अवयव दाना संबंधी - काही माहिती

Submitted by कविन on 22 October, 2012 - 05:50

कधी तरी कोणाच्या तरी अवेळी जाण्याची बातमी आपण पेपर मधे वाचतो

हळहळतो, लाईफ इज अनसर्टन म्हणतो. एक उसासा टाकतो. पुन्हा रोजच्या गतीने श्वासोच्छ्वासाची लय पकडून आपला मार्ग चालू लागतो

आपल्या मागे आपल्या कुटूंबाची सोय करुन ठेवायला हवी ह्या जाणीवेने कुठल्या कुठल्या पॉलीसीज घेतो. फायनान्सची कॅलक्युलेशन्स करतो. पुन्हा एकदा आपला पेस पकडून चालायला लागतो

हजारोंच्या की लाखोंच्या संख्येने रोज कोणी ना कोणी कुठच्या ना कुठच्या जीवघेण्या आजाराशी झुंजत असतो. डॉक्टर "डोनर" कोणी मिळाला तर जगायचे क्षण वाढतील असं निदान करतात. जेव्हा आपण किंवा आपलं कोणी त्या जागी असतं तेव्हा "डोनर" मिळवायला आपण जीवाचं रान करतो.

लाईफ इज अन्सर्टन पुन्हा एकदा जाणवून जातं

जगात अमुक इतके अंध आहेत, अमुक इतकी लोकसंख्या आहे. अमुक इतक्यांनी नेत्र दान केलं तर तमुक इतक्या दिवसात जगातलं अंधत्व लोप पावेल अशा अर्थाचे इमेल्स फ़ॉरवर्ड वर फ़ॉर्वर्ड करतो

मला ठावूक आहे तुम्हालाही हे ठावूक आहे की असं इमेल्स फ़ॉरवर्ड करुन काही होत असतं तर आत्ता पर्यंत बरच काही झालं असतं

तरीही आपण ते करतो. का?

कारण कधी तरी कोणीतरी आपल्यासारखाच वेडा विचार करणारा ते वाचेल. कदाचित तो ही ह्या माहीतीच्या शोधात असेल जसे आपण होतो. आपल्याला जसा फायदा झाला त्या एका इमेलचा/ त्या एका लेखाचा तसा तो त्या व्यक्तीलाही होईल.

१० मधल्या ५ जणांनी नुसतच डिलिट केलं, ३ जणांनी तुम्हालाच वेड्यात काढलं तरी एखाद दोन तर असतील ज्यांना ही पायवाट चालून बघावी वाटेल

त्या एक दोघांसाठी आपण ते इमेल फ़ॉरवर्ड करतो/ अनुभव लिहितो

तर आत्ता पर्यंतच वाचून हे कळलच असेल की हे लिहिण्याचा प्रपंच त्या एक दोघांसाठी आहे. तेव्हा बाकीच्या इग्नोर मारणाऱ्यांनी, डिलिट करण्याच्या मुडात असणाऱ्यांनी आणि खिल्ली उडवण्याच्या बेतात असणाऱ्यांनी इथेच रामराम म्हणायला हरकत नाही :फ़िदी:

झोनल ट्रान्सप्लान्ट को ऑर्डिनेशन सेंटर (मुंबई) ही संस्था ऑर्गन डोनेशन वर काम करते. जसं नेत्र दान करता येतं, तसच हृदय, यकृत, किडनी, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन, फुफ्फुस, आणि त्वचा दान देखील करता येतं.

अर्थात वरील पैकी त्वचा आणि नेत्र दान सोडता बाकीच्या गोष्टी ब्रेन डेड अवस्थेतील पेशंट्च दान करु शकतो

किडनी, यकृताचा काही भाग हा जीवित व्यक्ती देखील दान करु शकते पण त्यासाठीचे नियम वेगळे आहेत.

आपण गेल्यावर आपले देता येण्यासारखे अवयव दान देऊन आपण काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर त्यापेक्षा अधिक आनंदाचे असे काय असेल?

असे केल्यानंतर देखील तुमच्या पार्थिवाचे तुमच्या धर्मात लिहिल्याप्रमाणे अंत्यसंस्कार करता येतात तेव्हा धार्मिक क्रियाकर्म शक्य होतील का नाही हा विचार मनात येत असेल तर त्याच उत्तर निश्चीतच तुमच्या तुमच्या धर्मात लिहिल्याप्रमाणे अंत्यविधी करता येतील असच आहे

मुळात अशी इच्छा व्यक्त करुन डोनर कार्ड भरले तरी काही ठरावीक केसेस मधे ती इच्छा पुर्णत्वास नेणे अशक्य होते (जसं माझे वडील कॅन्सर पेशंट होते म्हणून त्यांचे नेत्रदान शक्य झाले नाही तसच माझ्या सासऱ्यांचे देखील शरीरात इन्फ़ेक्शन पसरल्यामुळे शक्य झाले नाही). तरी देखील आपली इच्छा नोंदवून तसे आपल्या जवळच्या कुटूंबियांस सांगणे केव्हाही योग्यच.

डोनर कार्ड हे साधारण असे दिसते
Resize of donation card.jpg

आपल्या पैकी कोणाला जर ह्या विषयी अधीक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा त्या संस्थेचा पत्ता

झोनल ट्रान्सप्लान्ट को ऑर्डिनेशन सेंटर
एल टी एम जी इस्पितळ, कॉलेज बिल्डींग
रुम नंबर ए/२९, त्वचा बॅन्केच्या जवळ
सायन (प.) मुंबई - ४०० ०२२

वेबसाईट: www.ztccmumbai.org

इमेल: organtransplant@ztccmumbai.org

फोन: 24028197/ 9167663468/ 69

वेळ: सोमवार ते शुक्रवार - सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
शनिवारी - सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत

सोबत त्यांचे पत्रक जोडत आहे

Organ Donation Information.pdf (131.45 KB)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहीती बद्दल धन्यवाद.
डोळ्याच्या बाबतीत म्हणाल तर हजारो डोळे योग्य त्या संयोजना अभावी फेकुन द्यावी लागल्याचे वाचनात आले आहे.

धन्स Happy

मुग्धानंद धन्स ग, अ‍ॅडमिनना सांगून माझ्या धाग्यातली माहिती तुझ्या धाग्यात हलवता येईल का? म्हणजे माझा धागा डिलिटला तरी चालेल. एकाच विषयावर दोन धागे झालेत म्हणून

नेत्रदान.
(थोडी माहिती)

तुम्ही स्वतः नेत्रदान केल्याचे कार्ड भरू शकता. याने तुम्हाला आनंद नक्कीच होईल, परंतू त्या फॉर्मचा अ‍ॅक्चुअल उपयोग तेव्हाच होईल, जेव्हा तुमच्या मृत्यूनंतर नातेवाईक योग्य ती खबरदारी घेतील व नेत्रदान केले जाऊन त्या डोळ्याचे रोपण होऊन कुणाला दिसू लागेल. रक्तदान वा किडनी दान हे जिवंतपणी करतात. नेत्रदान तुमच्या मृत्यूनंतर करावयाचे असते, तेंव्हा तुमच्यासोबत तुमच्या जवळच्यांनाही हे वाचायला द्या.

१. डोळा बसवतात / रोपण करतात म्हणजे नक्की काय करतात?

डोळ्याच्या काळ्या बाहुलीवर घड्याळाच्या काचे सारखा भाग आहे. या काचेला 'कॉर्निआ' (मराठीत पारपटल) असे म्हणतात. फक्त या इतक्याच पार्टचे रोपण करता येते. संपूर्ण बुबुळ वापरले जात नाही, वापरता येऊ शकत नाही.
(कॉर्निया मधे रक्तवाहिन्या नाहीत. रक्तामार्फत पोहोचणारे अनेक घटक तिथे पोहोचू शकत नाहीत व त्यामुळे कोणतेही क्रॉसमॅचिंग न करता कॉर्निया यशस्वीपणे कलम करून बसवता येतो. क्रॉसमॅचिंग : रक्तगट जुळवणे सारखा प्रकार. किडनी, वा इतर अवयवांच्या डोनेशन मधे या अनेक गुणांची पत्रीका तंतोतंत जुळली तरच काम चालते, नाहीतर अवयव 'रिजेक्ट' होतो. -रुग्णाचे शरीर/इम्युनिटी त्याला जगू देत नाही. कलम फसते.)

२. कोणत्या प्रकारच्या अंधांना याचा फायदा होतो?

सहाजिकच फक्त कॉर्निया अपारदर्शक झाल्यामुळे आलेल्या अंधत्वालाच नेत्रदानाने दृष्टी मिळू शकते. अपारदर्शक कॉर्निया काढून टाकून दान केलेला पारदर्शक कॉर्निया तिथे बसवला जातो.
सगळ्याच अंधांना याचा उपयोग नाही. जसे, डायबेटीसमुळे पडदा खराब झालेले, पडदा निखळलेले (रेटिनल डिटॅचमेंट), ऑप्टिक अ‍ॅट्रोफी ('नस' सुकलेले) इ. लोकांना दृष्टी येण्यासाठी याचा उपयोग नाही.

(मात्र, अशा पेशंटचा कॉर्निया दान केला जाऊ शकतो!)

३. कुणाला नेत्रदान करता येत नाही?

ज्या ज्या दात्याला अवयवामार्फत पसरतील असे आजार आहेत, उदा. कावीळ (हिपॅटायटिस बी), एड्स, कॅन्सर, शरीरभर सेप्टिक पसरले असे इन्फेक्शन इ. या रुग्णांनी नेत्रदान करू नये.
नेत्रपेढीतील डॉक्टर येऊन डोळे काढण्या आधी हा इतिहास विचारून घेतील, व तशी पॉझिटिव्ह हिस्टरी सापडली तर नेत्रदान स्वीकारता येत नाही, म्हणून तुमची क्षमा मागतील व धन्यवाद म्हणून निघून जातील.

नेत्रदान स्वीकारले, तर सोबत मृत शरीरातील रक्ताचा नमूना आजकाल HIV टेस्ट साठी काढून घेतात. तो मिळाला नाही, तर काहीवेळा दान स्वीकारत नाहीत.

याव्यतिरिक्त सर्व माणसे नेत्रदान करू शकतात.

४. डोळ्याचे ऑपरेशन झालेले असेल तर?

हरकत नसते. कॉर्नियाचा आजार नसेल तर तो डोळा वापरात येतो. मात्र, खूप काळ बेशुद्ध / सिरियस पेशंटचे डोळे अर्धवट उघडे राहून या कॉर्नियाज वाळून खराब झालेल्या असतात. त्यावर जखम तयार झालेली असते. (एक्स्पोजर केरॅटायटीस) असे कॉर्निया उपयोगात आणता येत नाहीत. अटेंडिंग डॉक्टरांना एक शब्द विचारुन घ्या.

५. नक्की नेत्रदान कसे करायचे?

मृत्यू झाल्यापासून ६ तासांचे आत डोळे/कॉर्निया काढून नेणे गरजेचे असते. (काहीवेळा आजोबा/आजी 'गेल्या'नंतर ४-५ तासांनी डॉक्टरला बोलावले जाते, उदा. झोपेतच गेले असतील तर. अशावेळी टिश्यू डीकांपोज होऊन खराब होऊ लागलेली असू शकते, म्हणून Time of death. NOT time of 'declaration of death')

पेशंटचे डोळे बंद करा. त्यावर स्वच्छ रुमाल ओला करून घट्ट पिळून मग त्याची घडी ठेवा. खोलीतील पंखे बंद करा.

ताबडतोब नेत्रपेढीला कळवा. (हत्यारे निर्जंतुक करून तुमच्यापर्यंत पोहोचायला त्यांना २ तासापर्यंत वेळ लागू शकतो. फ्रेश निर्जंतुक हत्यारेच वापरली जातात. ऑपरेशनला वापरतात तसे.)

तुमच्या आसपासच्या कोणत्याही डोळ्यांच्या डॉक्टरांना विचारलेत तर ते नक्की कुणाला बोलवायचे याचे मार्गदर्शन करतील. प्रत्येक गावात नेत्रपेढी नसते. अशावेळी शासकिय रुग्णालयांत संपर्क करावा. मात्र, तुमच्या गावापासून ३ तासात एसटीने पोहोचता येईल इतक्या अंतरावर नेत्रपेढी नसली तर उगा डोळे काढायला लावू नका. ते दान वायाच जाणार आहे. सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या रुग्णालयांत नेत्रपेढी आहे. उदा. ससून. पुण्यात अजूनही काही आहेत.

६. बाबांनी फॉर्म भरला नव्हता...

तुम्ही सर्वात जवळचे वारस आहात, अन तुम्ही नातेवाईकांनी मिळून नेत्रदानाचा निर्णय घेतलात तर चालतो. ते दान स्वीकारले जाईलच. वर म्हटल्याप्रमाणे आधी ते प्रश्न विचारतील, कागदांवर सह्या घेतील. (नेक्स्ट ऑफ किन व २ साक्षीदार) एड्स टेस्टींगसाठी रक्त काढतील (सरळ छातीतून) ते मिळाले नाही तर वर म्हटल्याप्रमाणे नेत्रदान स्वीकारले जाणार नाही.

७. डोळे काढतील म्हणजे?

संपूर्ण बुबुळ वा फक्त कॉर्निआ त्याच्या बाजूल स्क्लेरल रिम सह काढला जातो. प्रत्येक पेढीत स्टोरेजची सोय/पद्धत काय आहे त्यानुसार.

आलेल्या डॉक्टरांना हात धुवायला पाणी व साबण लागेल. तो द्या. मृतदेह ज्या खोलीत आहे, तिथून सगळ्यांना बाहेर जायला सांगा. तुम्हाला पहायचे असल्यास परवानगी मिळेल, पण अनाठायी हौस शक्यतो करू नका.

(कॉर्निआ हार्वेस्टिंग : डोळे काढून नेणे, हे एक ऑपरेशन आहे. अगदी जिवंत माणसांचे करतात तसेच निर्जंतुक परिस्थिती करून, व्यवस्थित ड्रेपिंग वगैरे करून ते काम करतात. मात्र ऑपरेशन व तेही नुकत्याच गेलेल्या जवळच्या व्यक्तीचे- पहाण्याइतके घट्ट काळीज असेल तरच पहा. नाहीतर चक्कर येऊन पडाल अन आलेल्या डॉक्टरांना वेगळेच काम लागेल.)

हवा तो भाग काढून घेतल्यानंतर पापण्या टाके मारून एकत्र शिवल्या जातील, चेहरा अजिबात विद्रुप दिसणार नाही.

८. बाबांचे डोळे कुणाला बसवलेत?

ते तुम्हाला सांगितले जाणार नाही. हे संपूर्ण अनामिक दान आहे. घेणार्‍यालाही कुणाचे कॉर्निया ते ठाऊक नसते, व देणार्‍यांनाही ही माहिती दिली जात नाही. ती सांगण्यासाठी दबाव कृपया टाकू नका.

९. काही 'फी' द्यावी लागेल का?

नाही.
तुम्ही नेत्रदानासाठी कुणालाही कोणतेही पैसे देणे अपेक्षित नाही.

नेत्रपेढीस देणगी देण्याची इच्छा असल्यास तिथे जाऊन नंतर संचालकांशी बोलून काय ते करावे.

(शक्यतो थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही धाग्यापेक्षा प्रतिसाद जड असे संपादकांना वाटल्यास वेगळा धागा करावा, अथवा उडवावा, ही विनंती. धन्यवाद!)

इब्लिस, चांगली माहिती दिलीत. धन्यवाद!

भारतात मरणोत्तर देहदान केलं असता नातेवाईकांनी नेमकं काय करायचं असतं? अशावेळी नेत्रदान प्रोसिजर देह जिथे नेल्या जातो त्याच जागी केल्या जातं का?

थोडे अवांतर तरीही अवयवदानाशी संबंधीत.

मध्यंतरीच्या काळात किडनी रॅकेटमुळे अवयवदानाचे कायदे फारच कडक करण्यात आले आहेत. नेत्रदान हे संपूर्णपणे मृत अशा देहापासून घ्यायचे आहे, इतर ठिकाणी जसे किडनी, पेशंट पूर्ण जिवंत आहे. व इतर अवयवांत 'ब्रेन डेड' आहे.

परंतू शासकीय नियमावली तयार करणार्‍यांनी हे समजून न घेता सर्व नियम बनवलेत. त्यामुळे नेत्रदानासारखा सोपा व परिणामकारक उपाय, आपल्या देशात फारसा वापरला जाताना दिसत नाहीये. सिंपल कारण म्हणजे नेत्रपेढी सुरू करणे व सुरू ठेवणे यासाठी डॉक्टरला स्वतःच्या डोक्याला करून घ्यावा लागणारा ताप व संताप. अगदी सगळ्या नव्या सरकारी व खासगी वैद्यकिय महाविद्यालयांतूनही नेत्रपेढी चालवली जात नाही, एस्टॅब्लिशच केली जात नाही याचे हेच एक मोठ्ठे कारण आहे.

अजून एक अवांतर निरिक्षण म्हणजे जैन समुदायात या दानाचे महत्व जास्त प्रमाणात प्रचार झालेले आहे. त्यांनी एक धार्मिक बाब म्हणून नेत्रदानाचा स्वीकार केलेला दिसतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात दाते समोरे येताना दिसतात. कोणत्याही कारणाने या दानाचा प्रसार होणे गरजेचे आहे, कारण आपल्या देशात कॉर्निया ब्लाईंडनेस चे प्रमाण भरपूर आहे. (17 Jun 2010 – There is an estimated 4.6 million corneal blind people in India. Out of this, 90 percent are below the age of 45, including 60 percent children ...)

मृण्मयी, नाही.
नेत्रदान हे आधी केले जाईल. तुमच्या घरीच वा जिथे मृत्यू झाला त्या हॉस्पिटलमधे. नंतर देह देहदान केला तिथे नेला जाईल. अभ्यासासाठी दान केलेल्या देहातला एक संपूर्ण अवयव मात्र कमी असेल, हे देहदात्याने ध्यानी ठेवावे..

हॉस्पिटल डेथ : नेत्रदान करणार असाल तर शक्यतो हॉस्पिटलच्या बिनडोक स्टाफला 'बॉडी' शवागारात हलवू देवू नका. बेडवरच डोळे काढून नेऊ द्या. शवागारात जंतूविरहित परिस्थीती करून डोळे काढणे अशक्य आहे.

पुन्हा एकदा, माहितीसाठी मनःपूर्वक धन्यवाद इब्लिस!

माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला वाचताना-लिहिताना या गोष्टी जरा मॉर्बिड वाटतात. पण विचारणं आवश्यक वाटतं. देहदान केल्यानंतर खरंतर यायला नको, पण अनेक प्रश्न डोक्यात येतात. मेडिकल अभ्यासासाठी वापरला जाणार देह कसा वागवला जातो? मृतदेहाची डिग्निटी सांभाळल्या जाते का? अभ्यासकाच्या दृष्टीनं रस्त्यावर सापडलेला बेवारस देह आणि एखाद्या व्यक्तीनं अत्यंत जाणीवपूर्वक निर्णय घेऊन दान केलेल्या देहात फरक करणं अवघड आहे हे कळतं. शेवटी सगळेच देह इन्सिनरेटरला... तरीही विचार केल्याशिवाय राहवत नाही.

इब्लिस खुप छान खुलासा.

देहदानासंबंधी लिहालच, पण एक सांगावेसे वाटते, मृतदेहाची डिग्निटी असा काही विचार मनात यायचे काही कारणच नाही. अगदी हिंदू तत्वज्ञानही, जीर्ण वस्त्र असेच म्हणते ना नश्वर देहाला ?

आताच काही महिन्यांपुर्वी माझे बाबा गेले..आणि तेव्हा आम्ही त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदान केले..पेढीच्या लोकांचा अनुभव फारच चांगला होता..वेळेत आले..सरळ शब्दात योग्य ती माहिती दिली..आणि त्यावेळची सर्वाची मनस्थिती लक्षात घेउन काहिही जास्त चौकशा न करता, भराभर व्यवस्थित काम करुन गेले.नंतर ८ दिवसानी सर्टिफिकेट आले आणि मध्ये काही दिवसांपुर्वी एक कृतज्ञता कार्यक्रम झाला..त्यात सर्वानी आपले अनुभव शेअर केले..

>>मृतदेहाची डिग्निटी असा काही विचार मनात यायचे काही कारणच नाही. अगदी हिंदू तत्वज्ञानही, जीर्ण वस्त्र असेच म्हणते ना नश्वर देहाला ?
काही वेळा तत्त्वज्ञान पुस्तकांत(च) ठीक आहे. मृतदेहाचीही डिग्निटी असते. म्हणूनच वर्तमानपत्रा/बातम्यात ते दाखवू नयेत असा संकेत आहे. म्हणूनच शत्रूच्या हाती सापडलेल्या वीराचा देह हातात यावा, त्याला सन्मानानं मूठमाती दिल्या जावी ही धडपड असते. म्हणूनच अंत्यसंस्काराला काही महत्त्व आहे. याच कारणानं गंगेत टाकलेल्या देहांची विटंबना बघवत नाही.... आणि बरंच काही बोलता येईल. पण तो या बीबीचा विषय नव्हे.

सॉरी मृण्मयी, माझ्या पोस्टने भावना दुखावल्या असतील तर.
पण एकदा वैद्यकिय अभ्यासासाठी मृतदेश दिल्यानंतर, विद्यार्थी पण त्याकडे अभ्यासविषय म्हणूनच बघणार.
त्यांच्यासाठी तोच विचार योग्य आहे.
वर्तमान पत्रात फोटो, गंगा वगैरे सामान्य माणसासाठी ठिक आहे.

खुप छान, उपयुक्त माहिती दिलीत दोधानी. पण तरीही काही शंका आहेत...... इब्लिस्...तुम्ही वर लिहीलेत कुणाला याचा उपयोग होणार नाही........डायबेटीसमुळे पडदा खराब झालेले, पडदा निखळलेले (रेटिनल डिटॅचमेंट), ऑप्टिक अ‍ॅट्रोफी ('नस' सुकलेले) इ. लोकांना दृष्टी येण्यासाठी याचा उपयोग नाही. पण डायबेटीस झालेले नेत्रदान करु शकतात का?
नेत्रदान/देहदान केल्यावर त्याचा योग्य तो उपयोगच होईल याची गॅरेंटी काय?
नेत्रदान्/देहदान करण्यासाठी डोनर कार्ड एका देशात भरला आणि मृत्यु दुसर्‍या देशात झाला तर???

लोकहो,
आपण वाचलेत व आपल्याला याबद्दल आस्था व उत्सुकता आहे हे पाहून छान वाटले.
उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

@ विद्याक.
१.
असे लोक नेत्रदान करू शकतात, हे मी वरच लिहिले आहे. कंसात. हे पहा:
>>
सगळ्याच अंधांना याचा उपयोग नाही. जसे, डायबेटीसमुळे पडदा खराब झालेले, पडदा निखळलेले (रेटिनल डिटॅचमेंट), ऑप्टिक अ‍ॅट्रोफी ('नस' सुकलेले) इ. लोकांना दृष्टी येण्यासाठी याचा उपयोग नाही.

(मात्र, अशा पेशंटचा कॉर्निया दान केला जाऊ शकतो!)
<<
कॉर्निया दान म्हणजेच नेत्रदान.

२.
नेत्रदान/देहदान केल्यावर त्याचा योग्य तो उपयोगच होईल याची गॅरेंटी काय?.
<<
हे दान तुम्ही रस्त्यावरच्या संशयास्पद भिकार्‍याला देत नाही आहात. नेलेला कॉर्निया ही भयंकर प्रेशियस टिश्यू असते. जर तो दुसर्‍या पेशंटला दिसण्यासाठी बसवता नाही आला, (याला ऑप्टिकल केरॅटोप्लास्टी म्हणतात) तरी त्याचा डोळा वाचविण्यासाठीच वापरता येतो. (थेरप्युटिक केरॅटोप्लास्टी) अगदी वापरण्याआधी स्पेक्युलर मायक्रोस्कोपी इ. मुळे तो वापरास अयोग्य ठरला, तर तो ससूनमधून युनिव्हर्सिटी ऑफ पुणेला आमच्या काळी रिसर्च साठी नेऊन देत असू.

कोणत्याही परिस्थितीत डोळा फेकून दिला जात नाही. न वापरता येण्यासारखी परिस्थिती अँटिसिपेट करता आली असेल, तर दान न स्वीकारता डॉक्टर दिलगिरी व्यक्त करून निघून जातील. खूप क्वचित परिस्थितीत घेतलेले रक्त HIV +ve असले, तर डोळा योग्य प्रकारे destroy केला जाईल.


नेत्रदान्/देहदान करण्यासाठी डोनर कार्ड एका देशात भरला आणि मृत्यु दुसर्‍या देशात झाला तर???
<<
याचेही उत्तर माझ्या पोस्टमधेच आहे. खरे तर पहिल्याच परिच्छेदात. तुम्ही कितीही कार्डे भरलीत, तरी actual execution of your will is in the hands of your next of kin..
तुमचे वारसच तुमच्या अखेरच्या इच्छा कशा अन किती पाळायच्या याचा निर्णय घेतात, अन तो कायद्याने अ‍ॅक्सेप्टेबल आहे.

मृण्मयी, श्री, दिनेशदा.
(या विषयी तिघांनी मते व्यक्त केलीत म्हणून तिघांची नांवे. धाग्याच्या विषयाशी अवांतर वाटत असले, तरीही एक विशिष्ट उंबरठा ओलांडून पाऊल पलिकडे टाकण्यासाठी गरजेचे आहे म्हणून देहदानाचा निर्णय घेण्याचा विचार करणार्‍यांसाठी टंकलेला प्रतिसाद आहे. इतरांनी कृपया वाचू नये.)

>>
माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला वाचताना-लिहिताना या गोष्टी जरा मॉर्बिड वाटतात. पण विचारणं आवश्यक वाटतं. देहदान केल्यानंतर खरंतर यायला नको, पण अनेक प्रश्न डोक्यात येतात. मेडिकल अभ्यासासाठी वापरला जाणार देह कसा वागवला जातो? मृतदेहाची डिग्निटी सांभाळल्या जाते का? अभ्यासकाच्या दृष्टीनं रस्त्यावर सापडलेला बेवारस देह आणि एखाद्या व्यक्तीनं अत्यंत जाणीवपूर्वक निर्णय घेऊन दान केलेल्या देहात फरक करणं अवघड आहे हे कळतं. शेवटी सगळेच देह इन्सिनरेटरला... तरीही विचार केल्याशिवाय राहवत नाही.
<<

बीबीचा विषय नाही असे मृण्मयी म्हटल्या आहेत.

सर्वात आधी,
मी इतरत्र एके ठिकाणच्या चर्चेत पुढील वाक्य टंकले आहे. "मी स्वतः डिसेक्शन केलेल्या स्त्रीदेहाने मला आईने दिले तितकेच ज्ञान दिले असे मी म्हणेन!" In my opinion, THAT is the dignity offered to that body by any and all medical students.

या ऊपर, डिग्निटी म्हणजे नक्की काय? विवस्त्रता? दवाखान्यात गेल्यावर आपण वस्त्रांची तमा बाळगायची असते का? की या जगातून गेल्या नंतर? अहो, येताना वस्त्रे नव्हती. गेल्यावर त्यांचा काय उपयोग?

अन एकदा वस्त्रेच काय, शरीरावरची त्वचाही निघून गेली की मगच शरीरशास्त्राची गुपिते त्या विद्यार्थ्यास उघड होणार ना? देहदानाची कल्पना करून आशंकित होणे ठीक आहे. मी तर ता माऊल्यांनाही नमस्कार करतो, ज्या सार्वजनिक रुग्णालयांत वैद्यक विद्यार्थ्यांसमोर सर्व तपासण्या 'जिवंतपणी' करू देतात.

बाकी या सगळ्या भावना मनात असल्या, तरी १७ वर्षे वयातल्या विद्यार्थ्यांसाठी त्या क्षणाला ते एक शरीराचे "मॉडेल" असते. अन त्याला हजार गोष्टींपाठी धावायचे असते. दान करून गेलेल्या व्यक्तीच्या मनी, या विद्यार्थ्यांप्रति तोच मोठेपणा असतो, -असायला हवा, जो त्याने अंगावर शी शू करणार्‍या तान्ह्या बाळाला दाखवलेला असतो. मला नाही वाटत, डिसेक्ट झालेया शरीरांतील एकाही आत्म्याने आजवर एकाही विद्यार्थ्याला बोल लावला असेल..

अन यापुढे जाऊन सांगतो. मनात थोडीही शंका असेल, तर नकाच देहदान करू. कारण ते 'दान' आहे. कठिण असते. Happy

>>या ऊपर, डिग्निटी म्हणजे नक्की काय? विवस्त्रता?
नाही, नाही. अजीबातच नाही. या बीबीला भरकवटायला नको म्हणून या पुढलं विचारपुशीत किंवा संपर्कातून.

इब्लिस... माझी ही शंका ...नेत्रदान्/देहदान करण्यासाठी डोनर कार्ड एका देशात भरला आणि मृत्यु दुसर्‍या देशात झाला तर???
याचा खुलासा करते....म्हणजे मला असे विचारायचे आहे की , आता मी अमेरिकेला आहे इथे मी एकदा डोनर झाली ,पण काही वर्षाने भारतात परत आले तर मला पुन्हा डोनर कार्ड काढावे लागेल का?
.....वारस, नातेवाईक काय करतील ते तर आहेच.
आणि, तुम्ही वर लिहीलेत कि, मनात शंका असतील तर देहदान करु नका.. हे पटत नाही... कारण कोणतेही "दान " केले तरी ते वाया जाउ नये एवढीच ईच्छा! भिकार्‍याला दान देत नाही हे माहित आहे पण आजकालच्या जगात अवयवांचा पण काळाबाजार कसा चालतो हे आपल्याला माहित आहे. तेव्हा दान करणार्‍याला हे सर्व जाणुन घेण्याचा अधिकार हा आहेच. असे मला वाटते.

विद्याक ताई,
तो 'रस्त्यावरील संशयास्पद भिकार्‍याला' शब्दप्रयोग माझ्याकडून 'हे कुपात्री दान नव्हे', हे सांगण्यासाठी केला गेला. माझ्या लिहिण्याच्या सवयी मुळे, वेगळा अर्थ ध्वनित झाला असेल, तर त्याबद्दल क्षमस्व.

तिथे मी नेत्रदानाबद्दल सांगत होतो.
'त्या' डोळ्यासाठी कधीच कुणी रेसिपियंटकडून पैसे आकारलेले माझ्यातरी ऐकिवात नाही. सरकारी रुग्णालयांतील अशा शस्त्रक्रीया मोफत आहेत. खासगी नेत्रपेढ्यांतूनही सर्जिकल चार्जेस फक्त घेतले जातात, म्हणजे ऑपरेशन, अ‍ॅडमिट होणे इ. चा खर्च. अवयवाचा ग्राफ्ट कोणत्याहीप्रकारे चार्ज केला जात नाही.

'देहदान' केल्यावर, जर ते शरीर वैद्यकिय महाविद्यालयात अभ्यासासाठी दिले गेले, तर त्यातील कोणताही अवयव काळ्या/पांढर्‍या बाजारत विकलाच जाऊ शकत नाही, कारण त्याचा उपयोग फक्त डिसेक्शनसाठी असतो.

भारताबाहेरील देशांत याप्रकारच्या दानासंदर्भी काय कायदे आहेत व परिस्थिती कशी आहे याची मला कल्पना नाही, कुणी जाणकार असतील तर त्यांनी जरूर माहिती द्यावी.

अधिक चर्चा व्यनीतून केलीत तरी चालेल.

इब्लिस धन्यवाद, या विषयात अजून बरेच लोकशिक्षण व्हायला हवे. डिसेक्शनचा इतिहास बघितला, तर त्यावर धर्माची कितीतरी बंधने होती, असे दिसून येते. तरीही त्या सगळ्या अडचणींवर मात करुन, मानवी देहाचा अभ्यास ज्यांनी केला, ते खरोखरच धन्य आहेत.

छान माहीती.............
.
.
अतिशय उपयुक्त

Pages