारी आहे. आम्ही थोडे चुकलेलो त्या शेताडीत..!
सौमित्रा, (एक कोकणी प्रश्न) हा कंपास केवढ्याला मिळतो रे.. दिसायला तरी भारी आहे! आणि कुठे मिळेल?

सुरेख!

आम्हीही एका दिवसात हे दोन्ही केले होते. फक्त घनगडावरची ती शिडी सापडलीच नाही आणि तेव्हा ट्रेकिंगमध्ये थोडे नवखे असल्यामुळे शोधायच्या भानगडीत पडलो नाही... Happy

@ स्वछंदी: आम्हाला शिवाजी ट्रेल्स चे क्षीरसागर भेटले होते घनगडाच्या पायथ्याला. त्यांनी भातशेतातून जाणारी वाट दाखवली होती. मात्र जरा आत गेल्यावर ती अस्पष्ट झाली. तेव्हा पिक तुडवत जाण्याऐवजी रस्त्याने जाणे आम्हाला जास्त योग्य वाटले. पुन्हा कधी गेलो की तुम्ही सुचवलेले मार्ग नक्की पत्करीन. धन्यवाद.

@ हेम: हा कंपास फक्त दिसायला भारी दिसतो. कुठल्याही स्टेशनरी च्या दुकानात दोन-तीनशे रुपयात मिळेल.

@ आनंदयात्री: हेम म्हणतात त्या प्रमाणे हि शिडी अलीकडेच बसवली आहे (सौजन्य:शिवाजी ट्रेल्स ). पूर्वी सोप्या श्रेणीचे प्रस्तरारोहण करावे लागत असे.

सर्वांचे आभार.

@ झकासराव:
वर्णन बरोबर असावे. खात्रीसाठी लोणावळे ते भाम्बर्डे बारपे तीस्करी मार्गे भाम्बर्डे मार्ग आणि येताना साल्तर खिंड मार्गे तेलबैला ते लोणावळा असे दोन गुगल अर्थ नकाशे जोडत आहे.Telbaila to Lonavala via Saltar Khind.jpglonavala to bhambarde via barpe tisakri.jpg

सौमित्र , स्वच्छंदी आणि आनंदयात्री छान ! तिघांच्या माहितीतून हा ट्रेक कसा करायचा ते अगदी स्पष्ट झाले . बसच्या( एसटिच्या लाल बसला लेलेन्डचे इंजेन ,सहा चाके आणि ब्रेक असतात आणि ती वेळेवर नेते ,ट्रेककरांची प्रियदर्शिनी ) वेळा , शॉर्टकटस ,चालण्याचे अंतर फार उपयोगी आहे .फोटो पुरेसे आहेत . आठ तारखेला सुधागडावर होतो तेंव्हाच समोरचा तेलबैला पाहून ठरवून टाकले हा गड करायचाच . असेच लिहित जा .