काळजास सहजी माझ्या कुसकरून गेले कोणी!

Submitted by सतीश देवपूरकर on 24 October, 2012 - 22:52

गझल
काळजास सहजी माझ्या कुसकरून गेले कोणी!
निमिषात सर्व स्वप्नांना विसकटून गेले कोणी!!

मी एक जणू विझलेला निस्तेज निखारा होतो;
हृदयात आस जगण्याची चेतवून गेले कोणी!

अडवाया गेलो वणवा वस्तीच्या वेशीपाशी;
तितक्यात घराला माझ्या पेटवून गेले कोणी!

आताच स्मृतींना सा-या कुलुपात ठेवुनी आलो!
आताच मनाला माझ्या उचकटून गेले कोणी!!

ठाऊक कळ्यांना नाही, ठाऊक फुलांना नाही....
इतकेच मलाही स्मरते...दरवळून गेले कोणी!

अद्याप मनाचे माझ्या हे पान पान थरथरते!
वाटते असे की, नुकते सळसळून गेले कोणी!!

ती साद कुणाची होती? मी कुणास शोधत आहे?
जवळून माझिया बहुधा झुळझुळून गेले कोणी!!

सूर्याचा प्रकाश किंवा ती हवा असो वा पाणी;
म्हणते का कोणी? त्यांना वापरून गेले कोणी!

मी अजून चालत आहे निष्ठेचा एकच रस्ता....
जो तमात आयुष्याच्या दाखवून गेले कोणी!

उघड्यावर निजला होता भररस्त्यावरती कोणी...
आताच कफन त्याच्यावर पांघरून गेले कोणी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एक जणू विझलेला निस्तेज निखारा होतो;
हृदयात आस जगण्याची चेतवून गेले कोणी!

अडवाया गेलो वणवा वस्तीच्या वेशीपाशी;
तितक्यात घराला माझ्या पेटवून गेले कोणी!

आताच स्मृतींना सा-या कुलुपात ठेवुनी आलो!
आताच मनाला माझ्या उचकटून गेले कोणी!!

अद्याप मनाचे माझ्या हे पान पान थरथरते!
वाटते असे की, नुकते सळसळून गेले कोणी!!

ती साद कुणाची होती? मी कुणास शोधत आहे?
जवळून माझिया बहुधा झुळझुळून गेले कोणी!!

मी अजून चालत आहे निष्ठेचा एकच रस्ता....
जो तमात आयुष्याच्या दाखवून गेले कोणी!

उघड्यावर निजला होता भररस्त्यावरती कोणी...
आताच कफन त्याच्यावर पांघरून गेले कोणी!<<<

व्वा व्वा प्रोफेसर साहेब, दिलखुष गझल

अग्निहोत्र हळूच चालू करून वहिनी उठायच्या आत भलताच भारी कार्यभाग साधलात की?

पुनश्च अभिनंदन!

(आजची ही दुसरी 'गायनानुकुल' गझल वाचायला मिळाली)

-'बेफिकीर'!

गायनानुकुल गझल वाटल्याबद्दल धन्यवाद!
आहो पण आम्ही गाऊ लागलो तर तात्काळ आमची हकालपट्टी व्हायची किंवा बाईसाहेब निघून जायच्या, म्हणून फारच दमादमाने, कलाकलाने शिताफीने घ्यावे लागते.
टीप: कालच५०,०००रुपयांचा डेल कंपनीचा laptop बाईसाहेबांनी जावयाच्या मदतीने(शारिरीक मदत) आम्हास घेवून दिला. मराठी त्यात अजून लोड करायचे आहे. तूर्तास जुन्या घोड्यावरच काम चालू आहे!
जावयास पकडण्यासाठीही आम्हास बरेच कावे करायला लागतात.
सहस्त्रबुद्धे आहेत ते softwear engineer. आवळा देवून कोहळा काढायला लागतो ब-याचदा!
आई व मुलगी carbon copies आहेत अगदी!

आपल्या कौटुंबिक पातळीवरील काव्यकुचंबणेची व उचंबळठेचआंदोलन प्रक्रियेची आम्हास काहीशी जाणीव होत आहे.

भारतीय रुपये पन्नास हजार फक्त या रकमेचा लॅपटॉप घेऊन त्या सर्वांनी आपल्याला व जगाला असे दाखवून दिलेले आहे की त्यांच्यात कवितेला आश्रय देण्याचे औदार्य आहे. पण आम्हास हे कृत्य तूर्त फसवे वाटते. याचे कारण स्वानुभव.

पण लवकरच आपल्या बाबतीतील आमचा हा समज गैरसमज असल्याचे सिद्ध होवो व आपल्या प्रतिभेला सुगंधी धुमारे फुटून त्यांचे मायबोलीवर सिंचन घडून मराठी गझलेला मायबोलीवर राजाश्रय मिळो अशी प्रार्थना!

-'बेफिकीर'!

आमच्या कोणत्याही वक्तव्यास खासगी स्वरुपाच्या टीकेचा गंध येत असल्यास त्वरीत माफ करावे कारण आमचा तसा कोणताही उद्देश नाही.

आहो पण आम्ही गाऊ लागलो तर तात्काळ आमची हकालपट्टी व्हायची किंवा बाईसाहेब निघून जायच्या, म्हणून फारच दमादमाने, कलाकलाने शिताफीने घ्यावे लागते.<<<

आपले तात्काळ व भलतेच गैरसमज होतात याचे आम्हास नवल वाटते. गझल गायनानुकुल आहे याचा अर्थ ती आपण गावीत असे आम्हाला मुळीच म्हणायचे नाही. एखाद्या व्यावसायिक गायकाने ती गावी इतकेच म्हणायचे आहे.

तरीही, 'बाईसाहेब निघून जायच्या' या आपल्या विधानातून आम्हास एक नवीनच दालन उघडल्याची जाणीव झाली. म्हणजे आपणास एकांत हवा असलाच तर आपण आपल्या गझला घरात गायला बसू शकता. हा एक जालीम व रामबाण उपाय आपल्या हाताशी आहे याचा आम्हास मत्सर वाटतो.

-'बेफिकीर'!

पेटवून आणि सळसळून हे शेर खूप आवडले.

बाकी गझलही मस्त.

अवांतर : मराठी गझलेला 'राजाश्रय' ही नावीन्यपूर्ण कल्पना वाटली मला.

बेफिकीरजी, विजयराव, वैभवा!
सर्वांचे मनापासून आभार!
भूषणराव!
जेवढा विरोध जास्त, तेवढा उचंबळ प्रखर! असे व्यस्त प्रमाण आम्ही अनुभवतो!
आमची काव्यलेखनाची/टंकलेखनाची कुचंबणा होते, हे खरे आहे, कारण compवर बसल्यावर keyboardचा, खुर्चीचा, आमच्या खाकरण्याचा/खोकण्याचा आवाज होवून बाईसाहेब व त्यांचा विरोध दोघेही एकदम जागृत होतात.
त्या आम्हास compवरून उठवू शकतात. पण, अंथरुणावर पडल्यावरही आमचा काव्यउचंबळ मनात चालूच असतो, जो काही केल्या त्यांना ठेचता येत नाही. हां, त्यांच्या तोंडाचा अखंड पट्टा मात्र चालूच असतो! पण, आम्ही या कानाने ऎकतो व त्या कानाने सोडून देतो. फक्त, मधून मधून ऎकत असल्याचे, दाद देण्याचे सोंग मात्र घेतो. आम्ही बोललेली बहुतेक वाक्ये, बहुतेकवेवळा असंबद्धच असतात! अशा वेळेस मात्र शिव्यांची लाखोली मिळते.आम्हास संसारात काही राम उरला नाही असेही प्रेमळ आरोप होतात. पण नंतर गाडी रुळावर कशी आणायची ही हातोटी आमच्या आमच्याकडे असल्याने , बाईसाहेबांच्या आवडीच्या घरगुती राजकारणावर दोनचार वाक्ये उच्चारली की, मूळ विषयाला बगल दिली जावून घडीभर तरी आमच्यावरचा रोख आम्ही दुसरीकडे शिताफीने वळविण्यात यशस्वी होतो.

बोलता बोलता त्या घोरू लागल्या की, आम्ही hallमधे चपळाईने पलायन करतो व आमचे काव्यलेखन रात्री/अपरात्रीही (तंबाखूचा बार भरून) उरकून घेतो. बाईसाहेबांचे म्हणणे असते की, आम्हास काहीही उद्योग नाहीत, संसाराची (आता आमच्या दोघांचाच संसार बर का....म्हातारा म्हातारीचा) फिकीर नाही, म्हणून असे काव्यलेखनासारखे फडतूस धंदे आम्हास सुचतात म्हणे!

म्हणून आमचे लिखाण आम्ही गुप्त ठेवतो. ओढणी, पदर, सुगंध, दरवळ किंवा कोणत्याही स्त्रीसंलग्न प्रतिमांचा शेर
वाचला/ऎकला/चोरून (आमच्या मागे चुपचाप उभे राहून) पाहिलाच तर झापडण्यात्मक तासाभराचे व्याख्यान ऎकून घ्यावे लागते! हे असे भलभलते विचार तुमच्या मनात चालू असतात काय? आहो, किती वर्षांचे झालात आपण? आपणास मानसोपचारतज्ञाची तातडीने गरज आहे वगैरे वगैरे ऎकवतात.

आम्ही शब्दांचे लाक्षणीक व ध्वन्यार्थ असतात, असे बोलू लागलो की, त्यांचा ध्वनी मात्र टिपेस पोचतो व हा फुटकळपणा पुरे करा व पहिल्यांदा झाडून घ्या, दाढी करा, प्यायचे पाणी भरून घ्या, आता पाणी जाईल, कितीला महाविद्यालयात तडफडायचे आहे, किती वाजताचे व्याख्यान आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू होते.
आम्हीही कावेबाजपणे दररोज बदलती असणारी जायची वेळ शेवटपर्यंत गुह्य ठेवून आमचे इप्सित साधून घेतो. असो.

पण, खरे सांगू का, त्याच तर आमच्या ultimate प्रेरणा आहेत. त्याच आमच्या लेखणीला पाझर फोडतात!
अर्थात हे आम्ही त्यांच्या समोर बोलू शकत नाही, हे मात्र खरे! भूशास्त्रात काही तरी भरीव करावे असा त्यांचा उदात्त हेतू आहे laptop देण्यात. ते तर आम्ही अधून मधून करतोच!
(आपणास काय फसवे वाटले ते कळले नाही.)

मराठी गझलेला मायबोलीवर राजाश्रय देणारे आम्ही कोण बुवा? असो.
परंतू आपल्या सदिच्छांबद्दल भूषणराव, आम्ही आपले आभारी आहोत.

टीप: आम्ही प्राचार्य झाल्यावर, बाईसाहेबांनी आम्हाला १४,०००रुपयांचा LGचा स्मार्टफोन उदार अंत:करणाने दिला, ज्यावर ideaचे नेटही घेवून दिले. त्याचाही आम्ही कलात्मक उपयोग करून घेतो, त्यांची नजर चुकवून!
मोबाइलमधे त्यांच्यासमोर बसून बघण्याची आमची धडगत नसते, कारण त्यांना भलभलतेच संशय येतात.

पुण्यात असताना, रात्री आम्हास कुठेही जायची परवानगी नसते व बाईसाहेबही माहेरास(शुक्रवार पेठ) कधीही जायचे नाव घेत नाहीत. कुठे जायचेच झाले तर, सारथी म्हणून आम्हीच असतो हक्काचे! असो.
फारच बोललो! त्यांना काही कुटील संशय यायच्या आत थांबतो!
...................प्रा.सतीश देवपूरकर

तळटीप: आमच्या एकांतावर बाईसाहेबांचा पूर्ण ताबा असतो. दर पाच मिनिटांनी hall मधे येवून आमच्या काय कारवाया चालल्या आहेत ते त्या गुपचूप न्याहाळून जातात. म्हणून आम्हीही अधून मधून खोकण्याचे वा खाकरण्याचे दंभ करीत असतो, म्हणजे त्यांचा hallमधे येण्याचा संभव कमी होतो!
आपणास एक नवीनच दालन उघडल्यासारखे वाटले, पण भूषणराव अशी किती तरी दालने आहेत, जी प्रत्यक्ष भेटीत निवांतपणे ऎसपैस, शेरोशायरी करीत बोलू या!
लवकरच भेटू या कधीतरी निवांतपणे मोकळ्याढाकळ्या गप्पा मारायला!(आपल्या दोघांच्या सोयीने)
..............................................................................................

लवकरच भेटू या कधीतरी निवांतपणे मोकळ्याढाकळ्या गप्पा मारायला!(आपल्या दोघांच्या सोयीने)>>>>>>>>>>>>>>>>
मलाही बोलवा मीही येईन

मलाही बोलवा मीही येईन<<< वैवकु, फार मोकळे बोलायचे नाहीये, थोडेसेच मोकळे बोलायचे आहे

Wink Proud Light 1

========================

प्रोफेसर साहेब,

माझ्यासारखी २४ प्रकरणे करणार्‍याची वहिनींशी या जन्मी ओळख होणे शक्य दिसत नाही. Sad

-'बेफिकीर'!

उघड्यावर निजला होता भररस्त्यावरती कोणी...
आताच कफन त्याच्यावर पांघरून गेले कोणी! << ओहोहो ..!!