डोळे भरून तुजला पाहीन रोज म्हणतो!

Submitted by सतीश देवपूरकर on 22 October, 2012 - 14:16

गझल
डोळे भरून तुजला पाहीन रोज म्हणतो!
मदिरा तुझ्या दिठीची रिचवीन रोज म्हणतो!!

कण एक मी धरेचा, ज्याची तहान न्यारी!
उंची तुझ्या नभाची मोजीन रोज म्हणतो!!

दररोज हाय होतो आघात एक ताजा;
जखमा जुन्यापुराण्या विसरीन रोज म्हणतो!

आहे खरेच भोळा अंधार झोपड्यांचा.....
हातामधे कवडसा पकडीन रोज म्हणतो!

कोणीतरी अचानक छाटून हात जातो....
आयुष्य फाटलेले टाचीन रोज म्हणतो!

घाईत घालतो मी जखमांस धावदोरे;
मी धांदलीत असतो, टाचीन रोज म्हणतो!

दररोज मानतो मी आभार ईश्वराचे!
एकेक शब्द त्याचा पाळीन रोज म्हणतो!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार फार सुंदर!!! अप्रतिम!!!

जगणेच नाहि जमले, असतो जिवंत तरिही
जगुदे किमान आज, मरणास रोज म्हणतो...!!!

सर, बरेच काही तुम्ही 'रोज म्हणता' पण मग पुढे काय???

नापास रदीफ आहे ही. अशा रदीफेची गझल कशी काय होऊ शकते.

स्पष्टवक्तेपणाबद्दल रागाऊ नयेत प्लीज.

अशा रदीफेची गझल कशी काय होऊ शकते.>>>>>>>>

<<<<<<<<<<न व्हायला काय झालय ???
करणर्‍याला करता आलेली नाहीये असे म्हणत असाल तर सहमत आहे मी !!...सरांनी अधिक प्रयत्न करायला हवे होते.

बरेच काही तुम्ही 'रोज म्हणता' पण मग पुढे काय???>>>>:P ......य्ये ब्बात!! मस्त प्रश्न आहे हा

चांदणी लाड मॅडम ...आपली काही ओळख नसताना जरा कडवट प्रतिसाद दिला आहे प्लीज गोड मानून घेणे !!:)

चांदणी लाड मॅडम ...आपली काही ओळख नसताना जरा कडवट प्रतिसाद दिला आहे प्लीज गोड मानून घेणे !!
<<

ओळख वाढवू या अशी प्रस्तावना आहे वाट्टं ही?

आ.न.
झोटिंग शहा

चांदणी लाड,
आमच्या रदीफास अनुत्तीर्ण केल्याबद्दल धन्यवाद!
अशा रदीफेची गझल कशी काय होऊ शकते?<<<<<
उत्तर तुमच्या समोर आहे........आमची ही गझल!
रदीफाचा अर्थच आपण समजून घेतलेला नसावा असे वाटत आहे.
नुसता रदीफ मनात घोळवून बघा व आपल्या मनास विचारा, उत्तर मिळेल!
रोज म्हणतो असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्यात जे म्हटले आहे ती गोष्ट रोज रोज करूनही मनाजोगती जमत नाही अशी अर्थाची छटा त्यात प्रतीत होते.
उदाहरणार्थ रोज सकाळी लवकर उठीन म्हणतो, असे म्हटल्यावर म्हणणा-याला असे सांगायचे असते, की, रोज ठरवून सुद्धा, इच्छा असून सुद्धा रोज सकाळी उठणे मला जमत नाही. असो. इथे पुढे काय हा प्रश्नच मुळी अप्रस्तुत वाटतो!
..........प्रा.सतीश देवपूरकर.
वैभवासाठी.............
अजून काय प्रयत्न हवे होते याचे प्रात्यक्षिक करून दाखवावे!
.................................................................................................

दररोज हाय होतो आघात एक ताजा;
जखमा जुन्यापुराण्या विसरीन रोज म्हणतो!
......... खुपच छान!