दक्षिण कोकण दुर्गमोहिम - पहिला मान रत्नदुर्गचा

Submitted by आशुचँप on 22 October, 2012 - 13:23

गेल्या कोकणवारीनंतर लगेचच पुढच्या वारीचे वेध लागले होते. तसे कोकणात जाणे येणे नविन राहीले नसले तरी बाईकवरून भटकंती केल्यामुळे जे काही कोकण अनुभवले त्यामुळे मी आणि अमेय तर कोकणाच्या प्रेमातच पडलो होतो. त्यामुळे लवकरात लवकर दक्षिण कोकण पार पाडण्याचे मनसुबे झाले. पण ते प्रत्यक्षात यायला तब्बल एक वर्ष लागले. त्यादरम्यान, बाईकवरून कोल्हापूर भटकंतीदेखील पार पडली होती. त्यामुळे बाईक भटके अशी आमची नवी ओळख निर्माण व्हायला लागली होती.
आता आमच्या दोघांचे ट्युनिंग छान जमत असल्याने बाकी कुणाला घेण्यापेक्षा आपले आपणच जाऊ असेच ठरत होते, पण एका बेसावध क्षणी माझ्या मित्रांना हा बेत सांगून बसलो. ...झाले
त्यांनीही आमच्याबरोबर येण्याचे ठरवले...आता मोठी पंचाईत होती..मित्र होते पिकनिक संप्रदायातले...त्यांना आमच्यासारखे रावडी ट्रेक करायला लावणे ही त्यांना मोठी शिक्षा होती आणि त्यांना चालणारी पिकनिक ट्रीप करणे ही आमच्यासाठी....मग शेवटी ते आम्हाला मालवणमध्ये भेटतील आणि नंतर एकत्र गोव्यापर्यंत जायचे अशी तडजोड झाली.
आता तयारी जाण्याची...बरीच चर्चा, डोकेफोड करून रूट ठरवला...आधी मायबोलीकर डेव्हिल याने सुचवल्याप्रमाणे लांबचे ठिकाण आधी करून मग पुण्याकडे यायचा बेत आखला होता. पण गोवा पहिल्यांदा करून मग हेक्टिक रुट घेण्याचे काय मनात येईना. आम्हाला गोव्यात जाऊन मस्त रिलॅक्स व्हायचे होते. निवांत भटकायचे होते. त्यामुळे तिथले दोन दिवस हे विश्रांतीचे, श्रमपरिहाराचे होते. ते आधीच कसे करणार. त्यामुळे मग रत्नागिरी ते गोवा अशीच मोहीम ठरली...यात किनारे, पर्यटकप्रसिद्ध ठिकाणे, मंदिरे असे काही न करता फक्त सागरी किल्ले एवढेच उद्दीष्ट ठेवले होते. तसे केले तरच कमी दिवसात मोठा पल्ला गाठता येणार होता. त्यामुळे किनारे, मंदिरे हे घरच्यांबरोबरच्या ट्रीपसाठी ठेवत ध्येय निश्चित केले.
बाईकवरून दोन मोठे ट्रेक झाल्यामुळे सामान किती व कसे भरायचे..काय काय घ्यायचे काय काय नाही हे सगळे सोपे झाले होते. प्रश्न होता प्रकृतीचा...गेल्या कोकण मोहिमेत पोटाचे इन्फेक्शन झाल्यामुळे हालत खराब झाली होती. यावेळी तसे काही होऊ नये म्हणून बाप्पांकडे प्रार्थना केली. त्यांनी ती तंतोतंत ऐकली आणि ट्रीपमध्ये काहीच झाले नाही पण जायच्या आदले दिवशी बाईक थोडी स्कीड झाली आणि ती सावरण्याच्या नादात डाव्या पायाचा घोटा चांगलाच दुखावला.
अर्थात त्याने जाण्याचा निश्चय काही डळमळला नाही. पण दुसरे दिवशी पहाटेच निघायचे म्हणून अमेय सामानसुमान घेऊन रात्री घरी दाखल झाला ते गुढग्याला पट्टी बांधूनच..
"च्यामारी आता तुलापण पायाला पट्टी बांधायला काय झाले," ...मी जरा चिडूनच विचारले...
"अरे, काल जिन्यावरून उतरताना धडपडलो...".
"छान..म्हणजे दोघेही आपण लंगडत लंगडत जायचे का आता?...."
नशिब घरच्यांनी आमचे संवाद ऐकले नाहीत अन्यथा मग परवानगी मिळताना पुरेवाट झाली असती. त्यामुळे भल्या पहाटे दोघेही आपापल्या पायांना क्रेप बँडेज लाऊन कोल्हापूरच्या दिशेने सुटलो..
चिपळूणमार्गे जायला कदाचित जवळ पडले असते पण तो रस्ता अगदीच खराब असल्याचे कळल्यामुळे सातारा कराड मलकापूर साखरपा हातखंबा मार्गाने रत्नागिरी गाठले...

पल्ला ३१० किमी....त्यामुळे मागे बसणार्याची चांगलीच वाट लागणार होती.त्यामुळे आलटून पालटून ड्रायव्हिंग करायचे ठरले...अर्थात दोघांच्या पायाला चांगलाच मार लागल्यामुळे गिअर टाकताना किंवा बाईक अचानक थांबवल्यावर पाय टेकताना सणसणून कळ जात होती. पण त्याकारणासाठीही मागे बसायची दोघांचीही तयारी नव्हती...लांबच्या पल्ल्यावर मागे बसणार्यांचे हाल ज्यांनी अनुभवलेत त्यांना यातली अपरिहार्यता कळेल...
जशी जशी दुपार व्हायला लागली तसा उन्हाचा तडाखाही वाढायला लागला आणि मग ३०० किमी हे देखील फार मोठे अंतर आहे याची जाणीव व्हायला लागली. पण चांगला स्पीड ठेवत पाचएक तासात रत्नागिरीत पोहचलो देखील....
रत्नागिरीत बाबांचे एक मित्र राहतात त्यांना भेटून मग रत्नदुर्ग किल्ला पाहून पुढे पावसला मुक्काम करायचा असा बेत होता. पण त्यांना भेटल्यावर त्यांनी घरी राहण्याचा सॉलीड आग्रह केला. रत्नागिरी पावस असे कितीसे लांब आहे...एवढ्या लांब आलाय तर घरी यायचंच..तुम्हाला उद्या भल्या पहाटे उठवून पाठवायची जबाबदारी माझी.
आता इतक्या आग्रहानंतर आम्हालाही त्यांचे मन मोडवेना...त्यातून त्यांनी रत्नागिरीचा थिबा पॅलेस रात्री पाहण्यासारखा असतो..लायटिंग वगैरे केलेल असते असे सांगून आमच्या आधीच्या बेताला चांगलाच सुरुंग लावला....
पण झालेला बदल आमचा चांगलाच पथ्थ्यावर पडला...आमची ती अवजड सॅक काकांच्या घरी टाकून त्यांच्या मुलासोबत किल्ला बघायला बाहेर पडलो. तत्पूर्वी, आमच्या दोघांच्या पायाच्या पट्टया, ती सॅक पाहून काकूंनी मात्र किती रे अगोचरपणा करता, का उगाच घरच्यांच्या जीवाला घोर लावता असे बोलून दाखवलेच...पण ते नेहमीप्रमाणेच कानामागे टाकत पहिले थिबा पॅलेस गाठला...

थिबा पॅलेस आहे मात्र मस्त...आमच्या सुदैवाने त्यावेळी आमचे आम्हीच असल्याने मनमुराद फोटो काढत राहीलो....हा अँगल..तो अँगल...ट्रेकचा पहिलाच दिवस असल्याने सॉलीड उत्साहात होतो...पण त्यात किती वेळ चाललाय याचे काही भान राहीले नाही....

शेवटी अजून आपल्याला आख्खा किल्ला पहायचाय या विचारानेच आम्हाला तिथून बाहेर काढले आणि थोड्याच वेळात रत्नदुर्ग किल्ल्यापाशी येऊन ठेपलो.
"रत्नदुर्ग किल्ला नालाच्या आकाराचा असून वेगवेगळ्या कालखंडात त्याची निर्मिती झाल्याचे उल्लेख आहेत. अर्थात आता फक्त बालेकिल्लाच चांगल्या स्थितीत उरला आहे. रस्ता थेट बालेकिल्ल्यावरच जातो आणि लोक बालेकिल्ल्यालाच मूळ किल्ला समजून परत फिरतात..."
भगवान चिलेंच्या पुस्तकात असे वर्णन वाचल्यामुळे आम्हीही मूळ किल्ला संपूर्ण पाहण्याचा बेत केला, पण थिबा पॅलेस पाहण्यात जरूरीपेक्षा जास्त वेळ गेल्यामुळे आम्हाला केवळ बालेकिल्यावरच समाधान मानावे लागले.
पण काकांचा मुलगा म्हणजे घर ते शाळा आणि आता कॉलेज आणि कॉलेज ते घर या पंथातला..त्याला आमचे साहसी उद्योग म्हणजे काहीतरी भन्नाट प्रकरण वाटत होते. त्यामुळे त्याला काय दाखवू काय नको असे झाले होते.

किल्ला आहे फार सुंदर....आपल्या जिप्स्याने त्याचे तितकेच सुंदर फोटो काढलेत...त्यामुळे एखादा वेगळा अँगल शोधण्याच्या धडपडीत मी होतो...आणि त्या प्रयत्नात उंच पॅरापीट वॉलवर चढण्याच्या प्रयत्नात पडून ढोपरं आणि हनुवटीला खरचटून घेतले...पण खरचटणे सार्थकी लागावे असा एक छानसा फोटो मिळाला...स्लो शटरस्पीड ठेऊन लाटांची साय दिसावी असा प्रयत्न होता..आणि उभी फ्रेम ठेवल्यामुळे अस्ताला चालेलले भास्करराव पण त्यात आले....

संध्याकाळी सहा वाजता किल्ल्याचा दरवाजा बंद होत असल्याने आम्हाला घाई करून बालेकिल्ल्याची फेरी आटपावी लागली. त्यामुळे फार काही प्रचि मिळाली नाहीत.

ट्रेकचा पहिलाच किल्ला मनासारखा न पाहता आल्यामुळे थोडे निराश झालो होतो पण याची भरपाई उद्या करायचीच असे मनाशी ठरवत तिथलीच एक बाग गाठली...त्या बागेचे नुकतेच नूतनीकरण झाले होते...आणि संध्याकाळच्या वेळी छानशी हिरवळही दिसत होती. ट्रेक आणि आईसक्रीम हे आमचे आता समिकरणच झाल्यामुळे ते दिसताच हादडण्यात फार वेळ घालवला नाही...
एकदा असा विचार आला की उद्या सकाळी पुन्हा एकदा किल्ल्यावर जाऊन यावे पण आधीच आम्ही शेड्युलपेक्षा १५ २० किमीने मागे होतो..त्यात अजून रत्नदुर्गलाच एवढा वेळ घालवला असता तर पुढची सगळी बोंब झाली असती..गिरीश आणि योगेश आम्हाला मालवणला ५ च्या सुमारास भेटणार असल्याने डीटूर करण्याचा कुठलाही स्कोप यंदा नव्हता....
त्यामुळे मुकाट्याने काकांच्या घरी जाऊन जेवणखाण उरकले आणि त्यांच्या मुलाचे व्हायोलीन वादन ऐकत निद्रादेवीला शरण गेलो...(ते दमल्यामुळे...वादनाचा काही संबंध नाही :))

====================================================================
दक्षिण कोकण दुर्गमोहिम २ - पूर्णगड, भुईसपाट झालेला अंबोळगड आणि प्रमुख आकर्षण विजयदुर्ग
http://www.maayboli.com/node/39847

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा पहिला नंबर....
नेहमीप्रमाणे झक्कास! आता पुढील भागांना वेळ लावू नकोस. येऊ दे झटपट..

मित्र होते पिकनिक संप्रदायातले...त्यांना आमच्यासारखे रावडी ट्रेक करायला लावणे ही त्यांना मोठी शिक्षा होती आणि त्यांना चालणारी पिकनिक ट्रीप करणे ही आमच्यासाठी. >>>>>> अगदी रे, कितीतरी वेळा कुठून घेतलं ह्यांना बरोबर अस होतं,
बाकी वृत्तांत मस्तचं
पुलेशु

मस्त रे.
मेजवानी मिळणार आता.
स्टार्टर्स भन्नाट आहेत. मस्त फ्रेम आहेत सर्व Happy

पहिलाच फोटु आंबा घाटाच्या पहिल्याच वळणावरचा आहे काय?

कोकण म्हणलं की मन हिरवं होऊन जातं... कोकणातल्या प्रत्येक मोसमाची जादू निराळी.

प्रकाशचित्रण आणि वर्णन दोन्ही लाजबाव... अगदी कोकणा सारखे Happy

फोटो मस्त आहेत.
किल्यावरच बहुतेक एक दीपगृह आहे. ते ही बघता येतं. पुढच्या वेळी अगदी आवर्जुन बघ.
फोटो मस्त आहेत. थीबा पॅलेसचा रात्रीचा फोटो कुठाय?

क्या बात है आशु.. मस्त वर्णन आणि प्रचि.
भास्कररावांचा प्रचि तर खासच Happy
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. लवकर येऊ दे.

मला अगदी माझ्या घरचे फोटो बघत असल्यासारखं वाटलं Proud

रत्नदुर्ग किल्ला.. लई भारी आठवणी आहेत आमच्या या ठिकाणासोबत. Happy

तुम्ही जर आधी सांगितले असते तर माझ्या भावाला तुमच्यासोबत करून दिली असती. किल्ल्यातली भुयारं आणि "सुसाईड पॉईंट" (इथून फोटो चांगले मिळतात.) जोतिबाचे मूळ मंदिर (कोल्हापूरच्या जोतिबाचे मूळ मंदिर या किल्ल्याच्या पायथ्याशी आहे) असलं बरंच फिरवलं असतं त्याने.

धन्यवाद सर्वांना....

हेम होय...टाकतो पटापट...आणि पुढचे भाग जरा विस्तृत असतील

सारंग ते आहेच....पण मी त्यांना सॉलीड दम भरला होता..आमच्याबरोबर यायचे तर आमच्या पद्धतीने वागावे लागेल...इ.इ...त्यापैकी बराच वेळ त्यांनी ऐकले...

झकासराव हो आंबा घाटाचाच आहे...

सॅम पाहिले ते दीपगृह...पण लांबूनच फोटो काढले...आम्हाला वेळ अगदीच कमी मिळाला...
आणि थिबा पॅलेसला त्या दिवशी रात्री लायटिंग केलेच नव्हते त्यामुळे सॉलीड पोपट झाला.....

Ammi .. नाही पाहिले...आधीच म्हणल्याप्रमाणे देवळे, किनारे, प्रेक्षणीय स्थळे आमच्या यादीतून कटाप होती....

नंदिनी अरेरे...आधी माहीती पाहीजे होती...श्या हे मिसलं राव...तरी ठिक आहे मी अर्धवट राहीलेला किल्ला बघण्यासाठी पुन्हा एकदा जाणारच आहे..बहुदा जानेवारीत जाईन...तेव्हा नक्की भेटेन तुमच्या भावाला...

डेविल तुझ्या नकाशाने फार मोठे काम केले बाबा...

सुंदर !

नंदिनींची मोठी पोस्ट येईल अशी अपेक्षा होती. त्यांच्याच 'होम पिच'वर तर बॅटींग करायला गेला होतात !!! Wink

रत्नागिरीला 'वायुदूत'च्या डॉर्नियर विमानाने जायचा योग आला होता. वरून दिसणारा किल्ला व बंदर परिसराचा नजाराही डोळ्याचं पारणं फेडणारा होता.! नंतर एका प्रकल्पाच्या संदर्भात पावस ते जयगड लाँचमधूनही प्रवास करण्याची संधि मिळाली व वेगळ्याच 'अँगल'ने किल्ला पहातां आला ! दोन्ही वेळच्या हृद्य आठवणी वरच्या अप्रतिम प्र.चि.मुळे उजळून निघाल्या. धन्यवाद.

रत्नागिरीला 'वायुदूत'च्या डॉर्नियर विमानाने जायचा योग आला होता. वरून दिसणारा किल्ला व बंदर परिसराचा नजाराही डोळ्याचं पारणं फेडणारा होता.! नंतर एका प्रकल्पाच्या संदर्भात पावस ते जयगड लाँचमधूनही प्रवास करण्याची संधि मिळाली व वेगळ्याच 'अँगल'ने किल्ला पहातां आला

सॉलीड...भाऊ तुमचा जोरदार हेवा वाटतोय....

<< भाऊ तुमचा जोरदार हेवा वाटतोय.... >> आशुचँपजी, तुम्हा ट्रेकर्सचा खरं तर कौतुकपूर्ण हेवा वाटतो; आमच्यासारख्याना असं कांही पहायला मिळतं केवळ योगायोगानेच. तुमच्यासारखं जिद्दीने नाही. And, believe me, that makes a world of difference !

कोकण म्हणलं की मन हिरवं होऊन जातं... कोकणातल्या प्रत्येक मोसमाची जादू निराळी.

प्रकाशचित्रण आणि वर्णन दोन्ही लाजबाव...

सगळी छायाचित्र खूपच सुंदर आली आहेत आशूचॅप.

संध्याकाळी सहा वाजता किल्ल्याचा दरवाजा बंद होत असल्याने आम्हाला घाई करून बालेकिल्ल्याची फेरी आटपावी लागली. त्यामुळे फार काही प्रचि मिळाली नाहीत>>

ह्या ओळींखालचे छायाचित्र फारच आवडले.

वाहवा भाऊ...भरून पावलो तुमच्या प्रतिसादाने...:)

धन्स रे भटक्या...

धन्यवाद शेखरकुल आणि बी....

Pages